कोकणातील मिरग म्हणजे काय? माहिती आहे का?
गावी राहायला आल्यापासून इथल्या माणसांची गोडी कळली तशी इथल्या मातीशी आणि निसर्गाशी खूप जवळीक हि वाढली. शेतकऱ्यांचे
निसर्गाशी असणाऱ्या प्रामाणिक नात्याची वेगळीच झलक इकडे बघायला मिळाली. हि आठवण
माझी कोकणातील घरातील पहिल्या पावसाळ्याची आठवण होती. दरवर्षी आई-बाबा मुंबई वरून जून
महिन्याच्या दरम्यान राखण देण्यासाठी म्हणून गावी यायचे. पण हि ‘राखण’ म्हणजे
नेमके काय? मला तेव्हा काहीच कळले नाही. श्रद्धा- अंधश्रद्धेचा भाग समजून मी हि थोडेसे
दुर्लक्षच केले. पण कोकणातील घरी राहायला लागल्यावर खूप नवीन गोष्टी कानावर पडू
लागल्या. जसे पावसाळ्यातील नऊ नक्षत्र, तरणा-म्हातारा
पाऊस, मिरगाची राखण वैगरे वैगरे. या सर्व नवीन गोष्टी ऐकताना आणि समजून घेताना
कळले कि, या गोष्टींचे निसर्गाशी जोडलेले नाते आहे. इकडे पावसाळ्यातील हवामानाचा अंदाज
हि याच नक्षत्रावर लागतो. शेतीची सुरवात हि याच नक्षत्रांच्या आधारावर होते. कालनिर्णयमधील पंचांगात बारीक अक्षरांनी हि नक्षत्रे
लिहिलेली असतात. हे देखील इकडे राहायला आल्यावर नव्याने कळले असेल.
रोहिणी नक्षत्र गेल्यानंतर ज्येष्ठ (साधारणत:
जून) महिन्यात मृग नक्षत्राची सुरुवात
होते. मृग हे पावसाळ्यातील नऊ नक्षत्रांपैकी
पहिले नक्षत्र आहे. याला कोकणी भाषेत ‘मिरग’ असे म्हणतात. पाऊसाची सुरुवात या नक्षत्रा पासून होते म्हणून पाऊस आगमन सोहळ्यासारखे साजरे केले जाते. आजही कोकणातील प्रत्येक घरात या पावसाच्या
आगमनाचे पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा दिसून येईल.
मिरगाची सुरुवात आणि
इथल्या गमती जमती :
PC : Giri |
साधारणत: ७ जून हा मिरगाचा दिवस मानला जातो. पण काही गावांत तो मृगनक्षत्रातील १५ दिवसातील पहिल्या ते शेवटच्या दिवसा पर्यंत कोणत्याही एका दिवशी साजरा केला जातो. मृग नक्षत्र सुरु झाले कि, निसर्गातील होणारे बदल हे शेतकऱ्याला शेतीची कामे सुरु करण्याची चाहूलच देत असतो. निसर्गात होणारे बदलाची सुरवात हि, जमिनीतून येणारा लाल रंगाचा ‘मिरग’ किटकापासून होते. कोकणातील लाल मातीत हा ‘मिरग’ दिसू लागला कि, मृग नक्षत्र सुरु झाल्याची पहिली चाहूल असते. मला तर लहानपणी हा मिरग किटक खूप आवडायचा. इतका आकर्षक, मोहक आणि मखमली ‘मिरगा’ सोबत खेळायला वेगळीच मज्जा यायची. मिरग सुरु झाला कि, ‘इथल्या शेतकऱ्याला आता पेरणीची वेळ सुरु झाली.’ हि निसर्गा कडून बातमी मिळते. आणि शेतकरी लगेचच शेतीच्या कामाला सरुवात करतो. आणखी एक गंमत म्हणजे मृग नक्षत्रातील दिवस सोडले तर हे कीटक वर्षभर कधीच दिसत नाही. हल्ली रासायनिक खतांमुळे हे कीटक दिवसेंदिवस कमी कमी होत चालले म्हणून एक उदासीनता हि वाटते.
