review लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
review लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

“The Social Dilemma”.......... नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी



the-social-dilemma-review-apali-writergiri

PC : Google

 आपला रोजचा दिनक्रम काय असतो ? असे जर कोणी विचारले तर सहाजिकच उत्तर असते कि, अमुक- अमुक वाजता उठणे. त्यानंतर चहा- नाश्ता मग ऑफिस किंवा दररोजची कामे करायची. मग दुपारचे जेवण करून पुन्हा कामाला सुरूवात किंवा थोडी वामकुक्षी घ्यायची.  पुन्हा संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण आणि अमुक वाजता झोपणे.

पण खरंच इतकाच असतो का आपला दिनक्रम ?

उत्तर : नाही........ अजिबात नाही.

आपल्या दिनक्रमाची पुन्हा उजळणी घेऊ.

सकाळी अमुक- अमुक वाजता उठल्यावर पहिला उश्याच्या बाजूला ठेवलेला मोबईलचे नोटिफिकेशन चेक करणे. रात्री झोपल्यापासूनचे काय काय सोशल मिडिया अपडेट आहेत. तिथे सहज अर्धा- एक तास घालवणे. नंतर चहा- नाश्ता करताना पुन्हा मोबाईलला बातम्या किंवा इतर अपडेट चेक करणे. ऑफिस किंवा दररोजचे कोणतेही काम करत असताना दर दहा ते पंधरा मिनिटांत सोशल मिडियाचे अपडेट बघत राहणे किंवा दिवसभर लॅपटॉपवर काम करत राहणे. दिवसातून कमीत कमी चार वेळा तरी instagram, facebook, twitter आणि youtube वर स्क्रोलिंग करत राहणे.  संध्याकाळी चहा आणि जेवण करताना हि सोशल मिडिया आणि यु ट्यूब हमखास असणारच. रात्री झोपेपर्यंत  हातात मोबाईल असणारच. पुन्हा तो उश्याला ठेवूनच तसेच झोपी जायचे.  पुन्हा दुसऱ्या दिवशी नोटीफिकेशन पासून सुरवात......................

Communication चे माध्यम हे कधी दैनंदिन जीवनातील आवश्यक गरज आणि सवय झाली हे कळलेच नाही. संपर्क आणि मनोरंजना सोबतच आपल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे हि “गुगल” बाबा चुटकीसरशी देतो. न कळणाऱ्या गोष्टी हि अगदी सोप्या आणि त्वरित कळतात.   आपल्याला पत्ता सापडत नसेल तर योग्य  पत्ता शोधून देईल. करोडो – अब्जावधीचे हिशोब क्षणात आणि अचूक करून देईल. त्यातील अलार्म आणि रिमांईडर आपल्याला महत्वाच्या मिटिंगची  याची आठवण करून देतो.  दूर राहणारे नातेवाईक व्हिडीओ कॉलमुळे रोज भेटू किंवा बघू शकतो. जगाच्या घडामोडी पण लगेच इंटरनेट क्रांती मुळे लगेच आपल्याला कळतात. सध्या लॉकडाऊन काळात हि अधिकाधिक कामे हि या इंटरनेट मुळे होत आहे. 

पण या इंटरनेट क्रांती – सोशलमिडियाची दुसरी नकारात्मक बाजू देखील आहे.

फेक न्यूज बातम्या हि क्षणात सगळीकडे पोहचतात. यामुळे मॉबलीन्चीग किंवा दंगली घडतात. काहीजन पब्जी किंवा टिकटॉक  सारख्या अनेक गेम्स आणि अप्लिकेशनच्या आहारी जातात. सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या  फोटोचे लाईक्स आणि कमेंट वाढत का नाही म्हणून चिंताग्रस्त आणि नैराश्याकडे वाटचाल करू लागतात. सोशल मिडियावर हजारो मित्र- मैत्रिणी असतात सोशल मिडियावर चॅटिंगहि दिवस-रात्र सुरु पण  खऱ्या आयुष्यात एक जवळचा मित्र- मैत्रिण हि बोलायला नसते.  खोट्या बातम्या आणि अफवा यांच्या प्रभावी प्रसारामुळे खरे- खोटे यातील फरक हि न कळण्या इतके आपण असाहाय्य होऊन जातो.  

“The Social Dilemma” याच सर्व मुद्यांवर सविस्तर आणि परखड चर्चा करते.

