गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

शिक्षणसाठी मोजावी लागणारी किंमत किती मोठी असू शकते..... याचे उत्तर देणारा चित्रपट ‘मसुटा’

 शिक्षणसाठी मोजावी लागणारी किंमत किती मोठी असू शकते..... याचे उत्तर देणारा चित्रपट ‘मसुटा’

 

मसुटा-आपली-masuta-apali-writergiri-anjali-pravin

समाज परिवर्तन करायचे म्हटले तर त्याची सुरुवात शिक्षणापासून होते.  पण आज हि आपल्या समाजात असे वंचित घटक आहेत ज्यांना समाजाच्या बरोबरीने प्रवाहात येण्यासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जातात  पण ते त्या वंचित घटकापर्यंत किती सहजतेने पोहचते... याचे उत्तर बहुतेकदा नकारात्मकच बघायला मिळते. समाजाच्या एका बाजूला कागदावर तयार केलेल्या कल्याणकारी योजना या कागदांवरच राहतात  तर दुसऱ्याबाजूला आज हि ‘आग्याच्या कुटुंबासारखे’ अनेकजण समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपड करताना होरपळून निघत असतात. याच आग्याच्या कुटुंबाच्या प्रवासाचे वर्णन ‘मसुटा’ चित्रपटात दिसून येईल. ‘मसुटा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित देवळे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा आग्या नावाच्या मुलाच्या कुटुंबावर आधारित आहे. ज्यात आग्याची भूमिका बालकलाकार यश मोरे याने साकारली आहे. ह्रदयनाथ राणे हे आग्याचे वडील, वैशाली केंडळे हि आग्याची आई, अर्चना महादेव हि आग्याची बहिणीची भूमिका साकारली आहे.  या चित्रपटात  नागेश भोसले हे पंचायत प्रमुख व अनंत जोग हे लाकूड मिलचे मालक या भूमिकेत दिसतात.

आग्याचे कुटुंब एक मसन जोगी समाजातील कुटुंब दाखविले आहे. एक असे कुटुंब जे गावाबाहेर स्मशानभूमीत झोपडी करून  राहतात. ज्यांना गावात राहण्याचा मान नसतो. हे मसणजोगी कुटुंब गावातील येणाऱ्या प्रेतांसाठी लाकडे गोळा करणे,  त्यांना जाळणे, त्याचे कुत्र्यापासून रक्षण करणे, प्रेत पूर्ण जळे पर्यंत त्याची राखण करणे,    त्याची राख गोळा करून त्या कुटुंबियांना देणे आणि पुन्हा ती स्मशानभूमीत पुन्हा धुवून स्वच्छ करणे. हे वंश परंपरागत असल्यासारखे कामाचा वारसा प्रामाणिकपणे चालवणारे कुटुंब दाखवले आहे.  पण  आग्याच्या कुटुंबाला बाकीचे पूर्ण  गाव ‘एक घाण’ म्हणूनच बघत असतात.  यांचे  ‘ना स्वतः चे घर - ना जमीन’.... आज या गावात तर उद्या दुसऱ्या गावात असा त्यांच्या प्रवास पिढ्यानपिढ्या चालत आलेला होता.

चित्रपटातील आग्या:

आग्याला शाळेत शिकण्याची इच्छा असते. त्याला कळत असते कि, आपण जर शिकलो तर आपण हि समाजाच्या प्रवाहात येऊ आणि आपले घर हि गावा बाहेर न राहता गावात येईल. आग्याला रीतसर शाळेत जाता येत नव्हते कारण त्याचे कुटुंब वर्षानुवर्षे मसनजोगी म्हणूनच आपला वारसा चालवत आलेले होते. शाळेत दाखल होण्यासाठी त्याचा जन्मदाखला किंवा रेशनकार्ड यातील कोणतेही कागदपत्र त्याच्या जवळ नव्हते. याच कारणामुळे तो शाळेत न जाता शाळेच्या खिडकीतून लपूनछपून जे शिकता येईल तसे शिकण्याचा प्रयत्न करत असतो  पण तिथे हि गावातील इतर मुले त्याला ओरडून आणि टोमणे मारून हाकलून देतात.  हि टोमणे मारणारी मुले वयाने फार मोठी होती असे नव्हते त्याच्यापेक्षा  लहानच होती तरीही ते उच्च जातीची असल्यामुळे आग्याला ऐकून घ्यावे लागत होते. चित्रपटातील हे दृश्य मला खूप संवेदनशील दिसले. कारण यामध्ये त्या उच्च जातीतील  लहान वयाच्या मुलांमध्ये इतकी कटुता हि  त्याच्या परिवाराकडून मिळालेली शिकवण होती तर दुसरीकडे आग्याने आपली चुकी असल्यासारखे ऐकून घेणे हेच आपले कर्तव्य असते हे त्याच्या परीवारकडून मिळालेली शिकवण होती.   त्याची  एक मैत्रीण जे जमेल तसे त्याला थोडे थोडे शिकवत असते. असेच एकेदिवशी आग्याची मैत्रीण त्याला शाळेत शिकवलेली  ‘देहदानाची गोष्ट’ सांगते आणि देहदानामुळे कसे इतर लोकांना फायदे होतात हे पटवून देते. आग्याला हि देहदानामुळे होणारे फायदे इतके पटतात कि तो लगेच आपल्या आईला देहदानाचे महत्व पटवून देत असतो आणि स्वतःचा मृत्यू झाल्यावर देहदान करण्याची इच्छा व्यक्त करत असतो.

