चित्रपट समीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रपट समीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

गुठली लड्डू || Guthali Laddu || शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी समान असतो का ? या बाबत विचार करायला लावणारा चित्रपट

 गुठली लड्डू 

guthali-laddu-movie-review-apali-writergiri-blog


गुठलीची आई गुठलीला आपल्या जाती बद्दल सांगत असते कि, आपण भंगी आहोत. आपल्याला त्या शाळेत शिकण्याचा अधिकार नाही. तू हि वडिलांसारखा भंगी बनणार. "  गुठली विचारतो कि , "भंगी कोण असतो ?" आई उत्तर देते कि, "साफसफाई करणारा भंगी असतो." गुठली, "मग तो मिठाई पण दुकानाची साफसफाई करतो. मग तो पण भंगी आहे. प्रत्येकजण घर साफ करतो तो पण भंगी आहे. " त्याच्या आईला आणि आपल्याला हि  निरुत्तर करणारा सात - आठ वर्षाचा "गुठली" नामक मुलाची हि गोष्ट आहे. 

गावातील सरकारी शाळा बंद झाली. गावातील सरस्वती विद्यामंदिर नामक खाजगी शाळेत उच्च वर्णीय व्यतिरिक्त मुलांना प्रवेश मिळत नाही. शिक्षक व नेता असो किंवा   गावातील छोट्याशा टपरीवरील चहावाला प्रत्येक जण सफाई कामगाराला बहिष्क्रुत करतात.  साधा चहाचा कप किंवा सायकल ला हात लावला तरीही त्याला मारले जाते किंवा शिवीगाळ केली जात. त्यांनी जर चुकून हात लावला किंवा सावली जर कोणावर पडली  तर त्यानंतरही आंघोळ केली जाते. छोट्या छोट्या प्रसंगातून जातीय भेदभाव बद्दल वास्तववादी मांडणी केली आहे. असे अनेक प्रसंग या चित्रपटात मांडले आहेत ज्यातून तळागाळातील समाज किती दबलेला आहे आणि उच्च वर्णीय कसे याला कळत नकळत कारणीभूत आहे हे दिसून येईल. 

संविधानाने मूलभूत हक्क दिले आहेत. शिक्षणाचा अधिकार हि सर्वाना दिलेला आहे. तरीही संपूर्ण समाजातील जातीय विचारधारा इतक्या दृढ आहेत यामुळे तळागाळातील समाज आज देखील त्यांच्या या हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहिला आहे.  "संविधान म्हणजे एक जादूचे पुस्तक आहे." असे म्हणत संविधाना शिकण्याचे महत्व खूप सुंदर पद्धतीने समजावले आहे.

दिग्दर्शक इशरत खान यांच्या या चित्रपटाचे जवळपास 50 चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झाले असून हा सन्मान मिळण्याचे कारण चित्रपट पाहिल्यानंतर स्पष्ट होईल. गुथली (धनय सेठ), लड्डू (हीत शर्मा) आणि संजय मिश्रा सारख्या कलाकारांनी या अप्रतिम काम या  चित्रपटात केले आहे. 

Available on Amazon prime and You tube

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

लुनाना: अ याक इन द क्लासरूम || Lunana: A Yak in the Classroom Movie Review

 "लुनाना: अ याक इन द क्लासरूम" एका सत्यकथेवर आधारित चित्रपट आहे. " जिग्मे दोरजी" यांच्या जीवनाचा शिक्षक म्हणून प्रवासाचे यात चित्रण केले आहे. " शिक्षकाच्या हातात भविष्याची चावी असते." हा महत्व पूर्ण संदेश या चित्रपटाने मांडला आहे. "लुनाना" गावातील शाळा हि फक्त भूतान मधील नाही तर जगामधील सर्वात दुर्गम गावातील एक शाळा आहे. या गावात पोहचण्यासाठी ७-८ दिवस पायी प्रवास करावा लागतो. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे गाव आहे. जिथे जवळपास रस्ता नाही, वीज नाही, दुकान नाही आणि हॉस्पिटल नाही. शाळा आहे पण ती देखील हिवाळा सुरु झाल्यावर बंद होते.  कारण हिमालयात नदी बर्फाने गोठू लागल्यावर या गावातून कुठेच प्रवास करता येत नाही. 

Lunana A Yak in the Classroom movie review apali writergiri blog
PC:Google

या चित्रपटात भूतानमधील आधुनिक शहर आणि ग्रामीण पारंपरिक  जीवनाचे सुंदर चित्रण केलेले पाहायला मिळते.  या चित्रपटाची कथा एका "उग्येन" नामक तरुण आणि महत्त्वाकांक्षी शिक्षकाभोवती फिरते. उग्येन हा सरकारी शाळेत शिक्षक असतो. पण त्याला शिक्षक म्हणून त्या नोकरीत अजिबात रस नसतो आणि काम करण्याची इच्छा नसते. त्याला  ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन गायक बनायचे असते. त्याला आरामदायी आणि सुखसोयीने समृद्ध वाटणारे  शहरी जीवन जगायचे असते. पण शाळेसोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे अनिच्छेने त्याला " लुनाना" नामक  दुर्गम गावात शिकवण्याची जबाबदारी दिली जाते. करारानुसार शेवटचे ३ महिने शिल्लक असतात म्हणून तो 'लुनाना' गावी जाण्याचा निर्णय घेतो.  शहरातून "लुनाना" गावी पोहचण्याचा प्रवास  खूपच चित्तथरारक आहे.  

७ दिवसांच्या प्रवासानंतर 'लुनाना' सारख्या दुर्गम गावात पोह्चयल्यावर मात्र त्याला आपण इथे शिकवण्याची जबाबदारी पार पाडू शकत नाही म्हणून पुन्हा घरी जाण्याची विनंती करतो. कारण तिथे  ना वीज, ना रस्ता, ना मोबाईलला नेटवर्क, ना शौचालय, ना फळा वैगरे  शहरासारखी कोणतीच आधुनिक सुविधा नसते. पण तेथील सरपंच सांगतात कि, "लगेच परतीचा लांब प्रवास अशक्य आहे कारण प्रवासाचा थकवा दूर होण्याकरिता काही दिवस थांबण्याचा सल्ला त्याला दिला जातो." 

त्या वेळी उग्येन गावातील मुलांना शिकवण्याचा आणि स्थानिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो.  गावाची संस्कृती, दैनंदिन जीवन आणि चित्तथरारक हिमालयीन आयुष्य कसे असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या गावातील गावकऱ्यांचा निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी घट्ट नाते आहे. यासाठी ते कायम निसर्गाचे उपकार मांडत असतात. "याक" हा इथला देवाप्रमाणे मानला जाणारा एक प्राणी आहे. याकचे इथल्या ग्रामीण पारंपरिक जीवन आणि निसर्गाशी महत्वपूर्ण जोडणारे गुंतलेले नाते आहे. उग्येनला  संपूर्ण गावात "शिक्षक" म्हणून त्याला खूप मान मिळतो कारण, इथे  "शिक्षकाच्या हातात भविष्याची चावी असते." हि महत्वपूर्ण शिकवण त्याला शिकायला मिळते.  एक निराश, इच्छा नसणारा शिक्षक ते  गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण किती महत्वपूर्ण आहे म्हणून आपुलकीची भावना शोधणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा प्रवास खात्रीपूर्वक चित्रित केला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या व्यक्तिरेखेशी भावनिक पातळीवर जोडता येते. 

भूतान मधील पहिला ऑस्कर नॉमिनेशनला पोहचलेला हा चित्रपट आहे. तसेच याला अनेक आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत. हा चित्रपट एका सरकारी शिक्षकाचा प्रवास दाखवतो. चित्रपटातील सुंदर हिरवळ असेलेले गाव, साधी माणसे आणि साधी राहणी प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालतो. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी भूतानच्या लँडस्केपचे विस्मयकारक सौंदर्य कॅप्चर करते, दर्शकांना दुर्गम आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात पोहोचवते. २019 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. अमझोन प्राईमवर हिंदी भाषेत हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com





 

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

शांतता! कोर्ट चालू आहे || Shantata! Court Chalu Ahe || Vijay Tendulkar

 शांतता! कोर्ट चालू आहे...

