कोकणातील अंगणात खेळले जाणारे खेळ....
PC : Instagram |
अटक मटक चवळी चटक... चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोड.. जिभेचा फोड फुटेना... घरचा पावना उठेना .. जिभेचा फोड फुटला... घरचा पावना उठला..
PC : Instagram |
लहानपणी मुंबईला राहत असताना हे गाण इतकेच म्हणायचो. तसेच चाळणी शब्द ऐवजी आम्ही चवळी म्हणायचो. पण हे गाणे अर्धवट आहे हे माहिती नव्हते. याच्या पुढच्या ओळी गावातील अंगणात शिकले...
पुन्हा याच गाण्यापासून सुरुवात करू...
अटक मटक चवळी चटक... चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोड.. जिभेचा
फोड फुटेना... घरचा पावना (पाहुणा) उठेना .. जिभेचा फोड फुटला... घरचा पावना
उठला..
उठ उठ पावण्या बत्तीला... बत्ती गेली
वाऱ्याने... गोंगाट घातला मुलांनी...
आज आता हे गाणे लिहितानाच मला तो लहानपणीचा
सर्व आवाज कानात घुमू लागला आणि अंगणातील
आठवणीची रांग समोर उभी राहत गेली.
लहानपणी दर मे महिन्याच्या सुट्टीत गावी
जाताना.... ‘का गावी जायचं?’ असे वाटायचे तर गावावरून परत मुंबईकडे निघताना ‘इतक्या लवकर का सुट्टी संपली?’ असे वाटायचे. आमच्या
गावचे घर बंद असायचे म्हणून घरात विंचू, इंगळी,
साप, मोठे मोठे कोळी यांसारखे कीटक आणि
छोटे प्राणी पण हक्काचं घर म्हणून राहायचे. आमचे गाव खूप डोंगराळ भागात होते. तिकडे ना रस्ता, ना धड लाईट, ना कसले दुकान... आजूबाजूला फ़क़्त हिरवेगार रान... गर्द
झाडी आणि जंगल. असे सर्व असले तरी जितकी भीती वाटायची तितकेच गाव आवडायचे.
माझी दर मे महिन्याची सुट्टी हि गावाकडे हमखास
ठरलेलीच असायची. पण मी एकदाही मुंबई वरून खेळणी घेऊन गावी गेली नाही. तशी कधी गरजच
पडली नाही. कारण इथल्या मातीत आणि
निसर्गात सर्व खेळणी मिळून जायची. त्यासोबत
खेळायला हक्काची जागा म्हणजे अंगण हि
मिळायचे. मुंबईला विकत खेळणी मिळतात पण खेळायला हक्काची जागा मिळेल हे सांगू शकत नाही. पण गावी हक्काचं अंगण आणि निसर्गातून मिळालेली
खूप सारी खेळणी होती. ज्यासाठी एक पैसा हि खर्च करायची गरज नसायची. पैशाने सुख विकत घेता येत नाही म्हणतात... तसेच
काही मला गावी निसर्गाच्या सानिध्यात
आल्यावर नेहमी वाटायचे.
आता अंगणातील खेळ समजून घेण्यासाठी आधी
कोकणातील अंगण समजून घेऊ.
