Kokan Diaries लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Kokan Diaries लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

"कोकणातील नारळी पोर्णिमा....."

"कोकणातील नारळी पोर्णिमा....."

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri
PC : Facebook

लहानपणी बऱ्याचदा ऐकले होते कि,  मुंबई पूर्वी सात बेटांची बनली होती असे म्हणतात.  ‘पूर्वी  मुंबई म्हणजे आगरी- कोळ्याची’ हे मुंबईतील मूळ रहिवाशी होते. असे असले तरी.... नारळी पोर्णिमा कशी साजरी करतात हे फ़क़्त सात वाजताच्या दूरदर्शन मधील बातम्यामध्येच पाहिले.  लहानपणी आई लोअरपरेलच्या मामाच्या घर रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधायला जायची. तेव्हा बस मधून जाताना रस्त्यावर सुरु असलेल्या नारळ स्पर्धा फ़क़्त पाहिल्या होत्या. या नारळ फोडण्याच्या स्पर्धेत दोन व्यक्ती असत. त्यांच्या एका हातात एक एक नारळ असे. एकाच्या हातातील नारळाने दुसर्याच्या हातातील नारळ फोडण्याची हि स्पर्धा किंवा खेळ सुरु असे.  बाकी समुद्रात नारळ सोडून समुद्राची पूजा करतात हे फ़क़्त टीव्हीवरील बातम्या आणि कोळी गाण्यातच पाहिले. जे इतके वर्षे मुंबईला पाहायला मिळाले नाही ते....  कामानिमित्त रायगड जिल्ह्यात राहण्याचा योग आला तेव्हा नारळी पोर्णिमा  प्रत्यक्षात बघण्याची संधी मिळाली.

रायगडमधील माझी  पहिली सकाळ हि.... नारळी पोर्णिमेच्या दिवशीचीच  होती....  

पहाटेपासूनच  कानावर लाउडस्पीकरची  गाणी ऐकू येऊ लागले....

सण आयलाय गो आयलाय गो

नारली पुनवचा

मनी आनंद मावणा

कोळ्यांचे दुनियेचा ||

अरे बेगिन बेगिन चल किनारी जाऊ

देवाचे पुंजेला

हाथ जोरुंशी नारल सोन्याचा

देऊया दरीयाला ||

सकाळी कोळी गाणी कानावर पडू लागले तेव्हा मी थोडी झोपेतच होते. तरीही गाणे कानावर पडले आणि ओठांवर एक आनंदी स्मितहास्य आले. योगायोगाने मी किनाऱ्यापासून जवळच राहायला होते. काल रात्री आले तेव्हा हा समुद्र पाहू शकले नव्हते. त्यात प्रवासाचा थकवा होताच पण लाटांचा आवाज ऐकत सुखाची झोप मात्र लगेच आली. सकाळी  त्या गाण्यांच्या आवाज आणि लाटांचा आवाज एकमेकांत मिसळून गेले होते. या आवाजामुळे लगेच डोळे उघडले आणि दरवाजावर येऊन आधी ‘समुद्र दर्शन’ करून घेतले.  लहानापासूनच मला  समुद्राची एक वेगळीच ओढ आणि  प्रेम आहे.  प्रत्येक किनारा... ती लाट... मला आपलीशी वाटते. कोकणी म्हटल्यावर समुद्रावर प्रेम हे by default असणारच... असायलाच पाहिजे.

 तर...  सकाळी उठून जशी घराबाहेर आले तशी आजूबाजूचे सणाचे आनंददायी वातावरण पाहून थकवा क्षणात नाहीसा झाला.  समुद्र  किनाऱ्यावर बोटींची साफसफाई आणि सजावट सुरु होती.  सजावटीसाठी फुलांच्या माळी, पताके आणि विविध रंग वापरत होते. काहीजण घरासमोर सडा मारून सुंदर रांगोळी काढत होते.  काहीजण मिरवणुकीची तयारी करत होते. कोणी नारळाला सोनेरी कागद लावून सोन्याचा नारळ तयार करत होते.  कोणी गजरा आणि वेण्या तयार करत होत्या. आजूबाजूच्या घरातून मस्त ओल्या नारळाच्या करंज्या (रायगडमध्ये पुर्ण्या / पुरण्या म्हणतात. ) , नारळी भात, पुरणपोळी, शिरा आणि खोबऱ्याच्या वडीचा सुंगध येत होता.  लहान मुल – मुली सकाळ पासूनच पारंपारिक कोळी वेशभूषा करून खेळत होते.

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri
 

मी ज्या गावात थांबले होते तिकडे नारळी पौर्णिमेच्या निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा पण आयोजित केल्या होत्या.  मी पहिल्यांदा बोटींची स्पर्धा, रस्सी खेच स्पर्धा, पारंपारिक कोळी नृत्य स्पर्धा, आणि  हातात नारळ फोडण्याची स्पर्धा (याला इथे ‘नारळफोडी’ म्हणतात) इतक्या जवळून पाहिली. नारळ फोडायचा प्रयत्न हि केला पण एक हि नारळ माझ्याने फुटला नाही.  

इथल्या मिरवणुकीची तयारी हि खूप जय्यत अशी असते.    लाल टोपी आणि  कमरेला रुमाल बांधलेला ‘कोळी’, पारंपारिक पद्धतीची साडी नेसलेली , ओढणी, लाल ठसठशीत कुंकू, हातात सोन्याच्या जाडजुड पाटल्या आणि हिरव्या बांगड्या,  गळ्यात पोटापर्यंत येईल इतके लांब मंगळसूत्र, इतर मोठे- मोठे हार –माळ, कानात मोठे फुलांच्या आकाराचे कानातले, केसाचा मोठा असा आंबाडा आणि त्यात  भरगच्च फुलांच्या वेण्या किंवा गजरे वैगरे पारंपारिक वेशभूषा – दागिन्याने नटलेली ‘कोळीण’... अर्थात पूर्ण कोळी समाज... रंगबिरंगी  पारंपारिक वेशभूषा आणि  दागिन्यांनी नटलेला मी पहिल्यांदा पाहिला असेल.... मी त्यावेळेस नेमके काय काय बघू ... कुठे कुठे बघू... आणि प्रत्येक गोष्टीचे कुतुहूल, नवल आणि नाविन्य वाटत होते.  मिरवणुकीसाठी  ढोल, ताशे, सनई आणि पारंपारिक वाद्ये  वापरली होती.   या वाद्यांच्या तालावर प्रत्येकजन ठेका धरून एक किंवा दोन्ही हातवर करून नाचत होते.  अर्थात मी त्यात तितक्याच  उत्साहाने सामील होती.  हि मिरवणूक तिथल्या कोळीवाड्यातील गल्लीमधून फिरून किनाऱ्यावर येते.  किनाऱ्यावरआल्यावर सोन्याचा वर्क रंगवलेला नारळ आणि बोटींची पूजा करून  पानाचा विडा, पुर्ण्या आणि  पुरणपोळीचा नैवद्य दाखविला जातो.  त्यानंतर सर्व एकत्र हात जोडून प्रार्थना / गाऱ्हाणे घालतात कि,  “दर्या राजा आता शांत हो... घरधनी येईल त्याचे  रक्षण कर... भरपूर मासळी गावू  दे (मिळू दे )... कोणतेही संकट येऊ देऊ नकोस.” गाऱ्हाणे झाले कि, नारळ हळुवार अलगदपणे समुद्रात अर्पण करतात.   

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri
PC : Facebook

नारळी पोर्णिमा हा श्रावण महिन्यातील दुसरा सण.... यात समुद्राला वरुणदेव मानून त्याची पूजा करतात. इकडे नारळी पोर्णिमेला 'नारली पुनव' असे म्हणतात.  आगरी-कोळी बांधव यांचा पारंपारिक व्यवसाय हा मासेमारी. या समुद्रामुळे त्यांचे कुटुंबाचे पोट भरते.  समुद्राला देव आणि कर्ता- धर्ता सर्वस्व मानले जाते. यामुळेच  मोठ्या उत्साहात हा सण इकडे साजरा केला जातो.  इकडे काही गावांमध्ये समुद्रात अर्पण केलेला नारळ पुन्हा त्या खवळत्या समुद्रातील लाटांसोबत खेळून... तो नारळ शोधून घेऊन येतात आणि प्रसाद म्हणून एकत्र खातात.

