कोकण डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोकण डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

खरी कोकणी भाषा कोणती ?

खरी कोकणी भाषा कोणती ?

kokan-kokani-konkani-malvani-language-bolibhasha-apaliwritergiri


गोव्याकडचे बोलतात कि, " कोंकणी आमची भाषा हीच खरी गोवन कोकणी भाषा." सिंधुदुर्ग- मालवणकडचे बोलतात कि, "आमची मालवणी म्हणजे खरी कोकणी भाषा." तेव्हा रत्नागिरीचे बोलतात कि, " संगमेश्वरी आणि चिपळूणची भाषा पण कोकणीच भाषा आहे. "  - रायगडचे  बोलतात कि, " आमची आगरी - कोळ्याची भाषा पण कोकणीच भाषा आहे."  "अमुक अमुक जिल्ह्याचे रहिवाशी म्हणजे कोकणी.  यात तळकोकणी, मध्यकोकणी, गोवन कोकणी , मंगलोरीयन कोकणी असे "   अंतर्गत मतभेद होताना सर्रास दिसतात. खरंतर, कोकणचा विस्तार विशाल आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या पश्चिमेकडील भागात पर्यंत पसरलेला आहे. पूर्वेस सह्याद्री म्हणजे  पश्चिम घाट पर्वत रांग आहे आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आहे. 

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी कोंकणी ही एक "इंडो-युरोपीय" भाषा आहे. महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. अगदी बारा-बारा  मैलावर गाव बदलत जाते तसे बोलीभाषेत बदल होताना दिसतात. कोकणी, कोंकणी, मालवणी, संगमेश्वरी,  चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अनेक बोलीभाषा या कोंकणीच्या उपभाषा आहेत.

जसे कोकणी भाषा बोलण्यात विविधता आहे तशी लिहिण्यात हि तितकीच विविधता दिसून येते. महाराष्ट्रात देवनागरी, गोव्यात देवनागरी आणि रोमन लिपी, कर्नाटकात कानडी, केरळातील कोकणी मल्याळी लिपी आणि कोकणी मुसलमान अरबी लिपी लिहिण्यासाठी वापरतात. गोवा राज्याने "कोंकणी आणि मराठी " या दोन्ही  भाषण सम राज्यभाषा म्हणून दर्जा दिला आहे.

यात हि धर्मानुसार आणि जातीनुसार अजून भाषेत बदल होताना दिसतो.  ख्रिश्चनांची कोंकणी, हिंदूंची कोंकणी आणि मुस्लिमांची कोकणी असेही फरक दिसतील.  ख्रिश्चनांची  कोकणी भाषेवर पोर्तुगीज भाषेचा प्रभाव दिसतो, मुस्लिमांच्या कोकणी बोलीभाषेत हिंदी- उर्दू आणि अरबीचा भाषेचा प्रभाव दिसतो. 

जसे गाव बदलते तसे बोलण्याच्या लयीत देखील अनेक बदलत दिसून येतात. का र्रर्रर्रर्र बाला ... " काही ठिकाणी र चा सूर दिसेल. तर काही ठिकाणी उच्चराचें  हेल बदललेले दिसतील. आता साधे खालील एका शब्दाचे वेगवेगळे उच्चार पाहू.
बसला आहे
बसलोसा
बसल्यानी
बसलंस
बसतंस
बसलीव
बसलंय
बसलेय