याच दिवसांत झाडांवर काजव्यांची लक-लक दिसायला सुरवात होते. अगदी आमच्या अंगणात आणि घरात हि रात्रीचे काजव्यांची ‘चमचम होते. रात्री अंगणातील चटईवर झोपून मोकळ्या आभाळातील चमचमत्या चांदण्या आणि समोरील झाडावरील लुकलुकणारे काजवे हे एक सारखेच वाटतात. तेव्हा निसर्गाची दिवाळी बघण्याचा विलक्षण अनुभव मिळतो. जणू निसर्ग स्वतःच पाऊस सुरु होण्याचे स्वागत या निसर्ग निर्मित लाईटिंगने करत असतो. मी लहान असताना, आम्ही काचेची किंवा प्लॅस्टिकची बरणी घेऊन काजवे पकडायचे आणि सोडायचे खेळ सुरु व्हायचे. जरी काजवे पकडले तरी ते लगेच सोडून द्यायचो कारण ते बंद बाटलीत मरून जाऊ नये. अलीकडील दोन तीन वर्षांत पर्यटकांसाठी काही शहरांजवळील गावांत ‘काजवा महोत्सव किंवा Fireflies Festival’ साजरा केला जातो. पण मला या महोत्सवातून आमच्या अंगणासारखा आनंद नाही मिळाला.
PC : Sushant Shinde |
त्यानंतर पहिला पाऊस सुरु झाला कि, गावतील काका
आणि दादासोबत चढणीचे मासे पकडणे (प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे मासे) आणि खेकडे
किंवा लाल चामटे (लाल छोटा खेकडा) पकडणे सुरु होते. मी हि तांब्या किंवा टोप घेऊन
लाल चामटे पकडायची आणि तितकीच घाबरायची. (
तांब्या आणि टोप म्हणजे एखादे पाणी भरण्याचे छोटेसे भांडे – खेकड्याच्या टोकदारपणा
मुळे पिशवी फाटते म्हणून खेकडे पकडायला
भांडे वापरतात) मिरगात कोकणातील प्रत्येक घरात रात्री चुलीवर या थोडेसे तिखट-मीठ
टाकून भाजलेले मासे किंवा कालवण आणि खेकड्यांचा काढा हमखास दिसणार.
या मृग नक्षत्रात इथला शेतकरी या वर्षातील पहिल्या पावसाचे आगमन आणि शेत जमीन यांचे पारंपारिक पद्धतीने पूजन करतात. त्यालाच कोकणात ‘मिरगाची राखण’ असे म्हणतात. या पावसाची आणि धरणी मातेची कृपा इथल्या शेतकऱ्यावर राहावी हे साकडे या मिरगाच्या राखणेतून घातले जाते. या राखणचे दोन प्रकार इकडे बघायला मिळतील. एक 'तिखटी' आणि 'गोडी'. तिखटी राखण म्हणजे कोकणातील प्रत्येक घरात मिरगाची राखणेसाठी ‘मिरगाचा कोंबडा’ निसर्गाला अर्पित केला जातो. तर 'गोडी राखण' म्हणजे एक भेंडा (भाजीतील भेंडी) घेऊन त्याचा देठ कापून धरणी मातेला अर्पण केले जाते. या दोन्हीतील एका प्रकारे राखण दिली जाते. कोणत्याही प्रकारे राखण दिली तरी त्यात 'नारळ' हा कायम असतोच. राखणेची सुरवात धरणी मातेच्या रक्षणकर्त्याला म्हणजे राखणदाराला जाप म्हणजेच गाऱ्हाणे घालण्या पासून करतात. ‘बा देवा मेरेकरा/ महाराजा माज्या शेताच्या रकवालदारा .. दर वर्सा सारखो आज ह्यो तुका नारळ कोंबो ठेवलेलो हा तो मान्य करून घे गुराढोरांचा मुला बाळांचा शेताचा रक्षण कर... आनी तुजो मिरग यंदा मजेत करून घी रे म्हाराजा..! तुझी कृपा दृष्टी कायम असू दे रे माहारजा... व्हय महाराजा..!’ या गाऱ्हाण्यातून ‘शेत जमिंचे रक्षण करणार्याला नारळ आणि कोंबडा अर्पित करत आहोत म्हणून आमच्या शेताचे आणि कुटुंबियांचे रक्षण कर’ हे साकडे घातले जाते. त्यानंतर तोच कोंबडा चुली वर शिजवून सर्व एकत्र मिळून चवीने खातात. राखणे देण्यासाठी वाडीतील इतर नातेवाईकांना हि आवर्जून आमंत्रित केले जाते. मिरगाची राखण देऊन झाल्या नंतर शेतकरी जोमाने शेतात कामाला सुरुवात करतो.