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri

रत्नागिरीत हि नारळी पोर्णिमा साजरी केली जाते पण इतक्या जल्लोषमध्ये नाही पाहायला मिळत. पण इथल्या किनाऱ्यावर इथले पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, इतर सरकारी कार्यालये, विविध सामाजिक आणि धार्मिक संस्था यांच्या वतीने देखील सागराला नारळ अर्पण करून.... ‘सर्वांचे रक्षण कर... अशी प्रार्थना केली जाते.’ पारंपारिक गोड पदार्थ तयार केले जातात.  नारळी भात, खोबऱ्याची  वडी आणि  ओल्या नारळाच्या करंज्या (पुर्ण्या / पुरण्या ) याला रत्नागिरीत माझ्या गावी  ‘शेंगा’म्हणतात.  बाकी रायगड जिल्ह्यात जसे  आगरी- कोळी वाडे असतात तसे इथे खारवी वाडा आणि भंडार वाडा बघायला मिळातात.  नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने झिम्मा-फुगडी खेळली जाते.



"अशी दोडका भेंडी पावरी वाजते रे,

अशी राजेश तुझी बहिण नाचते रे,

कशी धोपावर हात ठेवून तुवेरी नाचते रे.....||"

 

घराघरात साजरी होणारी रक्षाबंधन तर सर्वांनाच परिचयाची आहे... पण त्याच दिवशी असणारी नारळी पोर्णिमा.... रायगडमध्ये जाऊन नक्की अनुभवली पाहिजे.


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

“नाग पंचमी आणि नारळी पौर्णिमेच्या कोकणातील आठवणी.....”

“नाग पंचमी आणि  नारळी पौर्णिमेच्या कोकणातील आठवणी.....”

 

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri-nagpanchami-kokan-anjali-pravin
PC : Dhanashri Sutar

मला कोकणात गणपती उत्सव आणि  शिमगोत्सव साजरा केला जातो हे माहिती होते....कारण या दोन सणासाठी मुंबईचे चाकरमानी हमखास सुट्टी घेऊन गावी येतातच....गावातील इतर सणवार मी कधीच पाहिले नाही. त्यामुळे इकडे  नारळी पोर्णिमा हि साजरी केली जाते हे इथे कायम स्वरूपी राहायला आले तेव्हा कळले.  इकडे आल्यावर अनुभवायला मिळालेले पहिले दोन सण म्हणजे नागपंचमी आणि नारळी पोर्णिमा.  महाराष्ट्रातील   सण- परंपरा मला काही नव्या नव्हत्या पण कोकणात आल्यावर त्या मला तिथल्या निसर्गाशी कश्या जोडल्या आहेत हे मात्र नव्याने उलगडत गेले.

मुंबईला सणवार साजरे करताना.... ‘सण म्हणजे खरेदी आणि खर्च ठरलेलाच असायचा. जसे कि, नागपंचमी सण आला कि,  मातीचा नाग विकत घ्या,  लाह्या विकत घ्या,  मिठाई विकत घ्या , फुले -वेली विकत घ्या. एकूणच सर्व सामान विकत घ्यावे लागायचे.  त्यानंतर आपल्या बिल्डींग किंवा चाळीतील खोलीत प्रत्येक कुटुंब आपापली वैयक्तिक पूजा घरातल्या घरात  पुजून नागपंचमी साजरी करायचे.   

पण गावाकडे  नागपंचमी साजरी  करताना....

इकडे प्रत्येक सणवार साजरे करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे साहित्य हे निसर्गाकडून मिळते.  प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागत नाही.  फ़क़्त घरातल्या घरात सण साजरे करत नाही. तर गावातील लोक एकत्र येऊन सण साजरा करतात. एकमेकांच्या आनंदात – दुखात एकत्रितपणे समाविष्ट होतात. या सर्व गोष्टी माझ्या साठी खूप नवीन होत्या.  मी या सर्व गोष्टी इतक्या  कुतूहलाने पाहत होती. तसेच मला यातून खूप काही नव्याने शिकायला मिळत होते.   

गावी कोणताही सण असला कि, सकाळ पासूनच खूप वेगळेच असे आल्हाददायक आणि आनंदी वातावरण असल्यासारखे वाटू लागते. प्रत्येक घरात सर्वजण लवकर उठून आपापली घरातील कामे करायला सुरुवात करतात.  सर्वात आधी घर – अंगण शेणाने सारवून घेतले जाते.  हे शेणाचे आणि मातीचे  सारवण  करण्यासाठी देखील एकमेकांना मदत केली जाते. त्यानंतर लाल मातीच्या भिंतीवर आणि अंगणात मस्त रांगोळी आणि चुण्याने नक्षीकाम केले जाते.  अलीकडील काही वर्षात  संगमरवर दगडाची रांगोळी दिसून येते.  अन्यथा भाताच्या कोंड्या किंवा चुण्या पासून रांगोळी काढली जायची. आमच्याकडे आजही  भाताच्या कोंड्याची रांगोळी असते.  

सणवारा साठी लागणारे पूजेचे साहित्य देखील रानातून (जंगलातून) किंवा गाव मधूनच शोधून घेऊन यायचे. हे साहित्य गोळा करण्याचे काम विशेष करून लहान मुलांना द्यायचे.   जसे नागपंचमीसाठी  आम्ही तेरडा (तिरडा), सोनतल (सोनतळ), गोमेटीची (गोमेटा) वेल,  दुर्वा, बेल वैगरे गोळा करून घेऊन यायचो.  लहान मुल एकत्र जमून खूप सारे फुले- वेली गोळा करून आणतात आणि प्रत्येक घरात थोडे थोडे वाटत जायचो.  घरातील एका मातीच्या मडक्यात तांदूळ भाजून ‘लाह्या’ घरातच बनविले जाते. काही ठिकाणी वरी  आणि भात दोघांच्या लाह्या तयार करतात.  नागपंचमीच्या निमित्ताने लाह्या कसे बनतात हे मला पहिल्यांदाच कळले होते.  आमच्या गावी नागाची मूर्ती बनवत नाही. जवळपास असणारे वारूळ ज्याला कोकणात ‘भोंबाड’  म्हणतात. तिकडे जाऊनच पूजा केली जाते.  मी इकडे काही गावामध्ये असे देखील पाहिले कि, मुंग्याच्या वारुळातील माती थोडी घेऊन येऊन अळूच्या पानावर जमेल तसा नाग बनवून त्याची स्थापना करून पूजा आणि विसर्जन करतात.  

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri-nagpanchami-kokan-anjali-pravin
PC : Instagram
कोकणात जिल्ह्याप्रमाणे किंवा तालुक्याप्रमाणे थोड्याफार वेगवेगळ्या पद्धती दिसतील पण कोकणातील कोणत्याही गावात वाडीतील सर्व महिला आणि पुरुष  एकत्र जमून एकत्रितपणे  सण साजरे करतानाच दिसतील.   नागपंचमीला देखील एकत्रितपणे वाडीतील जवळचे भोंबाडाजवळ जाऊन पूजा करणार आणि कोकणी बोली भाषेत गाणी म्हणणार व  फुगडी खेळणार.     

जेव्हा मी विचारले कि नागपंचमी का साजरी करतात तेव्हा समजले कि....

“इथे नागपंचमीच्या  दिवशी कोणी शेतावर काम करायला जात नाही. येथील महिला त्या नागाला शेताचे आणि घराचे रक्षण करावे म्हणून ‘भाऊ’  मानून पूजा केली जाते.” हे कारण ऐकल्यावर मला शाळेतील एक शिकवण आठवली.  शाळेत असताना सर म्हणयचे कि, ‘साप हा शेतकऱ्याचा शत्रू नव्हे मित्र असतो म्हणून त्याला मारू नये’  कारण साप शेतातील उंदीर खातो.  जे उंदीर शेतातील धान्याचे आणि  नव्या पिकाचे  नुकसान करू  शकतात.  या उंदरांपासून साप शेताचे रक्षण करतो. म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.  यासाठीच इथल्या महिला त्याचे उपकार किंवा परतफेड म्हणून  सापाला भाऊ मानून त्याची पूजा त्याला नागपंचमी  असे म्हणतात.

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri-nagpanchami-kokan-anjali-pravin

PC : Instagram

कोकणात विविध सणवारानुसार विशेष असे खाद्य संस्कृतीतील नाविन्य हि पाहायला मिळते. जसे कि, नागपंचमीला स्पेशल ‘पातोळ्या /पाटोळ्या’ बनविल्या जातात. हळदीच्या पानात गुळ- खोबऱ्याचे पुरण आणि तांदूळ पिठाच्या साहाय्याने या पातोळ्या बनविल्या जातात. चवीला मस्त गोड आणि सोबत हळदीच्या पानांचा सुंगध यामुळे त्या अधिकच चविष्ट होतात.  ‘पातोळ्या’ म्हणजे नेमकं काय असत? हे मला गावी आल्यावरच पहिल्यांदा कळले.  

मडक्यात भाजलेल्या लाह्या – गुळ - खोबर आणि पातोळ्याचा लज्जत स्वाद .........म्हणजे एकूणच “सुख”  

जे कोकणातील नागपंचमी सणाच्या निमित्ताने भरभरून मिळते. 

नागपंचमी नंतर लगेचच नारळी पोर्णिमा येते...... तसा पुढचा नारळी पोर्णिमेचा  ब्लॉग हि लगेचच येईल.


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com



मंगळवार, २६ मे, २०२०

आडस रत्नागिरीकर ....

आडस रत्नागिरीकर ....

कोकण-डायरी

      कोकण म्हणजे निसर्गाची उधळण झालेला स्वर्ग आहे.  दोन शब्दात सांगायचं तर कोकण म्हणजे  ‘जगात भारी’. आणि  ‘कोकणी’ असाल तर वेगळाच रुबाब असतो.  तुम्हाला पु.ल. देशपांडे याचं मी मुंबईकर... पुणेकर...नागपूरकर माहितीच असेल पण जेव्हा मी कोकणातील रत्नागिरीत राहायला आले तेव्हा कामानिमित्त ज्या ज्या तालुक्यामध्ये  गावांमध्ये ओळख होऊ लागली. तस तसे मला कळले कि, कोकणातील ‘कोकणी’ हि इतकी रुबाबदार  पदवी नसून तर त्याचे उपप्रकारदेखील  आहे.    ‘मी रत्नागिरीकर, मी दापोलीकर, मी चिपळूणकर, मी राजापूरकर, मी संगमेश्वरकर’ यांचे  व्हॉटसअप आणि फेसबुक सोशल मिडियावर  ग्रुप देखील पाहायला मिळतील.  या सोशल मिडीयाच्या ग्रुप मध्ये समाविष्ट होतानाहि पहिला प्रश्न हाच असतो कि, ‘तुम्ही अमुक अमुक तालुक्याचे/ जिल्ह्याचे   आहात का?’ तरच तुमची या ग्रुप मध्ये समाविष्ट होण्याची पात्रता असेल. हि पदवी मिळण्यासाठी  तुमचा किंवा तुमच्या पूर्वजांचा जन्म रत्नागिरीच्या मातीत झाला असेल तर तुम्हाला मिळेल अन्यथा तुम्ही या पदवीसाठी पात्र ठरणार नाहीत.

      रत्नागिरीकर होण्यासाठी इथे  कायम वास्तव्य करण्याची गरज नाही. इकडे जन्म घेऊन जर नंतर तुम्ही  मुंबई आणि पुणे इकडे राहत असाल तरी काही हरकत नसते. उलट तुम्हाला  ‘रत्नागिरीकर’ या पदवी सोबतच ‘मुंबईचे चाकरमानी’ हि पदवी देखील मिळते.तुम्ही  जेव्हा गावात याल तेव्हा  ‘मुंबईच चाकरमानी इले...’ हा आवाज कानावर पडणारच.   या मुंबईच्या चाकरमानीची पण एक वेगळीच गम्मत असते. हे चाकरमानी गौरी-गणपती आणि शिमग्याला मोठ्या प्रमाणात आपल्या गावांत न चुकता  हजेरी लावणार.  जरी ऑफिस – कंपनीतून  सुट्टी मिळत नसेल तरीही काम सोडतील पण आपला सण सोडणार नाहीत.  ट्रेन –एसटी ला कितीही तुफान गर्दी असली, रिजर्वेशन मिळो न मिळो.  तरीही स्वतः गाडी करून किंवा भर गच्च ट्रेन मध्ये पूर्ण प्रवास उभे राहून आपल्या गावी येणार.  अशी वेगळीच जिद्द या चाकरमानीकडे असते.   जेव्हा हे चाकरमानी शहरातील नवीन कपडे घालून गावांमध्ये फिरतात तेव्हा अक्ख गाव कुतुहलाने बघणार. चाकरमानी होण्यासाठी कोकणी बोली भाषेतील वाक्यात  एखादा शहरी शब्द बोलण गरजेच असत. उदाहरणार्थ, गावातील रत्नागिरीकर बोलताना ‘मांगल्यायेलेला’ आणि शहरी रत्नागिरीकर ‘मांगल्याटायमाला’ बोलेल.

      मराठी भाषेच्या अनेक बोली भाषा आहेत. त्यात कोकणची ‘कोकणी भाषा’ असे म्हटले जाते. पण इकडे आल्यावर कळेल कि, अगदी तालुक्याप्रमाणे बोली भाषा बदलते. चिपळूण ते राजापूर भाषेत अनेक बदल दिसून येतील. राजापूरच्या भाषेला मालवणी सूर लागतो तर चिपळूण – संगमेश्वरी बोली भाषेचा वेगळाच सूर असतो.  रत्नागिरीतील चिपळूणकर, संगमेश्वरकर किंवा कोणताही कर असो तुमच्या बोलण्यात  काही शब्द मात्र आलेच पाहिजे. उदाहरणार्थ : ‘आडस’ हा एक शब्द अनेक प्रकारच्या भावना व्यक्त करायला वापरतात. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे आश्यर्य आणि  नवल  वाटत असेल तर ‘ कसलं आडस हाय ते’. जर एखादा  आंबा  खूप गोड आणि चविष्ट होता तर ‘आडस गोड’. जर मुसळधार पाऊस असेल तर ‘आडस पाऊस’. जर कोणाची जबरदस्त भांडण झाली असेल तर ‘आडस भांडण’. जर एखाद्याने महत्वपूर्ण- चांगली माहिती दिली तर, ‘आडस शिकवलान / समजवलान’   जर कोणतीही सुंदर गोष्ट दिसली तर ‘ आडस नाटक,   आडस मुलगा / मुलगी, आडस नाच’ एकूणच कळले असेल तर ‘आडस’ म्हणजे बहुअर्थरूपी  महत्वपूर्ण शब्द आहे. त्यासोबतच काही बेसिक अपशब्द (शिव्या) देखील तोंडी असले पाहिजे. त्या शिवीचा अर्थ म्हणजे राग द्वेष असतो असे नव्हे तर प्रेम , आश्चर्य , आवड, भीती  व्यक्त करण्यासाठी देखील या शिवीचा बहुअर्थी  उपयोग होतो. 

      रत्नागिरीकर बनायचं असेल  तर ‘ए पोरा किंवा ए पोरी’ चुकून सुद्धा म्हणणार नाही.  इकडे मुलगा असेल तर ‘बावा’  आणि मुलगी असेल तर ‘बाय’ असे म्हणतात.  तुमचे नाव माहिती असो किंवा नसो. हे नाव आपोआपच मिळून जात.  जेव्हा आजी आजोबा प्रेमाने  गालावरून हात फिरवतात तेव्हा ‘ माझी बाय ती / माझा बावा  तो’ या शब्दात एक वेगळाच गोडवा अनुभवायला मिळतो.


आपण शाळेत ‘सण’ म्हणजे उत्सव हा अर्थ शिकले असू. पण  रत्नागिरीत ‘सण’ म्हणजे जेव्हा एखाद्या स्पेशल दिवशी किंवा पाहुणे-चाकरमानी घरी  आल्यावर कोंबडी वडे किंवा मटण वडे यांचे जेवण करतात. त्याला ‘आज आमच्याकडे सण हाये’ म्हणतात. ‘कोंबडी वडे’ वाचल्यावर डोळ्यासमोर कोंबडी आणि बटाटा वड्यातील वडे समोर आणू नये. इकडे कोंबडी म्हणजे चिकन आणि वडे म्हणजे पुरी सारखा तांदूळ आणि इतर पिठांपासून बनवलेला एक पदार्थ आहे.  हे मांसाहारी जेवण कोकणाची खासियत आहे. रत्नागिरीकर व्हायचे असेल तर एक दिवस आड म्हणजेच आठवड्यातील तीन ते चार दिवस घरात  मांसाहार बनलाच पाहिजे. साधारणत कोकणी माणसाचा मांसाहाराचा वार  असला कि,  दुपारच्या जेवणाच्या वेळी  बाबांसाठी बोंबलाच कलावान, भाऊसाठी सुकट  (सुकट म्हणजे उन्हात सुकवलेले मासे) ,  ताईसाठी तव्यावरील फ्राय केलेले पापलेट मासे तर संध्याकाळी अंडी’   असे अनेक मांसाहाराचे  प्रकारचे पदार्थ एकाच दिवशी बनते. पण कोंबडी आणि  वडे एकत्र स्पेशल दिवशीच बनते. या विशेष मांसाहारी जेवणाचे  एक वेगळेच महत्व असल्याने  कदाचित  ‘सण’ बोलत असावे.  
रत्नागिरीकर व्हायचं असेल तर प्रत्येक ऋतूप्रमाणे येणारे फळे आणि भाज्या खाल्लेच पाहिजे. यालाच इथल्या भाषेत ‘नवं करण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ: या उन्हाळ्यात वर्षी पहिला खाल्लेला आंबा म्हणजे ‘आंब्याच नव केल’. फणस असेल तर ‘फणसाच नव’,  करवंद असेल तर ‘करदीच नवं’. कैरी टाकून केलेलं सुक्या मावर्याच कालवण (मच्छी), पावसाळ्यात टाकल्याची  (टाकळा) भाजी, दोडक्याची भाजी, अळूच फतफत. हिवाळ्यात काजूची भाजी. असे सर्व आवडीने खाता आलं पाहिजे. जर नाही खायला मिळाले तर ‘यंदा काय नवं करता आलं नाय’ याच दु:ख व्यक्त करता पाहिजे.  त्याबरोबरच दुकानातील काजू पेक्षा चुलीतील भाजलेले काजू किती चविष्ट असतात. हे देखील सांगता यायला हवं. 

रत्नागिरीकर होण्यासाठी बहुउपयोगी असणारे ‘नारळ आणि खोबर’ याचा  जास्तीत जास्त वापर करता यायला हवा. नारळ फोडून कोणत्याही कामाची सुरवात करताना नारळ फोडूनच केली पाहिजे.  देवळातील नवस करायला नारळ हवा.  साधा सर्दी खोकला झाला तरी डॉक्टरच्या उपचारा  सोबतच देवा समोर नारळ ठेवलेला दिसेल.  जर काही चोरीला गेले तरी चोर शोधण्यासाठी हा नारळ मदत करतो. कोणतेही शुभ कार्य म्हटले तरी त्याची सुरवात  नारळापासूनच झाली  पाहिजे.  करणी करायची म्हटली तरी पहिला नारळ पाहिजे.  तुम्ही शाकाहारी किंवा  मांसाहारी कोणीही असू देत. प्रत्येक  पदार्थात खोबऱ्याचा मसाला (वाटण / ग्रेव्ही) असलीच पाहिजे. त्यासोबतच साधे कांदा पोहे  – उपमा पासून चिकन –मटण पर्यंत प्रत्येक  पदार्थावरून डेकोरेशनसाठी  कोथींबीर नसली तरी काही हरकत नाही पण   ‘खोबर’ मात्र  दिसलेच  पाहिजे.

      रत्नागिरीकर बनण्यासाठी अजून एक खासियत म्हणजे इथला सांस्कृतिक वारसा जपता यायला हवा. रत्नागिरीकर बनायचंय  तर इथले नमन, खेळ, शंकासूर, गोमुचे नाच, बाल्या नाच , डबलबारी, भजन, गणपतीतल्या आरत्या आणि फुगडी यात रस-आवड असलीच पाहिजे.  चाकरमानी गावी आल्यावर पत्त्यांचा डाव रंगला पाहिजे. सर्वात महत्वाच म्हणजे घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाण्याच्या ग्लासासोबत पान- सुपारीचे ताट (पानाची तबकडी) असलेच पाहिजे. 
     रत्नागिरीकर होण्यासाठी शेवटचा आणि महत्वाचा टप्पा ‘हापूस’ ओळखता यायला हवा. चुकुनही रायवळ – बिटकीचे  आंबे आणि हापूस आंबे  यांची एका पारड्यात तुलना करायची नाही. आणि ‘रत्नागिरीचा हापूस’ म्हणून एक जाज्वल्य अभिमान असायला हवा.   


      थोडक्यात म्हणजे इथल्या नारळासारखी बाहेरून टणक दिसली तरी आतून त्या गोड आणि मऊ खोबऱ्यासारखी असतात.  म्हणूनच ग. दि. माडगूळकर यांनी कवितेच्या पुढील ओळी लिहिल्या असाव्यात,  कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी....’



लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com



कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...