कोकणातल्या वेगवेगळ्या बोलीभाषेतील वेगवेगळ्या कला आणि साहित्य हे जगभर प्रसिद्ध आहे. आपण हि अनेकदा पाहिले असेल कि,  जगभरात किंवा भारतात महाराष्ट्राचे  नेतृत्व करताना कोळी गाणे आणि नृत्य सादर केले जाते. आगरी कोळी गाण्यांविना शाळेचे सांस्कृतिक संमेलन किंवा लग्न समारंभ पूर्ण होत नाही. मच्छिद्र कांबळे मालवणचे नाट्यसम्राट यांनी तर "मालवणी" भाषा सातासमुद्रापार पोहचवली. " गाव गाता गजाली, मालवणी डेज, रात्रीस खेळ चाले " यांसारख्या मराठी मालिकाही कोकणी भाषेत पाहायला मिळतात.  तसेच मराठी साहित्यात हिविंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, मधु कर्णिक, जयवंत दळवी, वि. नेरुरकर, पेडणेकर वैगरे अनेक लेखनाचे साहित्यही वाचायला मिळेल.
एकाच फुलाला वेगवेगळ्या पाकळ्या असतात तसे  कोकणातील वेगवेगळ्या बोलीभाषा पाहायला मिळतील. जशी फुलाची एक पाकळी नसेल तर फुल अपूर्ण दिसेल तसे या प्रत्येक बोलीभाषेचे तितकेच महत्व आहे. बोलीभाषेत वेगळेपण असले  तरीही माझी बोली भाषा म्हणजे ओरिजनल असे मतभेद  यायला नको. प्रत्येक बोलभाषेची गोडी तितकीच मधुर आहे. हे कायम लक्षात ठेवावे.   एकूणच "बोलणाऱ्यांन बोलत रवाचा आणि ऐकणाऱ्यानं ऐकत रवाचा" अशी कोकणी भाषा आहे.
 

मंगळवार, २५ जुलै, २०२३

कोकणातल्या निसर्गाची दशा आणि मानवाच्या आयुष्याची दुर्दशा : थोडं वास्तवतेचा स्वीकार करूया. ||"Nature's Wrath in KOKAN: Landslides, Monsoon Floods, and Rain's Lamentable Toll on Life"

कोकणातल्या निसर्गाची दशा आणि मानवाच्या आयुष्याची दुर्दशा : थोडं वास्तवतेचा स्वीकार करूया. 
आजची ताजखबर : "पावसामुळे हाहाकार झाला." अमुक अमुक ठिकाणी महापूर, भूसख्खलन आणि  ढगफुटी  झाली आणि  शेकडो / हजारो माणसांचा मृत्यू झाला. खरंच याला "पाऊस" दोषी आहे का ?
apali-writergiri-blog-kokan-nature-landslide-flood


भारतात हिमालय परिसरातील भागाला स्वर्ग असे म्हणतात. तसे महाराष्ट्रात कोकणाला स्वर्ग असे म्हणतात. पाहायला गेले तर हिमालय आणि कोकण हे एकमेकांपासून खूप दूर आहेत. पण यांत एक साम्य आहे ते म्हणजे इथला "निसर्ग" 
उत्तर भारतातील "हिमालय पर्वत" आणि महाराष्ट्रातील " सह्याद्री" हे दोघेही निसर्गाचे रक्षणकर्ते होते. इथल्या जंगलामुळे वादळी वारे,  पूर आणि भूसख्खलने रोखली गेली होती. अनेक वन्यजीवांना त्यांचं हक्काचं घर मिळत होतं.  इकडे खूप दुर्मिळ असे औषधी वनस्पती मिळायची.  

पण सध्याची वास्तविक स्थिती : उत्तर भारत 
२०१३ मध्ये  केदारनाथ प्रलय म्हणजे महापूर आणि भूसख्खलनामुळे ४००० हुन अधिक लोक मृत्युमुखी पडले. हजारो गावे उध्वस्त झाली. 
२०२१ उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला. 
२०२३ जुलै १०० हुन अधिक मृत्यू आणि १०० हुन अधिक जखमी हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पंजाबला महापुराची परिस्थिती ते हि पहिल्याच पावसात. 

सध्याची वास्तविक स्थिती : महाराष्ट्र 
२०२३ : इरशाळगडाच्या  ईशाळवाडी  भूसख्खल दुर्घटना २७ जणांचा मृत्यू ८० हुन अधिक जखमी पूर्ण गाव उध्वस्त 
२०२१ चिपळूण रत्नागिरी महापूर -वाशिष्ठी नदीने रौद्र रूप धारण केलं. २५१ हुन अधिक मृत्यू, २०००० हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतरण 
२०१९ कोल्हापूर महापूर -पंचगंगा नदीने रौद्र रूप धारण केलं. ३०००० हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतरण 
२०२३ बिपरजॉय चक्रीवादळ,  २०२१ तोक्ते चक्रीवादळ,  भूकंप , उन्हाच्या अति झळा किंवा उष्मघाट्यामुळे मृत्यू 
दरवर्षी मुंबई, बदलापूर , पुणे , चंद्रपूर, गडचिरोली इथला पूर हा कायम असतोच. 

