बुधवार, १७ एप्रिल, २०२४

"अंतिमा" || Antima by Manav Kaul

 "अंतिमा" || Antima by Manav Kaul

antima_book_novel_by_manav_Kaul

बाहर खुला नीला आकाश था 

और भीतर एक पिंजरा लटका हुआ था | 

बाहर मुक्ति का डर था 

और भीतर सुरक्षित जीने की थकान | 

उसे उड़ने की भूख थी 

और पिंजरे में खाना रखा हुआ था | 


"अंतिमा" या पुस्तकाच्या नावावरून कोणत्या तरी मुलीचे नाव असेल असे वाटू लागते. पुस्तक वाचण्याआधीच "अंतिमा" नामक स्त्रीची कहाणी वैगरे असेल असा अंदाज बांधला जातो. पुस्तक वाचताना लक्षात येईल कि, हा लावलेला अंदाज पूर्णतः चुकीचा असतो. "काही चुकलेले अंदाज चांगले असतात. " त्या प्रमाणे या पुस्तकाच्या नावावरून चुकलेला अंदाजच... मला हे पुस्तक वाचण्यास अधिक फायदेशीर ठरले. 

"अंतिमा" हि एका एका लेखकाची गोष्ट.. त्याच्या लिखाणाचं गोष्ट... त्या लिखाण प्रक्रियेतील गोष्ट ... त्या लिखाणासंबंधित वैयक्तिक आयुष्याच्या चढाव - उताराची गोष्ट... नेमके कोणत्या विशिष्ठ थीम मध्ये या पुस्तकाला बसविणे थोडे अवघडच वाटते. मानव कौलचे लिखाण वाचताना अनेकदा आपण त्या लिखाणात आहोत का असा भ्रम होऊ लागतो. या कादंबरीमध्ये देखील त्यांनी एक असाच भ्रम तयार केला आहे. ज्यात वाचक  नेमके आपण रोहित नामक लेखकाची गोष्ट समजून घेतोय कि तो लिहीत असेलेल्या कथेतील गोष्ट समजून घेतोय. हा विचार करताना अनेकदा बुचकळ्यात पडल्यासारखे वाटू लागते.  

पुस्तक आणि पात्रांची ओळख थोडक्यात :  

कोरोना काळ हा प्रत्येकासाठी तितकाच नवीन आणि विलक्षण होता. कोरोनाच्या लाटेत अनेक जण होरपळले. कोरोना आजार शारीरिक लक्षणांवरून दिसणारा असला तरीही त्याचे मानसिक परिणाम अधिकतर होते. "अंतिमा" हि कादंबरी अश्याच कोरोना काळातील लोकडाउनच्या कालावधीवर आधारित आहे. ज्यात रोहित नामक लेखक आपल्या अर्धवट लिखाणासोबत स्वतःशी संवाद साधत असतो. 


"कुछ भी नया करना कितना कठिन है। फिर चाहे वो गलती ही क्यों न हो।"


रोहित आपल्या लिखाणातील पात्रांशी देखील बोलायला लागतो. पण हि पात्रे नेमकी फक्त लिखाणात आहेत कि खऱ्या आयुष्यात देखील आहेत. हे कोड शेवट पर्यंत या कादंबरीत टिकून राहिले आहे.  रोहित हे मुख्य पात्र असले तरीही  पवन, अंतिमा, अरु, पब्लिशर, वर्मा मॅडम, दुष्यंत,  रोहितचे वडील आणि सलीम हि पात्रे देखील क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवणारी दाखविली आहेत.   हि पात्रे नेमके रोहितच्या लिखाणातील आहेत कि त्याच्या वैयाक्तिक आयुष्यातील हा संभ्रम झाल्याशिवाय कादंबरी पूर्णच होऊ शकणार नाही. 


रोहित हा नवीन लेखन करण्यासोबत आपल्या जुन्या लेखनाचे परीक्षणदेखील करत असतो. जुने लेखन करताना नेमका कोणता विचार केला होता. याबद्दल सुंदर परीक्षण यात मांडले आहे. काही सुंदर अर्थपूर्ण कविता देखील या पुस्तकात वाचायला मिळतात. ज्यामुळे हि  कादंबरीअजूनच अर्थपूर्ण आणि सुंदर कलाकृती बनते. 