“The Social Dilemma” हि नेटफ्लिक्सवर याच महिन्यात नुकतीच प्रदर्शित झालेली डॉक्युमेंटरी आहे.  हि डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर हमखास डोक्यात विचार येईल कि, सर्व अप्लिकेशन बंद करावे किंवा मोबाईल आणि   लॅपटॉप बंद करून काहीवेळ असेच सुन्न होऊन बसावे.

“The Social Dilemma” हि  डॉक्युमेंटरी जेफ ऑरलोव्स्की (Jeff Orlowski) यांनी दिग्दर्शित केली आहे. ज्यात सिलिकॉन व्हेलीतील अनेक गोष्टीवर बारकाईने चर्चा केली आहे. जी-मेलचे जी-चॅट (Gmail and G-chat), गुगल ड्राईव्ह, फेसबुकवरील लाईक बटण, फेसबुक पेजेस यासारख्या फीचर्समुळे फेसबुक, twitter, युट्युब, गुगल, instagram, pinterest सारख्या अप्लिकेशनचा वापर हा झपाट्याने कसा वाढला आणि या कंपनीची प्रगती व  महत्व हि अधिकाधिक वाढत गेले. पण त्यानंतर हावर्ड आणि न्यू-यॉर्क युनिवर्सिटीच्या संशोधनानुसार सोशलमिडीयाचा वापर हि ड्रग्स इतकाच हानिकारक आणि चिंताजनक आहे हे निदर्शनास आणून दिले. या संशोधनात समोर आलेल्या सोशल मिडिया व्यसनाबद्दल परखड भाष्य केले आहे.  या डॉक्युमेंटरीमध्ये फेसबुक, twitter, युट्युब, गुगल, instagram, pinterest सारख्या अप्लिकेशनच्या अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू दाखविले आहेत. त्यांनी या सोशलमीडियाची सुरुवात कशी का केली ..... ते पुढे त्यांना काय वाटले किंवा कोणत्या नकारात्मक गोष्टी निदर्शनास आल्या याबद्दल चर्चा केली आहे.

या अधिकाऱ्यांची चर्चा आणि मुलाखतीचे  संभाषण सुरु असताना एका  कुटुंबाचे उदाहरण दिले आहे आणि हे उदाहरण खूपच चिंताग्रस्त करणारे आहे.  आपला सोशल मिडीयाचा वापर हा कसा वाढत जातो याचे अत्यंत बारकाईने विश्लेषण केले आहे.

या फिल्ममध्ये एका कुटुंबाचे उदाहरण खूप संवेदनशील पद्धतीने मांडले आहे. मला त्यातील एक प्रसंग खूपच सुन्न करून गेला. ज्यात ते  कुटुंब एकत्र जेवण्यासाठी बसताना त्यांची आई सर्वांचे मोबाईल एका डब्यात  बंद करून लॉक करते आणि हे लॉक एका तासानेच उघडेल असा टाईमर लावते. ती आई, वडील आणि तीन मुलं एकत्र जेवायला बसतात पण त्यांचे जेवण्यात अजिबात लक्ष नसते. सर्व कुटुंबियांचा अस्वस्थपणा आणि शांतता खूपच भीषण दिसते. तेवढ्यात एकाच्या मोबाईलला नोटीफिकेशनचा आवाज होतो व सर्वांची अस्वस्थता अजून वाढते. या कुटुंबातील ती मुलगी जेवत असताना खोट बोलून मोबाईल घ्यायला जाते हि... पण तो डबा लॉक असल्याने तिला मोबाईल घेता येत नव्हता. अखेरीस ती तो डबा फोडते आणि मोबाईल घेते...जेवण हि सोडून देते....व स्वतःच्या खोलीत जाऊन सेल्फीचे फिल्टर लावून फोटो अपलोड करत बसते. त्यावरील लाईक्स आणि कमेंटने तिला अधिक आनंद मिळतो तर त्यातील एका कमेंट मध्ये तिचे कान मोठे असते तर अजून सुंदर दिसली असती. या कमेंटमुळे ती चटकन नैराश्येकडे झुकू लागते. इतर कुटुंबीय पण जेवण सोडून आपले मोबाईल घेऊन आपल्या रूममध्ये निघून जातात. 