"शांतता कोर्ट चालू आहे" विजय तेंडुलकर यांचे नाटक भारतभर १४ भाषांमध्ये प्रदर्शित झाले. ज्यात १९६७ मध्ये त्यांनी "कुमारीमाता- भ्रूणहत्या " सारख्या  विषयाची मांडणी केली आहे.  गंमत म्हणजे या नाटकाचे मला विकिपीडिया पेज दिसले. पण जेव्हा त्या ते पेज वाचले तेव्हा  लक्षात आले कि, यात नाटकाच्या विषयाबद्दल काहीच लिहिले नाही.  त्यानंतर अजून काही लेख शोधण्याचा प्रयत्न केला तरीही फारसे लिखाण दिसले नाही. 

shantata-court-chalu-ahe-vijay-tendular-sulabha-deshpande-apaliwitergiri


"विजय तेंडुलकर"  हे नाव ऐकले कि साहजिकच त्यांनी लिहिलेली नाटके डोळ्यासमोर  उभी राहतात. घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, कमला, गिधाडे, माणूस नावाचे बेट यासारखे अनेक प्रसिद्ध नाटके त्यांनी लिहिली. त्यांनी ६०-७० च्या दशकात लिखाणातून एक वेगळी क्रांती करण्याचा प्रयत्न केला. नाटक हे फक्त विरंगुळ्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नसून त्यातून समाजाचा आरसा देखील दाखवता येतो. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश आपल्या लिखाणांमधून टाकला.  यांच्या खडतर स्पष्टपणामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आणि त्यांच्यावर टीका विरोध हि तितकेच झाले. 


त्यातीलच एक नाटक म्हणजे "शांतता कोर्ट चालू आहे." या नाटकाला ५५हुन हि अधिक वर्षे पूर्ण झाली. या नाटकातील प्रमुख पात्र  'सुलभा बेणारे' ही भूमिका करणाऱ्या सुलभा देशपांडे यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती. त्यांनतर "रेणुका शहाणे" यांनी हि भूमिका पार पडली.  


या नाटकात एक नाटक कंपनी दाखवली आहे.  ज्यात बेणारे बाई या शिक्षिका या नाटक कंपनीतील अभिनेत्री असतात.  जे न्यायालयीन खटल्याचे नाट्यमय रूपांतर सादर करीत असतात. या नाटकात असेच सर्व कलाकार दुसऱ्या ठिकाणी नाटकाच्या सादरीकरणासाठी जातात पण त्याचवेळी त्यांच्यातील एक कलाकार नाहीसा होतो. 

त्याच्या जागी ते एका नवीन पात्राला घेतात. पण त्याला नाटक म्हणजे काय हेही माहित नसते. नाटक सुरु होण्यासाठी देखील अजून वेळ असतो म्हणून त्या नाटक कंपनीतील  बेणारे बाई नावाच्या पत्रावर खोटा खटला लढवून त्याला नाटक  शिकविण्याचे ठरवतात. बेणारे बाईच्या आयुष्यात आलेले पुरुष येऊन बेणारे बाई कशी बेताल बाई आहे हा आरोप तिच्यावर लावण्यात येतो.  हा खोटा आरोप आणि खोटा वाटणारा खटला कसा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खऱ्या घटनांना जोडला जातो.   त्यानंतर बेणारे बाईच्या आयुष्याचे सत्य स्वरूप बाहेर पडते. समाजाकडून तिच्यावर आरोपांचा भडीमार सुरु होतो. यात फक्त आणि फक्त स्त्रीलाच दोषी कसे ठरविले जाते. यातून सुटण्याचा ती खूप प्रयत्न करते. पण तिला ते शक्य होत नाही.  यातील बेणारे बाईने " जीवन हि एक महा भयंकर गोष्ट आहे. " या मनोगताच्या वेळी जीवन आणि समाजाचा क्रूर चेहरा समोर मांडण्याचा प्रयत्न करते.  'कुमारीमातेला' दिली जाणारी दूषणे, कलंक, आरोपांचा भडीमार, समाजापासून एकटे करणे. अश्या अनेक मुद्द्यांवर बेणारे बाई हे पात्र भाष्य करते.   


आज हि  आपल्या  आधुनिक समाज सहज कुमारीमाता ताठ मानेने चारचौघात राहताना दिसणार नाही. एक तर तिला आश्रमात ठेवले जाते किंवा राहते घर - कुटुंबापासून दूर कोणत्या तरी गावी ठेवले जाते. जिथे तिला कोणी ओळखत नाही. जर अशी कुमार माता समोर आली तर, आज हि तितकीच मौन पाळले जाते. आणि त्या मौनातून तिला दोषी ठरविले जाते. तिच्या जीवावर बेतून गर्भपात केले जातात किंवा भ्रूणहत्या केली जाते किंवा त्या बाळाला मंदिरात सोडून दिले जाते. विजय तेंडुलकर यांच्या लिखाणातील काळातही संकुचित मानसिकतेचा समाज दाखविला आहे.  आज काळ बदलला तरीही समाजाची मानसिकता मात्र अजूनही तशीच संकुचित राहिली आहे. 


सदर नाटकाची लिंक  : 

शांतता कोर्ट चालू आहे . 



Anjali Pravin

amkar.anju@gmail.com


सोमवार, १७ जुलै, २०२३

Vakeel Babu Short Film || वकील बाबू

 

vakeel-babu-hindi-shortfilm-abhishek-banerjee-apali-writergiri

हि एक शॉर्टफिल्म आहे. ज्यात एक साधारण वकील आहे जो... फॅमिली मॅटर्सवर छोटीमोठी कामे करतो. पण हाच वकील 

कौटुंबिक हिंसाचार आणि इतर तत्सम प्रकरणांमध्ये महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर मदतीबद्दल ऑनलाइन व्हिडिओ बनवीत असतो.  यामुळे अनेक महिलांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याबद्दल माहिती हि मिळत असते.  

पण ते व्हिडीओ पाहून अनेक लॉचे विद्यार्थी आणि महिला त्या वकिलाकडे मार्गदर्शनासाठी येत असतात. एकूणच हे व्हिडीओ म्हणजेच त्या वकिलाची केसेस मिळविण्यासाठीची एक स्ट्रॅटेजी असते.  

पण त्या पब्लिसीटीच्या नादाने एकदा एका कौटुंबिक हिंसाचार पीडित महिलेची गोपनीयता / प्रायव्हसीचा विचार न करता तिचा व्हिडीओ युट्युबला पब्लिश केला जातो. यामुळे त्या वकिलाला तर खूप प्रसिद्धी मिळते पण त्या पीडित महिलेला मात्र या सर्वच नाहक त्रास होतो. ती पुन्हा कधी कोर्टात येत नाही. 

एक वकील म्हणून यातील अभिनेत्याचा खरा प्रवास इथूनच सुरु होतो.  RIGHT TO PRIVACY  -  Article 21गोपनीयतेचा मूलभूत हक्क संविधानाने दिलेला आहे. पण स्वतःचा फायदा आणि प्रसिद्धी साठी अनेकदा या गोपनीयतेच्या हक्काची पायमल्ली होताना दिसते.  

न्यूज चॅनेल आणि सोशलमीडिया हे इतके पॉवरफुल माध्यम आहे कि, TRP आणि views साठी याचा जितका फायदा तितकेच नुकसान लोकांच्या खाजगी आयुष्यात होत असेल हा विचार हि केला जात नाही. 

पण या वकिलाच्या आयुष्यात या व्हिडीओ वाल्या घटनेनंतर एक अशी कौटुंबिक हिंसाचाराची केस येते. ज्यात त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव हि होते व त्याची भरपाई करण्यास एक पाउल देखील उचलतो. 

नेमके यात काय होते हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण शॉर्ट फिल्म फ्री अमॅझॉम मिनी टीव्ही वर पाहू शकता. 