 

आग्याचे वडील :

आपल्या मुलाची शिकण्याची इच्छा बघून त्याचे वडील रेशनकार्ड बनविण्यासाठी धडपड करत असतात. सरकारी कार्यालाच्या वारंवार होणाऱ्या वाऱ्या आणि  तेथील भ्रष्टाचार यांच्या कात्रीत त्याचे वडील जमेल तसे प्रयत्न करत असतात. ते रेशनकार्ड मिळणे किती महत्वाचे आहे हे त्या सरकारी अधिकारीला पटवून देऊन सुद्धा दोन हजार रुपयांची लाच मागत असतो.  त्या दोन हजारासाठी त्यांची वणवण सुरु होते. स्मशानभूमीत येणाऱ्या प्रेतासोबतचे सोने विकून हि तो पैसे मिळवू शकत असतो पण प्रामाणिकपणामुळे त्याला तो मार्ग चुकीचा वाटतो. याचवेळी एका प्रेताचे श्राद्ध दाखवले आहे जिथे ब्राम्हणाच्या अर्ध्यातासाच्या पूजेसाठी  पाचशे रुपये मिळतात पण आपण प्रेतासाठी काम करताना पूर्ण दिवस- रात्र काम करतो तर मला शंभर रुपये मिळतात. स्वतःच्या हक्काचे पैसे घेण्यासाठी पण त्याला हुज्जत घालावी लागते.  एकीकडे प्रामाणिकपणे काम करण्याचा मोबदला मिळत नाही तर दुसरीकडे सरकारकडून मिळणारे पैसे हि त्याला मिळत नसतात. पण तरीही रामबाबा वर नितांत श्रद्धा ठेवून रामबाबा म्हणजे त्यांचा देव सर्व काही ठीक करेल असे त्यांना वाटत असते.

आग्याची बहिण :

 आग्याची बहिण हि सुंदर आणि मेहनती  असते. ती बांधकामाच्या मजुरी काम करताना दाखवली आहे पण त्यासोबत तेथील कंत्राटदाराच्या लैंगिक पिळवणूकीने त्रस्त हि झालेली असते.  तिचे एका उच्च जातीतील लाकूडमिलच्या मालकाच्या मुलाशी प्रेम असते पण तिथे हि सारखे तिला आपल्या शरीराचा वापर करून घेत आहे असे वाटत असते. पण तो मुलगा ‘आपण लग्न करू’ असा विश्वास कायम तिला देत असतो.  जेव्हा बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तो मुलगा आपल्या वडिलांना आग्याच्या बहिणीची ओळख मैत्रीण म्हणून करून देतो तेव्हा तिला आपल्या मुलीची ‘करवली’ म्हणून मान मिळतो पण जेव्हा कळते कि ती मसणजोगीची मुलगी आहे तर तिला खूप अपमान सहन करावा लागतो.  जेव्हा त्यांचे हे प्रेम प्रकरण घरी समजते तेव्हा अर्थातच अनेक भांडणे होतात. तो मुलगा तिची साथ देत असतो तर दुसरीकडे त्याचे वडील स्वतःच्या मुलाला  मारायला हि कमी करत नाहीत.  त्यांचे प्रेम प्रकरण थांबावे म्हणून आग्याच्या कुटुंबावर स्मशानभूमीतील प्रेताचे मांस खातात असा आरोप केला जातो.  यासाठी गावात पंचायत देखील बसते. तिथे आग्याची बहिण खूप स्पष्टपणे  हे आरोप कसे खोटे आहेत आणि किती त्रास सहन करावा लागतो हे सर्व गावासमोर सांगते पण त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.  दुसरीकडे या सर्व घटनांचा  तिच्या  वडीलांच्या मनावर खोलवर परिणाम होऊन अकाली मृत्यू होतो. यामुळे आग्याची बहिण त्या लाकूडमिल मालकाच्या सूडासाठी पेटून उठलेली असते. ती आताच्या आता लग्न करण्याचा आणि समजात समान वागणूक मिळण्याचा हट्ट तिच्या प्रियकराकडे करते. ज्या दिवशी ते लग्न करणार असतात त्याच दिवशी तो कंत्राटदार तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कंत्राटदाराच्या अत्याचाराच्या बळी जाण्यापेक्षा  आत्महत्या करते. तिचा मृतदेह पाहून तिचा प्रियकर भावनाहीन सारखा बाजूने निघून जातो आणि तिचा मृतदेह तसाच पडून राहतो.