या मी मोजून ३- ४ घटना लिहिल्या ज्या मोठ्या - मोठ्या बातम्यांना सांगितल्या गेल्या  कि, पावसामुळे हाहाकार झाला.  पण  खरंच याला फक्त  "पाऊस" दोषी आहे का ?

हिमालय आणि कोकण या दोन्ही हि ठिकाणी अनेक वर्षांपासून मुसळधार पाऊस पडतो.  तसे आपण भूगोलात देखील नक्की वाचले किंवा शिकले असेल.  या दोन्ही ठिकाणी खूप जंगले देखील होती. या जंगलामुळे इथले वन्यजीव आणि इथली माणसं सुरक्षित असायची.  इथले वातावरण संतुलित असायचे पण आता  "कमर्शियल पर्यटन" म्हणून तर कधी "विकास" म्हणून  नदीपात्रात आणि जंगलात अतिक्रमणे सुरु झाली. 
धरणासाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
रस्त्यासाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
रेलवेसाठी  : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
मेट्रोसाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
विमानतळसाठी  : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
पर्यटनासाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
कारखान्यासाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
रोजगारासाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
घरे आणि इमारती बांधण्यासाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
खनिजांसाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
वीजप्रकल्पासाठी : बेसुमार जंगलतोड सुरु झाली. 
हि "बेसुमार जंगलतोड" ची  लिस्ट न संपणारी आहे.  

शहरात नदी आणि समुद्राचे घाणेरडे नाले केले गेले. याचे उत्तम उदहारण मुंबई, पुणे , रायगड, चिपळूण किंवा उत्तर भारतातील कोणतीही नदी ची सध्याची परिस्थिती बघू शकतो. या नदीपात्रात फक्त अतिक्रमणे केले असे नाही तर त्यात सर्व सांडपाणी सोडण्याचे माध्यम मानले जाते.  कमर्शियल विकासाच्या मागे माणूस इतका धावत आहे. दरवर्षी लाखों झाडांची कत्तल करत आहे.  जेसीबीने डोंगर ओरबाडत आहे. 
परिणामी दरवर्षी पुरमय परिस्थिती आणि भूसख्खलने वाढत आहेत. आणि हे वाढतच राहणार.  पावसाचे जलचक्र असंतुलित बनणार. उष्माघात वाढणार.  पाणी टंचाई होणार. शेतीवर परिणाम होणार. शेती उत्पन्नाचे पुरात किंवा दुष्काळात नुकसान झाले तर पुन्हा अन्नटंचाई आणि महागाई सुरु. मग पुन्हा विकासाच्या नावाने अजून नवीन जंगले तोडायला सुरु. 

अश्या परिस्थिती "मृत्यू" हा कायम  तिथल्या गावकर्यांचा आणि गरीब सामान्य माणसाचा  होतो त्याला शासन ५ लाख वैगरे नुकसानभरपाई देणार. पण पुन्हा विकासाच्या नावाने जंगलतोड मात्र करत राहणार. जो पर्यंत माणूस विकासाच्या नावाने झाडांची कत्तल, जंगले आणि नदीवर अतिक्रमण करत राहणार तसा तो स्वतःच्या  विध्वंस विकासाकडे ओढला जाणार. 

या लेखाचा एकच उद्देश आहे कि , विकासाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. 
"प्रकृती आहे तर प्रगती आहे." निसर्गरूपी राखणदार संपला तर माणूस हि संपणारच. 
म्हणून निसर्ग जपण्यासाठी  आपले एक पाऊल उचला. 

अन्यथा कोकणातील "स्वर्ग" हा शब्द जाऊन फक्त "नरक" उरेल. 


