शनिवार, ११ जुलै, २०२०

“कोकणात लग्न असते तेव्हा....”

कोकणात लग्न असते तेव्हा....

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin
PC : Prathamesh Nalawade

लहानपणी मुंबईला असताना कोणाचेहि लग्न असले तर मी खूप खुश होऊन जायचे. पहिले कारण म्हणजे  त्यादिवशी  शाळेला सुट्टी आणि दुसरे कारण  नवीन कपडे घालून फिरायला मिळणार. त्यासोबत विशेष लग्नाचे जेवण खायला मिळणार याचा हि एक वेगळाच आनंद असायचा. तसा माझा डोळा फ़क़्त स्वीट डिश आणि आईसक्रिमवर जास्त असायचा. आई बाबांच्या ताटातील त्यांच्या वाटणीचे गोड पदार्थ हि मीच खायची.  मुंबईत खूप लग्न पाहिले पण लग्नात कोणते विधी करतात हे मला कधीच कळले नाही. नवरा – नवरी त्यांचे आई -वडील आणि भडजी (भट)यांचे काहीना काही स्टेजवर सुरु असायचे. पण लग्नाला आलेले सर्व पाहुणे मंडळी आपल्याच चर्चामध्ये जास्त रंगलेले दिसायचे. त्यामुळे मला हि असेच वाटले कि, स्टेज वर त्याचं त्याचं जे चालायचं ते चालू दे. आपण हॉल भर इतर लहान मुलांसोबत खेळायचे किंवा गप्पा मारायच्या. फ़क़्त ‘शुभमंगल सावधान!’ शब्द कानावर पडले कि, अक्षता (तांदूळ) टाकायचे. आणि अक्षता टाकायचा कार्यक्रम झाला म्हणजे जेवणाची वेळ झाली. आवडत्या पदार्थावर ताव मारून. पैशाचे पाकीट नवरा नवरीला देऊन पुन्हा घराकडे परतायचे.  मुंबईला राहत असताना लग्न म्हणजे मला  एवढेच कळले.

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin

जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत गावी यायचे. तेव्हा कोणाचे  लग्न म्हटले कि एक वेगळीच मज्जा असायची. अर्थात आज हि तितकीच मज्जा पाहायला मिळते.  वाडीत  कोणाचे हि लग्न असले कि, पूर्ण वाडी त्या लग्न समारंभाच्या कोणत्या ना कोणत्या कामात  सहभागी असतात.  इकडे ज्याची त्याची काम ठरलेली असतात. कारण इथे लग्न म्हणजे फ़क़्त ‘शुभ मंगल सावधान’ म्हणून जेवायला पळत गेलो असे नसते. तसेच एका दिवसात लग्न उरकून घेतले असे हि नसते.

वाडीत कोणाचे लग्न असले कि, पहिला गावाचा मानकरी आणि चार गावकरी एकत्र जमून देवाला नारळ देऊन गार्हाण घालणार. ‘देवा महाराजा, आज आमच्या गावात –वाडीत अमुक अमुक लेकीचे लग्न ठरलेले हाये... म्हणून आज पासून मांडव बांधणी पासून सुरुवात करत आहोत तरी सर्व लग्न कार्या सुखरूप होऊ दे रे महाराजा.... व्हय महाराजा!’