हि कादंबरी कोणी वाचावी :

जर तुम्हालाही लिखाणाची आवड असेल.. किंवा लिखाण प्रक्रियेत उत्सुकता असेल. तर नक्की हि कादंबरी वाचावी.


__________

amkar.anju@gmail.com 


मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

The Horse, The Mole, The Fox and The Boy Book Review

 

पुस्तकाचे नाव : The Horse, The Mole, The Fox and The Boy

लेखकाचे नाव : चार्ली मॅकेसी /Charlie Mackasey


"The Horse, The Mole, The Fox and The Boy" "मुसाफिर आर्टिस्ट" प्रोजेक्टच्या वेळी आर्ट थेरपीच्या प्रवासात हे पुस्तक हातात येणे म्हणजे कोहिनुर मिळाल्याचा आनंदच आहे. या पुस्तकात  पुस्तक एक मनमोहक चित्र  कथा आहे. 

Charlie Mackasey || चार्ली मॅकेसी यांनी लेखक आणि चित्रकार असा दोन्ही बॅलन्स सांभाळत या पुस्तकाची रचना केली आहे. या पुस्तकाचा मूळ गाभा हि साधी सरळ चित्रे, साधे प्रश्न आणि त्याची साधी उत्तरे यांद्वारे सामर्थ्याबद्दल आणि जीवनातील साध्या आनंदाच्या सौंदर्याबद्दल मांडणी केली  आहे.  या पुस्तकातील कथेत पुस्तकाच्या नावाप्रमाणेच एक मुलगा, एक चिचुंद्री, एक कोल्हा आणि एक घोडा हि प्रमुख  पात्रे असतात. 

जे एका प्रवासादरम्यान एकत्र येतात. प्रत्येकाचा विशिष्ठ असा स्वभाव आहे.  मार्मिक संभाषण आणि मार्मिक उदाहरणांद्वारे, पात्र प्रेम, नुकसान, धैर्य आणि दयाळूपणाचा ते शोध घेतात. 

पात्रांची छोटीशी ओळख : 

एक लहान मुलगा जो आपल्या घराच्या शोधात प्रवासावर निघाला आहे.  "हा शोध नेमका कशाचा होता?" हे या पुस्तकातील गूढ आहे.  यातील "घोडा" एक शहाणा आणि सौम्य मार्गदर्शक म्हणून काम करतो, जो मोठा होण्याच्या आव्हानांना तोंड देत असलेल्या मुलाला गहन अंतर्दृष्टी आणि सांत्वन देणारे शहाणपण देतो. "चिचुंद्री" त्याच्या प्रेमळ निरागसतेने आणि अतृप्त कुतूहलाने कॉमिक आराम देते, तर कधी कधी केकसाठी हावरटपणा करते. "कोल्हा" प्रतिकूल परिस्थितीत लवचिकता आणि निष्ठा दर्शवतो. एकत्रितपणे, ते एकमेकांच्या कंपनीत सांत्वन आणि सामर्थ्य शोधून, अस्तित्वाच्या गुंतागुंतांवर नेव्हिगेट करतात.

मॅकेसीची मंत्रमुग्ध करणारी कलाकृती पात्रांमध्ये जीवनाचा श्वास घेते, शेवटचे पान उलटल्यानंतरही अनेक प्रकारच्या भावना निर्माण करतात. चित्रांची साधेपणा त्यांच्या गहिरा  मतितार्थ  कायम ठेवत, वाचकांना विराम देण्यास आणि आत दडलेल्या गहन सत्यांवर चिंतन करण्यास आमंत्रित करते.

"The Horse, The Mole, The Fox and The Boy"  खरंतर हे पुस्तक वाचायचे म्हटले तर वीस मिनिटांच्या आत पूर्ण वाचून होईल.  इतकी साधी सरळ वाक्यरचना आहे कि, शब्दांचे अर्थ आपल्याला उमजले असे वाटेल. पण खरी गंमत तिथेच आहे. साध्या वाटणाऱ्याच गोष्टी समजून-उमजून  घ्यायला जास्त अवघड असतात.   