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com







शुक्रवार, ७ जुलै, २०२३

गाव गाता गजाली....

gav-gata-gazali-apali-writergiri


कोकणावर आधारित झी मराठीवर अनेक सिरियल्स प्रदर्शित झाल्या पण “गाव गाता गजाली या सिरियल्सचे पर्व १ आणि पर्व २ हे दोन्ही पर्व खरोखरच खूप दर्जेदार असे आहेत. कोकणी बोलीभाषा, गावे, निसर्ग, इथल्या लोकांच्या भावना, इथली संस्कृती आणि परंपरा यांचा सखोल अभ्यास आणि निरीक्षण करून बारकाईने या सिरियल्सच्या सर्व एपिसोड्सचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या सिरियल्समधील सर्व कलाकारांची देखील एक स्वतःची वेगळी ओळख आणि महत्व या सिरियल्समध्ये वेगळेपणाने सादर केलेले आहे. या सिरियल्समध्ये ना कोणी एखादा ठराविक हिरो किंवा हिरोईन आहे. ना व्हिलन आहे. यात सर्वच जण एकाच गावातील वेगवेगळ्या स्वभावाचे हसून-खेळून कधी भांडून -रागावून पण कायम एकजुटीने राहणारे आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे गावकरी आहेत. या सिरियल्स मधील सर्वच कलाकार हे प्रमुख कलाकार म्हणून सादरीकरण केलेले आहे. गाव गाता गजाली या सिरियल्सच्या दोन्ही पर्वाचे  २०१७ – २०१८  चित्रीकरण आणि झी मराठी टीव्हीवर सादरीकरण झाले. प्रल्हाद कुरतडकर – लेखक, राजू सावंत – दिग्दर्शित, संतोष काणेकर -निर्मित या सिरीयलचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

 

या सिरीयलमधील गावाचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “मिठबाव” असे दाखविले आहे. यातील प्रत्येक वल्लीची दोन ओळीत ओळख लिहिणे महत्वाचे कारण याच वाल्लीमुळे या सिरीयलला एक उत्तम दर्जा मिळाला आहे.:

प्रल्हाद कुरतडकर – म्हणजे “संदीप” रिक्षावाला ज्याला स्वप्न आणि ध्यास आहे... “सरपंच” बनायचे. त्याच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात  “मेड झालस का ?, आज या ठिकाणी माझ्या मतदार संघात....” असे बोलून होते.

दिगंबर नाईक – सुहास नावाची भूमिका साकारली आहे. जो सर्व कामे अर्धवट ठेवतो आणि “व्ह्तल व्ह्तल सगळ व्हतल.” बोलून विषय टाळतो. आणि “विषय कसो हा.. “ बोलून नवीन मुद्द्याला हात घालतो.  

लीना पाटकर – शोभा म्हणजे सुहासची पत्नी जी सुख – दुख कोणत्याही क्षणी रडून आणि तोंडाला पदर लावूनच आपल्या भावना व्यक्त करते.   

सार्थक वाटवे – क्रिश म्हणजे सुहासचा मुलगा ज्याला  “अभ्यास केल कि माका गरगरता” सर्वात लहान आणि मस्तीखोर कलाकार.

भरत सावले – विष्णू आबा म्हणजे गावातील गुरव. देवाला गाऱ्हाणे घालणारा कौल लावणारा आणि देवाशी थेट सवांद करणारा.  

अस्मिता खटखटे – गोदा म्हणजे आबाची पत्नी जी खूप कंजूस आणि काटकसर करणारी दाखवली आहे.

किशोर रावराणे – वामन चहाचा घोट घेत घेत छोटीशी बातमी संपूर्ण गावभर पसरवणारा गावातील सोशल मिडिया.  “मी कधी कुणाक काय सांगतय काय ?” असे बोलून सर्व गावभर बातमी पसरवतो.

रोहित रोहन कोटेकर  - करण अर्जुन म्हणजे जुळी भावंडे. जे प्रत्येक गोष्ट एकसारखी बोलतात – करतात आणि एकाच मुलीवर प्रेम करतात. रुचिता शिर्के – शिल्पा म्हणजे आबाची मुलगी जिच्यावर करण – अर्जुनाचे प्रेम असते.

मिथिल म्हाडेश्वर – बैल ज्याला सतत भूक लागलेली असते. त्यांच्या तोंडी कायम  “मला ना आता भूक लागलीय.“ हे वाक्य हमखास असणार. याच्यासाठी “खाणे आणि खात राहणे” हेच अतिंम सत्य आहे

विश्वजित पालव -  प्रसाद म्हणजे शाहरुख अंगात आलेला त्याची नक्कल करणारा कलाकार.  ज्याचे गावातील पद्मा नावाच्या मुलीवर प्रेम असते.  दिपाली जाधव – पद्मा म्हणजे नाम्या काकाची मुलगी. जिला प्रसाद म्हणजे चित्रपटातील हिरो सारखा वाटत असतो.

रोहन सुर्वे – मनोहर म्हणजे ज्याला “बळी” म्हणून चिडवतात. अर्थात बायको आणि आईच्या भांडणात निराश झालेला व्यक्ती.  भाग्यश्री राणे – गायत्री म्हणजे मनोहरची बायको जी भांडखोर असली तरी तितकीच मायाळू असते. प्रतिभा पाटील – बहिरी आजी म्हणजे मनोहरची आई. जी एका कानाने बहिरी असते. ऐकू येत नाही म्हणून अर्थाचे अनर्थ करून भांडत असते.

मुकेश जाधव – बबन धा रुपये दे मग सांगतो. नेहमी दारूच्या नशेत असतो आणि वेगवेगळ्या प्रसंगावर गाणी बोलत असतो.  कवि बनण्याचे स्वप्न भांग्ल्याने निराश झालेला असतो. पण तरीही गावातील प्रत्येक प्रसंगावर गाणी बोलत असतो.

अभय नेवगी – नाम्या काका म्हणजे ज्यांचे गावात स्वतःचे सलून आहे. जिथे एकत्र बसून गजाली करतात. “ वस्तारो मारेन “ असे बोलून आपला राग व्यक्त करत असतात. शुभा कदम – शकू काकू म्हणजे  नाम्या काकाची पत्नी

कल्पना सारंग – सरकती आजी म्हणजे जिला वयामुळे चालायला जमत नाही. जी सरकून सरकून चालते. बहिरी आजीची बाल मैत्रीण असते.  जिचा मुलगा शहरांत राहत असतो. ती एकटीच गावी राहत असते.

निलेश पवार  - शाळेतील मास्तर शुभांगी भुजबळ – सविता मास्तरची बायको यांची दुसऱ्या जिल्हात वरच्या पदासाठी बदली झाली तरीहि ते आपलं गाव सोडून जात नाही. ज्यांचे गावात स्वतःचे छोटेसे किराणामालाचे दुकान आहे.    

 

या सिरीयलमध्ये नेमकं काय विशेष आहे ?

या सिरियलमध्ये वरील सर्व प्रमुख कलाकार मिळून एक गाव दाखवले आहे. गाव म्हंटले कि गावात कोणत्याही गोष्टीवरून चर्चा – गप्पा होत असतात. पण “गजाली” म्हणजे  एका मुद्द्याने गप्पांची सुरुवात होते ते भलत्याच गोष्टीवर जाऊन पोहचतात. गावातील गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या गप्पा म्हणजे “गजाली”. या सिरीयलमध्ये अश्याच गावातील प्रत्येक छोट्या गप्पाचा विषय ठरणारे “ गावातील प्रसंग “ कथेच्या स्वरुपात मांडले आहे. ज्यात “ पद्मा- प्रसादचे प्रेम प्रकरण” “मनोहरचा बळी” “शाळेतील खिचडी प्रकरण” “गाऱ्हाणे” असे अनेक मुद्दे त्यामागील गावातील सुख -दुःखाचे प्रसंग आणि आपुलीकीची – जिव्हाळ्याची  भावना या सिरीयलमध्ये खूप अचूक पद्धतीने मांडली आहे.

जर तुम्ही हि सिरीयल पाहिली नसेल तर युट्युबवर याचे दोन्ही पर्व आहेत... नक्की पाहा.. तुम्हाला तुमचे गाव आणि गावातील गजाली नक्की आठवतील.