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin

त्याघरात स्पीकर लावला जातो आणि स्पीकरवर फ़क़्त लग्नाची गाणी “ नवरा आला वेशी पाशी, नवरा नवरी कशी नेशी”. दुसऱ्या गावात हि गाण्याचा आवाज पोहचला कि, लगेच आमच्या गावात लग्न आहे याची चाहूल लागून जायची.  त्यानंतर वाडीतील ठराविक गावकरी  त्याघरासमोर लगेच  मांडव तयार करायला घ्यायचे.  आमच्या गावी आजहि सर्व लग्ने अंगणात मांडव घालूनच होतात.  हॉल किंवा सभागृहातील लग्नापेक्षा मांडवातील लग्नात एक वेगळीच मज्जा अनुभवायला मिळते. त्या मांडवाची पण पूजा केली जाते. आणि लामण दिवा लावला जातो.  लग्नाचे सर्व कार्यक्रम पूर्ण होई पर्यंत हा लामण दिव्याची ज्योत कायम प्रज्वलित ठेवली जाते. सोबतच  मांडवाला आंब्याचे टाळकी,  केळीचे खांब, नारळीच्या झावळ्यांनी सजवले जाते.  त्या अंगणातील मांडवाला रंगीबिरंगी पडदे आणि झूल लावून देखील सजवले जाते.  इथे प्रत्येक वाडीत अश्या समारंभासाठी वाडीतील चाकरमानी  एकत्र येऊन वर्गणी काढून  सार्वजनिक वापरासाठी  असे पडदे, झूल, स्पीकर, ढोल- ताशे, लाईट्स - तोरणे,   जेवण बनविण्यासाठी लागणारी भांडी घेऊन ठेवलेली असतात.  जेव्हा कोणाच्या घरी किंवा मंदिरात कोणताही मोठा कार्यक्रम असला कि, हेच साहित्य वापरले जाते.  त्यासोबत  लहान मुलांना पताके बनवायचे काम दिले जाते. रंगीत कागद पताकेच्या आकाराने कापण्यापासून ते पताके चिटकवण्यासाठी लागणारा डिंक पण चुलीवरच घरगुती तयार केला जातो.  मांडव घातलेला अंगण, त्याच्या आजूबाजूचा थोडा परिसर आणि जिथे जेवणाची पंगत बसणार असेल ते अंगण पाताक्यांनी  सजवले जाते.   वाडीतल्या महिला वर्ग दुपारी लग्नघरातील  मांडवात जमून तांदूळ पाखडणे, कडधान्य - डाळी साफ करणे, मसाले तयार करून ठेवणे, जात्यावर (तांदूळ पिठाचे वडे) वड्याचे पीठ व हळद दळून ठेवणे, घर - अंगण शेणाने सारवणे, रांगोळी काढणे,  जेवण बनविणे.   अशी कामे प्रत्येकाला  वाटून एकमेकांच्या मदतीने  पूर्ण केली  जातात. वाडीत प्रत्येक जण आपली आपली शेताची आणि मजुरीचे काम सांभाळून हि कामे केली जातात.  आमच्या गावी ग्रामपंचायत नळ-पाणी योजना नव्हती.

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin
PC : Anjali
 थोडे लांबून हंडा कळशीने  पाणी आणावे लागायचे.  त्यामुळे मोठा  कार्यक्रम असला कि, वाडीतील सर्वांचे मोठे पाण्याचे पिंप लग्न घराच्या मागच्या बाजूला एकत्र ठेवून. सकाळी सर्व महिला वर्ग सकाळी  पाणी भरायला मदत करत. तर पुरुष वर्ग रात्री पाणी भरायला मदत करत असे.  रात्रीच्या वेळी लहान – मोठी सर्व मंडळी एकत्र जमून पत्रावळी आणि द्रोण तयार करतात.  (वडाच्या पानांचे ताट आणि वाटी ) हि प्रत्येक कामे करताना वाडीतील मंडळी एकत्र जमत असतात आणि गाणी देखील बोलतात.  जात्यावर पीठ दळतानाचे गाणे, भाजी कापतानाचे गाणे, अंगण सारवतानाचे गाणे, भात पाखडतानाचे गाणे, नदी वरून पाणी आणतानाचे गाणे.  कधी कधी गाणे असते तर कधी कधी ओव्या देखील म्हटले जाते.  गावी जेव्हा हि गाणी बोलायला  सुरुवात करायची असते तेव्हा लगेच कोणी तयार होत नाही. थोडं लाजणं, मुरडणे  आणि हसणे सुरु असते. “तू बोल गं..., नाही नाही तू सुरुवात कर...” या वाक्यांत काही वेळ हा जातोच जातो.  गाण्यांची सुरुवात होताना  लाजत वैगरे गाणी म्हणत असल्यामुळे  गाण्यांचे सूर हि बदलत असतात.  पहिले गाणे झाले कि पुन्हा  ‘तू म्हण तू म्हण सुरु होते’ मध्येच सर्व हसण्याचे आवाज पण माईकमुळे गाव भर ऐकू जात असतात. लहान मुलांना गाण्याचा कोरस द्यायला बाजूला बसविले जायचे.  