फ़क़्त एक तास मोबाईल नाही वापरायचा म्हणून इतका अस्वस्थपणा हि खरंच खूप टोकाची व्यसनाधीनता आहे.  असे अनेक प्रसंग खूप संवेदनशील पद्धतीने यात दाखविले आहेत. जर आपण आपल्या आयुष्यातदेखिल निरखून पाहिले तर आपल्या घरात किंवा आपल्या बाबतीत हि या घटना घडत असल्याच्या लक्षात येईल.

या डॉक्युमेंटरीमध्ये पुढे फेक न्यूजवर देखील सविस्तर चर्चा केली आहे.  खोट्या बातम्या किंवा अफवा या सोशल मिडियामुळे अधिक वेगाने पसरतात. यावर का कंट्रोल करता येत नाही? यामुळे सोशलमिडियाला होणारा फायदा कोणता? समाजाचे होणारे नुकसान कोणते? या फेक न्यूजमुळे आपण कसे हतबल होतो ? आपल्याला खरे-खोटे का ओळखता येत नाही ? फेक न्यूज आणि राजकारण यांचे कसे संबंध असतात? राजकारणाला याचा कसा फायदा होतो? अश्या प्रत्येक प्रश्नांवर अगदी चिकित्सकपणे चर्चा केली आहे. यासाठी हल्लीच कोरोना आणि लॉकडाऊनच्या   काळात देश-विदेशातील कोरोना बातम्याचे उदाहरणे मांडली आहेत. या फेक न्यूजमुळे झालेल्या दंगली, मॉब लिंचीग ते सिव्हील वॉर होण्याची शक्यता किती गंभीर आहे हे या  डॉक्युमेंटरीमध्ये मांडले आहे.

एकूणच संपूर्ण डॉक्युमेंटरीमध्ये आपण सोशलमिडीयाचा कसा वापर करतो... आपण आपल्या मोबाईलवर जे  प्रत्येक क्लिक करतो. त्या प्रत्येक क्लिकचे सायकोलोजिकली, पोलिटिकली आणि सोशली निरीक्षण कशाप्रकारे  केले जाते. आपला सर्व डाटा एकत्र स्टोअर करून त्यानुसार आपल्याला कसे मेन्यूप्लेनेट केले जाते.  आपल्या विचारांवर आणि कृतीवर सोशलमिडियाचे कंट्रोल कसे वाढत जाते. आणि महत्वाचे म्हणजे आपण सोशल मिडिया पुढे हतबल झालो आहोत हे आपल्याला कळत हि नाही. हे खूप संवेदनशील पद्धीतीने मांडले आहे.

या डॉक्युमेंटरीच्या अखेरीस सोशलमिडीयाच्या वापराचे ड्रग्समध्ये किंवा फेक न्यूज सारख्या गंभीर घटना घडू नयेत म्हणून डॉक्युमेंटरीमधील मुलखातदारांनी सोपे आणि आपल्याला माहित असेलेल्या काही टिप्स दिले आहेत. जे तुम्हाला ती डॉक्युमेंटरी पाहिल्यावर कळेलच.... मी त्या बद्दल इथे लिहिणार नाही.

शेवटी इतकेच म्हणेन कि, प्रत्येकाने हि डॉक्युमेंटरी नक्कीच बघायलाच पाहिजे.... त्यातून स्वतः मध्ये बदल देखील केलाच पाहिजे.  


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

शिक्षणसाठी मोजावी लागणारी किंमत किती मोठी असू शकते..... याचे उत्तर देणारा चित्रपट ‘मसुटा’

 शिक्षणसाठी मोजावी लागणारी किंमत किती मोठी असू शकते..... याचे उत्तर देणारा चित्रपट ‘मसुटा’

 

मसुटा-आपली-masuta-apali-writergiri-anjali-pravin

समाज परिवर्तन करायचे म्हटले तर त्याची सुरुवात शिक्षणापासून होते.  पण आज हि आपल्या समाजात असे वंचित घटक आहेत ज्यांना समाजाच्या बरोबरीने प्रवाहात येण्यासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जातात  पण ते त्या वंचित घटकापर्यंत किती सहजतेने पोहचते... याचे उत्तर बहुतेकदा नकारात्मकच बघायला मिळते. समाजाच्या एका बाजूला कागदावर तयार केलेल्या कल्याणकारी योजना या कागदांवरच राहतात  तर दुसऱ्याबाजूला आज हि ‘आग्याच्या कुटुंबासारखे’ अनेकजण समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपड करताना होरपळून निघत असतात. याच आग्याच्या कुटुंबाच्या प्रवासाचे वर्णन ‘मसुटा’ चित्रपटात दिसून येईल. ‘मसुटा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित देवळे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा आग्या नावाच्या मुलाच्या कुटुंबावर आधारित आहे. ज्यात आग्याची भूमिका बालकलाकार यश मोरे याने साकारली आहे. ह्रदयनाथ राणे हे आग्याचे वडील, वैशाली केंडळे हि आग्याची आई, अर्चना महादेव हि आग्याची बहिणीची भूमिका साकारली आहे.  या चित्रपटात  नागेश भोसले हे पंचायत प्रमुख व अनंत जोग हे लाकूड मिलचे मालक या भूमिकेत दिसतात.

आग्याचे कुटुंब एक मसन जोगी समाजातील कुटुंब दाखविले आहे. एक असे कुटुंब जे गावाबाहेर स्मशानभूमीत झोपडी करून  राहतात. ज्यांना गावात राहण्याचा मान नसतो. हे मसणजोगी कुटुंब गावातील येणाऱ्या प्रेतांसाठी लाकडे गोळा करणे,  त्यांना जाळणे, त्याचे कुत्र्यापासून रक्षण करणे, प्रेत पूर्ण जळे पर्यंत त्याची राखण करणे,    त्याची राख गोळा करून त्या कुटुंबियांना देणे आणि पुन्हा ती स्मशानभूमीत पुन्हा धुवून स्वच्छ करणे. हे वंश परंपरागत असल्यासारखे कामाचा वारसा प्रामाणिकपणे चालवणारे कुटुंब दाखवले आहे.  पण  आग्याच्या कुटुंबाला बाकीचे पूर्ण  गाव ‘एक घाण’ म्हणूनच बघत असतात.  यांचे  ‘ना स्वतः चे घर - ना जमीन’.... आज या गावात तर उद्या दुसऱ्या गावात असा त्यांच्या प्रवास पिढ्यानपिढ्या चालत आलेला होता.

चित्रपटातील आग्या:

आग्याला शाळेत शिकण्याची इच्छा असते. त्याला कळत असते कि, आपण जर शिकलो तर आपण हि समाजाच्या प्रवाहात येऊ आणि आपले घर हि गावा बाहेर न राहता गावात येईल. आग्याला रीतसर शाळेत जाता येत नव्हते कारण त्याचे कुटुंब वर्षानुवर्षे मसनजोगी म्हणूनच आपला वारसा चालवत आलेले होते. शाळेत दाखल होण्यासाठी त्याचा जन्मदाखला किंवा रेशनकार्ड यातील कोणतेही कागदपत्र त्याच्या जवळ नव्हते. याच कारणामुळे तो शाळेत न जाता शाळेच्या खिडकीतून लपूनछपून जे शिकता येईल तसे शिकण्याचा प्रयत्न करत असतो  पण तिथे हि गावातील इतर मुले त्याला ओरडून आणि टोमणे मारून हाकलून देतात.  हि टोमणे मारणारी मुले वयाने फार मोठी होती असे नव्हते त्याच्यापेक्षा  लहानच होती तरीही ते उच्च जातीची असल्यामुळे आग्याला ऐकून घ्यावे लागत होते. चित्रपटातील हे दृश्य मला खूप संवेदनशील दिसले. कारण यामध्ये त्या उच्च जातीतील  लहान वयाच्या मुलांमध्ये इतकी कटुता हि  त्याच्या परिवाराकडून मिळालेली शिकवण होती तर दुसरीकडे आग्याने आपली चुकी असल्यासारखे ऐकून घेणे हेच आपले कर्तव्य असते हे त्याच्या परीवारकडून मिळालेली शिकवण होती.   त्याची  एक मैत्रीण जे जमेल तसे त्याला थोडे थोडे शिकवत असते. असेच एकेदिवशी आग्याची मैत्रीण त्याला शाळेत शिकवलेली  ‘देहदानाची गोष्ट’ सांगते आणि देहदानामुळे कसे इतर लोकांना फायदे होतात हे पटवून देते. आग्याला हि देहदानामुळे होणारे फायदे इतके पटतात कि तो लगेच आपल्या आईला देहदानाचे महत्व पटवून देत असतो आणि स्वतःचा मृत्यू झाल्यावर देहदान करण्याची इच्छा व्यक्त करत असतो.