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com



रविवार, १७ जुलै, २०२२

आजी आणि लिमलेटच्या गोळ्या..

 

*आजी आणि लिमलेटच्या गोळ्या*

माझं लहानपण कोकणातल्या एका उंच डोंगरावर वसलेल्या सुंदर अशा टुमदार गावात गेलं. मुंबई गोवा हायवेला लागून गाव असलं, तरी वाडीतुन हायवेकडे यायला त्यावेळी लोकांना 10 मिनिट पायपीट करून जावं लागे. त्यावेळी वीजही पोहचली नव्हती गावात. गावची त्यावेळी लोकसंख्या साधारण 50 ते 60 उंबऱ्यांची. या 60 घरांच्या मध्यातून खाली आणि वर जाणारी साधारण 800 पेक्षा  जास्त पायऱ्यांची पाखाडी आहे. ही पाखाडी म्हणतात देवाने बांधलेली, हीचा शेवट वरती "सडा" म्हणजे एक सपाट डोंगरावरचा भाग जिथे साधारण एक विमानतळ उभं राहील इतका मोकळा भाग, म्हणून त्याला सडा म्हणत. पूर्वी सर्वांची रहदारी याच पाखडीने होई. या पाखाडीचा खालचा शेवट जिल्हा परिषदेची शाळा, जिथे पिंपळाचे मोठे झाड आणि देवाची साण आहे तिथे. आता दुसऱ्या बाजूने रस्ता झाल्याने या पाखाडीने रहदारी कमी झाली आणि प्रवास गाड्यांनी सध्या वाढलाय, मग पर्यायाने सोबत आजारांचा प्रवासही तितकाच वाढला. आता कोणी पायाने चालतच नाहीत. काढली गाडी गेला बाजारातमागवली रिक्षा गेला फिरायला. पूर्वी सारखं नागमोडी वळण घेत जाणाऱ्या वहीवाटाही राहील्या नाहीत, पूर्वी या वहीवाटांवरून जाताना मध्येच लागणाऱ्या घरांतल्या लोकांना हाक मारत, विचारपूस करत जाण्याची मज्जा काही औरच होती! .. माझ्या आजीच्या मतानुसार आता लोकं डोक्याने चालतात (आमच्या आजीचे टोमणे,म्हणी,गाणी पुऱ्या गावात सर्वश्रुत, ती असेच ऐकवायची लोकांना बऱ्याचदा). चालणं कमी झाल्याने पर्यायाने आजार वाढले, पूर्वी हृदयविकाराने कोणी मेलं असं ऐकलंच नव्हतं आता सर्रास ऐकू येतं.

या पाखाडीने खालून पिंपळाडुन वाडीत यायला साधारण 15 मिनिट लागत आणि दम इतका लागे की, बस्स आता नकोच चालणं!..वाडीतून वर सड्याकडे जायला अजुन साधारण 25 मिनिटं लागंत. याच पाखाडीने तेव्हा लोकं उन्हाळ्यात 3 हांडे एकावर एक घेऊन पाणी भरत असंत. पाण्याची मोठी टंचाई उन्हाळ्यात असे आणि त्यात लग्न कोणाचे असले की अख्खा गाव त्या लग्न घरात पाणी देण्यासाठी मदत करत असे

पावसाळ्यात मात्र ही कोरडी पाखाडी अगदी पाण्याने न्हाऊन जायची..पाणी इतकं वाहायचं की, आम्ही मुलं कागदाची, झाडांची पानं घेऊन होडी बनवून यातून आपल्या मालकीची होडी  आनंदाने सोडत असू, इतकी श्रीमंती.