Vakeel Babu

वकील बाबू 





शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

जया जया जया जया हे "Jaya Jaya Jaya Jaya He - Movie Review"

 "जया जया जया जया हे"


या वर्षी बॉक्स ऑफिसवर पुष्पा, केजीएफच्या आणि आर आर आर  सारख्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीने लाऊड - हिंसक मसाला स्टोरीने खूप जोरदार कमाई केली.  पण या प्रत्येक चित्रपटातील स्त्री पात्र कायम मला पुरुषात्तक पद्धतीखाली दबलेले दिसले. प्रत्येक चित्रपटात अभिनेता त्या  अभिनेत्रीची खुलेआम छेड काढतो. तिला चिमटे काढतो. अश्लील भाष्य देखील करतो. तरीही  त्याला नंतर प्रेमाचे नाव दिले जाते. तर बाकी पूर्ण चित्रपटात  अभिनेत्री हे पात्र फक्त नामपात्र दिसते. या  सर्बाव चित्कीरपटातील स्त्री पात्र म्हणजे फ़क़्त शोभेची बाहुली इतकाच अर्थ निघतो.  
हे सर्व चित्रपट पाहून  समाधान मिळाले किंवा मस्त करमणूक झाली असे कधीच वाटले नाही. 

या गुरुवारी हॉटस्टारवर "जया जया जया जया हे" मूळ - मलयाळम चित्रपट स्ट्रीमिंग झाला.

आणि खरं सांगायचं तर, 

वर्षा अखेरीस लक्षात राहील असा चांगला मुव्ही पाहिला याचे समाधान मिळाले.

उगीच 
ना मिर्च मसाला
ना मोठे फिलॉसॉफिकल डायलॉग्ज
ना उगीच धांगड धिंगा
ना कोणते ग्राफीक्स 
नं मोठे सेट्स 


"जया जया जया जया हे" हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट  आहे. विपीन दास यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  तर 
दर्शना राजेंद्रन हिने "जयाभारती" आणि बसील जोसेफ याने "राजेश" जयाचा नवरा हि प्रमुख भूमिका साकारली आहे. 


या चित्रपटातील जयाचे  शालेय जीवनापासून ते वैवाहिक जीवनातील अनेक चढउतार दाखवले आहेत. "जया" या पात्राला - काय शिकायचे ? कुठे शिकायचे ? स्वतः चे मत मांडायचे ? स्वतः साठी निर्णय घ्यायचे ? स्वतः चे अस्तित्व दाखवायचे ? याचा कसलाच अधिकार नाही. लग्नाआधी सर्व अधिकार तिचा मामा आणि वडिलांकडे असतात. कॉलेजला गेल्यावर कोणता ड्रेस घालायचा ? ओढणी कशी ठेवायची ? केस कसे विंचरायचे ? टिकली लावायची ?  याचे सर्व अधिकार प्रियकराकडे असतात.  लग्न झाल्यावर सहाजिकच सर्व मालकी हक्क नवऱ्याकडे असतो. यातील  नवऱ्याचा स्वभाव म्हणजे एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर चटकन राग आणि पटकन तिला कानाखाली द्यायची.  
लहान पणापासून ते लग्न झाल्यावर देखील  सहन करत असलेले कौटुंबिक हिंसाचार आणि तिचे मत न विचारणे  याच विषयाला धरून चित्रपट एक इंटरेस्टिंग वळण घेतो.  
खरंतर तिने कोणालाच हे आपल्या आयुष्याचे  निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले नसतात पण समाजात रुजलेल्या पुरुषसत्ताक पद्धतीने तिच्या आयुष्यातील या पुरुषांनी ते अधिकार स्वतःकडे तिच्या निर्णय किंवा मतांना न जुमानता ठरवलेले असतात.
या चित्रपटातील स्त्री पात्राला फारसे मोठे -मोठे सवांद किंवा डायलॉग्स नाही. पण तिची एक नजरच कमालीची बोलून जाते.
चित्रपटाची सुरुवात - मध्य आणि शेवट खूप धमाकेदार आणि उत्सुकता वाढवणारा आहे. 

पुरुषात्तक पध्दतीचे एक वास्तववादी प्रतिबिबं या चित्रपटातून दिसून येते.
प्रत्येकाने आवर्जून पाहावा.
ज्या मुली कधी स्वतः साठी निर्णय घेऊ शकत नसतील त्यांनी नक्कीच यातून  जयासारखी जिद्द शिकावी आणि प्रेरणा घेण्यासारखा हा चित्रपट आहे.

यातील जयाला पाहून कदाचित अनेक स्त्रियांना स्वतःचे प्रतिबिंब नक्कीच यातून दिसेल.    
 तसेच यातील जयाला पाहून नक्कीच एक जोरदार  शिट्टी वाजवायची इच्छा होईल. 

शुक्रवार, २७ मे, २०२२

एस्केप लाइव : जिथून तुम्ही कधीच एस्केप करू शकत नाही


एस्केप लाइव सिरीज रिव्हियू


आजकाल कुठेही थोडासा निवांत क्षण मिळाला तर त्यावेळी लगेच हात आपल्या मोबाईलकडे जातो. त्यातही साहजिकच कोणते ना कोणत्या सोशल मीडिया अप्लिकेशन आपल्याकडून कळत नकळत ओपन होते.  एक एक पोस्ट स्क्रोल करू लागतो. आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला त्याच आवडीच्या प्रकारातील वेगवेगळ्या व्हिडीओ पोस्टचे अनेक ऑप्टशन्स प्रत्येकवेळी मोबाईलला पॉअप होऊ लागतात.  ऑफिस, घर, शाळा किंवा कॉलेज कोणत्याही वयाचा कोणत्याही गाव किंवा शहरातील करोडोने व्यक्ती आज व्हिडीओ  रिल्स बघणे किंवा बनवणे  हे एक करमणुकीचे साधन म्हणून स्वीकारले आहे.
 
"एस्केप लाइव" या  सिरीज मधून आपल्या आजूबाजूला अनेक घटनांचा संबंध घेऊन एक थ्रिलर सिरीज तयार केली आहे. ज्यात एस्केप लाइव नामक एक अप्लिकेशन लोकप्रिय होऊ लागते ज्यात पूर्ण भारतभरातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या वयाचे लोक आपले टेलेन्टचे किंवा करमणुकीचे व्हिडीओ बनवून टाकतात तर लाखो करोडो लोक ते बघतात. या कंपनीचे मूळ उद्देश हा कि, " एस्केप लाइव या नावाप्रमाणे हि कंपनी खऱ्या आयुष्यातून आपल्याला बाहेर काढून आपले टेलेन्ट लोकांसमोर प्रदर्शित करण्याचे एक प्लॅटफॉर्म तयार करून देते."  ज्यांचे व्हिडीओ जास्त फॉलोअर, लाईक्स आणि डायमंड जास्त त्यांना काही रक्कम मानधन म्हणून मिळू लागते.  पण खरी स्पर्धा इथूनच सुरु होते कि दररोज खूप सारे  फॉलोअर, लाईक्स आणि डायमंड मिळावे म्हणून ती व्यक्ती स्वतःला इतकी हरवून बसते कि वास्तवाशी पूर्णतः संबंधच तुटला जातो. . 
या सिरीज मधील सोशल मीडिया अँप मध्ये ते सर्व कथित इन्फ्लुइन्सर पाहायला मिळतील की जे डान्स, प्रॅन्क,स्टंट, गायन वैगरे करतात. ही स्पर्धा जिंकण्यासाठी सगळे स्पर्धक जीवांच रान करताना पाहायला मिळतात. ही सिरीज 5 पात्रं भोवती फिरत असते.
पहिला डार्की, जो सतत सोशल मीडिया च्या आहारी गेल्यामुळे रागावर नियंत्रण हरवुन बसला आहे. दुसरी डान्स राणी, जी 10 वर्षाची मुलगी जीला तिच्या मामाने पैशासाठी हार्मोन्स ची इंजेक्शन देऊन तिच बालपण बरबाद केलं आहे. तीसरी मीना, जी ट्रान्सवूमन आहे पण समाजापासून ओळख लपवली आहे फक्त व्हिडिओस मधून ती स्त्री म्हणून लोकांसमोर येते. चौथी आहे कृष्णा, जी fetish girl या नावाने मास्क घालून व्हिडिओ बनविणारी North-East राज्यातील एक मुलगी की जीला समाज सतत तिच्या वांशिकतेमुळे जज करत असतो. आणि पाचवं पात्र आहे स्वामी, जो एस्केप लाईव्ह साठी काम करत असतो जो थोडासा जुन्या विचारांचा पण बंडखोर असतो.