"What is the bravest thing you've ever said? asked the boy.

'Help,' said the horse.

'Asking for help isn't giving up,' said the horse. 'It's refusing to give up."

याच पुस्तकातील एका चित्राचे वर्णन करताना या ओळी लिहिल्या आहेत. "मदत मागणे." आणि " प्रयत्न करायचा न थांबवणे"  खरंतर अगदी साधी वाटणारी बाब असली तरीही कृती करताना मात्र खूप अवघड असते.  स्वतःमध्ये किंवा  आपल्या आजूबाजूला असे अनेकजण दिसतील कि, ज्यांना योग्य वेळी "मदत" मागता जमत  नाही. तसेच प्रयत्त्न करणे हि थांबवून देतात. याचे गंभीर परिणाम दिसू लागतात. 

अखेरीस, हे पुस्तक करुणा आणि सहानुभूतीच्या परिवर्तनीय शक्तीचा पुरावा आहे. हे आपल्याला आपल्या प्रियजनांसोबतचे क्षण जपण्याचे आणि अपूर्णतेचे सौंदर्य स्वीकारण्याच्या महत्त्वाची आठवण करून देते. 

"The Horse, the Mole, the Fox and the Boy" is a treasure trove of wisdom and wonder, set to become a beloved classic for generations to come.

या पुस्तकातील एक सुंदर वाक्य : 

"The greatest illusion," said the mole, "is that life should be perfect."

----------------------------------------------------------------------------------------------
amkar.anju@gmail.com

शनिवार, ६ एप्रिल, २०२४

Bee's are natures Magicians ...

Bee's are natures Magicians ...

apali-writergiri-blogspot-bee-photography


Throwing it back 4 years ago, one of the most beautifully captured moments of my life....Caught in a moment of delicate grace: a honeybee's gentle pause on nature's canvas... 

आपल्याला त्या फोटोतून फोटोग्राफरने क्लिक केलेली फ्रेम दिसते... पण जेव्हा एक फोटोग्राफर तो  फोटो पाहतो तेव्हा क्लिक करताना त्या क्षणाच्या काही hidden गोष्टी / आठवणी दिसतात  जे त्या फोटोत क्लिक झालेले नसते... तो प्रसंग .. ते ठिकाण... तो पूर्ण क्षण फोटोग्राफरला दिसतो... जसा हा फोटो जेव्हा ही मी पाहते.... त्याक्षणी मी माझ्या memory express ने पुन्हा त्या ठिकाणी पोहचलेली असते. मला ती छोटीशी टेकडी...त्यात केलेले ही छोटेसे गार्डन...तो Sunset... ती सोनेरी किरणे पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी केलेली धावपळ...त्यावेळी तिकडे असणारी ती छोटीशी गर्दी...तसेच पुन्हा डोळ्यासमोर येते. आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे त्या क्षणी सोबत असणारे "साथी"आठवू लागतात. 

आता हाच सुंदर फोटो क्लिक करताना हे फुल ज्याने दाखवले तो  "साथी" आठवतो.... 

Bee's are natures Magicians ...Also, The honey bee is a symbol of success, good luck, productivity, fidelity, confidence, purity, and teamwork. हा पण काही जादूगारापेक्षा कमी नव्हता... आम्ही जितकी धम्माल, मस्ती, प्रवास करायचो... तितकेच तो मला मेंटोर सारखे गाईड करायचा.... One of my Intellectual friend...माझ्या सारखे सतत पुस्तक, चित्रपट, डॉक्युमेंट्री वाचायचा आणि त्यावर आम्ही आमची मत आणि चर्चा करायचो...   कधी financial adviser बनायचा .. कधी life कशी जगायची फंडे सांगायचा.... अचानक ऑफिसला किंवा घरी येऊन surprise द्यायचा. माणसाचं भरभरून कौतुक करायला यांच्याकडूनच शिकले. 

खरंतर तो "साथी" नसून "सारथी" होता...... ज्याने life चे फंडे शिकवले.. डोळ्याला दिसणारी जादू कशी थोड्यावेळात गायब होते.. तसा  कोविडच्या लाटेत अचानक "अलविदा" केले. 

