“नाग पंचमी आणि नारळी पौर्णिमेच्या कोकणातील आठवणी.....”
|  | 
| PC : Dhanashri Sutar | 
मला कोकणात गणपती
उत्सव आणि  शिमगोत्सव साजरा केला जातो हे
माहिती होते....कारण या दोन सणासाठी मुंबईचे चाकरमानी हमखास सुट्टी घेऊन गावी
येतातच....गावातील इतर सणवार मी कधीच पाहिले नाही. त्यामुळे इकडे  नारळी पोर्णिमा हि साजरी केली जाते हे इथे कायम
स्वरूपी राहायला आले तेव्हा कळले.  इकडे
आल्यावर अनुभवायला मिळालेले पहिले दोन सण म्हणजे नागपंचमी आणि नारळी पोर्णिमा.  महाराष्ट्रातील   सण- परंपरा मला काही नव्या नव्हत्या पण कोकणात
आल्यावर त्या मला तिथल्या निसर्गाशी कश्या जोडल्या आहेत हे मात्र नव्याने उलगडत
गेले. 
मुंबईला सणवार
साजरे करताना.... ‘सण म्हणजे खरेदी आणि खर्च ठरलेलाच असायचा. जसे कि, नागपंचमी सण आला
कि,  मातीचा नाग विकत घ्या,  लाह्या विकत घ्या,  मिठाई विकत घ्या , फुले -वेली विकत घ्या. एकूणच
सर्व सामान विकत घ्यावे लागायचे.  त्यानंतर
आपल्या बिल्डींग किंवा चाळीतील खोलीत प्रत्येक कुटुंब आपापली वैयक्तिक पूजा
घरातल्या घरात  पुजून नागपंचमी साजरी करायचे.
  
पण गावाकडे  नागपंचमी साजरी  करताना.... 
इकडे प्रत्येक सणवार
साजरे करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे साहित्य हे निसर्गाकडून मिळते.  प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागत नाही.  फ़क़्त घरातल्या घरात सण साजरे करत नाही. तर
गावातील लोक एकत्र येऊन सण साजरा करतात. एकमेकांच्या आनंदात – दुखात एकत्रितपणे
समाविष्ट होतात. या सर्व गोष्टी माझ्या साठी खूप नवीन होत्या.  मी या सर्व गोष्टी इतक्या  कुतूहलाने पाहत होती. तसेच मला यातून खूप काही
नव्याने शिकायला मिळत होते.   
गावी कोणताही सण असला
कि, सकाळ पासूनच खूप वेगळेच असे आल्हाददायक आणि आनंदी वातावरण असल्यासारखे वाटू
लागते. प्रत्येक घरात सर्वजण लवकर उठून आपापली घरातील कामे करायला सुरुवात करतात.  सर्वात आधी घर – अंगण शेणाने सारवून घेतले जाते.
 हे शेणाचे आणि मातीचे  सारवण 
करण्यासाठी देखील एकमेकांना मदत केली जाते. त्यानंतर लाल मातीच्या भिंतीवर
आणि अंगणात मस्त रांगोळी आणि चुण्याने नक्षीकाम केले जाते.  अलीकडील काही वर्षात  संगमरवर दगडाची रांगोळी दिसून येते.  अन्यथा भाताच्या कोंड्या किंवा चुण्या पासून
रांगोळी काढली जायची. आमच्याकडे आजही  भाताच्या
कोंड्याची रांगोळी असते.  
सणवारा साठी
लागणारे पूजेचे साहित्य देखील रानातून (जंगलातून) किंवा गाव मधूनच शोधून घेऊन
यायचे. हे साहित्य गोळा करण्याचे काम विशेष करून लहान मुलांना द्यायचे.   जसे नागपंचमीसाठी
 आम्ही तेरडा (तिरडा), सोनतल (सोनतळ), गोमेटीची
(गोमेटा) वेल,  दुर्वा, बेल वैगरे गोळा
करून घेऊन यायचो.  लहान मुल एकत्र जमून खूप
सारे फुले- वेली गोळा करून आणतात आणि प्रत्येक घरात थोडे थोडे वाटत जायचो.  घरातील एका मातीच्या मडक्यात तांदूळ भाजून ‘लाह्या’
घरातच बनविले जाते. काही ठिकाणी वरी  आणि
भात दोघांच्या लाह्या तयार करतात.  नागपंचमीच्या
निमित्ताने लाह्या कसे बनतात हे मला पहिल्यांदाच कळले होते.  आमच्या गावी नागाची मूर्ती बनवत नाही. जवळपास
असणारे वारूळ ज्याला कोकणात ‘भोंबाड’  म्हणतात.
तिकडे जाऊनच पूजा केली जाते.  मी इकडे काही
गावामध्ये असे देखील पाहिले कि, मुंग्याच्या वारुळातील माती थोडी घेऊन येऊन
अळूच्या पानावर जमेल तसा नाग बनवून त्याची स्थापना करून पूजा आणि विसर्जन करतात.  
|  | 
| PC : Instagram | 
जेव्हा मी
विचारले कि नागपंचमी का साजरी करतात तेव्हा समजले कि....
“इथे नागपंचमीच्या दिवशी कोणी शेतावर काम करायला जात नाही. येथील महिला त्या नागाला शेताचे आणि घराचे रक्षण करावे म्हणून ‘भाऊ’ मानून पूजा केली जाते.” हे कारण ऐकल्यावर मला शाळेतील एक शिकवण आठवली. शाळेत असताना सर म्हणयचे कि, ‘साप हा शेतकऱ्याचा शत्रू नव्हे मित्र असतो म्हणून त्याला मारू नये’ कारण साप शेतातील उंदीर खातो. जे उंदीर शेतातील धान्याचे आणि नव्या पिकाचे नुकसान करू शकतात. या उंदरांपासून साप शेताचे रक्षण करतो. म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. यासाठीच इथल्या महिला त्याचे उपकार किंवा परतफेड म्हणून सापाला भाऊ मानून त्याची पूजा त्याला नागपंचमी असे म्हणतात.
|  | 
कोकणात विविध
सणवारानुसार विशेष असे खाद्य संस्कृतीतील नाविन्य हि पाहायला मिळते. जसे कि, नागपंचमीला
स्पेशल ‘पातोळ्या /पाटोळ्या’ बनविल्या जातात. हळदीच्या पानात गुळ- खोबऱ्याचे पुरण
आणि तांदूळ पिठाच्या साहाय्याने या पातोळ्या बनविल्या जातात. चवीला मस्त गोड आणि
सोबत हळदीच्या पानांचा सुंगध यामुळे त्या अधिकच चविष्ट होतात.  ‘पातोळ्या’ म्हणजे नेमकं काय असत? हे मला गावी
आल्यावरच पहिल्यांदा कळले.   
मडक्यात भाजलेल्या
लाह्या – गुळ - खोबर आणि पातोळ्याचा लज्जत स्वाद .........म्हणजे एकूणच “सुख”  
जे कोकणातील नागपंचमी
सणाच्या निमित्ताने भरभरून मिळते.  
नागपंचमी नंतर
लगेचच नारळी पोर्णिमा येते...... तसा पुढचा नारळी पोर्णिमेचा  ब्लॉग हि लगेचच येईल. 
लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे. तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com

 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा