कासव जत्रा (Turtle Festival)
कोकण डायरीतील अजून
एक अनमोल आठवण ‘ कासव जत्रा’
PC: Madhura_Shitole |
मुंबई सोडून कायमस्वरूपीसाठी कोकणात
राहायला आल्यानंतर मी मुंबईची चाकरमानी न
राहता. आता एक रत्नागिरीकर बनले. इकडच्या मातीत राहायला सुरवात केल्यावर इथली बोली
भाषा, सण-उत्सव, निसर्ग पर्यटन, शेती,
मासे पकडणे असं बरंच काही नवीन गोष्टी आणि नवीन माहिती रोज अनुभवयाला आणि शिकायला मिळाली. ज्याचा अनुभव या पूर्वी कधीच घेता आला
नव्हता. संपूर्ण बालपण आणि शिक्षण
मुंबईलाच झाल्यामुळे गाव म्हणजे फ़क़्त मे
महिन्याच्या सुट्टीत आंबे खायला आणि गणपती सणासाठी असत इतकचं माहिती होते. मी स्वतः कोकणातील असून कोकणातील सौंदर्य
खजिनापासून मी खूप अलिप्त राहिली होती. आता ती सर्व कसर पूर्ण करायचा विचार केला. त्यातीलच एक अनमोल आणि आल्हाददायक अनुभव म्हणजे ‘कासव
जत्रा’.
हि अनोखी कासव जत्रा
अनुभवण्यासाठी मी वेंगुर्ला येथील वायंगणी इथल्या कासव जत्रेत गेले होते. कोकण रेल्वेने कुडाळ रात्री कुडाळ स्तेशनला पोहचले. तिकडे कासव
जत्रे साठी ज्यांच्याकडे बुकिंग केले होते
त्यांची गाडी आम्हाला घेऊन जायला आली होती. आम्हाला म्हणजे माझे मित्र-
मैत्रिणी पण सोबत होते. साधारणत: रात्री १२ वाजता वायंगणी गावातील आम्ही एका पारंपारिक अश्या
कोकणी घराच्या इथे पोहचलो. इकडे आल्यावर एक गोष्ट लक्षात आली कि, रात्रीच्या
शांततेत लाटांचा मधुर आवाज कानी पडत होता.
सूर्योदय पाहण्यासाठी सकाळी लवकर उठून पहिला किनाऱ्यावर पोहचायचं हे तेव्हाच ठरलं. इकडे आल्यावर या समुद्राच्या
आवाजाने आणि वाऱ्याने सर्व प्रवासाचा तान चुटकीसरशी निघून गेला. थोडेसे फ्रेश
होऊन गप्पा गोष्टी करत झोपायला रात्रीचे
दोन वाजले. घरात असल्यावर उशिरा झोपून उशिरा उठणारे आम्ही
चौघे जण आज सूर्योदय बघण्यासाठी वेळेवर उठलो होतो. जास्त वेळ वाया न घालवता लगबग आमची पाउले त्या लाटांच्या
आवाजाकडे धावू लागली. किनाऱ्यावरची वाळू
पायाला लागायला सुरवात झाली तेव्हा तिथेच चप्पल ठेवून. त्या थंडगार वाळूवर अनवाणी पायाने
लाटांच्या इथे आम्ही धावत सुटलो. त्या
पहिल्या लाटेचा पायाला झालेला स्पर्श घेताना आपोआप डोळे मिटून गेले होते. तेव्हा
फ़क़्त त्या लाटांचा आणि वाऱ्याचा स्पर्श व आवाज अनुभवत होते. बाकी कोणतेही विचार डोक्यात नाही. कसलीही चिंता मनात नाही. जे आहे ते फ़क़्त आज आताचा क्षण
अनुभवणे. इतकचं कळत होत. खूप वेळ तो निवांत क्षण डोळ्यात आणि कॅमेरामध्ये
कैद करून घेतला. पुन्हा त्या कोकणी घराकडे
चालत आलो. परत घराकडे आल्यावर ते घर नीट
पाहिले. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर,
लाकडाचे दरवाजे आणि खिडक्या, छोटेसे शेणाने सारवलेले अंगण, घर आणि अंगणा भोवती खूप
सारे नारळ आणि आंब्याची झाडे, कोपऱ्यात एक लाकडी झोपाळा आणि बरंच काही होत. जे आम्ही रात्री आलो तेव्हा पाहिले नव्हते. थोडक्यात, हे एक पारंपारिक साध कोकणी घर होत. पण या घरात राहण्याची जी मज्जा आणि आपलेपण आहे .