 

आग्याचे वडील :

आपल्या मुलाची शिकण्याची इच्छा बघून त्याचे वडील रेशनकार्ड बनविण्यासाठी धडपड करत असतात. सरकारी कार्यालाच्या वारंवार होणाऱ्या वाऱ्या आणि  तेथील भ्रष्टाचार यांच्या कात्रीत त्याचे वडील जमेल तसे प्रयत्न करत असतात. ते रेशनकार्ड मिळणे किती महत्वाचे आहे हे त्या सरकारी अधिकारीला पटवून देऊन सुद्धा दोन हजार रुपयांची लाच मागत असतो.  त्या दोन हजारासाठी त्यांची वणवण सुरु होते. स्मशानभूमीत येणाऱ्या प्रेतासोबतचे सोने विकून हि तो पैसे मिळवू शकत असतो पण प्रामाणिकपणामुळे त्याला तो मार्ग चुकीचा वाटतो. याचवेळी एका प्रेताचे श्राद्ध दाखवले आहे जिथे ब्राम्हणाच्या अर्ध्यातासाच्या पूजेसाठी  पाचशे रुपये मिळतात पण आपण प्रेतासाठी काम करताना पूर्ण दिवस- रात्र काम करतो तर मला शंभर रुपये मिळतात. स्वतःच्या हक्काचे पैसे घेण्यासाठी पण त्याला हुज्जत घालावी लागते.  एकीकडे प्रामाणिकपणे काम करण्याचा मोबदला मिळत नाही तर दुसरीकडे सरकारकडून मिळणारे पैसे हि त्याला मिळत नसतात. पण तरीही रामबाबा वर नितांत श्रद्धा ठेवून रामबाबा म्हणजे त्यांचा देव सर्व काही ठीक करेल असे त्यांना वाटत असते.

आग्याची बहिण :

 आग्याची बहिण हि सुंदर आणि मेहनती  असते. ती बांधकामाच्या मजुरी काम करताना दाखवली आहे पण त्यासोबत तेथील कंत्राटदाराच्या लैंगिक पिळवणूकीने त्रस्त हि झालेली असते.  तिचे एका उच्च जातीतील लाकूडमिलच्या मालकाच्या मुलाशी प्रेम असते पण तिथे हि सारखे तिला आपल्या शरीराचा वापर करून घेत आहे असे वाटत असते. पण तो मुलगा ‘आपण लग्न करू’ असा विश्वास कायम तिला देत असतो.  जेव्हा बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तो मुलगा आपल्या वडिलांना आग्याच्या बहिणीची ओळख मैत्रीण म्हणून करून देतो तेव्हा तिला आपल्या मुलीची ‘करवली’ म्हणून मान मिळतो पण जेव्हा कळते कि ती मसणजोगीची मुलगी आहे तर तिला खूप अपमान सहन करावा लागतो.  जेव्हा त्यांचे हे प्रेम प्रकरण घरी समजते तेव्हा अर्थातच अनेक भांडणे होतात. तो मुलगा तिची साथ देत असतो तर दुसरीकडे त्याचे वडील स्वतःच्या मुलाला  मारायला हि कमी करत नाहीत.  त्यांचे प्रेम प्रकरण थांबावे म्हणून आग्याच्या कुटुंबावर स्मशानभूमीतील प्रेताचे मांस खातात असा आरोप केला जातो.  यासाठी गावात पंचायत देखील बसते. तिथे आग्याची बहिण खूप स्पष्टपणे  हे आरोप कसे खोटे आहेत आणि किती त्रास सहन करावा लागतो हे सर्व गावासमोर सांगते पण त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.  दुसरीकडे या सर्व घटनांचा  तिच्या  वडीलांच्या मनावर खोलवर परिणाम होऊन अकाली मृत्यू होतो. यामुळे आग्याची बहिण त्या लाकूडमिल मालकाच्या सूडासाठी पेटून उठलेली असते. ती आताच्या आता लग्न करण्याचा आणि समजात समान वागणूक मिळण्याचा हट्ट तिच्या प्रियकराकडे करते. ज्या दिवशी ते लग्न करणार असतात त्याच दिवशी तो कंत्राटदार तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कंत्राटदाराच्या अत्याचाराच्या बळी जाण्यापेक्षा  आत्महत्या करते. तिचा मृतदेह पाहून तिचा प्रियकर भावनाहीन सारखा बाजूने निघून जातो आणि तिचा मृतदेह तसाच पडून राहतो.