अशा या हिरव्यागार, माणसांनी भरलेल्या गावात माझं बालपण गेलं. प्रत्येक जण एकमेकांवर प्रेम करायचा. विचारपूस, आपुलकी यांनी आपल्याकडे काही कमी आहे याची लोकांना कोणालाच जाणीव नसायची. मी ही गरीब असूनही श्रीमंतीत न्हाऊन जगत होतो. आमचे आजोबा यांना एकूण 5 भाऊ आणि त्यांची मुलं आणि मग त्यांची मुलं अशी मिळून आम्ही भावंडं (चुलत, सख्खी) त्यात आत्या,काका असा मोठा गोतावळा असे

दिवसा शाळेतून आल्यानंतर खेळणे, खाणे,बागडणे असं सगळं एकत्र चाले. रात्री वीज नसल्याने बत्ती, कंदील यावर अभ्यास आणि अभ्यास झाला की चोरचिठ्या, काचाचे खेळ, खांब खांब, गाण्याच्या भेंड्या, गोष्टी नाहीतर असंच कोणी लग्नाची गाणी,चित्रपटातली गाणी ऐकवायचे. आम्ही मन लावून ऐकायचो किंवा तसं गाण्याचा प्रयत्न करायचो. असे छान दिवस जायचे.

आमचे आजोबा गवंडी कामाला जात, त्यांचे सगळे भाऊही तसंच काम करीत असंत, शिक्षण नसल्याने. मग ही मंडळी कामावरून आली की प्रत्येक नातवाला खाऊच्या पुड्या आणीत, प्रत्येकाला वेगवेगळ्या. या खाऊत चणे, शेंगदाणे, शेवबुंदी, चॉकलेट्स, गोळ्या, बिस्कीट, बुंदी लाडू, कुरमुरा लाडू असं वेगवेगळं असायचं. ही मेजवानी आम्हाला खास असायची. आम्ही सगळी चुलत, सख्खी भावंडं मिळून संख्या खूप असायची, त्या मानाने खाऊ कमीच पडायचा. पण आमची आजी त्याची विभागणी अगदी समान करायची. विशेष म्हणजे आमचे हे सगळे आजोबा त्यांच्या सूनांनाही खाऊची पुडी वेगळी आणून सुपूर्द करायचे. मला आठवतं या खाऊत जेव्हा लिमलेटच्या गोळ्या, चॉकलेट्स असायची तेव्हा तिचं वाटप करताना ती संख्येने नेहमीच कमी पडायची. मग आजी ह्या गोळ्या आपल्या पदरात पकडायची आणि दाताने तिचे तुकडे करून सगळ्यांना थोडे थोडे त्याचे वाटप करीत असे. यातूनच आम्ही शेअरिंग आणि केअरिंग शिकलो. आपल्याकडे कितीही कमी असले, तरी त्यातून सगळ्यांना आपण दिले पाहिजे हे आम्हाला आजीने शिकवले. खाऊच्या पुड्या सोडताना आमची चुलत भावंडंही सोबत असंत, त्यांनाही देता यावं यासाठी आजी या पदरातल्या गोळ्यांना दाताखाली चिरडायची..मुळात ती गोळी नाही तर आमच्या मनातला स्वार्थभाव चिरडायची आणि म्हणूनच आमच्यात आज आपल्याकडची प्रत्येक वस्तु दुसऱ्यालाही देण्याची भावना रुजली. या पदरातल्या गोळीला आम्ही उष्टी गोळी म्हणून कधीच हिणलं नाही. ती आम्हाला खूप गोड आणि श्रीमंत वाटायची कारण तिला आजीच्या प्रेमाचा आणि पदराचा स्पर्श होता.

आता आमच्या मुलांना 100 रुपयाच्या कॅडबरी चॉकलेट्स देतो आम्हीपण त्यांना तो मायेचा पदर आणि ती प्रेमाची श्रीमंती कुठून कळणारमग शेअरिंग आणि केअरिंग तर दुरचंच?

आजीचा पदर आणि तिच्या दाताखालची गोळी आम्हाला आजही आठवते, पण आज ना ती गोळी राहीली, ना पदर राहिला आणि ना आजी. पण आजीने दिलेली शिकवण, प्रेम यांनी आम्ही मात्र श्रीमंत झालो. आजही त्या आठवणीत न्हाऊन जातो. म्हणून आजही जेव्हा मी लिमलेटची गोळी बघतो तेव्हा आवर्जून मला आजीची आणि अजीच्या पदराची नक्कीच आठवण येते.🙂


दीपेश मोहिते, कल्याण

लिहायला, वाचायला आवडतं. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण  करायची आवडं.

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...