आग्याची आई:

पिढ्यानपिढ्या चालत असेलेले काम निमुटपणे करणारी साधारण बाई दाखवली आहे. आग्याच्या सततच्या पोटात दुखण्याला देवाचा अंगारा लावून मुलाला दिलासा देणारी तर कधी बाबा रेशनकार्डाचे काम केल्यावर मुलाला शिकता येईल असा धीर देणारी आई दाखवली आहे.  अज्ञानामुळे आपल्या मुलांचे होणारे नुकसान तिला समजत असते पण त्यासाठी काय करावे हे माहित नाही म्हणून हतबल झालेली असते. जेव्हा मुलाचे पोटात दुखणे वाढून त्याला हॉस्पिटलला दाखल केले जाते तेव्हा डॉक्टर त्याची ‘किडनी फेल’ झाल्याचे सांगतात. यासाठी शेवटचा उपाय किडनी दान केली तर त्याला नवी  किडनी बदलणे असतो. त्या आईला किडनी दान म्हणजे काय हे देखील माहिती नसते तर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याकडे किडनी मागत फिरते. जेव्हा कळत कि स्वतः ची किडनीहि लावता येईल तो पर्यंत आग्याचा मृतदेह घेऊन अम्ब्युलन्स  झोपडीपर्यंत येते. पण त्याच क्षणी त्याची देहदानाची इच्छा तिला आठवते व त्या अम्ब्युलन्सला देहदानासाठी मृतदेह घेऊन जायला सांगते. आपल्या मुलामुळे कोणी तरी नवीन आयुष्य बघेल म्हणून धीर घेत डोळे पुसत निर्णय घेते.  त्याचवेळी सरकारी कार्यालायातील शिपाई त्यांचे रेशनकार्ड घेऊन येतो पण ती तसेच रेशनकार्ड चुलीतील अग्नीत जाळून टाकते.   आणि शेवटी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या फलकावर  लिहिलेल्या ‘देहदान हेच सर्व श्रेष्ठदान’ वाक्यावरील धूळ साफ करून स्वतःचा प्राण सोडते.

एकूणच शिक्षणासाठी आणि समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी आग्याच्या कुटुंबाने अनेक प्रयत्न केले पण शेवट त्याच्या  कुटुंबाचा अत्यंत वेदनाकारक असा अंत झाला.  समाजातील जळजळीत असे  वास्तव दाखवणारा हा चित्रपट आहे. पूर्ण चित्रपट पाहून झाल्यावर काहीवेळ नक्कीच निशब्द आणि विचार स्तब्ध होऊन जातात. या चित्रपटात जसे  आग्याच्या कुटुंबाला आज हि जातीचे पारतंत्र्या सामोरे जावे लागले असे कितीतरी आग्या सहज आपल्या घराच्या बाहेरील रस्त्यावर दिसून येतील. त्या प्रत्येक आग्याची प्रश्न आणि समस्या थोड्याफार वेगळ्या असतील पण मूळ मुद्दा ‘जात’च  दिसून येईल.

हा चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर अनेक माहिती शोधली पण फारसे काही सापडले नाही. आश्चर्य म्हणजे यावर्षातील नवीन चित्रपट असून हि लोकांना याबद्दल फारसे माहिती नाही किंवा वर्तमानपत्रात माहिती नाही. कदाचित नवीन कलाकार किंवा जातीवर प्रखर भाष्य करणारा चित्रपट असल्यामुळे कदाचित फारसे चर्चेत आला नसेल पण  तिथेहि मला एक वेगळे राजकारणच दिसून आले.    असो पण एम एक्स प्लेअरच्या माध्यमातून हा चित्रपट पाहता येईल.   जेव्हा आपण समाज बदलण्याच्या गोष्टी करतो किंवा विचार करतो तेव्हा हा चित्रपट नक्कीच एकदा पाहायला हवा. या चित्रपटात अनेक असे प्रसंग आहेत कि जे खूप संवेदनशील आहेत आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाजापेक्षा आग्याचे अशिक्षित कुटुंब जास्त साक्षर दिसून येतील.  एकाच चित्रपटातून जातीभेद, शिक्षणाचे महत्व आणि देहदान असे अनेक सामाजिक विषय पाहायला मिळतील.   


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

२ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...