या प्रत्येक पात्राची एक चांगली बाजू आहे आणि तितकीच काळी बाजू ही आहे. आभासी जगाची स्पर्धा जिंकण्यासाठी वास्तविक जीवनाची कशी नासाडी होतें याच भयाण चित्रण या सिरीज मधून केलं आहे.


सिद्धार्थ, जावेद जाफरी ,  श्वेता त्रिपाठी , स्वस्तिका मुखर्जी, ऋत्विक साहोरे,प्लाबिता बोरठाकुर, वलूचा ,  सुमेध मुदगलकर, गीतिका विद्या ओहल्यान, जगजीत संधू, रोहित चंदेल असे अनेक कलाकार या सिरीज मध्ये दिसून येतात. हॉटस्टारवर हि सिरीज स्ट्रीमिंग होत आहे.

ही सिरीज का बघावी?

1. आजकाल लहान मुलांच सोशल मीडिया प्रोफाईल्स असतात पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील ? हे जाणून घेण्यासाठी

2. सतत च्या सोशल मीडिया मुळे मानसिक ताण येतो किंवा येऊ शकेल याची कल्पना सहसा नसते, ते किती भयंकर असू शकते याच उत्तर ही सिरीज द्यायचा प्रयत्न करते.

3. खास पालकांसाठी, रिल्स बनविणे या कडे करिअर म्हणून बघण्याआधी ही सिरीज बघा. लहान मुलं ही त्यांच्या बाल्य अवस्थेत चांगली वाटतात. 

4.  सोशल मीडिया  सर्वच वास्तवापासून दूर जात आहोत. हे या सिरीज च्या माध्यमातून समोर येते. आणि अनेक निरुत्तर करणारे प्रश्न समोर येतात .
 लहान मुलांचे बालपण व्हिडिओ टेलेन्टच्या नावाने खरच हरवून बसतो का ?
मुलांना मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी आपण लावतो का ?
आपण स्वतः हि या सोशल मीडियाच्या आहारी गेलो आहात का ?

सर्वांनी आवर्जून पहा.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

जयंती :जयभीम-जयशिवराय घोषणेंच्या पलीकडे जाणारा उत्सव

जयंती :जयभीम-जयशिवराय घोषणेंच्या पलीकडे जाणारा उत्सव

"जयंती" हे नाव वाचलं किंवा ट्रेलर पाहिला की खालील प्रश्न 100% मनात येतात.

जयंती चित्रपटातील जयंती नेमकी कोणाची आहे ?
शिव जयंती की भीम जयंती ?
कोणी बघावा, शिव भक्तांनी की भीम भक्तांनी ?

कोणत्या समाजासाठी / जातीसाठी हा चित्रपट बनलाय ?
प्रत्येकाला माहीत आहे की आपल्या देशात जयंत्या कशा साजऱ्या होतात.  त्या कशा करू नये यावर हा चित्रपट उपदेश तर नाही आहेत ना?
असे अनेक प्रश्न मनात येतात. 

या साऱ्या प्रश्नाची उकल करत हा चित्रपट जयभीम जयंशिवराय या घोषणेंच्या पलीकडे जातो. बाबासाहेबाना मानणारा समाज असो, शिवाजी महाराजांना मानणारा समाज असो , किंवा  महात्मा फुल्यांना मानणारा समाज.... पण ज्यांना मानता त्यांचे अंधभक्त आणि डोळस अनुयायी यांच्यातील संघर्ष या चित्रपटाने खूप प्रभावी पणे मांडला आहे.

चित्रपटाची पार्श्वभूमी
चित्रपटाची कथा ही एका अशा नायका (ऋतुराज वानखडे)  भोवती फिरत असते की जो स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा समजत असतो पण त्याला शिवजयंतीला मुसलमानांची वर्गणी चालत नसते. घरात बाबासाहेबांचा फोटोही नको असतो कारण त्याच्या आईला घरात *जयभीम* वाले नको असतात.  शिवाजी मान्य असतो पण मुलीला रस्त्यात अडवण्यात त्याला काहीच चूक वाटत नसते. 
 एकंदरीत जातीवादी आणि धर्माध असा या चित्रपटाचा नायक असतो. 
याच नायकाच्या मनातल्या अंधभक्ताची आणि त्याच्यातच दडलेल्या डोळस अनुयायीशी संघर्ष चालू होतो. 
आता या संघर्षाचा नेमका परिणाम काय होतो हे समजण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पहावा लागेल. 

चित्रपटातील प्रतीकं

चित्रपटात धनंजय किर यांनी लिहिलेल डॉ  बाबासाहेब आंबेडकर , कॉ पानसरेनी लिहिलेलं शिवाजी कोण होता? महात्मा फुलेंच गुलामगिरी आणि  आ.ह. साळुंखेच विद्रोही तुकाराम या पुस्तकांचा प्रतीक म्हणून केलेला वापर या चित्रपटाचं वेगळंपण दाखवतो.  एका प्रसंगात पुरोहितकडून बांधून घेतलेले धागे गंडे फेकून देणं, हे बंधन झिडकरण्याचं प्रतीक दर्शवितो.   भगवे, निळे झेंडे, गाड्यांवरच्या घोषणा आणि स्टिकर्स, जयंतीच्या पार्ट्या.... अशा प्रसंगाचा प्रतीकं म्हणून केलेलं वापर  हा चित्रपट निळ्या, भगव्या , हिरव्या रंगाआढ लपलेलं नग्न वास्तव दाखवतो.

चित्रपटातील भाषा

मराठी चित्रपट हा आजकाल टिपिकल पुणेरी लाहेजात अडकलेला असताना, या चित्रपटाने वऱ्हाडी फोडणी झणझणीत दिली आहे.या चित्रपटाने उघड भाषेचा केलेला वापर या चित्रपटाला वास्तववादी बनवतो. चित्रपटातले संवाद ही चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणावी लागेल. 

चित्रपट का पहावा?

हा चित्रपट प्रत्येकाने बघावं....कडू सत्य कदाचित पचनी पडणार नाही .... पण रोग बरा करायला औषध कडूच लागत.
तुम्ही महाराजांबद्दल / बाबसाहेबाबद्दल कितीही आदर असला किंवा द्वेष असला तरी हा चित्रपट पहावा.

एका चित्रपटाने बाबासाहेब किंवा महाराज नाही समजणार पण त्यांना समजून घ्यायची दिशा हा चित्रपट देतो.
शेकडो वर्षाची जळमटे बाजूला काढून जयभीम आणि जयंशिवराय चा खरा अर्थ समजून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा.