कोकणात काही ठिकाणी अंगणाला ‘खळ’ असे म्हणतात. कोकणातील प्रत्येक घरासमोरील काही भाग मातीने सपाट (चोप देऊन ) करून त्याला शेणाने सारवून ‘अंगण’ तयार केले जाते. अंगणाच्या तिन्ही कडेला प्याळ किंवा प्यालं म्हणजे एक छोटा कट्टा सारखा भाग तयार केला जातो. ज्यामुळे अंगणातील माती भक्कम बसते. पावसाळ्यात वाहून जात नाही. अंगणाच्या एका कोपऱ्यात तुळस लावली जाते. सर्व साधारण याच ढाच्याप्रमाणे सर्व अंगण असतात. पण प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्याची रचना बदलतात म्हणून खूप वेगवेगळ्या प्रकारचे अंगण बघायला मिळतात. जसे कि, आमच्याच गावी आमचे अंगण शेणामातीचे आणि बिना मांडवाचे ( मांडव म्हणजे अंगणालावरून नारळाच्या झावळीच्या साहाय्य्याने केलेले छप्पर). काही ठिकाणी अंगणाला जोडून फाटीचे (झाडाच्या बारीक फांद्या / लाकडाचे) कुंपण केलेले असते त्याला ‘बेड’ असे म्हणतात. काही अंगणाला नारळाच्या झावळीचे आणि गवताचे मांडव म्हणजे छप्पर केलेले असतात. काही अंगणाच्या भोवती आबोली, शेवंती, कचकडी, मखमल(झेंडू), अनंत आणि मोगरा या फुलांचे कुंपण असते. काही घरांना पुढे आणि मागे दोन अंगण हि असतात. इथे प्रत्येकाच्या अंगणात कोणत्यातरी फळाचे झाड हमखास दिसणार. सर्वात जास्त अंगणाला लागुनच आंब्याचे झाड असतेच असते. अन्यथा फणस, काजवीन (काजू), पेरविन (पेरूचे झाड), लिंबिन (लिंबाचे झाड), चीकवीन (चिकूचे झाड), नारळीन (नारळ) तरी असतेच असते. बदलत्या काळानुसार अंगणाचे स्वरूप हि बदलत गेले. नारळाच्या झावळीची जागा पत्र्याने घेतली. शेणामातीऐवजी सिमेंटचा कोबा किंवा फरशी वाले अंगण हि दिसू लागले. पण अंगणाचे महत्व अजूनहि तितकेच महत्वाचे राहिले. काळ बदलला तरी काही गोष्टी मात्र तश्याच राहिल्या. जसे कि, प्रत्येक अंगणात लाकडाचे बाकडे मात्र कायम होते आणि अजूनही आहेत. काही ठिकाणी लाकडाचे झोपळे आज हि दिसतील.
आता परत येऊ आमच्या अंगणात...
आमच्या घराला पुढे आणि मागे दोन अंगण... ते हि शेणामातीचे
भले मोठे अंगण. शेणाने सारवताना दोन व्यक्ती तरी लागतातच. माझा तर दिनक्रम या अंगणापासून
सुरु व्हायचा. सकाळी उठल्यावर तांब्यात
पाणी घेऊन मागच्या अंगणाच्या प्याळावर बसून दात घासायचे. मग दोन्ही अंगण कचरा
काढून स्वच्छ करायचे. (कचरा फ़क़्त झाडांची पाने असायची)त्यानंतर बाबांसोबत देव पूजा करून तुळशीला पाणी घालायचे. आमच्या
अंगणाभोवती खूप साऱ्या तुळशी आहेत. मग पुढच्या अंगणाच्या चहा आणि नाश्ता घ्यायचा. त्यानंतर काही तरी वाचत, चित्र काढत वैगरे
अंगणातच बसायचे. अंगणाच्या दोन्ही बाजुला
मोठे आंब्याचे झाड असल्यामुळे कायम सावली आणि
आल्हाददायक वारा असायचा. अंगणात बसून मध्येच
मधुर असा निरनिराळ्या पक्षांचा आवाज ऐकायचा. मग तो पक्षी कोणत्या झाडावर आणि फांदीवर बसला असेल हे त्या अंगणातूनच शोधयाचे. पक्ष्यांचे
आवाज, पानांची सळसळ, कोंबडी- गुर (गाय /बैल ) यांचे आवाज आणि आजूबाजूला असणारे त्यांचे अस्तित्व अनुभवयाला
त्यात रमून जायला खूप मज्जा यायची.
PC : Instagram |
दुपार होत आली कि, हळूहळू खेळायला मुल-मुली
जमायचे. नेहमी वेगवेगळ्या घरासमोरील
अंगणात जमायचे त्या ठिकाणी वेगवेगळे
खेळ खेळायचो. ज्यांच्या अंगणाला मांडव
असायचा तर त्यांच्या अंगणात खांब पण असायचे. मग तिकडे आम्ही ‘खांब- खांब’ खेळायचो.