मृग नक्षत्र सुरु झाले कि, कोकणातील प्रत्येक घरासमोरील नेहमी शेणामातीने सारविलेले अंगण हि लाल मातीने
रंगून जाते. मातीचा सुंगध दरवळायला सुरवात होते. त्याच अंगणात घरात जपून ठेवलेल्या तोवशी (दोडकी), पडवळ, भोपळा, काकडीच्या, वांगी, मिरची, मखमलीची (लाल झेंडूची) बिया लावायला सुरवात होते. त्या सोबतच लाईट जाण्याची
पण सुरुवात होते. जो पर्यंत नियमित पाऊस पडायला सुरुवात होत नाही तो पर्यंत इथे
प्रत्येकाला मृग नक्षत्रात ‘लाईट जाणे’ हे
नित्यनियमाचे असते असे वाटते. समुद्राचा रंग बदलायला सुरुवात होते. मच्छीमार
समुद्रात लांब मासेमारीसाठी जाणे बंद करतात. मिरग सुरु होण्या आधी घराची कौल (नळे /छप्पर)
पण दुरुस्त केली जाते. इरली साफ केली
जातात. घराच्या भोवती नारळाच्या झावळीने
किंवा इतर सुक्या झाडांच्या सहाय्याने ‘सपार’ (एक आवरण) बनवले जाते कारण मातीच्या
भिंती भिजू नये.
दर वर्षी यंदाच्या नक्षत्रांत काय होणार याच्या चर्चा रंगू
लागतात. म्हणजे मृग नक्षत्रा नंतरची ‘आद्रा ओली कि कोरडी असेल ? कोरडा म्हणजे रिमझिम पाऊस आणि ओला म्हणजे मुसळधार पाऊस. त्यानंतर ‘पुनर्वसु’
नक्षत्रातील तरणा (मुसळधार) पाऊस आणि ‘पुष्य’
नक्षत्रातील म्हातारा (संथधार) पाऊस कसा असेल? ‘आश्लेषा’ आसलाकचा पाऊस, ‘मघा’ म्हणजे कडाडत सासुंचा पाऊस ,
‘पूर्वा (फाल्गुनी), उत्तरा (फाल्गुनी), हस्त’ म्हणजे हत्तीचा पाऊस
आणि ‘चित्रा’ अश्या पावसाळ्यातील प्रत्येक नक्षत्रातील वाहन
काय आहे? याची पण जोरदार चर्चा रंगते.
ज्या नक्षत्रातील वाहन हत्ती, बेडूक आणि म्हैस असेल तर त्या नक्षत्रावेळी जोरदार पाऊस असणार. ज्या नक्षत्रातील वाहन मोर, कोल्हा आणि घोडा असेल तर मध्यम पाऊस असणार.
ज्या नक्षत्रातील वाहन उंदीर, गाढव, मेंढा असणार तेव्हा कमी पाऊस अपेक्षित असणार. गंमत म्हणजे
या सर्व गोष्टी कालनिर्णय मध्ये लिहिलेल्या असतात
हे मला इथल्या मातीतून कळले. या
नक्षत्र आणि वाहनावरून पावसाचे अंदाज
बांधून शेतीची कामे केली जातात. हवामान खात्याचे अंदाज इथले शेतकरी या नक्षत्र आणि
इथला नैसर्गिक बदलातून व्यक्त करतात. मला पावसाळा म्हणजे जून ते सप्टेंबर इतकंच
माहिती होते. पण इथे मला पावसाची वेगवेगळे प्रकार पण बघायला मिळाले.
मुंबईला राहत असताना शाळेतील निबंधाचा आवडीचा विषय ‘माझा आवडता ऋतू पावसाळा’, ‘ सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?’ आणि कागदाच्या होड्या बनवून सोडणे आणि गेट-वे, नरीमन पोइंट आणि मरीन लाईन्सच्या किनाऱ्यावर अनुभवलेल्या पावसासोबत या कोकणाने निसर्गाच्या सानिध्यातील निसर्गाशी जवळचे नाते जोडणाऱ्या पावसाची ओळख करून दिली. कोकणी भाषेत या मिरगाची आणि पावसाची अनेक गाणी देखील ऐकायला मिळतील त्यातील अजय गावडे यांची कविता
“मातीयेचो दरवळणारो सुंगंध म्हणजे मिरग
शेतकऱ्यांचो वर्षभराचो घाम म्हणजे मिरग
पालवी वर तरंगणारो थेंब म्हणजे मिरग”
पावसाची कविता खर तर निसर्ग निर्माण करतो. आणि कवी फ़क़्त शब्दाने व्यक्त करतो.
लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे. तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
खुप छान लिहिलंय. गावच्या खूप आठवणी जाग्या झाल्या.
उत्तर द्याहटवाGavakadchi majach vegli
उत्तर द्याहटवा