ते पंचतारिक हॉटेल आणि रिसोर्ट मध्ये येण
अशक्य आहे.
सकाळी ७ वाजता पुन्हा त्या किनाऱ्यावर यायला
सांगितले होते. उन्हामुळे कासवाच्या पिल्लांना इजा होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून प्रखर उन नसेल तेव्हा म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी कासवांची पिल्ले समुद्रात
सोडण्याचे कार्यक्रम पार पाडला जातो. अर्थातच
आम्ही वेळे आधीच पहिले किनाऱ्यावर पोहचलो
होतो. बाकीचे पर्यटक हळूहळू येत
होते. त्यावेळेस कासव मित्र म्हणजे
कासवांचे संवर्धन आणि संरक्षण करणारे कासव प्रेमी यांच्या हालचालीकडे निरीक्षण करत
होतो. ते आम्हाला त्या मादी कासवाची
माहिती सांगत होते. तेव्हा समजले कि, हि ‘ऑलिव्ह रिडले’ नामक या कासवाची दुर्मिळ अशी प्रजात
आहे. हि मादी कासव निर्जन आणि एकांत अश्या
समुद्र किनारीच येऊन आपली अंडी घालते. या मादी कासवांचा विणीचा हंगाम हा नोव्हेंबर
ते मार्च पर्यंतचा असतो. वैशिष्ठ्य म्हणजे
सायंकाळी ते रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर येऊन
ती मादी कासव स्वतः मागच्या दोन पायाने दीड ते दोन फुट खड्डा खोदून त्यांत
एकावेळेस ५० ते १५० पर्यंत अंडी घालू शकते. हि अंडी घालताना ती सतत अश्रू देखील ढाळते. कारण
त्या मादीला वेदना होतात म्हणून नव्हे तर अनावश्यक
मीठ बाहेर टाकता यावे म्हणून ती अश्रू ढाळत असते. अंडी घालून झाल्यावर त्या अंड्यांना उष्णता
लागण्यासाठी स्वतःच ती वाळूने भरते.
त्यानंतर आम्हाला जिथे कासवाची अंडी ठेवली जातात ती जागा दाखविली. कासव मित्र हि किनार्यावर धोक्याच्या ठिकाणी असलेली अंडी एका सुरक्षित ठिकाणी आणून ठेवतात. त्याला चौकोनी जाळीदार असे कुंपण बनविलेले होते. या कासवाच्या अंडीची तस्करी आणि चोरी होण्याची शक्यता असते. तसेच या अंड्यांना साप, खेकडे, घार, गरुड, कोल्हे, कुत्रे , कावळे व इतर समुद्र पक्षी पासून धोका असतो. या अंड्यांची इतर वन्य प्राणी आणि पक्षांकडून नासधूस होऊ नये आणि या अंड्याची तस्करी-चोरी होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावे लागते. या अंड्याची आणि पिल्लांची नोंद वन अधिकारी विभागाकडे होते.