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

जोजो रॅबिट - फासिसमचे समर्थन करण्याआधी जरूर पाहावं

 जोजो रॅबिट - फासिसमचे समर्थन करण्याआधी जरूर पाहावं

Credit: https://www.shutterstock.com/

जोजो रॅबिट हा ताइका वाईटिटी यांनी दिग्दर्शित केलेला हिटलरच्या नाझीवादावर आधारित विनोदी पण तितकाच संवेदनशील जर्मन चित्रपट आहे. चित्रपटाची कथा ही जोजो , या नाझीवाद आणि वंशश्रेष्ठत्वाने प्रभावित असलेल्या 10 वर्षाच्या मुलाच्या आणि त्याच्या कल्पनेत असलेला त्याचा मित्र हिटलर या दोन पात्रांभोवती  फिरते. ही कथा एका काल्पनिक शहरात घडत असली तरी या कथेला दुसऱ्या महायुद्धाच्या अमानवी हिंसेची पार्श्वभूमी आहे. 10 वर्षाचा मुलगा जोजो (रोमन डेविस) आर्य (?) वंशीय मुलगा या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. जोजो हा कट्टर नाझी असतो आणि त्याच्या डोक्यात सतत ज्यू वंशाविषयी घृणा पेरण्याच काम त्याच्या कल्पनेतला त्याचा मित्र हिटलर (ताइका वाईटिटी ) करत असतो. ज्यू किती वाईट आहेत आणि आर्य वंश किती श्रेष्ठ आहे याचे धडे कल्पनेतला  हिटलर जोजोला देत असतो. जोजो हा हिटलरच्या बाल सेनेचा सदस्य असतो, सेनेत त्याला ज्यूविषयी विष पेरणे, युद्ध करणे , हिंसा करणे, पुस्तक जाळून हत्यार हाती घेणे  ई अमानवी गोष्टी शिकवल्या जात असत. सेनेच्या प्रमुखाने जोजोला एक निष्पाप ससा (रॅबिट) मारायला सांगतो पण जोजो ते जमत नाही. जोजो हा सस्यांसारख भित्रा आहे म्हणून त्याच नाव जोजो रॅबिट ठेवल जात.
वंशश्रेष्ठत्व कस महत्वाचं आहे आणि युद्ध हिंसा इत्यादींचे समर्थन का केले पाहिजे यावर सतत जोजोच आणि त्याच्या मित्राचं ब्रेनवॉश चालू असत. यात जोजो च्या कल्पनेतला मित्र हिटलर भर घालत असतो. आर्यवंश कसा सर्वोत्तम आहे आणि ज्यू लोक कशी हलक्या जातीची असतात हे सारख तो हिटलर जोजो ला सांगत असतो
कथेला कलाटणी मिळते ती जोजो च्या घरात नाझीपासून लपलेल्या एका ज्यू मुलींमुळे. एलसा नावाची एक ज्यू मुलगी जोजो च्या बहिनीची मैत्रीण असते. एल्सा जोजो च्या आईनेच घरात लपवून ठेवलेले असत, कारण तिलाही माहीत होतं की एल्सा जर नाझी लोकांना सापडली तर तिला अमानुष रित्या मारले जाईल.
जोजो एल्साला ज्यू विषयी अनेक प्रश्न विचारतो, आणि प्रत्येकवेळी गोंधळात पडतो. त्याच्या कल्पनेतल्या मित्राने दाखविलेला ज्यू आणि एल्सा या ज्यू मुलीने दाखविलेला ज्यू फार वेगळा असतो. जोजो त्या एल्साला ज्यू जिथे राहतात त्याच चित्र काढायला सांगतो तेव्हा एल्सा जोजो च डोकं काढते. (भारतात पण अशा अनेक परजाती केवळ जातीच्या डोक्यातच राहत असतात).
जोजो ला जे ज्यू लोकांबद्दल सांगितलेलं असत ते आणि त्याच्या घरात लपलेली ज्यू मुलगी यातला फरक त्याला गोंधळात टाकत असतो.
जोजो च्या मनातलं द्वंद्व त्याला भंडावून सोडत असत. प्रस्थापित समाजव्यवस्थेला धक्का देणारे विचार समोर आल्यावर स्वतःशी होणार वैचारिक युद्ध याचित्रपटात खूप प्रभावीपणे मांडले आहे.
हा चित्रपट जरी तात्कालिक जर्मनी बद्दल सांगत असला तरी हा चित्रपट सद्य परिस्थितीवर भाष्य करतो. 
जोजो ची फाशीवाद आणि वंशवादापासून सुटका होते का?
हिटलरच्या प्रभावातून जोजो मुक्त होतो का?
त्या ज्यू मुलीचं पुढे काय होत? नाझी तिला मारतात का?
या सर्वांची उत्तरे विनोदी पद्धतीने पण तितक्याच संवेदशीलतेने हा चित्रपट देतो.
हसवत हसवत, फॅसिस्ट सत्तेला चपराक लावणारा हा चित्रपट आहे. याआधी चार्ली चॅप्लिन यांचा अशाच प्रकारचा the great dictator नावाचा चित्रपट आला होता.
हा चित्रपट Hot star वर हिंदी मध्ये उपलब्ध आहे.

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

Halla Ho 200 Movie Review

 या चित्रपटाची कथा १३ ऑगस्ट २००४ कस्तुरबा नगर परिसर नागपूर येथील अक्कू यादव नामक सवर्ण जातीतील गुंडाला  २०० महिलांनी नागपूर कोर्टात घुसून मिरची पावडर व घरातील हत्यारे घेऊन न्यायालयात त्याचा जमावाने खून केला. यावर आधारित आहे.... पण हि फक्त एक कथा नाही... २०० महिलांच्या जमावाने एका व्यक्तीला इतक्या क्रूरतेने मारणे म्हणजे नक्कीच यामागे कारण हि त्याच प्रकारचे असले पाहिजे. या सत्यकथेत किंवा सत्यघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दलित समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या क्रूर अन्यायाचा आणि संघर्षाचा प्रवास दाखवला आहे. भारतीय न्यायव्यवस्था आणि प्रशासन यांच्याकडून जात – वर्ण व्यवस्थेनुसार होणारा अन्याय याचा एक आरसा दाखवतो.


या चित्रपटाची सुरुवातच स्वयंपाक घरातील दररोजची घरगुती कामे करतानाच्या महिला.... आणि थोड्यावेळातच त्या आपल्या रोजच्या कामातीलच कैची, चाकू, मिरची पावडर, कोयता यासारखे धारदार वस्तू घेऊन  महिलांचा एक मोठा जमाव घराबाहेर पडतात इथून होते....

या चित्रपटातील  त्या गुंडाचे नाव “बल्ली “ असते. जो त्या दलित वस्तीतील रोज एका महिलेवर लैंगिक अत्याचार करायचा. जर कोणी पोलीस तक्रार दाखल केल्यास त्या व्यक्तीला भर वस्तीत मारून टाकायचा. कालांतराने बल्ली ज्या घरातून महिलेसाठी निरोप देई त्या घरातील महिला स्वतः – मुलीला – सुनेला त्याच्याकडे सोडून येई. १० वर्षे सतत हा क्रूर अत्याचार सुरु राहिला आणि एक हि पोलीस तक्रार दाखल झाली नाही. काही जणांनी आपल्या मुलीला लहानपणीच दुसऱ्या गावी किंवा शहरांत आपल्या मुलीना सोडून आले. अशीच एक “ आशा सुर्वे” नावाची मुलगी हा सर्व प्रकार बघून पोलीस तक्रार करते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. तिच्यातील जिद्द बघून वस्तीतील इतर माणसे तिला सहकार्य करतात. पण पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेकडून होणारी निराशा त्यांना आधीच माहिती होती. याच अपयशी न्यायव्यवस्थेमुळे हा महिलांचा जमाव त्या बल्ली गुंडाचे तुकडे तुकडे करून क्रूरपणे हत्या करतात.

पण चित्रपटाची कथा इथे संपत नाही... त्या दलित वस्तीतील महिलांचा संघर्ष हि तिथे संपत नाही. या पुढे त्यांचा पोलीस प्रशासन आणि नायव्यवस्थेशी संघर्ष सुरु होतो. भारताची न्यायव्यवस्था आणि संविधान सर्वाना समान हक्क देत असले तरीही कागदावरील तो सामान हक्क आणि सामान न्यायव्यवस्था प्रत्यक्ष जीवनात मात्र नामपात्र दिसून येते. हा चित्रपट मला आपल्या समाजातील न्यायव्यवस्था जवळून दाखवणारा एक आरशाप्रमाणे वाटतो.

 

दलित वस्तीतील जमावाने एका उच्च वर्णीय गुंडाला मारलं म्हणजे अर्थात गुन्हा दाखल होतो काही महिलांना अटक केली जाते. पोलीस कोठडीत मारहाण केली जाते. त्वरित त्या महिलांना शिक्षापण दिली जाते. निवडणुकीचा मुद्दा म्हणून राजकीय पक्ष यात हस्तक्षेप सुरु करतात.  एक किमिटी स्थापन केली जाते. आणि पुढे एक कोर्ट रूम ड्रामा सुरु होतो.

