पुस्तक सारांश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक सारांश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

The Horse, The Mole, The Fox and The Boy Book Review

 

पुस्तकाचे नाव : The Horse, The Mole, The Fox and The Boy

लेखकाचे नाव : चार्ली मॅकेसी /Charlie Mackasey


"The Horse, The Mole, The Fox and The Boy" "मुसाफिर आर्टिस्ट" प्रोजेक्टच्या वेळी आर्ट थेरपीच्या प्रवासात हे पुस्तक हातात येणे म्हणजे कोहिनुर मिळाल्याचा आनंदच आहे. या पुस्तकात  पुस्तक एक मनमोहक चित्र  कथा आहे. 

Charlie Mackasey || चार्ली मॅकेसी यांनी लेखक आणि चित्रकार असा दोन्ही बॅलन्स सांभाळत या पुस्तकाची रचना केली आहे. या पुस्तकाचा मूळ गाभा हि साधी सरळ चित्रे, साधे प्रश्न आणि त्याची साधी उत्तरे यांद्वारे सामर्थ्याबद्दल आणि जीवनातील साध्या आनंदाच्या सौंदर्याबद्दल मांडणी केली  आहे.  या पुस्तकातील कथेत पुस्तकाच्या नावाप्रमाणेच एक मुलगा, एक चिचुंद्री, एक कोल्हा आणि एक घोडा हि प्रमुख  पात्रे असतात. 

जे एका प्रवासादरम्यान एकत्र येतात. प्रत्येकाचा विशिष्ठ असा स्वभाव आहे.  मार्मिक संभाषण आणि मार्मिक उदाहरणांद्वारे, पात्र प्रेम, नुकसान, धैर्य आणि दयाळूपणाचा ते शोध घेतात. 

पात्रांची छोटीशी ओळख : 

एक लहान मुलगा जो आपल्या घराच्या शोधात प्रवासावर निघाला आहे.  "हा शोध नेमका कशाचा होता?" हे या पुस्तकातील गूढ आहे.  यातील "घोडा" एक शहाणा आणि सौम्य मार्गदर्शक म्हणून काम करतो, जो मोठा होण्याच्या आव्हानांना तोंड देत असलेल्या मुलाला गहन अंतर्दृष्टी आणि सांत्वन देणारे शहाणपण देतो. "चिचुंद्री" त्याच्या प्रेमळ निरागसतेने आणि अतृप्त कुतूहलाने कॉमिक आराम देते, तर कधी कधी केकसाठी हावरटपणा करते. "कोल्हा" प्रतिकूल परिस्थितीत लवचिकता आणि निष्ठा दर्शवतो. एकत्रितपणे, ते एकमेकांच्या कंपनीत सांत्वन आणि सामर्थ्य शोधून, अस्तित्वाच्या गुंतागुंतांवर नेव्हिगेट करतात.

मॅकेसीची मंत्रमुग्ध करणारी कलाकृती पात्रांमध्ये जीवनाचा श्वास घेते, शेवटचे पान उलटल्यानंतरही अनेक प्रकारच्या भावना निर्माण करतात. चित्रांची साधेपणा त्यांच्या गहिरा  मतितार्थ  कायम ठेवत, वाचकांना विराम देण्यास आणि आत दडलेल्या गहन सत्यांवर चिंतन करण्यास आमंत्रित करते.

"The Horse, The Mole, The Fox and The Boy"  खरंतर हे पुस्तक वाचायचे म्हटले तर वीस मिनिटांच्या आत पूर्ण वाचून होईल.  इतकी साधी सरळ वाक्यरचना आहे कि, शब्दांचे अर्थ आपल्याला उमजले असे वाटेल. पण खरी गंमत तिथेच आहे. साध्या वाटणाऱ्याच गोष्टी समजून-उमजून  घ्यायला जास्त अवघड असतात.   

"What is the bravest thing you've ever said? asked the boy.

'Help,' said the horse.

'Asking for help isn't giving up,' said the horse. 'It's refusing to give up."

याच पुस्तकातील एका चित्राचे वर्णन करताना या ओळी लिहिल्या आहेत. "मदत मागणे." आणि " प्रयत्न करायचा न थांबवणे"  खरंतर अगदी साधी वाटणारी बाब असली तरीही कृती करताना मात्र खूप अवघड असते.  स्वतःमध्ये किंवा  आपल्या आजूबाजूला असे अनेकजण दिसतील कि, ज्यांना योग्य वेळी "मदत" मागता जमत  नाही. तसेच प्रयत्त्न करणे हि थांबवून देतात. याचे गंभीर परिणाम दिसू लागतात. 

अखेरीस, हे पुस्तक करुणा आणि सहानुभूतीच्या परिवर्तनीय शक्तीचा पुरावा आहे. हे आपल्याला आपल्या प्रियजनांसोबतचे क्षण जपण्याचे आणि अपूर्णतेचे सौंदर्य स्वीकारण्याच्या महत्त्वाची आठवण करून देते. 

"The Horse, the Mole, the Fox and the Boy" is a treasure trove of wisdom and wonder, set to become a beloved classic for generations to come.

