सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

लुनाना: अ याक इन द क्लासरूम || Lunana: A Yak in the Classroom Movie Review

 "लुनाना: अ याक इन द क्लासरूम" एका सत्यकथेवर आधारित चित्रपट आहे. " जिग्मे दोरजी" यांच्या जीवनाचा शिक्षक म्हणून प्रवासाचे यात चित्रण केले आहे. " शिक्षकाच्या हातात भविष्याची चावी असते." हा महत्व पूर्ण संदेश या चित्रपटाने मांडला आहे. "लुनाना" गावातील शाळा हि फक्त भूतान मधील नाही तर जगामधील सर्वात दुर्गम गावातील एक शाळा आहे. या गावात पोहचण्यासाठी ७-८ दिवस पायी प्रवास करावा लागतो. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे गाव आहे. जिथे जवळपास रस्ता नाही, वीज नाही, दुकान नाही आणि हॉस्पिटल नाही. शाळा आहे पण ती देखील हिवाळा सुरु झाल्यावर बंद होते.  कारण हिमालयात नदी बर्फाने गोठू लागल्यावर या गावातून कुठेच प्रवास करता येत नाही. 

Lunana A Yak in the Classroom movie review apali writergiri blog
PC:Google

या चित्रपटात भूतानमधील आधुनिक शहर आणि ग्रामीण पारंपरिक  जीवनाचे सुंदर चित्रण केलेले पाहायला मिळते.  या चित्रपटाची कथा एका "उग्येन" नामक तरुण आणि महत्त्वाकांक्षी शिक्षकाभोवती फिरते. उग्येन हा सरकारी शाळेत शिक्षक असतो. पण त्याला शिक्षक म्हणून त्या नोकरीत अजिबात रस नसतो आणि काम करण्याची इच्छा नसते. त्याला  ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन गायक बनायचे असते. त्याला आरामदायी आणि सुखसोयीने समृद्ध वाटणारे  शहरी जीवन जगायचे असते. पण शाळेसोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे अनिच्छेने त्याला " लुनाना" नामक  दुर्गम गावात शिकवण्याची जबाबदारी दिली जाते. करारानुसार शेवटचे ३ महिने शिल्लक असतात म्हणून तो 'लुनाना' गावी जाण्याचा निर्णय घेतो.  शहरातून "लुनाना" गावी पोहचण्याचा प्रवास  खूपच चित्तथरारक आहे.  

७ दिवसांच्या प्रवासानंतर 'लुनाना' सारख्या दुर्गम गावात पोह्चयल्यावर मात्र त्याला आपण इथे शिकवण्याची जबाबदारी पार पाडू शकत नाही म्हणून पुन्हा घरी जाण्याची विनंती करतो. कारण तिथे  ना वीज, ना रस्ता, ना मोबाईलला नेटवर्क, ना शौचालय, ना फळा वैगरे  शहरासारखी कोणतीच आधुनिक सुविधा नसते. पण तेथील सरपंच सांगतात कि, "लगेच परतीचा लांब प्रवास अशक्य आहे कारण प्रवासाचा थकवा दूर होण्याकरिता काही दिवस थांबण्याचा सल्ला त्याला दिला जातो." 

त्या वेळी उग्येन गावातील मुलांना शिकवण्याचा आणि स्थानिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो.  गावाची संस्कृती, दैनंदिन जीवन आणि चित्तथरारक हिमालयीन आयुष्य कसे असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या गावातील गावकऱ्यांचा निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी घट्ट नाते आहे. यासाठी ते कायम निसर्गाचे उपकार मांडत असतात. "याक" हा इथला देवाप्रमाणे मानला जाणारा एक प्राणी आहे. याकचे इथल्या ग्रामीण पारंपरिक जीवन आणि निसर्गाशी महत्वपूर्ण जोडणारे गुंतलेले नाते आहे. उग्येनला  संपूर्ण गावात "शिक्षक" म्हणून त्याला खूप मान मिळतो कारण, इथे  "शिक्षकाच्या हातात भविष्याची चावी असते." हि महत्वपूर्ण शिकवण त्याला शिकायला मिळते.  एक निराश, इच्छा नसणारा शिक्षक ते  गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण किती महत्वपूर्ण आहे म्हणून आपुलकीची भावना शोधणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा प्रवास खात्रीपूर्वक चित्रित केला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या व्यक्तिरेखेशी भावनिक पातळीवर जोडता येते. 

भूतान मधील पहिला ऑस्कर नॉमिनेशनला पोहचलेला हा चित्रपट आहे. तसेच याला अनेक आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत. हा चित्रपट एका सरकारी शिक्षकाचा प्रवास दाखवतो. चित्रपटातील सुंदर हिरवळ असेलेले गाव, साधी माणसे आणि साधी राहणी प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालतो. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी भूतानच्या लँडस्केपचे विस्मयकारक सौंदर्य कॅप्चर करते, दर्शकांना दुर्गम आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात पोहोचवते. २019 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. अमझोन प्राईमवर हिंदी भाषेत हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...