या चित्रपटातील हा कोर्ट रूम ड्रामा मला सर्वात जास्त आवडला. ज्यात अमोल पालेकर यांनी विठ्ठल डांगळे नामक निवृत्त न्यायाधीशाची उत्तम भूमिका केली आहे.  चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि वस्तीतील इतर पात्रे – खलनायक या सर्वांनी खूप उत्तम अभिनय केला आहे.

उगाच मिर्च मसाला भरलेला नाही यामुळे काही जणांना कदाचित हा चित्रपट अधिक मनोरंजक नाही वाटत. पण मला यातील साधे सरळपणामुळे  हा चित्रपट अधिक जास्त आवडला.

या चित्रपटात मला म. फुलेचे विचारसरणीतील वाक्य रिंकू राजगुरूच्या पात्रातून समोर आले ते अधिक आवडले.

मध्यम वर्गा खाली असतो गरीब वर्ग.

गरीब दारिद्र्य रेषेच्या खालील लोकां नंतर येतात दलित.

दलितापेक्षा हि अधिक खाली असतात दलित स्त्रिया

 

माझे जमावाने केलेल्या मोब्लीन्चींगला समर्थन नाही. पण जर आपली नायावावस्था त्या दलित स्त्रियांना सुरक्षा देऊ शकत नसेल तर शिक्षा देण्याचा हक्क हि ठरवू शकत नाही.


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारा आहेत. तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


 

 

 

रविवार, २० जून, २०२१

अवनी २०१८ आणि शेरनी २०२१


 

२०१८ मध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात “टी-१ किंवा अवनी” नावाने ओळखली जाणारी वाघीण शोधमोहीम आणि तिला ठार केल्या प्रकरणी खूप चर्चा झाल्या. यवतमाळ येथील राळेगाव तालुक्यातील  ‘बोराटी - वारूड मार्गातील गावामध्ये ’  अवनी या वाघिणीला नरभक्षक होती असे सांगून तेरा ते चौदा जणांचा जीव घेतल्याचे आरोप होते. पण डीएनए टेस्टनुसार अवनीने पाच  जणांवर हल्ला करून ठार केले होते. साधारणत: वीस महिने हि शोधमोहीम सुरु होती.  गावातील लोकांना जंगलात जाऊ नये याचे आदेश देण्यात आले होते. जंगलातील tap कॅमेराद्वारे वाघिणीच्या हालचालीचा अभ्यास करण्यात आला होता. वेगवेगळ्या टीम आणि कमिटी यावर काम करत होत्या. राजकारणी हि या मुद्द्यात जवळून लक्ष देत होते. वनविभाग ती वाघीण जिवंत पकडून किंवा नेशनल पार्कच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करत असतानाच “असगर” या खाजगी शिकाऱ्याने तिला ठार केले. त्यांतर बेशुद्ध करण्याचा डारट मारण्यात आला होता. याबद्दल अनेक चर्चा झाल्या पण चौकशीमध्ये  अखेरीस काही निष्पन्न  झाले नाही. याबद्दल अनेक जणांनी tweet करून अवनी बद्दल शोक व्यक्त केला होता. याच मुद्द्याला अनुसरून अलीकडेच “शेरनी” चित्रपट एमेझोन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. विद्या बालन, विजय राज आणि इतर कलाकार यांनी प्रमुख भूमिका केली आहे. अमित मसुरकर यांनी उतम चित्रपट दिग्दर्शन आणि लेखन केले आहे.

विद्या बालन हि नुकतीच नवीन ट्रान्स्फर होऊन त्या वनविभागात येते. त्या प्रभागातील जंगलातील  प्राण्यांसाठी असणारे पाणी टंचाई आणि  जंगल तोड प्रश्नाविषयी मुद्दे मांडायला सुरवात करत असते पण गावातील राजकारणामुळे ती हतबल असते. त्याच दरम्यान वाघिणीच्या नरभक्षण मुद्द्याला सुरुवात होते. ती वाघीण जिवंत राहावी म्हणून खूप उपाययोजना करते. गावातील लोकांना “फोरेस्ट मित्र” बनवून जंगले-वनचर यांबद्दल जाणीवजागृती करते. पण इथे हि राजकारण येतच आणि अखेरीस वाघिणीचा मृत्यू होतो.

Save The Tiger,  Save The Planet”  हा संदेश या चित्रपटातील त्या आदिवासी गावातील एका मुलाने खूप साध्या सरळ भाषेत सांगितला आहे.  त्या गावकऱ्यांनी देखील हि गोष्ट समजून घेतली आहे. पण सुशिक्षित म्हटला जाणारा समाजच या चित्रपटात जास्त असमजुतदार दिसला आहे.

एकूणच वन्यजीव संरक्षण या संवेदनशील मुद्द्याला धरून उत्तमरीतीने आणि वास्तववादी मांडणी करणारा चित्रपट आहे. उत्तम दिग्दर्शन आणि अभिनय आहे. उगाच बॉलीवूड मसाला भरला गेलेला नाही.

एमेझोन प्राईमवर हा चित्रपट पाहायला मिळेल.

 

रविवार, ३० मे, २०२१

आसुरन आणि कर्णन


asuran-karnan-movie-review

हे दोन्ही चित्रपट वेगवेगळे असले तरीही दोन्ही चित्रपटाची कथा हि स्वतंत्र भारतातल्या गुलाम किंवा अस्पृश्य म्हणून गणती होणाऱ्या समाजाच्या संघर्षाची कथा आहे. “दलित समाज” म्हणजे नेमके कोण होते? त्यांच्यावर कोणत्या प्रकारची हिंसा झाली होती? त्यांच्यावर सवर्ण समाज कश्या प्रकारे छळ करायचे ? दलित समाजाला या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी किती बळी द्यावे लागले ? किती काळ द्यावा लागला ? दलित समाजाचा विकास होण्यास नेमके कोणते अडथळे येतात ? दलित समाजाला आज हि नेमके आरक्षणाची आणि कायदे संरक्षणाची गरज का आहे ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे आणि दलित समाजाची व्यथा आणि संघर्ष गाथा या दोन्ही चित्रपटाच्या कथेतून मांडली आहे.  

आसुरन :

“आसुरन” हि चित्रपटाची कथा साहित्यिक पुमई यांच्या “वेक्कई” कादंबरीवर आधारित आहे. सिनेमाचं दिग्दर्शन वेट्रीमरन या साऊथच्या दिग्दर्शकाने केलं आहे. २०१९ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.  धनुष आणि मंजू हे प्रमुख कलाकार या चित्रपटात आहेत. राष्ट्रीय पुरस्कार ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार हि या चित्रपटाला मिळाले आहेत. चित्रपटाची कथा हि थोडक्यात म्हणजे  जमिनीच्या तुकड्यासाठी दलित समाजाच्या कुटुंबाने सावकाराशी केलेला संघर्ष म्हणजे “आसुरन”. या चित्रपटाची  कथा शिवा नावाच्या शेतकरी कुटुंबाची आहे. शिवा हा खूप अबोल – दारूच्या नशेत बुडालेला दाखविला आहे. त्याची दोन्ही मुले मात्र रागीष्ट आणि अन्याय सहन न करणारे दाखविले आहे. सवर्ण सावकाराशी  जमिनीचे वाद सुरु होतात तेव्हा शिवा ते भांडण मिटविण्यासाठी संपूर्ण गावासमोर माफी मागतो. पण मुलांना हे कळल्यावर मात्र हे भांडण – हत्यारे हातात घेऊन घातपातात रुपांतर होते. याच वेळी शिवाचे अबोल रूप आपल्या परिवाराला  वाचविण्यासाठी रोद्र होते. मुळातच शिवा हा ज्वालामुखीप्रमाणे होता पण पूर्वार्धातील अश्याच घातपाताच्या घटनेमुळे आपले पूर्ण कुटुंब – गाव गमावल्याची खंत  मनात राहिल्याने शांत आणि अन्याय सहन करण्याचा मार्ग स्वीकारला होता. पण  यावेळेस आपल्या कुटुंबाच्या  संरक्षणासाठी  पुन्हा त्या   जातिवाद आणि हिंसा यांचे खूप भीषण स्वरूप बघावे लागू नये म्हणून चित्रपटाच्या अतिंम क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिला आहे. प्रामुख्याने या चित्रपटातून न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि शिक्षणाचे महत्व खूप आशादायी आणि सकारात्मकरीतीने मांडली आहे.