या पुस्तकातील एक सुंदर वाक्य : 

"The greatest illusion," said the mole, "is that life should be perfect."

----------------------------------------------------------------------------------------------
amkar.anju@gmail.com

सोमवार, १ एप्रिल, २०२४

Norwegian Wood by Haruki Murakami Book Review

 

Norwegian Wood by Haruki Murakami Book Review




काही पुस्तकांबद्दल आपण चुकीचे ऐकतो आणि ते पुस्तक वाचण्याचा कधीही प्रयत्नही देखील केला जात नाही. माझ्यासाठी  "Norwegian Wood" हे एक असेच पुस्तक आहे. कितीतरी वेळा पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक पहिले लावलेले दिसायचे. पण मनात पूर्वग्रह दूषित झालेले होते म्हणून चुकूनसुद्धा  हात लावण्याची कधी तसदी घेतली नाही. हे पुस्तक न वाचण्याचे  निमित्त फक्त इतकंच ऐकून होते कि, "ती एक लव्हस्टोरी होती." मला पुस्तकातले गुलाबी  प्रेम किंवा विरहाचे प्रेम अतिशय कंटाळवाणे वाटते. त्यामुळे सहसा लव्ह स्टोरीज वाचतच नाही.  पण या मागील दोन महिन्यात एका मित्राच्या रेफरन्समुळे दिव्य प्रकाश दुबे यांची "ऑक्टोबर जंक्शन" आणि मानव कौल यांची "अंतिमा" कादंबरी वाचनात आल्या.  यात अनेक वेळा मुराकामीच्या पुस्तकांचे संदर्भ सापडायचे.  न राहवून  "Norwegian Wood" पासून मुराकामीचे पुस्तक वाचायला सुरुवात केली. "Norwegian Wood" कादंबरी पूर्ण झाल्यावर मला  George Eliot चे वाक्य आठवले. ते म्हणजे, “Don't judge a book by its cover” 


पुस्तकाबद्दल थोडक्यात :   

हे पुस्तक मूळ जपानी भाषेत हारुकी मुराकामी या लेखकाने लिहिले आहे. या पुस्तकाचे दोन वेळ इंग्रजी भाषांतर झाले आहे. यावर आधारित चित्रपटही बनले आहेत. साधारणतः प्रेम कथेत फक्त एक -दोन  पात्र असतात. पण या कादंबरीत प्रत्येक पात्र तितकाच महत्वाचा वाटतो. त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यात दिसून येते. मी इतर कादंबरी वाचताना बऱ्याचदा कादंबरीतील इतर पात्रांना सहज विसरून जाते. पण या कादंबरीत सर्व पात्रे मला तितकीच जवळची वाटतात. खरंतर हि एक डार्क रोमान्स कादंबरी आहे. 

"Norwegian Wood"या कादंबरीचे नाव हे Norwegian Wood नामक गाण्यावरून ठेवण्यात आले आहे. ६०च्या दशकातील हे गाणे नातेसंबंध, दु: ख आणि  वासना यावर आधारित आहे.  या कादंबरीची प्रमुख थीम / मुख्य विषय देखील याच भावनांशी निगडित आहे.  ही एक आत्मनिरीक्षण करणारी कादंबरी आहे, कारण यातील पात्रे सतत स्वत:ला शोधून काढत असतात, परंतु ती त्याच्या गाण्याच्या संकेतांसह विस्तीर्ण प्रेक्षकांशी देखील संबंधित आहे.

 इतर कादंबरी मध्ये  बऱ्याचदा एक -दोन  पात्रांवर अधिक फोकस केले जाते आणि बाकीची पात्रे निरर्थक वाटतात. पण या कादंबरीत प्रत्येक पात्र तितकाच महत्वाचा वाटतो. त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यात दिसून येते.  

“I read Naoko's letter again and again, and each time I read it I would be filled with the same unbearable sadness I used to feel whenever Naoko stared into my eyes. I had no way to deal with it, no place I could take it to or hide it away. Like the wind passing over my body, it had neither shape nor weight, nor could I wrap myself in it.”

पात्रांची ओळख : 

"टोरू वतनबे"  नामक पात्रापासून गोष्टीची सुरुवात होते. जो स्वतःची गोष्ट  सांगत असतो. ज्यात त्याच्या सर्वात जवळचा मित्र "किज़ुकी"च्या  आत्महत्येचा उल्लेख होतो.  यामुळे टोरूला असह्य मानसिक त्रास झाला. त्या  दुःखातून सावरण्यासाठी बऱ्याच गोष्टी त्याने केल्या.  त्याने दुसऱ्या शहरात स्थलांतरण हि केले. मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्या एकट्याच्या  वैयक्तिक आयुष्यात बदल झाला नव्हता तर त्यासोबत "नाओको " चे आयुष्यही पूर्ण बदलले होते.  