आग्याची आई:

पिढ्यानपिढ्या चालत असेलेले काम निमुटपणे करणारी साधारण बाई दाखवली आहे. आग्याच्या सततच्या पोटात दुखण्याला देवाचा अंगारा लावून मुलाला दिलासा देणारी तर कधी बाबा रेशनकार्डाचे काम केल्यावर मुलाला शिकता येईल असा धीर देणारी आई दाखवली आहे.  अज्ञानामुळे आपल्या मुलांचे होणारे नुकसान तिला समजत असते पण त्यासाठी काय करावे हे माहित नाही म्हणून हतबल झालेली असते. जेव्हा मुलाचे पोटात दुखणे वाढून त्याला हॉस्पिटलला दाखल केले जाते तेव्हा डॉक्टर त्याची ‘किडनी फेल’ झाल्याचे सांगतात. यासाठी शेवटचा उपाय किडनी दान केली तर त्याला नवी  किडनी बदलणे असतो. त्या आईला किडनी दान म्हणजे काय हे देखील माहिती नसते तर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याकडे किडनी मागत फिरते. जेव्हा कळत कि स्वतः ची किडनीहि लावता येईल तो पर्यंत आग्याचा मृतदेह घेऊन अम्ब्युलन्स  झोपडीपर्यंत येते. पण त्याच क्षणी त्याची देहदानाची इच्छा तिला आठवते व त्या अम्ब्युलन्सला देहदानासाठी मृतदेह घेऊन जायला सांगते. आपल्या मुलामुळे कोणी तरी नवीन आयुष्य बघेल म्हणून धीर घेत डोळे पुसत निर्णय घेते.  त्याचवेळी सरकारी कार्यालायातील शिपाई त्यांचे रेशनकार्ड घेऊन येतो पण ती तसेच रेशनकार्ड चुलीतील अग्नीत जाळून टाकते.   आणि शेवटी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या फलकावर  लिहिलेल्या ‘देहदान हेच सर्व श्रेष्ठदान’ वाक्यावरील धूळ साफ करून स्वतःचा प्राण सोडते.

एकूणच शिक्षणासाठी आणि समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी आग्याच्या कुटुंबाने अनेक प्रयत्न केले पण शेवट त्याच्या  कुटुंबाचा अत्यंत वेदनाकारक असा अंत झाला.  समाजातील जळजळीत असे  वास्तव दाखवणारा हा चित्रपट आहे. पूर्ण चित्रपट पाहून झाल्यावर काहीवेळ नक्कीच निशब्द आणि विचार स्तब्ध होऊन जातात. या चित्रपटात जसे  आग्याच्या कुटुंबाला आज हि जातीचे पारतंत्र्या सामोरे जावे लागले असे कितीतरी आग्या सहज आपल्या घराच्या बाहेरील रस्त्यावर दिसून येतील. त्या प्रत्येक आग्याची प्रश्न आणि समस्या थोड्याफार वेगळ्या असतील पण मूळ मुद्दा ‘जात’च  दिसून येईल.

हा चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर अनेक माहिती शोधली पण फारसे काही सापडले नाही. आश्चर्य म्हणजे यावर्षातील नवीन चित्रपट असून हि लोकांना याबद्दल फारसे माहिती नाही किंवा वर्तमानपत्रात माहिती नाही. कदाचित नवीन कलाकार किंवा जातीवर प्रखर भाष्य करणारा चित्रपट असल्यामुळे कदाचित फारसे चर्चेत आला नसेल पण  तिथेहि मला एक वेगळे राजकारणच दिसून आले.    असो पण एम एक्स प्लेअरच्या माध्यमातून हा चित्रपट पाहता येईल.   जेव्हा आपण समाज बदलण्याच्या गोष्टी करतो किंवा विचार करतो तेव्हा हा चित्रपट नक्कीच एकदा पाहायला हवा. या चित्रपटात अनेक असे प्रसंग आहेत कि जे खूप संवेदनशील आहेत आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाजापेक्षा आग्याचे अशिक्षित कुटुंब जास्त साक्षर दिसून येतील.  एकाच चित्रपटातून जातीभेद, शिक्षणाचे महत्व आणि देहदान असे अनेक सामाजिक विषय पाहायला मिळतील.   


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...