कर्णन :

२०२१ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.क्षणी या सिनेमाचं दिग्दर्शन मारी सेल्वराज आणि निर्मिती कालैपुली यांनी केलं आहे.  धनुष, राजीषा, लाल, नटराजन आणि इतर  हि  प्रमुख कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची सुरुवातच खूप संवेदनशील  अशी सुरु होते. एक मुलगी रस्त्याच्यामध्येच फिटने तडफडून मरत आहे. आजूबाजूने अनेक बस – गाड्या जात आहेत पण कोणीही तिच्या मदतीला थांबत नाही. याच सुरुवातीच्या प्रसंगाला धरून संपूर्ण चित्रपटाची कथा आधारलेली आहे. या चित्रपटात एक असे गाव दाखविले आहे. जिथे बस थांबत नाही कारण त्या गावात दलित – वंचित समाज राहत असतात. जर या गावाला बस मिळाली तर या गावातील लोक बाहेर सहज शिक्षण घेऊ शकतील, नोकरी करू शकतील आणि गावाचा विकास होऊ शकतो. हाच गावातील विकास होऊ नये म्हणून आजूबाजूच्या गावातील राजकारणी येथे बस थांबू देत नाही. हे गाव कायम दलित – वंचित आणि अविकसित राहावे म्हणून गावातील विकासाचे मार्ग हे अनेकदा थांबविले गेले आहे. कर्णन म्हणजे एक असा तरुण आहे ज्याला हि विषमता नष्ट करण्यासाठी कशाचेही भय नाही. ज्याचा समता – शिक्षण आणि संघर्ष यावर विश्वास आहे. अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो असा विचार करणारा आहे.

एकाचवेळी भीती,  प्रेम,  आनंद, आणि अचानक काळजाचा ठोका चुकवणारे प्रसंग, प्रचंड करुणा आणि शेवट या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळेल. उत्तम कथेसोबतच धनुषची अप्रतिम भूमिका या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळेल. या दोन्ही चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “शिका – संघटीत व्हा आणि संघर्ष करा.” या ब्रीद वाक्याला धरून दोन्ही संघर्ष दाखविले आहेत. दोन्ही चित्रपटांच्या अखेरीस “शिक्षणाच्या प्रकाशाची”  एक सकारात्मक बाजू या दोन्ही चित्रपटातून उत्तम पद्धतीने मांडली आहे.  

आपल्याकडे जर जमीन असेल तर ती कोणीही बळकावून घेईल.आपल्याकडे पैसे असतील तर कोणीही लुटून घेईल. पण जर आपल्याकडे शिक्षण हे शस्त्र एकदा मिळविले की कोणी आपल्याकडून ते हिरावुन घेऊ शकत नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण हेच एक प्रभावी माध्यम आहे. पण या माध्यमाचा चुकीचा वापर नको करू. जसे काही अधिकारी शिक्षण आणि अधिकाराचा चुकीचा वापर  करत आले आहेत.

मूळ चित्रपट हे तमिळ भाषेत असले तरीही हिंदी – इंग्रजी अनुवाद आणि शीर्षक हि या चित्रपटाचे पाहायला मिळतील. एमेझोन प्राईम आणि युट्युबला हे चित्रपट पाहायला मिळतील. नक्कीच हे चित्रपट पाहिल्यानंतर मन सुन्न होऊन जाते. दोन्ही चित्रपटातील अनेक असे संवेदनशील आणि मन -डोके  विचार सुन्न करणारे प्रसंग दिसून येतील कि, माणूस सत्ता किंवा जातीच्या अहंकारापोटी कसा दुसऱ्याला गुलाम बनवितो.

मी स्वतः हि हे दोन्ही  चित्रपट पाहिल्यानंतर  विचार सुन्न होऊन गेले होते. हा ब्लॉग करायला हि त्यामुळे उशीर झाला. मास्टरपीस अश्या या दोन्ही चित्रपटाबद्दल नेमके व्यक्त होऊ सुचत नव्हते. शेवटी इतकेच सांगेन कि, नक्की पाहा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा.

 

 

बुधवार, २६ मे, २०२१

Sound of Silence Movie Review

 Sound of Silence Movie Review

apali-writergiri-sound-of-silence
PC: MKVmoviespoint

डॉ. बिजुकुमार  या मल्याळम दिग्दर्शकाने दिग्दर्शित- लिखित  आणि डॉ. ऐके पिल्लई यांनी निर्मीत केलेला हा चित्रपट आहे. वर्ष २०१७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. हिंदी, पहाडी आणि तिबेटीयन भाषा हा चित्रपटात दिसून येते.   बालकलाकार गोवर्धन, उदय चंद्रा आणि भूषण यांनी प्रमुख भूमिका केली आहे.

चित्रपटाची कथा :

या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हिमालयीन प्रदेशात झालेले आहे. चित्रपटाची मुख्य कथा त्या बालकलाकाराच्या आयुष्याशी निगडीत असते. जो जन्मतः मुका असतो. तसेच त्याच्या जन्माच्या वेळीच आईचा मृत्यू झालेला असतो. या कारणास्तव त्याचे वडील हि त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. त्याचे वडील दारूचे व्यसन आणि भांडण यांच्या आहारी गेलेले  असतात. वास्तविक जीवनात त्या मुलाला ना  कोणी नातेवाईक आणि मित्रपरिवार  असतो ज्याच्याकडून त्याला प्रेम आणि जिव्हाळा मिळू शकेल. आपली आई आणि वडिलांपासून हवे असणारे प्रेम. तो बालकलाकार आपल्या स्वप्नात शोधायचा प्रयत्न करायचा. जिथे तो बोलू शकतो. आपल्या आईला भेटू शकतो. वडिलांचे प्रेम मिळते. पण वास्तवात मात्र वडिलांचा तिरस्कार हे सत्य होते. याच चित्रपटात एक बुद्धिस्ट सन्यासी त्यांच्या गावात वास्तव्य करणारा दाखविला आहे. यांचे एक मार्गदर्शक गुरु आणि शिष्य यांसारखे नाते दाखविले आहे. दोघे एकत्र मेडिटेशन करताना आणि सुंदर विचारांची देवाणघेवाण करताना दिसतात. जेव्हा त्या मुलाचे वडील एका गुन्हामुळे जेलमध्ये निघून जातात. वडील आपल्या मुलाची ओळख हि दाखवत नाही . अश्यावेळी ते  बुद्धिस्ट सन्यासी या मुलाची शिकण्याची आणि समजून घेण्याची ओढ पाहून एका मोनेस्टरी शिकण्यासाठी दाखल करतात. इथून त्याच्या आयुष्याला अजून एक सुंदर वळण मिळते.

एकूणच संपूर्ण चित्रपट हा त्या मुलाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर आधारित आहे. आयुष्यातील एकटेपणा, संघर्ष आणि प्रयत्न अगदी सध्या- सोप्यापद्धतीने मांडले आहे. एकाकी आणि  संघर्षमय जीवनात हि एक सकारात्मकता लपलेली असते. गौतम बुद्धांची सर्वसमावेशक विचारधारा आणि  शिकवण  या चित्रपटातून उत्तम पद्धतीने मांडली आहे.

युट्युबवर सदर चित्रपट पाहायला मिळू शकेल. 