"नाओको" हि किज़ुकीची प्रेमिका असते. अचानक ते दोघे त्या शहरात ते भेटतात. किज़ुकीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दोघांनाही सावरणे अवघड जात होते. त्यामुळे मैत्रीच्या नात्याने एकमेकांना सपोर्ट करू लागतात.   एखाद्या मानसिक धक्क्यातून सावरणे प्रत्येकालाच जमतं असे नाही. काहीजण दुःखातून लगेच सावरतात तर काहींजण वर्षानुनवर्षे त्याच  दुःखाला कुरवाळून आयुष्य जगतात. नाओको हि अशीच मानसिक त्रासात अडकलेले एक व्यक्ती असते. पण तिला इतका मानसिक त्रास होण्यामागे देखील एक तितकाच आघात करणारा इतिहास असतो. 

"मिदोरी" नावाची हि एक टोरूची  मैत्रीण दाखवली आहे. जी कायम मज्जा मस्ती करणारी दाखवली असली तिच्या या हसण्यामागे वैयक्तीक आयुष्यातील सुरु असलेल्या नैराश्यपूर्ण घटनांचा समोरच्याला पत्ताही लागू देणार नाही. या कादंबरीतील हिचे टोरूची मैत्रीण आणि स्वतःचे वैयक्तिक स्थान हि तितकेच महत्वाचे आहे.  

"नागवासा" नावाचा टोरूचा रूममेट  ज्याला आता पर्यंत शंभरहून अधिक मुलींशी शरीर संबंध ठेवल्यालाचा अभिमान असतो. त्याची "हातसुमी"  नामक शालीन प्रेमिका पण असते. नागवासा आणि हातसुमी हि दोन पात्रांची देखील एक वैयक्तिक ओळख आणि त्यांची रिलेशनशिप एक वेगळेच कोडं असतं. यांचे विचार आणि स्वभाव देखील पूर्णतः वेगवेगळे असतात. तरीही एक विलक्षण नातं त्यांचं असत. त्यासोबत ते टोरूच्या जीवनाशी जोडले जाणे देखील तितकेच सुंदर पद्धतीने मांडले आहे. 

" रेईको" नामक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये ओळख होते. तिचा हि मानसिक आजाराचा एक  इतिहास असतो.  ज्याची ट्रीटमेंट ती या हॉस्पिटलमध्ये घेत होती. ज्यात तिनेही अश्या अनेक चढ -उताराचा सामना केलेला असतो. जी एक आधारस्तंभासारखी त्यांच्या जीवनात येते.  

टोरू आणि मिदोरी, टोरू आणि नाओको, नाओको आणि कुजिकी, मीदोरी आणि तिचा बॉयफ्रेंड याचे प्रेमातील आणि वैयक्तिक जीवनातील  उतार -चढाव, त्यात रेईको, नागवासा, हातसुमी सारखे काही पात्र देखील आयुष्याच्या वळणावर भेटत राहतात.  या प्रत्येक पत्राचे स्वतःची वेगळी ओळख आणि जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. जे कधी एकमेकांना  मानसिक आधार देतात. तर कधी रिफ्लेक्शन करायला तर कधी एकमेकांना मदत करतात. यात कोणतेही पात्र चूक किंवा बरोबर या मापात नाही बसवू शकत.

शरीर आजारी पडले कि, ताप, सर्दी, अंग दुखी सारखी लक्षणे दिसू लागतात. त्याच प्रमाणे मन आजारी पडलं कि, एकटेपणा, ताण -तणाव, बैचेनी, दुःख, नैराश्य सारख्या भावना येऊ लागतात. या मानसिक त्रासाचे परिणाम शरीरावर देखील बदल दिसत असतात. त्याचप्रमाणे  मानसिक त्रासासोबत जगणाऱ्या व्यक्तीचे  लैंगिक जीवन किंवा लैंगीकतेबद्दल  (sexuality) हि अनेक बदल होत असतात. ज्याचा परिणाम आजही कोणी खुलेपणाने बोलू शकत नाही.  मानसिक त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीचे आपल्या समाजात सहज समावेशन केले जात नाही.  अश्या अनेक   मानसिक विषयाला अनुसरून कादंबरीतील पात्रांचे वर्णन केले आहे. मानसिक त्रास झाला तर त्याला आधार देणे आणि  त्यावर उपचार होणे किती महत्वाचे आहे याचे हि अप्रतिम वर्णन केले आहे. जर तो मानसिक आधार द्यायला कोणी सापडले नाही तर... किंवा योग्य मानसिक उपचार झाले नाही तर.... व्यक्तीच्या मानसिक त्रासाचा गंभीर परिणाम म्हणेजच "आत्महत्या". यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही त्या सोबतचे नातेवाईक किंवा मित्रपरिवारात याचा मानसिक धक्का बसलेला असतो. आणि पुन्हा मानसिक त्रासाचे नवीन चक्र सुरु होते.  