PC: Madhura_Shitole |
PC: Madhura_Shitole |
कासवाची पिल्ले समुद्रात सोडून झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. ते हि एक कोकणी घर होते. या घराला मोठे असे अंगण होते. ज्याला नारळाच्या झावळ्यांचा मांडव होता. मस्त खोबर टाकलेले गरमागरम पोहे आणि चहाचा नाश्ता पोटभर खाऊन घेतला. पुन्हा त्याच किनाऱ्यावर आलो. इकडे कासव निरीक्षणासोबत समुद्रातील डॉल्फिन सफारी पण अनुभवायला मिळते. स्थानिक मच्छीमारांच्या छोट्या होडीतून आम्ही आता डॉल्फिन सफारी साठी समुद्रात जायला निघालो. किनार्यापासून थोडे दूर गेल्यावर समुद्राची भीती तर वाटत होती पण लगेचच डॉल्फिन दर्शन हि मिळाले. खूप सारे डॉल्फिन आळीपाळीने बाहेर उड्या मारत होते. डॉल्फिन्स बघून मनात समुद्राची असणारी भीती कधी पळून गेली कळलेच नाही. डॉल्फिन सफारीनंतर एक वायंगणी- कोंडूर जंगल ट्रेक पण अनुभवायला मिळाला. तेव्हा सोबत प्राणी आणि पक्षी तज्ञांशी गप्पा देखील झाल्या. ट्रेक वरून परत आल्यावर अस्सल मालवणी मेजवाणी आमच्यासाठी तयार होती. शाकाहारी आणि मांसाहारी दोघांची हि उत्तम जेवणाची सोय केली होती. सोबतच आमरस आणि सोलकढीची जोड देखील होती. त्या नंतर शंख- शिम्प्ल्याचे आणि नारळाच्या वस्तूंचे प्रदर्शन हि तिथे पाहायला मिळाले. नारळाच्या कधी विचार हि नसेल केलेल्या असंख्य शोभेच्या वस्तू इथे पाहिल्या.
PC : Madhura_Shitole |
संध्याकाळी पुन्हा सूर्यास्त पाहण्यासाठी किनाऱ्यावर आलो. किनाऱ्यावर चालता चालता वेगवेगळे शंख- शिंपले जमा केले. खेकड्या सोबत खेळलो. तिथे मला एक श्रावणी नावाची ११ वर्षाची चिमुकली भेटली तिच्या सोबत खेकडे पकडायला शिकले. तिच्या सोबत खेळताना पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले. त्यानंतर कासव संवर्धनाचे फिल्म शो सुरु झाले. अनेक कासव आणि मासे त्याच्या प्रजातीची आणि संवर्धनाची माहिती दाखवली. त्यानंतर तिकडेच आपोआप पाय थिरकतील अशी मालवणी गाणी आणि डान्स, कोंबडा नृत्य, दशवतार, संकासूर आणि बरच काही मालवणी संस्कृती दाखविणारे पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले. रात्री खूप उशिरा पर्यंत हे कार्यक्रम राहतात.
Pc: Madhura_Shitole |
अशी हि जत्रा खर तर
दोन दिवसांची असते पण आमची सुट्टी कमी होती म्हणून हि जत्रा एका दिवसात अनुभवून दुसर्या दिवशी परतीच्या
प्रवासाला निघालो. निघताना इथल्या आठवणीची शिदोरी हि सोबत घेतली होती.
अशी हि कोकणातील
आगळीवेगळी ‘कासव जत्रा’. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, कशेळी, आंजर्ले, मुरुड,
दाभोळ, गुहाघर, गावखडी, दापोली, वेंगुर्ला येथील
वायंगणी, कांदळवन येथे या जत्रा
अनुभवायला मिळतील.
कासव नवनिर्मितीच समाधान आणि बहुरंगी निसर्गाच्या छटा एकाच ठिकाणी अनुभवायची असेल तर हि कासव जत्रा नक्कीच करायला हवी.
लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे. तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
Superb Trip ❤️
उत्तर द्याहटवाखूप छान माहीती दिलीत ताई🙏
उत्तर द्याहटवाछान माहिती.उत्सुकता वाढली. या महोत्सवाची तारीख नमूद केली असती तर येत्या वर्षभरात जायचा प्लॅन केला असता.
उत्तर द्याहटवाछान माहिती.उत्सुकता वाढली. या महोत्सवाची तारीख नमूद केली असती तर येत्या वर्षभरात जायचा प्लॅन केला असता.
उत्तर द्याहटवाया महोत्सवाची तारीख फिक्स नसते पण महिने फिक्स असतात जे लेखात नमूद केलेले आहे...हि जत्रा आयोजक करणारे आगाऊ तारीख सांगतात. मग आपण बुकिंग करू शकतो
हटवा