आपण कितीही Impermanence म्हणून Let  go  केले तरीही काही आठवणी माञ Permanent राहतात.

 

सोमवार, १ एप्रिल, २०२४

Norwegian Wood by Haruki Murakami Book Review

 

Norwegian Wood by Haruki Murakami Book Review




काही पुस्तकांबद्दल आपण चुकीचे ऐकतो आणि ते पुस्तक वाचण्याचा कधीही प्रयत्नही देखील केला जात नाही. माझ्यासाठी  "Norwegian Wood" हे एक असेच पुस्तक आहे. कितीतरी वेळा पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक पहिले लावलेले दिसायचे. पण मनात पूर्वग्रह दूषित झालेले होते म्हणून चुकूनसुद्धा  हात लावण्याची कधी तसदी घेतली नाही. हे पुस्तक न वाचण्याचे  निमित्त फक्त इतकंच ऐकून होते कि, "ती एक लव्हस्टोरी होती." मला पुस्तकातले गुलाबी  प्रेम किंवा विरहाचे प्रेम अतिशय कंटाळवाणे वाटते. त्यामुळे सहसा लव्ह स्टोरीज वाचतच नाही.  पण या मागील दोन महिन्यात एका मित्राच्या रेफरन्समुळे दिव्य प्रकाश दुबे यांची "ऑक्टोबर जंक्शन" आणि मानव कौल यांची "अंतिमा" कादंबरी वाचनात आल्या.  यात अनेक वेळा मुराकामीच्या पुस्तकांचे संदर्भ सापडायचे.  न राहवून  "Norwegian Wood" पासून मुराकामीचे पुस्तक वाचायला सुरुवात केली. "Norwegian Wood" कादंबरी पूर्ण झाल्यावर मला  George Eliot चे वाक्य आठवले. ते म्हणजे, “Don't judge a book by its cover” 


पुस्तकाबद्दल थोडक्यात :   

हे पुस्तक मूळ जपानी भाषेत हारुकी मुराकामी या लेखकाने लिहिले आहे. या पुस्तकाचे दोन वेळ इंग्रजी भाषांतर झाले आहे. यावर आधारित चित्रपटही बनले आहेत. साधारणतः प्रेम कथेत फक्त एक -दोन  पात्र असतात. पण या कादंबरीत प्रत्येक पात्र तितकाच महत्वाचा वाटतो. त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यात दिसून येते. मी इतर कादंबरी वाचताना बऱ्याचदा कादंबरीतील इतर पात्रांना सहज विसरून जाते. पण या कादंबरीत सर्व पात्रे मला तितकीच जवळची वाटतात. खरंतर हि एक डार्क रोमान्स कादंबरी आहे. 

"Norwegian Wood"या कादंबरीचे नाव हे Norwegian Wood नामक गाण्यावरून ठेवण्यात आले आहे. ६०च्या दशकातील हे गाणे नातेसंबंध, दु: ख आणि  वासना यावर आधारित आहे.  या कादंबरीची प्रमुख थीम / मुख्य विषय देखील याच भावनांशी निगडित आहे.  ही एक आत्मनिरीक्षण करणारी कादंबरी आहे, कारण यातील पात्रे सतत स्वत:ला शोधून काढत असतात, परंतु ती त्याच्या गाण्याच्या संकेतांसह विस्तीर्ण प्रेक्षकांशी देखील संबंधित आहे.

 इतर कादंबरी मध्ये  बऱ्याचदा एक -दोन  पात्रांवर अधिक फोकस केले जाते आणि बाकीची पात्रे निरर्थक वाटतात. पण या कादंबरीत प्रत्येक पात्र तितकाच महत्वाचा वाटतो. त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यात दिसून येते.  

“I read Naoko's letter again and again, and each time I read it I would be filled with the same unbearable sadness I used to feel whenever Naoko stared into my eyes. I had no way to deal with it, no place I could take it to or hide it away. Like the wind passing over my body, it had neither shape nor weight, nor could I wrap myself in it.”

