मंगळवार, २८ मे, २०२४

Menstrual Hygiene Day

PC:GOOGLE

माझ्या नातेवाईकांनी मिल कामगारांची मुंबई ते मॉलवाली मुंबई इतके झपाट्याने परिवर्तन पाहिले.  आमच्या गावातील निम्मी लोकसंख्या रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित झाली. पण मासिक पाळीतील बंधने मात्र मुंबईच्या छोट्याश्या खोलीत हि काटेकोर पाळले जायचे.  

माझं बालपण देखील  मासिक पाळीतील कपडे लपवून कसे सुकवायचे आणि छोट्याश्या हॉलमध्ये ५ दिवस अस्पृश्य कसे राहायचे यात गेले.  जेवण - पाणी लांबून द्यायचे. या पाच दिवसाचे अंथरून पण वेगळे असायचे. पाच दिवसा नंतर तर ते पुन्हा धुवून ठेवायचे. त्यात कोणी "जाणवे घातलेले किंवा माळकरी म्हणवणारे" घरी आले तर, मासिक पाळी आल्यावर मला बोलण्याची हि पाबंदी होती.  अन्यथा ते "पाण्याचा तांब्या उलटा करून श्राप देतात." हि भीती घालायचे. घरात गोमूत्र शिंपडले जायचे. 


त्यानंतर घरी गणपती, दिवाळी, दसरा, लग्न समारंभ आले कि मासिक पाळीच्या गोळ्या खाण्याचा  एक "नवीन संस्कार" घरी करण्यात आला. घरातील स्त्रिया म्हणजे आई बहिणी मैत्रिणी कायम सणवार आला कि, "किती गोळ्या आणायच्या ? कधी पासून खायच्या ? कुठली गोळी चांगली ? मग त्याने दिवस मागे येतात कि पुढे जातात ?  त्यामुळे कोणाकोणाला किती उलट्या होतात ? कोणाचं किती डोकं दुखत? कोणाची किती  मळमळ होते?  किती चिडचिड होते ?   किती पिंपल्स येतात ? पपई -खजूर -हळद दूध घरगुती कोणते उपाय किती करायचे ? किती गरम पडायचे ?" याची तासनतास पुरुष घरी नसताना चर्चा करायच्या. याचमुळे नेमकं मासिक पाळीत स्त्रीची मानसिक आणि शारीरिक नेमके काय बदल होतात. स्त्रीला किती त्रास होतो या गोष्टी कधी पुरुषांपर्यंत पोहचतच नाही. 


 नेमके सणवाराला त्या घरातील स्त्रीला पाळी आली तर आजही  "अडचण झाली,  प्राब्लेम झाला , विघ्न आले" असे शब्द आज हि सर्रास वापरले जातात. "घरातील आता सर्व सणवारातील काम कोण करणार ?" यामुळे घरातील इतर स्त्री आणि पुरुष यांची चिडचिड आणि टेन्शन वाढत.  आज हि हे चित्र आमच्या गावातील आणि शहरातील  प्रत्येक नातेवाईकाच्या घरी हमखास बघायला मिळते. 


मासिक पाळीतील ५ दिवस वेगळे ठेवणे यासाठी काही सुशिक्षित  मैत्रिणी वकिली करत पुढाकार घेऊन बोलतात कि, "स्त्रीला आराम मिळावा म्हणून ते दिवस वेगळे ठेवतात." तिला आराम मिळावा म्हणून अस्पृश्य ठेवण्याची का गरज भासते? समावेशन करून हि तिला आराम देता येऊ शकतो.  इतकं साधी गोष्ट हि लक्षात येत नाही. 

 

सध्या मी मेट्रो सिटी मध्ये राहते. माझ्या ऑफिसचे कर्मचारी आज हि "अडचण / प्रॉब्लेम आला..किंवा येणार .. आता घरातली सणवारची पूजेची काम कशी होणार ? " याच चर्चा सुरु असतात. 


 It's Time for Action... मासिक पाळी बद्दलचे संस्कृती- परंपरेच्या नावाने नकारात्मक असेलेली विचार सरणी पण बदलूया. प्रत्येकाने पुढाकाराची बदलाची गरज आहे.. 

कारण, 

ती आजही मासिक पाळीला प्रॉब्लेम / अडचण /  बर्थडे / पगार असे कोडवर्ड वापरते. 

कारण, 

तिने मासिक पाळी शब्द वापरला तर ती चारित्र्यहीन म्हणून तिला पाहिले जाते. 

कारण, 

ती आजही तिच्या मासिक पाळीतील कपडे लपवूनच सुकवते. 

कारण, 

ती आज हि सणवारा आणि समारंभात घरात काम करता यावे म्हणून किती हि वेदना झाल्या तरीही  मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेत असते. 

कारण, 

तिला आज हि गावा-गावांत मासिक पाळीच्या दिवसात तिला अस्पृश्यासारखी वागणूकी दिली जाते. 

कारण, 

आज हि तिची मासिक पाळी अपवित्रच आहे. 

कारण, 

तुमच्या घरातील  "ती" तुमची आई, बहीण, पत्नी, काकी,  मामी  किंवा मैत्रीण कोणीही असू शकते. जर लेख वाचणारी स्त्री आहे तर तुम्ही स्वतः देखील असू शकाल ?


 मासिक पाळीदेखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. इतकं सोपं आहे समजून घ्यायला. पण उगीच रूढी - परंपरा पाप -पुण्य संस्कृती वैगरे जोखड त्यावर टाकत गेले आहेत. 


नुसते Menstrual Hygiene Day 2024 चा स्टेट्स ठेवण्या पेक्षा तिला तिच्या मासिक पाळीला समजून घेणायचा प्रयत्न करूया. 


अज्ञान, समज - गैरसमज असतील तर मोकळ्या मनाने चर्चा करूया. 

मी चर्चेसाठी तयार आहे माझ्याशी नक्की बोलू शकता. तुम्ही तयार आहात का ?




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...