या कादंबरीतील पात्रे आणि  प्रसंग मला समुद्रातील जहाजांप्रमाणे वाटतात. ज्यात अनेक जहाजे  प्रवास करत असतात. त्यांना आपल्या ठरलेल्या वेगवेगळ्या मुक्कामी पोहचायचे असते. प्रत्येक खलाश्याला समुद्रातील वादळ-वाऱ्याशी झुंज द्यावी लागते. कधी अचानक भरती तर कधी ओहोटी... यात काही जहाजे मुक्कामी पोहचतात. तर काही  भरकटली जातात... तर काही समुद्रात बुडून जातात.  माणसाचं आयुष्य हि असेच काहीसे आहे. 

“What makes us the most normal," said Reiko, "is knowing that we're not normal.” 



-----------

amkar.anju@gmail.com 


बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

Book Review : "जिणं आमुचं" || "The Prisons We Broke" by Baby Kamble

Book Review :  "जिणं आमुचं" || "The Prisons We Broke" by Baby Kamble

 

"जिणं आमुचं" हे पुस्तक म्हणजे बेबीताई कांबळे यांचे आत्मचरित्र आहे. याचा इंग्रजी अनुवाद "The Prisons We Broke" नावे माया पंडित यांनी केला आहे.  मराठीतले पहिले दलित स्त्रीचे आत्मचरित्र म्हणून बेबीताईंच्या पुस्तकाला ऐतिहासिक महत्व आहे. ह्या पुस्तकातील त्यावेळच्या महार स्त्री जीवनाचे स्वरूप कसे होते ? याबाबत अतिशय बारकाईने मांडणी केली आहे. बेबीताईं या ललित लेखन करणाऱ्या लेखिका नसून समाजशास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखिका होत्या. या पुस्तकात   महार समाजाचे भीषण  वास्तव मांडले तर आहेच त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या,  "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." मूलतत्त्वांचा बेबीताईंच्या जीवनात कसा बदल घडला याबाबत हि आपले विचार मांडले आहेत.  

या पुस्तकातील महार समाजाचे माणूसपण फक्त दिसण्यात होते.. त्यांना जनावरांसारखे शेपूट आणि चार पाय नव्हते इतकाच तो बाहेरून दिसणारा माणूस आणि जनवरातील फरक होता.  माणसांसारखी माणसं पण सवर्णांकडून मिळणारी मात्र वागणूक जनावरांसारखी होती. जसे जनावरांना गोठ्यात बंदिस्त ठेवले जायचे तसे याना गावाच्या वेशी बाहेर ठेवले जायचे. त्यांना सवर्णासमोर बोलण्याचा हक्क नव्हता.  त्यांचा स्पर्श चालत नसे. त्यांना मान वर करण्याचा हि हक्क नव्हता. त्यांना विचार मांडण्याचा हि हक्क नव्हता. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यांना पाणवठा, मंदिर अश्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नव्हता. पण गावातील आणि घरातील घाण साफ करायला मात्र महार पाहिजे होते. गावात व्यक्ती किंवा जनावर मृत्यू झाला तर त्याची सर्व काम महारांनाच होते. गावात कोणाचे लग्न असले, त्यात नवरा नवरीला हळद लावली कि, भुताखेतांपासून वाचण्यासाठी घराबाहेर  पडू देत नाही. अश्यावेळी त्याचे शौच साफ करायला हि महाराचं असायचे.  या कामाच्या बदल्यात मिळायचे त्या लोकांच्या घरातील आंबलेली भाजी आणि शिळी भाकरी.  जर ते हि नाही मिळाले तर उपासमार व्हायची.  ८-१० वर्षातचं मुलींची लग्न लावली जायची. त्या मुलींवर घरातील दारिद्र्याचा आणि गुलामगिरीचा सर्व राग निघायचा.  सतत काम, शिवीगाळ, मारहाण  तर असायचीच त्यासोबत मासिक पाळी आल्यापासून ते जो पर्यंत पाळी  जात नाही तो पर्यंत उपासमारीतील गर्भारपण सुरूच असायचे. त्यातील काही मुलं वाचतील ती वाचतील. त्यासोबतच अंधश्रद्धेचा हि विळखा सोबत जोडलेला असायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बेबीताईंच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. कारण त्यांना त्यांचं आणि वंचित समाजासाठीचे  माणूसपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे  मिळाले. 

या पुस्तकाचे  छोट्या प्रकरणांत विभाजन झाले आहेत. ज्यात त्यांचे महार वस्तीचे वर्णन, आजोळचे घर , बालपण,  आषाढ महिन्यातील सण, अस्पृश्यता, गरिबी, अस्वच्छता, रोगराई, नोकरीची अवस्था, मासिक पाळीतील काळ, बालविवाह, गरोदरपणातील हाल, सुनांवर होणारी गुलामगिरी, भीमाचे शिक्षणाचे वारे आल्यानंतरचा बदल, मंदिर प्रवेश,  हिंदू कोड बिल, शिक्षणाचे महत्व आणि क्रांतिकारी प्रबोधन अश्या अनेक मुद्द्यांवर बारकाईने सखोल वर्णन केले. या पुस्तकातील हे वर्णन वाचताना महार वस्ती कशी असू शकते ? सवर्णांनी कशी वागणूक दिली. दलित स्त्रीच्या गुलामगिरीची जीवन अवस्था  म्हणजे गुलामांची हि गुलाम असते. याचे नक्कीच अनुभूती येईल. 