पात्रांची ओळख : 

"टोरू वतनबे"  नामक पात्रापासून गोष्टीची सुरुवात होते. जो स्वतःची गोष्ट  सांगत असतो. ज्यात त्याच्या सर्वात जवळचा मित्र "किज़ुकी"च्या  आत्महत्येचा उल्लेख होतो.  यामुळे टोरूला असह्य मानसिक त्रास झाला. त्या  दुःखातून सावरण्यासाठी बऱ्याच गोष्टी त्याने केल्या.  त्याने दुसऱ्या शहरात स्थलांतरण हि केले. मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्या एकट्याच्या  वैयक्तिक आयुष्यात बदल झाला नव्हता तर त्यासोबत "नाओको " चे आयुष्यही पूर्ण बदलले होते.  

"नाओको" हि किज़ुकीची प्रेमिका असते. अचानक ते दोघे त्या शहरात ते भेटतात. किज़ुकीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दोघांनाही सावरणे अवघड जात होते. त्यामुळे मैत्रीच्या नात्याने एकमेकांना सपोर्ट करू लागतात.   एखाद्या मानसिक धक्क्यातून सावरणे प्रत्येकालाच जमतं असे नाही. काहीजण दुःखातून लगेच सावरतात तर काहींजण वर्षानुनवर्षे त्याच  दुःखाला कुरवाळून आयुष्य जगतात. नाओको हि अशीच मानसिक त्रासात अडकलेले एक व्यक्ती असते. पण तिला इतका मानसिक त्रास होण्यामागे देखील एक तितकाच आघात करणारा इतिहास असतो. 

"मिदोरी" नावाची हि एक टोरूची  मैत्रीण दाखवली आहे. जी कायम मज्जा मस्ती करणारी दाखवली असली तिच्या या हसण्यामागे वैयक्तीक आयुष्यातील सुरु असलेल्या नैराश्यपूर्ण घटनांचा समोरच्याला पत्ताही लागू देणार नाही. या कादंबरीतील हिचे टोरूची मैत्रीण आणि स्वतःचे वैयक्तिक स्थान हि तितकेच महत्वाचे आहे.  

"नागवासा" नावाचा टोरूचा रूममेट  ज्याला आता पर्यंत शंभरहून अधिक मुलींशी शरीर संबंध ठेवल्यालाचा अभिमान असतो. त्याची "हातसुमी"  नामक शालीन प्रेमिका पण असते. नागवासा आणि हातसुमी हि दोन पात्रांची देखील एक वैयक्तिक ओळख आणि त्यांची रिलेशनशिप एक वेगळेच कोडं असतं. यांचे विचार आणि स्वभाव देखील पूर्णतः वेगवेगळे असतात. तरीही एक विलक्षण नातं त्यांचं असत. त्यासोबत ते टोरूच्या जीवनाशी जोडले जाणे देखील तितकेच सुंदर पद्धतीने मांडले आहे. 

" रेईको" नामक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये ओळख होते. तिचा हि मानसिक आजाराचा एक  इतिहास असतो.  ज्याची ट्रीटमेंट ती या हॉस्पिटलमध्ये घेत होती. ज्यात तिनेही अश्या अनेक चढ -उताराचा सामना केलेला असतो. जी एक आधारस्तंभासारखी त्यांच्या जीवनात येते.  

टोरू आणि मिदोरी, टोरू आणि नाओको, नाओको आणि कुजिकी, मीदोरी आणि तिचा बॉयफ्रेंड याचे प्रेमातील आणि वैयक्तिक जीवनातील  उतार -चढाव, त्यात रेईको, नागवासा, हातसुमी सारखे काही पात्र देखील आयुष्याच्या वळणावर भेटत राहतात.  या प्रत्येक पत्राचे स्वतःची वेगळी ओळख आणि जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. जे कधी एकमेकांना  मानसिक आधार देतात. तर कधी रिफ्लेक्शन करायला तर कधी एकमेकांना मदत करतात. यात कोणतेही पात्र चूक किंवा बरोबर या मापात नाही बसवू शकत.