गाणे क्र १  :

“मोहूर आंबे तुझी हिरवी पाने आंबा वाढत जाई,

‘देसाई’च्या मुलाने तोरण तोडूनी जाऊन मंडपी बसविले,

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravinKokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin

‘पालांडेच्या’ मुलीला कुंकू लावूनी केली आपुली राणी,

मोहूर आंबे तुझी हिरवी पाने आंबा वाढत जाई |”

 गाणे क्र २ :

“प्रियांका उभी मंडपात सुशांत दुरून होता पाहत

करणार पत्नी मी तिला शोभेल सून तुम्हाला

विचारा तिच्या  बाबांना मुलगी द्याल काय आम्हाला

मुलगा आहे कामाला... राहणार मुंबईला”

 गाणे क्र ३ :

“जगी वाजेल लग्नाचा चौघडा

आज होणार ‘प्राजक्ता’ तुझा साखरपुडा”

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin

गाणे क्र ४ :

“यशोदेचे कमळ फुल बाळ चालले मंदिरी..

मिस्त्रीचा सुशांत पुत्र.. वाजवितो ग बासरी

बासरीच्या आवाजाने ‘प्रिया’ झाली ग बावरी  

नको रडू माझे ताई जाते मी सासर घरी”

गाणे क्र ५ :

“रामा सीतेचा जोडा चंद्र मनामध्ये हसला,

कुठे मिळाली ‘प्रियांका’   ‘सुशांत’ तुम्हाला”

गाणे क्र ६ :

“हृदय भरून आले हिचे हृदय भरून आले

बाबांचे गुण हिला सारे आठविले

बाबा जन्माचे हिचे सासरे धर्माचे

सुखी ठेव भगवंता सासरे धर्माचे”


या गाण्यांचे वैशिष्टय असे कि यात   नवरा – नवरीचे नाव आणि  गावाचे नाव असतच असते.  कोकणात प्रत्येक मैत्रीण, बहिण, काकी,
Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin
मामी , भाऊ, इतर नातेवाईक
  यांची अशी इच्छा असतेच कि, “मला तुझ्या लग्नात गाणी म्हणायचेय आणि हळदी – वरातीत नाचायचेय.“ जसे मी आता या वरील  गाण्यांत माझ्या मैत्रिणींचे नाव लिहिले. त्यांच्या लग्नाला जायला मिळाले नाही म्हणून या ब्लॉगच्या निमित्ताने त्यांच्या लग्नाची गाणी बोलण्याची हौस पूर्ण करून घेतली.  या  गाण्याचे गहिरे अर्थ ऐकून डोळे भरून येतात आणि त्या घरातील कोणी न कोणी  रडायला पण सुरवात करू लागतात. लहानपणी  मला हि गाणी आणि ओवी  खूप आवडायची. अर्थात आता हि तितकीच आवडतात.

 


(कोकणातील लग्न हे एका दिवसात पूर्ण होत नाही तर हा ब्लॉग तरी मी कसा एका ब्लॉग मध्ये पूर्ण करू.  लग्नात होणाऱ्या अजून गमती जमती आणि कोकणातील प्रथा पाहू पुढच्या ब्लॉग मध्ये............)

क्रमशः

 

 

 लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com



१९ टिप्पण्या:

  1. छान... डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो...वाट बघतो पुढच्या ब्लॉगची...

    उत्तर द्याहटवा
  2. ताई खरंच खुप भावनिक व्हायला होतं ही गाणी ऐकून. तुमच्या पुढील ब्लॉग ची आतुरता😊

    उत्तर द्याहटवा
  3. मस्तच...
    खूप आठवण येते गावाची हे असं वाचल की

    उत्तर द्याहटवा
  4. This felt amazing... we don't have this type of celebration in our region.🌼🌼

    उत्तर द्याहटवा
  5. छान लिहिलंय.....लिहत रहा

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान:)
    वाडीतली लग्न उभी राहिली डोळ्यांसमोर.
    Keep writing 👍💐

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...