The Prisons We Broke Available on Amazon and Book ganga

-----

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com












मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

Animal Farm by George Orwell

 एनिमल  फार्म || Animal Farm by George Orwell

Animal Farm by George Orwell

सारांश : "एनिमल  फार्म" हे पुस्तक जॉर्ज ऑरवेल लिखित असून त्यांनी राजकीय व्यवस्थेवर उपहासात्मक लेखन केले आहे.  या लेखकाच्या लेखनाला अनेकदा विरोध झाले कारण यांच्या लेखणीतून, "लोकशाही आणि हुकूमशाही यातील अंतर हे खूप कमी आहे. लोकशाही केव्हा हुकूमशाहीत बदलते आणि लोकप्रतिनिधित्व करणारा नेता कसा हुकूमशहा बनू लागतो." या कांदंबरीच्या माध्यमातून  या कडवट राजकारणावर एक प्रकाश टाकला आहे. 


जॉर्ज ऑरवेल लिखित ऍनिमल फार्म या पुस्तकाचे  १७ ऑगस्ट १९४५ प्रथम इंग्लंडमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे  प्रकाशन होण्याआधीपासून दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी देखील अनेक संघर्ष त्यांना करावा लागला होता. कारण त्याच दरम्यान जर्मनीने इंग्लंडवर हल्ला केला होता.  या पुस्तकाच्या माध्यमातून राजकारणातले व्यंगचित्र शब्दांमध्ये मांडण्याचा एक  यशस्वी प्रयत्न केलेला दिसेल. या पुस्तकाच्या माध्यमातून 'सोविएत मिथ' सोविएत रशियातील वरकरणी   साम्यवादी वाटणाऱ्या व्यवस्थेवर उपहासात्मक लेखन केले होते.  या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध होण्याचे मुख्य कारण म्हणजे याच दरम्यान सोविएत युनियनच्या गुप्तचर विभागाने या लेखकाच्या लेखनावर बंदी घातली होती.  

खरंतर, हे पुस्तक त्यावेळी होणाऱ्या राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकणारे होते पण जर याची तुलना आताच्या राजकारणासोबत केली तरीही फारसा काहीच बदल न झालेला आपल्याला लक्षात येईल. 

"नेता" हा कायम लोकांनी लोक कल्याणासाठी निवडून दिलेला असतो. जो त्या लोकांचे प्रश्न मांडतो. लोकांना एकत्र करतो. लोकांना योग्य ते  मार्गदर्शन करतो. लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याचा तोडगा शोधतो. पण हा नेता लोकांचे प्रतिनिधित्व करत नसेल तर किंवा लोकांच्या समस्यांचे निवारण न करता चुकीच्या गोष्टींचे नेतृत्व करायला लागला तर.... "एनिमल  फार्म"  या कादंबरीत अश्याच लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या सत्ताधारी राजकारणाची वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

 "एनिमल  फार्म"  या कादंबरीतील कथा हि एका फार्म हाऊसची आहे. जिथे मालक, कामगार आणि सगळे प्राणी एकत्र राहतात. कुत्रा, मांजर, डुक्कर, घोडे वैगरे प्राणी एकत्र राहत होते. एकदा या सर्व प्राण्याची एकत्र मिटिंग होते. यात अशी चर्चा होते कि, हे सर्व प्राणी दिवस- रात्र खूप मेहनत करतात. मात्र या मेहनतीचा सर्व फायदा मात्र मनुष्याला होतो. आपल्याला पुरेसे अन्नदेखील मिळत नाही.  आपल्याला योग्य न्याय व हक्क मिळत नाही. तेव्हा येथील एक म्हातारा डुक्कर सर्व प्राण्यांना एकत्र करून मालकाविरुद्ध  बंड पुकारायला एकत्र येण्याचे ठरवितात. त्याच दरम्यान म्हातारा डुक्कर मरण पावतो तेव्हा येथील दुसरे  दोन डुक्कर नेपोलियन आणि स्नोबॉल नावाचे या गटाचे  नेतृत्व करत असतात. सर्व मिटिंगमध्ये चर्चेनंतर असे ठरविले जाते कि, आपण क्रांती करायची. आपण फार्म हाऊस आपल्या ताब्यात ठेवायचे. या मीटिंगप्रमाणे सर्व प्राणी एकत्र येतात. त्या "मॅनॉर फार्म" च्या मालकाला फार्म बाहेर काढण्यात यशस्वी होतात. त्याचवेळी "मॅनॉर फार्म" चे नाव "ऍनिमल फार्म" असे ठेवण्यात येते त्यासोबत या फार्म मध्ये प्राणिवादाचे काही नियम ठरविण्यात येतात. जसे सर्व प्राणी समान आहेत, मित्रत्व ठेवणार, कोणताही प्राणी कपडे घालणार नाही, दारू पिणार नाही, दुसऱ्या प्राण्याला मारणार नाही, बिछान्यात झोपणार नाही आणि मनुष्य त्यांचा शत्रू असणार. सर्व प्राणी एकत्र आनंदी राहत असतात. मुबलक अन्न आणि शेती सुरळीत सुरु असते. 