शरीर आजारी पडले कि, ताप, सर्दी, अंग दुखी सारखी लक्षणे दिसू लागतात. त्याच प्रमाणे मन आजारी पडलं कि, एकटेपणा, ताण -तणाव, बैचेनी, दुःख, नैराश्य सारख्या भावना येऊ लागतात. या मानसिक त्रासाचे परिणाम शरीरावर देखील बदल दिसत असतात. त्याचप्रमाणे  मानसिक त्रासासोबत जगणाऱ्या व्यक्तीचे  लैंगिक जीवन किंवा लैंगीकतेबद्दल  (sexuality) हि अनेक बदल होत असतात. ज्याचा परिणाम आजही कोणी खुलेपणाने बोलू शकत नाही.  मानसिक त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीचे आपल्या समाजात सहज समावेशन केले जात नाही.  अश्या अनेक   मानसिक विषयाला अनुसरून कादंबरीतील पात्रांचे वर्णन केले आहे. मानसिक त्रास झाला तर त्याला आधार देणे आणि  त्यावर उपचार होणे किती महत्वाचे आहे याचे हि अप्रतिम वर्णन केले आहे. जर तो मानसिक आधार द्यायला कोणी सापडले नाही तर... किंवा योग्य मानसिक उपचार झाले नाही तर.... व्यक्तीच्या मानसिक त्रासाचा गंभीर परिणाम म्हणेजच "आत्महत्या". यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही त्या सोबतचे नातेवाईक किंवा मित्रपरिवारात याचा मानसिक धक्का बसलेला असतो. आणि पुन्हा मानसिक त्रासाचे नवीन चक्र सुरु होते.  

या कादंबरीतील पात्रे आणि  प्रसंग मला समुद्रातील जहाजांप्रमाणे वाटतात. ज्यात अनेक जहाजे  प्रवास करत असतात. त्यांना आपल्या ठरलेल्या वेगवेगळ्या मुक्कामी पोहचायचे असते. प्रत्येक खलाश्याला समुद्रातील वादळ-वाऱ्याशी झुंज द्यावी लागते. कधी अचानक भरती तर कधी ओहोटी... यात काही जहाजे मुक्कामी पोहचतात. तर काही  भरकटली जातात... तर काही समुद्रात बुडून जातात.  माणसाचं आयुष्य हि असेच काहीसे आहे. 

“What makes us the most normal," said Reiko, "is knowing that we're not normal.” 



-----------

amkar.anju@gmail.com 


बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

Book Review : "जिणं आमुचं" || "The Prisons We Broke" by Baby Kamble

Book Review :  "जिणं आमुचं" || "The Prisons We Broke" by Baby Kamble

 

"जिणं आमुचं" हे पुस्तक म्हणजे बेबीताई कांबळे यांचे आत्मचरित्र आहे. याचा इंग्रजी अनुवाद "The Prisons We Broke" नावे माया पंडित यांनी केला आहे.  मराठीतले पहिले दलित स्त्रीचे आत्मचरित्र म्हणून बेबीताईंच्या पुस्तकाला ऐतिहासिक महत्व आहे. ह्या पुस्तकातील त्यावेळच्या महार स्त्री जीवनाचे स्वरूप कसे होते ? याबाबत अतिशय बारकाईने मांडणी केली आहे. बेबीताईं या ललित लेखन करणाऱ्या लेखिका नसून समाजशास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखिका होत्या. या पुस्तकात   महार समाजाचे भीषण  वास्तव मांडले तर आहेच त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या,  "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." मूलतत्त्वांचा बेबीताईंच्या जीवनात कसा बदल घडला याबाबत हि आपले विचार मांडले आहेत.  

