रविवार, ३० मे, २०२१

आसुरन आणि कर्णन


asuran-karnan-movie-review

हे दोन्ही चित्रपट वेगवेगळे असले तरीही दोन्ही चित्रपटाची कथा हि स्वतंत्र भारतातल्या गुलाम किंवा अस्पृश्य म्हणून गणती होणाऱ्या समाजाच्या संघर्षाची कथा आहे. “दलित समाज” म्हणजे नेमके कोण होते? त्यांच्यावर कोणत्या प्रकारची हिंसा झाली होती? त्यांच्यावर सवर्ण समाज कश्या प्रकारे छळ करायचे ? दलित समाजाला या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी किती बळी द्यावे लागले ? किती काळ द्यावा लागला ? दलित समाजाचा विकास होण्यास नेमके कोणते अडथळे येतात ? दलित समाजाला आज हि नेमके आरक्षणाची आणि कायदे संरक्षणाची गरज का आहे ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे आणि दलित समाजाची व्यथा आणि संघर्ष गाथा या दोन्ही चित्रपटाच्या कथेतून मांडली आहे.  

आसुरन :

“आसुरन” हि चित्रपटाची कथा साहित्यिक पुमई यांच्या “वेक्कई” कादंबरीवर आधारित आहे. सिनेमाचं दिग्दर्शन वेट्रीमरन या साऊथच्या दिग्दर्शकाने केलं आहे. २०१९ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.  धनुष आणि मंजू हे प्रमुख कलाकार या चित्रपटात आहेत. राष्ट्रीय पुरस्कार ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार हि या चित्रपटाला मिळाले आहेत. चित्रपटाची कथा हि थोडक्यात म्हणजे  जमिनीच्या तुकड्यासाठी दलित समाजाच्या कुटुंबाने सावकाराशी केलेला संघर्ष म्हणजे “आसुरन”. या चित्रपटाची  कथा शिवा नावाच्या शेतकरी कुटुंबाची आहे. शिवा हा खूप अबोल – दारूच्या नशेत बुडालेला दाखविला आहे. त्याची दोन्ही मुले मात्र रागीष्ट आणि अन्याय सहन न करणारे दाखविले आहे. सवर्ण सावकाराशी  जमिनीचे वाद सुरु होतात तेव्हा शिवा ते भांडण मिटविण्यासाठी संपूर्ण गावासमोर माफी मागतो. पण मुलांना हे कळल्यावर मात्र हे भांडण – हत्यारे हातात घेऊन घातपातात रुपांतर होते. याच वेळी शिवाचे अबोल रूप आपल्या परिवाराला  वाचविण्यासाठी रोद्र होते. मुळातच शिवा हा ज्वालामुखीप्रमाणे होता पण पूर्वार्धातील अश्याच घातपाताच्या घटनेमुळे आपले पूर्ण कुटुंब – गाव गमावल्याची खंत  मनात राहिल्याने शांत आणि अन्याय सहन करण्याचा मार्ग स्वीकारला होता. पण  यावेळेस आपल्या कुटुंबाच्या  संरक्षणासाठी  पुन्हा त्या   जातिवाद आणि हिंसा यांचे खूप भीषण स्वरूप बघावे लागू नये म्हणून चित्रपटाच्या अतिंम क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिला आहे. प्रामुख्याने या चित्रपटातून न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि शिक्षणाचे महत्व खूप आशादायी आणि सकारात्मकरीतीने मांडली आहे.

कर्णन :

२०२१ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.क्षणी या सिनेमाचं दिग्दर्शन मारी सेल्वराज आणि निर्मिती कालैपुली यांनी केलं आहे.  धनुष, राजीषा, लाल, नटराजन आणि इतर  हि  प्रमुख कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची सुरुवातच खूप संवेदनशील  अशी सुरु होते. एक मुलगी रस्त्याच्यामध्येच फिटने तडफडून मरत आहे. आजूबाजूने अनेक बस – गाड्या जात आहेत पण कोणीही तिच्या मदतीला थांबत नाही. याच सुरुवातीच्या प्रसंगाला धरून संपूर्ण चित्रपटाची कथा आधारलेली आहे. या चित्रपटात एक असे गाव दाखविले आहे. जिथे बस थांबत नाही कारण त्या गावात दलित – वंचित समाज राहत असतात. जर या गावाला बस मिळाली तर या गावातील लोक बाहेर सहज शिक्षण घेऊ शकतील, नोकरी करू शकतील आणि गावाचा विकास होऊ शकतो. हाच गावातील विकास होऊ नये म्हणून आजूबाजूच्या गावातील राजकारणी येथे बस थांबू देत नाही. हे गाव कायम दलित – वंचित आणि अविकसित राहावे म्हणून गावातील विकासाचे मार्ग हे अनेकदा थांबविले गेले आहे. कर्णन म्हणजे एक असा तरुण आहे ज्याला हि विषमता नष्ट करण्यासाठी कशाचेही भय नाही. ज्याचा समता – शिक्षण आणि संघर्ष यावर विश्वास आहे. अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो असा विचार करणारा आहे.

एकाचवेळी भीती,  प्रेम,  आनंद, आणि अचानक काळजाचा ठोका चुकवणारे प्रसंग, प्रचंड करुणा आणि शेवट या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळेल. उत्तम कथेसोबतच धनुषची अप्रतिम भूमिका या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळेल. या दोन्ही चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “शिका – संघटीत व्हा आणि संघर्ष करा.” या ब्रीद वाक्याला धरून दोन्ही संघर्ष दाखविले आहेत. दोन्ही चित्रपटांच्या अखेरीस “शिक्षणाच्या प्रकाशाची”  एक सकारात्मक बाजू या दोन्ही चित्रपटातून उत्तम पद्धतीने मांडली आहे.  

आपल्याकडे जर जमीन असेल तर ती कोणीही बळकावून घेईल.आपल्याकडे पैसे असतील तर कोणीही लुटून घेईल. पण जर आपल्याकडे शिक्षण हे शस्त्र एकदा मिळविले की कोणी आपल्याकडून ते हिरावुन घेऊ शकत नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण हेच एक प्रभावी माध्यम आहे. पण या माध्यमाचा चुकीचा वापर नको करू. जसे काही अधिकारी शिक्षण आणि अधिकाराचा चुकीचा वापर  करत आले आहेत.

मूळ चित्रपट हे तमिळ भाषेत असले तरीही हिंदी – इंग्रजी अनुवाद आणि शीर्षक हि या चित्रपटाचे पाहायला मिळतील. एमेझोन प्राईम आणि युट्युबला हे चित्रपट पाहायला मिळतील. नक्कीच हे चित्रपट पाहिल्यानंतर मन सुन्न होऊन जाते. दोन्ही चित्रपटातील अनेक असे संवेदनशील आणि मन -डोके  विचार सुन्न करणारे प्रसंग दिसून येतील कि, माणूस सत्ता किंवा जातीच्या अहंकारापोटी कसा दुसऱ्याला गुलाम बनवितो.

मी स्वतः हि हे दोन्ही  चित्रपट पाहिल्यानंतर  विचार सुन्न होऊन गेले होते. हा ब्लॉग करायला हि त्यामुळे उशीर झाला. मास्टरपीस अश्या या दोन्ही चित्रपटाबद्दल नेमके व्यक्त होऊ सुचत नव्हते. शेवटी इतकेच सांगेन कि, नक्की पाहा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा.

 

 

२ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...