त्याच दरम्यान इथले दोन नेतृत्व करणारे लीडर 'नेपोलियन' तत्वांचे महत्व प्राण्यांना शिकवत असतो तर 'स्नोबॉल' शिक्षण आणि आधुनिक शेती शिक्षण यांचे काळानुसार बदल किती महत्वाचे आहे हे प्राण्यांना शिकवत असतो. नेपोलियन मात्र या आधुनिकीकरणाच्या  विरोधात असतो. यावेळी नेपोलियन इतर प्राण्यांच्या मदतीने स्नोबॉलला फार्म बाहेर हाकलून लावतो. अखेरीस तो स्वतःला "सर्वोच सेनापती" घोषित करतो. त्यानंतर हळूहळू त्या फार्म च्या नियमात बदल होऊ लागतात. ज्या समस्यांमुळे प्राणी एकत्र आलेले असतात. पुन्हा त्याच समस्यांमध्ये ते प्राणी अडकलेले दिसतात. 

एकूणच, लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत कसे बदलते. हा प्रवास लोकांच्या  डोळ्यात  अंजन घालणारा आहे .  "राज्यव्यवस्था जरी बदलली, तरीही सर्व सामान्य जनतेचे प्रश्न आणि समस्या मात्र बदलत नाही." या पुस्तकात लोकांचा निरपेक्ष नेता सत्ता मिळाल्यावर मात्र आपल्याच लोकांमध्ये मतभेद करू लागतो. हे वर्णन करणारे सुंदर वाक्य यात लिहिले आहे. "All animals are equal, but some animals are more equal than others." " सर्व प्राणी समान आहेत पण काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत."

काळ दशकांत बदलतोय पण राजकारणाचा पॅटर्न मात्र सेम... या पुस्तकाच्या शेवटी अजून एक सुंदर वाक्य आहे.

"The creatures outside looked from pig to man, and from man to pig, and from pig to man again; but already it was impossible to say which was which." " बाहेरून पाहणाऱ्याला कायम भ्रम होत राहतो कि, समोर नेमका डुक्कर आहे कि माणूस,  माणूस आहे कि डुक्कर,  आणि डुकराकडून पुन्हा माणूस ; पण कोण माणूस आणि कोण डुक्कर, हे सांगणे अशक्य होते. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com






गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

आमचा बाप अन आम्ही



अनेक लोकांची आत्मचरित्रे वाचली, त्यातील काही मनाला जबरदस्त भिडली. या आत्मचरित्रांचा विचारधारेवर आणि जीवन शैलीवर सकारात्मक परिणाम झाला. गांधींचे "सत्याचे प्रयोग" , अंजली जोशी लिखित "मी अल्बर्ट एलिस", अच्युत गोडबोले यांचं "मुसफिर" अशा अनेक पुस्तकांनी नायकाला जिवंत केलं. पण या सगळ्यात हटके आणि पठडी बाहेरच वाटलं ते म्हणजे डॉ. नरेंद्र जाधव यांचे "आमचा बाप आणि आम्ही"...

हे पुस्तक वाचल्यावर निळू भाऊ (निळू फुले) म्हणाले होते "साने गुरुजींनी महाराष्ट्राला आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी बाप दिला" मी हे पुस्तक वाचले तेंव्हाच या अभिप्रायची प्रचिती आली. हे एका बापाचं नुसतं आत्मचरित्र नाही तर हे एका माणसाच्या संघर्षातून आणि प्रेरणेतून घडत जाणाऱ्या पिढ्यांचा खडतर पण तितकाच उत्साहवर्धक प्रवास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून घडलेला हा जीवनप्रवास नरेंद्र जाधवांनी ग्रामीण आणि प्रमाण भाषेच्या सुंदर मिलापतुन लिहिला आहे. ही कथा आहे एका बापाची, डॉ नरेंद्र जाधव यांच्या वडिलांची.... त्यांनी घडविलेल्याया तीन पिढ्यांची.
या चरित्रातुन तत्कालीन समाजातला जातीभेद, समाजाची मानसिकता, त्यातील संघर्ष, संघर्षातून मिळलेल यश अशा अनेक भावभावनांचं चित्रण केलं आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र हे तीन वेगवेगळया काळातील आहेत पण तरीही दादा (नरेंद्र जाधवांचे वडील) आणि आंबेडकरी चळवळ या दोन गोष्टी या तिन्ही पिढ्यांचा समान दुवा आहेत.

यशाची शिखरे गाठणाऱ्या  दलित आणि मागासवर्गी व्यक्तींकडे पाहून लोक  "काय नशीबवान माणूस आहे, आरक्षण आणि सवलतीमिळवत पुढं गेला " अस म्हणतात. अशा कमनशिबी माणसानं चपराक म्हणून रेव्ह जेसी जॅक्सन ला कोट करून म्हणतात .. "don't judge me from where I stand, judge me from where I came from..."

हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं...कारण हे पुस्तक संघर्ष करण्याला प्रेरणा देत आणि हताश मनाला प्रफुल्लित करत..... प्रत्येक बाप आपल्या पोरासाठी खपत असतो पण  संघर्षातून पिढ्या घडवणारा नरेंद्रचा बाप हा लाखात एक असतो....

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

नक्की कोण झपाटलेल आहे- 1

एक मित्र भेटला होता. अभय नाव त्याच. भरपूर खुष होता, अर्थात कारणही तसंच होत. त्याने पुण्यात एका टॉवन शिप मध्ये 3 BHK घर घेतलं होतं. ईस्ट फेस बाल्कनी, हिरवेगार  टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, मुलांसाठी इंटरनॅशनल स्कूल , जवळच एक भलामोठा शॉपिंग मॉल, क्लब, .... आणि बरंच काही. प्रत्येक तरुणांच्या स्वप्नातलं घर अभयने प्रत्यक्षात घेतलं होतं.  
अभय एका मोठ्या MNC मध्ये मोठ्या पदावर कार्यरत होता. नजरेत भरावी अशी त्याची गरुड झेप होती, यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत तो इतवर पोहचला होता. त्याला एक सुंदर बायकोही होती. शमिका. शमिका शाळेमध्ये समाजशास्त्र शिक्षिका होती आणि त्याच शाळेची मुख्याध्यापिकाही होती. अभय आणि शमिका पुण्यातील लोहगड ट्रेक ला भेटले. दोघंही ट्रेकचे दिवाने. दर वीकएंड ला ट्रेक करणे हा दोघांचाही आवडीचा छंद. किल्ले सर करत असेच एके दिवशी कळत-नकळत प्रेमात पडले. कधी प्रेमाचा किल्ला सर केला त्यांनाही नाही कळले. इतक्या व्यापातून ते अजूनही ट्रेक करत असतात. 
त्यांनी 3 BHK घर घेतलं होतं त्याच्या उदघाटनाला मी गेलो होतो. दोघ तशी खुश दिसत होती, पण अभय कडे पाहून तसं वाटत नव्हतं. उदघाटन आणि नंतर जेवण असा कार्यक्रम उरकला. दुसऱ्या दिवशी अभय नेहमी प्रमाणे ऑफिस नंतर चहाच्या टपरी आला, मी तिथंच होतो. मला पाहताच स्मित करून गप्पा मारायला चालू झाला. हातात गरमागरम चहा, दुसऱ्या हातात सिगरेट , आणि  गोंधळलेले भाव. अशा गोंधळात अचानक अभय बोलला, "मित्रा तुला भूत-प्रेत यावर विश्वास आहे का?"
मी गोंधळलो, IT मध्ये काम करणारा, वेळोवेळी चळवळीला मदत करणारा असा प्रश्न कसा कायविचारतो.मी म्हणालो "नाही, पण असा प्रश्न अचानक...."
त्यावर तो बोलला, "नवीन घर घेतलंय, पण तिथं मला झोप नाही लागत, सतत काही तरी पाप केल्यासारख वाटत आहे, कोणीतरी त्या माहीत नसलेल्या पापाची शिक्षा देतंय याची भीती वाटत आहे, ......"
"अरे हे तुला वाटत आहे , म्हणजे हा तू विचार करत आहेस की  ....." मधेच टोकून तो म्हणाला ...." अरे भावा मला स्वप्न पडतात तशी आणि एक अनोळखी सावली मला सतत् तू पापी , तू माझा जीव घेतला आहेस..... आणि आजूबाजूला झाडं, जनावर आणि मध्ये मी.... अस चित्र दिसत असत...."
"बापरे.... पण तू जे घर घेतलं आहेस त्याचा व्यवहार...." मी काही बोलणार तोच त्याने मला पुन्हा टोकाल. " व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होता, जो पैसा मी उभा केला तोही घामाचा ... तुला माहीत आहेच की मी आणि शमिका दिवस रात्र काम करत होतो... आणि दोघंही जमेल तसं समाजकार्य ही करत असतो..शमिका तर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करते... मग हे स्वप्न , माझं पाप..... ,भावा घर झपाटलय की मला झपाटलाय कळतं नाही...."
"तू समाजतोस तसं काही नसेल,अस कोण कुणाला झपाटत का? हो जर हे शक्य जरी असेल तर कोण झपाटणार तुला, जे घर घेतलंय त्याचा पहिला मालक तू, म्हणजे त्यावर आधी।कोणाची मालकी पण नव्हती,... मग तुला झपाटणार तरी कोण... मला वाटत तुझ्यावर थोडा कामाचा ताण आलाय आणि बरेच दिवस तू शमिका सोबत ट्रेकला सुद्धा नाही गेलाय. मस्त दोन-चार दिवस फ़िरायला जा... मग बरं वाटेल..."