या पुस्तकातील महार समाजाचे माणूसपण फक्त दिसण्यात होते.. त्यांना जनावरांसारखे शेपूट आणि चार पाय नव्हते इतकाच तो बाहेरून दिसणारा माणूस आणि जनवरातील फरक होता.  माणसांसारखी माणसं पण सवर्णांकडून मिळणारी मात्र वागणूक जनावरांसारखी होती. जसे जनावरांना गोठ्यात बंदिस्त ठेवले जायचे तसे याना गावाच्या वेशी बाहेर ठेवले जायचे. त्यांना सवर्णासमोर बोलण्याचा हक्क नव्हता.  त्यांचा स्पर्श चालत नसे. त्यांना मान वर करण्याचा हि हक्क नव्हता. त्यांना विचार मांडण्याचा हि हक्क नव्हता. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यांना पाणवठा, मंदिर अश्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नव्हता. पण गावातील आणि घरातील घाण साफ करायला मात्र महार पाहिजे होते. गावात व्यक्ती किंवा जनावर मृत्यू झाला तर त्याची सर्व काम महारांनाच होते. गावात कोणाचे लग्न असले, त्यात नवरा नवरीला हळद लावली कि, भुताखेतांपासून वाचण्यासाठी घराबाहेर  पडू देत नाही. अश्यावेळी त्याचे शौच साफ करायला हि महाराचं असायचे.  या कामाच्या बदल्यात मिळायचे त्या लोकांच्या घरातील आंबलेली भाजी आणि शिळी भाकरी.  जर ते हि नाही मिळाले तर उपासमार व्हायची.  ८-१० वर्षातचं मुलींची लग्न लावली जायची. त्या मुलींवर घरातील दारिद्र्याचा आणि गुलामगिरीचा सर्व राग निघायचा.  सतत काम, शिवीगाळ, मारहाण  तर असायचीच त्यासोबत मासिक पाळी आल्यापासून ते जो पर्यंत पाळी  जात नाही तो पर्यंत उपासमारीतील गर्भारपण सुरूच असायचे. त्यातील काही मुलं वाचतील ती वाचतील. त्यासोबतच अंधश्रद्धेचा हि विळखा सोबत जोडलेला असायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बेबीताईंच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. कारण त्यांना त्यांचं आणि वंचित समाजासाठीचे  माणूसपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे  मिळाले. 

या पुस्तकाचे  छोट्या प्रकरणांत विभाजन झाले आहेत. ज्यात त्यांचे महार वस्तीचे वर्णन, आजोळचे घर , बालपण,  आषाढ महिन्यातील सण, अस्पृश्यता, गरिबी, अस्वच्छता, रोगराई, नोकरीची अवस्था, मासिक पाळीतील काळ, बालविवाह, गरोदरपणातील हाल, सुनांवर होणारी गुलामगिरी, भीमाचे शिक्षणाचे वारे आल्यानंतरचा बदल, मंदिर प्रवेश,  हिंदू कोड बिल, शिक्षणाचे महत्व आणि क्रांतिकारी प्रबोधन अश्या अनेक मुद्द्यांवर बारकाईने सखोल वर्णन केले. या पुस्तकातील हे वर्णन वाचताना महार वस्ती कशी असू शकते ? सवर्णांनी कशी वागणूक दिली. दलित स्त्रीच्या गुलामगिरीची जीवन अवस्था  म्हणजे गुलामांची हि गुलाम असते. याचे नक्कीच अनुभूती येईल. 

The Prisons We Broke Available on Amazon and Book ganga

-----

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com












सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

गुठली लड्डू || Guthali Laddu || शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी समान असतो का ? या बाबत विचार करायला लावणारा चित्रपट

 गुठली लड्डू 

guthali-laddu-movie-review-apali-writergiri-blog


गुठलीची आई गुठलीला आपल्या जाती बद्दल सांगत असते कि, आपण भंगी आहोत. आपल्याला त्या शाळेत शिकण्याचा अधिकार नाही. तू हि वडिलांसारखा भंगी बनणार. "  गुठली विचारतो कि , "भंगी कोण असतो ?" आई उत्तर देते कि, "साफसफाई करणारा भंगी असतो." गुठली, "मग तो मिठाई पण दुकानाची साफसफाई करतो. मग तो पण भंगी आहे. प्रत्येकजण घर साफ करतो तो पण भंगी आहे. " त्याच्या आईला आणि आपल्याला हि  निरुत्तर करणारा सात - आठ वर्षाचा "गुठली" नामक मुलाची हि गोष्ट आहे. 