ज्या अंगणातील प्याळ मोठे होते तिकडे ‘डोंगर कि दरी’ किंवा ‘तळ्यात कि मळ्यात’
खेळायचो. जे अंगण मोठे असायचे तिकडे
कब्बडी, पकडापकडी, सोनसाखळी, खो-खो, लगोरी सारखे खेळ खेळायचो. लगोरी साठी
नारळाच्या करवंटी किंवा बेलटीचा (नारळाचे वरील टणक आवरण) वापर करायचो आणि बॉल
म्हणून पिशवी, फाटके चिंधी कपडे यांचा बॉल तयार करायचो. त्यानंतर लपाछपी / लपवाछपवीला इथे ‘कुकडी कुक’ म्हणायचे. हा
खेळ खेळताना पूर्ण गाव भर कुठे हि लपायचो.
ज्या अंगणाला लागून शेताचे मळे किंवा खळे
असतील तिकडे ‘विटीदांडू’ खेळायचो.
भातुकली खेळायचे म्हटले तरी आम्ही ज्याच्या त्याच्या अंगणातून आमची खेळायचे साहित्य जमा करायचो.
PC : Instagram |
डोंगराला आग लागली पळा पळा...
आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं...
शाळेतल्या मुली आल्या कशाला.... खेळता खेळता
खोकला झाला खो खो खो ...
PC :Instagram |
PC : Instagram |
रात्रीच्या वेळी अंगणात एक मोठी चटई रोज घालायची. वरती मस्त चांदण्यांनी भरलेलं आभाळ, थंडगार वारा, काजव्यांची लकलक, बेडकांचे आवाज आणि रातकिड्यांची कीरकीर हि रात्री अंगणातून अनुभवायला मिळायची. त्यानंतर हळूहळू मोठी माणस हि अंगणात जमायला सुरु व्हायचे. दिवसभर शेतातील कामे करून अंगणातच थोड्या गजल्या (गप्पा-गोष्टी) करून करमणूक व्हायची. रात्रीचे पत्त्यांचे खेळ जागरणासारखी उशिरा पर्यंत अंगणात रंगायचे. लहान मुलांसोबत मोठेदेखील हौशीने सामील व्हायचे. तेवढाच दिवस भराच्या शेतातील कामातून थोडा विरंगुळा आणि आराम हा रात्रीच्या वेळी अंगणातूनच मिळायचा.
कोकणात अंगणातील हि मज्जा अनुभवायची असेल तर हिवाळा आणि उन्हाळ्यात अनुभवता येईल. पावसाळ्यात हेच अंगण लाल मातीने रंगून जाते. सुरवातीच्या पावसात अंगणात मस्त भिजायला आणि नाचायला हि मिळते. चिखलात हवे तसे खेळायला हि मिळते. असे हे अंगणातील ऋतू नुसार खेळ मी लहानपणी खूप अनुभवले.
माझे कोकणातील जुने घर आणि पावसाळ्यातील अंगण |
अगदी भरभरून आनंद मला फ़क़्त अंगणामुळे अनुभवायला
मिळायचा. म्हणूनच पुन्हा मुंबईला निघायला पाय जड होऊ लागायचे. आणि व पू काळेच्या
कवितेतील ओळी कानावर पडू लागायच्या.
मला गाव जेव्हा दिसू लागले..... लुळे पाय माझे
रुसू लागले......
लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे. तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख ताई
उत्तर द्याहटवाखरच लहान पणाची आठवण आली वाचताना..
उत्तर द्याहटवाआम्हीही हेच खेळ खेळून मोठे झालो..❣️
धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल !!!
हटवाKhup mast...saglya lahan panichya aathavani jagya zalyat
उत्तर द्याहटवाधन्यवाद प्रतिक्रियेबद्दल !!!
उत्तर द्याहटवाKharch ga kiti mja yaychi na
उत्तर द्याहटवाAani aapan khali gothaniver angholila pn jaycho dbkyat athavt ka? Mi tula nehmi vicharychi Mumbai la kadhi janar tya mage majha hetu tumhi lvkr jevat asa nsaycha tr kiti divas aaplyala mja krayla bhetnar ha asaycha
Kakichi khup aathavn yete