अभयला बहुदा हे पटलं, तशी त्याने होकारार्थी मान हलवली. बसल्या बसल्या, Nearest Natural Resort अस गूगल वर सर्च केलं. लोणावल्यातील घनदाट जंगलातील एक रिसॉर्ट त्याला आवडलं. चार दिवस बुक केलं. स्वारी खुश होऊन घरी गेली. 
ठरल्याप्रमाणे अभय आणि शमिका लोणावळ्याला जायच्या तयारीत होते.... आदल्या रात्री अभय ला स्वप्नांत तीच सावली दिसली ... मिश्किल हसण्याचा आवाजात एक स्त्री म्हणत होती .... पुन्हा तीच चूक करतोय........
अभय जागा झाला, पण काही घडलंच नाही अस भासवून लोणावळ्याला जायच्या तयारीला लागला.....

क्रमशः....₹

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

"सडेतोड आणि स्पष्ट लिखाणातून सामान्य जगण्यातले प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधून देणारे आणि खिळवून ठेवणारे लिखाण म्हणजे बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्र्वरकर ही कादंबरी"


 

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्र्वरकर...

लेखक : भाऊ पाध्ये

बऱ्याचदा आपण एखाद्याने सांगितल्यावर एखादा पदार्थ खातो आणि मग त्याचे अगदी चाहते बनतो, ती आपली चव बनून जाते. अगदी तसंच भाऊ पाध्ये यांचे लिखाण माझ्या आयुष्यात आले आणि माझी चव बनून गेले. या लेखकाचा चाहता झालो

वासूनाका,राडा यानंतर हे पुस्तक म्हणजे समाजभान, मनातील कालवाकालव यांचे अगदी भेदक वर्णन करणारं जबरदस्त लिखाण. भाषा उगाच गुळगुळीत नाही पण खिळवुन ठेवणारी

तर बॅरिस्टर असूनही वकीलीत विशेष रस नाही, आयुष्यात प्रियंवदा अगदी सुंदर बायको पण तिच्या विषयी विशेष आकर्षण नाही, घरात अलोट श्रीमंती पण तीचं विशेष कौतुक नाही, शेजारी पाजारी यांच्यात सहभाग घेण्यात रस नाही असा जीवनपट ढकलत असलेले धोपेश्र्वरकर वकिली सोडून, मी का जन्माला आलो? आपल्या जन्माचा उपयोग काय? या प्रश्नात अडकून, याचे उत्तर शोधण्यात गर्क आहेत. प्रियंवदा, वडील तात्या, मित्र चक्रपाणी यांनी कित्येकदा समजावून पण यांना जुमानता आपल्याच तंद्रीत जगणारे धोपेश्वरकर यांच्या आयुष्यात क्लाडा आणि आयव्ही या दोन मुली येतात आणि स्वतःच्या तंद्रीत मश्गूल असणारे धोपेश्वरकर वेगळ्याच प्रकारे जगायला लागतात. त्यात या दोघींचा बॉस असलेला राय हाही यांच्या गँग मध्ये सहभागी असतो

इकडे पत्नीला कसल्याच प्रकारचा प्रतिसाद देणारे धोपेश्र्वरकर क्लाडा आणि आयव्ही यांच्यात मात्र रमु लागतात. हे सगळं घडत असताना अचानक एक घटना घडते ज्याने धोपेश्र्वरकर यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते, त्यांना या घटनेमुळे घर सोडावं लागतं, काय नक्की घडलं असेल? क्लाडाला हळूहळू धोपेश्र्वरकर आवडू लागतात, पण परिस्थिती मात्र निराळी असल्याने धोपेश्र्वरकर मात्र हे सगळं सोडून दूर जातात, का जाता असतील? आयव्हीला  धोपेश्वरकर का दुर घेऊन जातात? बेजबाबदार स्वभावाचे धोपेश्र्वरकर एकदम जबाबदार व्यक्ती म्हणून कसे बदलतात? आयव्हीच्या मृत्यूला ते कसे सामोरे जातात? प्रियंवदाला हे सगळं कळल्यावर ती जेव्हा धोपेश्र्वरकर यांना थेट त्याठिकाणी भेटायला आल्यावर कशी वागते? आणि शेवटी ती त्यांना परत आपल्या संसारात रमण्यासाठी तयार करते का? कारण आता प्रियंवदा गर्भवती आहे हे समजल्यावर धोपेश्र्वरकर काय विचार करतात? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण हे पुस्तक वाचणे अत्यंत गरजेचं आहे

जगताना माणसाला कायम पडणारे साधे प्रश्न पण त्याची याच जीवनपटातून उत्तरे देण्याचा लेखकाचा अगदी सडेतोड प्रयत्न फारच भावणारा आहे. स्त्री आणि पुरुष यांचा संबंध आणि यातून देव या वृत्तीचा नक्की काय विचार असेल याचे उत्तर वाचताना अगदी बुध्दीला आरश्यासारखा स्पष्ट वाटतो. कुठे ही लिखाणात बढेजाव नाही अगदी सरळ स्पष्ट लिखाणातून सामान्य जीवनातले प्रश्न आणि उत्तरं याचं समर्पक लिखाण म्हणजे "बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्र्वरक ही कादंबरी"...नक्कीच वाचावी अशीच.

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...