गावातील सरकारी शाळा बंद झाली. गावातील सरस्वती विद्यामंदिर नामक खाजगी शाळेत उच्च वर्णीय व्यतिरिक्त मुलांना प्रवेश मिळत नाही. शिक्षक व नेता असो किंवा   गावातील छोट्याशा टपरीवरील चहावाला प्रत्येक जण सफाई कामगाराला बहिष्क्रुत करतात.  साधा चहाचा कप किंवा सायकल ला हात लावला तरीही त्याला मारले जाते किंवा शिवीगाळ केली जात. त्यांनी जर चुकून हात लावला किंवा सावली जर कोणावर पडली  तर त्यानंतरही आंघोळ केली जाते. छोट्या छोट्या प्रसंगातून जातीय भेदभाव बद्दल वास्तववादी मांडणी केली आहे. असे अनेक प्रसंग या चित्रपटात मांडले आहेत ज्यातून तळागाळातील समाज किती दबलेला आहे आणि उच्च वर्णीय कसे याला कळत नकळत कारणीभूत आहे हे दिसून येईल. 

संविधानाने मूलभूत हक्क दिले आहेत. शिक्षणाचा अधिकार हि सर्वाना दिलेला आहे. तरीही संपूर्ण समाजातील जातीय विचारधारा इतक्या दृढ आहेत यामुळे तळागाळातील समाज आज देखील त्यांच्या या हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहिला आहे.  "संविधान म्हणजे एक जादूचे पुस्तक आहे." असे म्हणत संविधाना शिकण्याचे महत्व खूप सुंदर पद्धतीने समजावले आहे.

दिग्दर्शक इशरत खान यांच्या या चित्रपटाचे जवळपास 50 चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झाले असून हा सन्मान मिळण्याचे कारण चित्रपट पाहिल्यानंतर स्पष्ट होईल. गुथली (धनय सेठ), लड्डू (हीत शर्मा) आणि संजय मिश्रा सारख्या कलाकारांनी या अप्रतिम काम या  चित्रपटात केले आहे. 

Available on Amazon prime and You tube

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

फ्लॅमिंगो सफरनामा || Flamingo Safarnama

फ्लॅमिंगो सफरनामा  || Flamingo Safarnama

फ्लॅमिंगो सफरनामा... 
स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेकदा आपल्या संकुचित डबक्यातून बाहेर  लागते... परदेशातून हजारो मैल प्रवास करणारे फ्लॅमिंगो हीच जगण्याची धडपड शिकवत  असतात.  त्यांचे हेच वेगळेपण बघायला आज लाखो पर्यटक गर्दी करतात. 
या पक्षी निरीक्षणाच्या वेळी इतर हि खूप सुंदर पक्षी होते. तरीही फ्लॅमिंगोचे वेगळेपणच जास्त मनाला भावते. 
असे संकुचित डबके आपल्याही  आयुष्यात  वेगवेगळ्या स्वरूपात असतात. अगदी जवळच्या वाटणाऱ्या व्यक्ती, ठिकाण, आठवणी  किंवा विचांरांचे" हि डबके असू  शकते. या सफरनाम्यातून मी एक गोष्ट शिकले - ती म्हणजे  जगण्याची धडपड फक्त डबक्यापुरती मर्यादित ठेवणार नाही. 

या सुंदर सफर  नाम्याचे  आयोजक "उनाड भ्रमंती टीम" होती. ज्यांच्या  नावातच "उनाड" थ्रिल भरले आहे.. कोणत्याही वयाचं बंधन नाही... चवदार चिलापी फिश थाळी, उजनी धरणात मनसोक्त सफर आणि सुंदर पक्षी दर्शन 
या सफरनाम्यातील काही क्षण चित्रे 
Picture Credit : Anjali Pravin


Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri



Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

Flamingo Watching Expedition: A Pictorial Journey Photo blog apali writergiri

apali-writergiri-flamingo-marathi-photo-blog-blogger









 

"अंतिमा" || Antima by Manav Kaul

 "अंतिमा" || Antima by Manav Kaul बाहर खुला नीला आकाश था  और भीतर एक पिंजरा लटका हुआ था |  बाहर मुक्ति का डर था  और भीतर सुरक्षित ...