 

 

मंगळवार, ११ मे, २०२१

कोकणावर आधारित चित्रपट

 कोकणावर आधारित चित्रपट

apali-writergiri-kokan-movie-review-hapus-kaksparsh-ventilator

आज कोकणी माणसं कामानिमित्त कोकण सोडून इतर जिल्हाराज्य किंवा देशात वास्तव्य करत आहे. पण कोकणी व्यक्ती  जगाच्या कोणत्याही ठिकाणी राहायला गेला तरीही कोकणी व्यक्ती  इथली मातीनिसर्ग  आणि  माणसं यांची आपुलकी हि कायम मनात राहिलीच. कोकणावर आधारित चित्रपट असला कि,  हेच आपले पण कोकणी माणूस कायम शोधायचा प्रयत्न करत असतो. इथली मधाळ  कोकणी भाषा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी कोकणी व्यक्ती कायम आतुर झालेला असतो.  अगदी फेसबुकवर पोस्ट पाहताना पण कोकणातील काही दिसले कि लगेच आपण ती व्हिडिओ किंवा पोस्ट पूर्ण वाचतो किंवा बघतो. असेच काही कोकणावर आधारित  चित्रपट आहेत जे आपल्याला आपल्या मातीशी आणि माणसाशी जोडून ठेवतात.

नवरा माझा नवसाचा :

हा एक कॉमेडी चित्रपट आहे.  सचिन पिळगांवकर, अशोक सराफ  आणि सुप्रिया पिळगांवकर हे प्रमुख कलाकार आहेत. सचिन पिळगांवकर यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट बॉम्बे टू गोवा या जुन्या हिंदी  चित्रपटा सारखाच आहे. 

ज्यात सचिन आणि सुप्रिया त्यांच्या लहानपणीचा नवस फेडण्यासाठी राज्यपरिवहन बस मार्गे गणपतीपुळे येथे जात असतात.  हा प्रवास करताना इतर सह प्रवासीच्या  छोट्या छोट्या गमतीशीर गोष्टी सर्वाधिक लोकप्रिय आहेत.  हा चित्रपट पाहताना कोकणचा प्रवास केल्याचा आनंद नक्कीच मिळेल. सोबतच गणपतीपुळे मंदिराचे सुंदर दर्शन हि मिळून जाते.

हापूस :

या चित्रपटात कोकणातील शेतकरी कुटुंबाची विनोदी कथा पाहायला मिळते. या चित्रपटात शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, पुष्कर श्रोत्री, सुलभा देशपांडे, मृणाल देशपांडे आणि इतर कलाकार या चित्रपटात उत्तम काम केले आहे. या चित्रपटातूनच शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम यांनी प्रथमच या   चित्रपट  दिग्दर्शन करत आपले पदार्पण केले आहे.

या चित्रपटातील "आंबा पिकतो रस गळतो... कोकणचा राजा कसा धंदा मांडतो..." या गाण्यातील अर्थानुसारच संपूर्ण चित्रपटाची कथा आधारीत आहे. "हापूस" आंबा म्हणजे कोकणचा राजा आहे. पण तरीही कोकणातील शेतकरी मात्र या हापूस ने आपल्या कुटुंबाचं पोट  का भरू शकत नाही?  कोकणातील आंबा बागायतदार असलेले कुटुंब जेव्हा आंब्याचा व्यापार करताना  झाडावरील आंबा बाजारात येई पर्यंत किती अडचणींना सामोरे जात असतो. पण कितीही अडचणी असल्या  कुटुंबाची एकजूटता हि या चित्रपटात खूप उत्तम पद्धतीने मांडली आहे. कोकणच्या निसर्ग सौंदर्याची उत्तम सिनेमॅटोग्राफी या चित्रपटात दिसेल पण कोकणी भाषेची कमतरता हि दिसून येते.  पण तरीही जे आंब्याचा व्यवसाय करतात त्यांना हा चित्रपट आपलासा नक्कीच वाटेल.

व्हेंटिलेटर चित्रपट :

राजेश म्हापुस्कर दिग्दर्शित आणि प्रियांका चोप्रा निर्मित हा एक विनोदी आणि भावनिक यांची रंगसंगत असेल चित्रपट आहे.  या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील १०० हुन अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे.  संपूर्ण चित्रपटाची कथा हि  "कामरकर" या कुटुंबावर आधारित आहे.   कामरकर कुटुंबातील सर्वात मोठे काका हे अचानक मोठा आजाराने कोमा मध्ये जातात. ते व्हेंटिलेटरवर असल्याची बातमी त्यांच्या नातेवाईकांना कळते. याच दरम्यान कोकणातील गणेशोत्सव हि येणार असतो.  कोकणातील गणेश उत्सव,  कोकणातील जमिनीवरून कुटुंबातील वाद, नातेवाईकांचे इतर आपापसातील वाद  आणि स्वतःचे वेगवेगळे पैलू दाखवणारे नातेवाईक या सर्व गमती जमतीने भरलेला हा चित्रपट आहे. अखेरचे घटका मोजत असलेले काका आणि चित्रपटातील पात्रे सर्वानीच उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष २०१७ पर्यत सर्वाधिक कमाई केलेला दहावा चित्रपट म्हणून या चित्रपटाची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

 काकस्पर्श : 

गुहागर तालुक्यातील पालशेत मध्ये चित्रीकरण झालेला चित्रपट. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला हा चित्रपट आहे.  सचिन खेडेकर, प्रिया बापट, मेधा मांजरेकर,  केतकी माटेगावकर, अभिजित केळकर आणि वैभव मांगले यांनी प्रमुख कलाकार म्हणून उत्तम भूमिका साकारली आहे.  हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील कोकणी ब्राह्मणी कुटुंबातील ह्र्द्यस्पर्शी वास्तवदर्शी चित्रपट आहे. रूढी परंपराच्या विळख्यात अडकलेला माणूस, विधवा महिलांची घुसमट, स्त्रीचे मुलभूत हक्क आणि पाखंडी समाज यांचे प्रश्न मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात खूप सुंदर अर्थांच्या ओव्या आहेत.  त्यासोबतच निसर्गाने मुक्तहस्ते दान पावलेली कोकण भूमीचे सौंदर्य या चित्रपटात पाहायला मिळते.

नारबाची वाडी :

हा सिनेमा 'सज्जनो बागान' या बंगाली नाटकावर आधारित आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, गुरु ठाकूर यांचे लेखन तसेच दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, किशोरी शहाणे, विकास कदम, निखिल रत्नपारखी यांनी प्रमुख कलाकार म्हणून भूमिका साकारली आहे. संपूर्ण चित्रपट हा कोकणातील नारळी-सुपारीच्या माडीत आणि तिथल्या घरात चित्रीकरण केले आहे. कोकणातील माणस हि नारळ आणि फणसासारखी बाहेरून कडक असेल तरी आतून गोड आणि मधाळ असतात. या चित्रपटातून तोच गोडवा दिसून येतो. गावातील खोताला हि  नारबाच्या वाडीच्या हिरवळ आणि गारव्याने भुरळ पडते. नारबाची वाडी आपल्याला कशी मिळेल? या गमती जमती वर आधारित हा संपूर्ण चित्रपट आहे.  संपूर्ण चित्रपटातील कोकणातली हिरवळ बघून कोकणात जाण्याची इच्छा हमखास होतेच.

किल्ला : 

हा अविनाश अरुण दिग्दर्शित आणि आर्किट देवधर, गौरीश गावडे, अमृता सुभाष, पार्थ भालेराव आणि अथर्व उपासनी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सदर चित्रपटाला अनेक अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच वडील गमवलेल्या आणि आईच्या नोकरीमुळे पुणे शहरातून कोकणातील एका गावात बदली झालेल्या सातवी इयत्तेत शिकत असलेल्या मुलाची कथेवर आधारित हा चित्रपट आहे. बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे प्रयत्न यांचे उत्तम चित्रीकरण केले आहे. या चित्रपटात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रीकरण झाले आहे. चित्रपटात कोकणी भाषेची कमतरता असली तरीही चित्रपटाच्या कथेचा गहिरा अर्थ आणि स्वर्गीय कोकणाची हिरवळ मात्र अप्रतिम आहे. 


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...