बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

"कोकणातील नारळी पोर्णिमा....."

"कोकणातील नारळी पोर्णिमा....."

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri
PC : Facebook

लहानपणी बऱ्याचदा ऐकले होते कि,  मुंबई पूर्वी सात बेटांची बनली होती असे म्हणतात.  ‘पूर्वी  मुंबई म्हणजे आगरी- कोळ्याची’ हे मुंबईतील मूळ रहिवाशी होते. असे असले तरी.... नारळी पोर्णिमा कशी साजरी करतात हे फ़क़्त सात वाजताच्या दूरदर्शन मधील बातम्यामध्येच पाहिले.  लहानपणी आई लोअरपरेलच्या मामाच्या घर रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधायला जायची. तेव्हा बस मधून जाताना रस्त्यावर सुरु असलेल्या नारळ स्पर्धा फ़क़्त पाहिल्या होत्या. या नारळ फोडण्याच्या स्पर्धेत दोन व्यक्ती असत. त्यांच्या एका हातात एक एक नारळ असे. एकाच्या हातातील नारळाने दुसर्याच्या हातातील नारळ फोडण्याची हि स्पर्धा किंवा खेळ सुरु असे.  बाकी समुद्रात नारळ सोडून समुद्राची पूजा करतात हे फ़क़्त टीव्हीवरील बातम्या आणि कोळी गाण्यातच पाहिले. जे इतके वर्षे मुंबईला पाहायला मिळाले नाही ते....  कामानिमित्त रायगड जिल्ह्यात राहण्याचा योग आला तेव्हा नारळी पोर्णिमा  प्रत्यक्षात बघण्याची संधी मिळाली.

रायगडमधील माझी  पहिली सकाळ हि.... नारळी पोर्णिमेच्या दिवशीचीच  होती....  

पहाटेपासूनच  कानावर लाउडस्पीकरची  गाणी ऐकू येऊ लागले....

सण आयलाय गो आयलाय गो

नारली पुनवचा

मनी आनंद मावणा

कोळ्यांचे दुनियेचा ||

अरे बेगिन बेगिन चल किनारी जाऊ

देवाचे पुंजेला

हाथ जोरुंशी नारल सोन्याचा

देऊया दरीयाला ||

सकाळी कोळी गाणी कानावर पडू लागले तेव्हा मी थोडी झोपेतच होते. तरीही गाणे कानावर पडले आणि ओठांवर एक आनंदी स्मितहास्य आले. योगायोगाने मी किनाऱ्यापासून जवळच राहायला होते. काल रात्री आले तेव्हा हा समुद्र पाहू शकले नव्हते. त्यात प्रवासाचा थकवा होताच पण लाटांचा आवाज ऐकत सुखाची झोप मात्र लगेच आली. सकाळी  त्या गाण्यांच्या आवाज आणि लाटांचा आवाज एकमेकांत मिसळून गेले होते. या आवाजामुळे लगेच डोळे उघडले आणि दरवाजावर येऊन आधी ‘समुद्र दर्शन’ करून घेतले.  लहानापासूनच मला  समुद्राची एक वेगळीच ओढ आणि  प्रेम आहे.  प्रत्येक किनारा... ती लाट... मला आपलीशी वाटते. कोकणी म्हटल्यावर समुद्रावर प्रेम हे by default असणारच... असायलाच पाहिजे.

 तर...  सकाळी उठून जशी घराबाहेर आले तशी आजूबाजूचे सणाचे आनंददायी वातावरण पाहून थकवा क्षणात नाहीसा झाला.  समुद्र  किनाऱ्यावर बोटींची साफसफाई आणि सजावट सुरु होती.  सजावटीसाठी फुलांच्या माळी, पताके आणि विविध रंग वापरत होते. काहीजण घरासमोर सडा मारून सुंदर रांगोळी काढत होते.  काहीजण मिरवणुकीची तयारी करत होते. कोणी नारळाला सोनेरी कागद लावून सोन्याचा नारळ तयार करत होते.  कोणी गजरा आणि वेण्या तयार करत होत्या. आजूबाजूच्या घरातून मस्त ओल्या नारळाच्या करंज्या (रायगडमध्ये पुर्ण्या / पुरण्या म्हणतात. ) , नारळी भात, पुरणपोळी, शिरा आणि खोबऱ्याच्या वडीचा सुंगध येत होता.  लहान मुल – मुली सकाळ पासूनच पारंपारिक कोळी वेशभूषा करून खेळत होते.

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri
 

मी ज्या गावात थांबले होते तिकडे नारळी पौर्णिमेच्या निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा पण आयोजित केल्या होत्या.  मी पहिल्यांदा बोटींची स्पर्धा, रस्सी खेच स्पर्धा, पारंपारिक कोळी नृत्य स्पर्धा, आणि  हातात नारळ फोडण्याची स्पर्धा (याला इथे ‘नारळफोडी’ म्हणतात) इतक्या जवळून पाहिली. नारळ फोडायचा प्रयत्न हि केला पण एक हि नारळ माझ्याने फुटला नाही.  

इथल्या मिरवणुकीची तयारी हि खूप जय्यत अशी असते.    लाल टोपी आणि  कमरेला रुमाल बांधलेला ‘कोळी’, पारंपारिक पद्धतीची साडी नेसलेली , ओढणी, लाल ठसठशीत कुंकू, हातात सोन्याच्या जाडजुड पाटल्या आणि हिरव्या बांगड्या,  गळ्यात पोटापर्यंत येईल इतके लांब मंगळसूत्र, इतर मोठे- मोठे हार –माळ, कानात मोठे फुलांच्या आकाराचे कानातले, केसाचा मोठा असा आंबाडा आणि त्यात  भरगच्च फुलांच्या वेण्या किंवा गजरे वैगरे पारंपारिक वेशभूषा – दागिन्याने नटलेली ‘कोळीण’... अर्थात पूर्ण कोळी समाज... रंगबिरंगी  पारंपारिक वेशभूषा आणि  दागिन्यांनी नटलेला मी पहिल्यांदा पाहिला असेल.... मी त्यावेळेस नेमके काय काय बघू ... कुठे कुठे बघू... आणि प्रत्येक गोष्टीचे कुतुहूल, नवल आणि नाविन्य वाटत होते.  मिरवणुकीसाठी  ढोल, ताशे, सनई आणि पारंपारिक वाद्ये  वापरली होती.   या वाद्यांच्या तालावर प्रत्येकजन ठेका धरून एक किंवा दोन्ही हातवर करून नाचत होते.  अर्थात मी त्यात तितक्याच  उत्साहाने सामील होती.  हि मिरवणूक तिथल्या कोळीवाड्यातील गल्लीमधून फिरून किनाऱ्यावर येते.  किनाऱ्यावरआल्यावर सोन्याचा वर्क रंगवलेला नारळ आणि बोटींची पूजा करून  पानाचा विडा, पुर्ण्या आणि  पुरणपोळीचा नैवद्य दाखविला जातो.  त्यानंतर सर्व एकत्र हात जोडून प्रार्थना / गाऱ्हाणे घालतात कि,  “दर्या राजा आता शांत हो... घरधनी येईल त्याचे  रक्षण कर... भरपूर मासळी गावू  दे (मिळू दे )... कोणतेही संकट येऊ देऊ नकोस.” गाऱ्हाणे झाले कि, नारळ हळुवार अलगदपणे समुद्रात अर्पण करतात.   

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri
PC : Facebook

नारळी पोर्णिमा हा श्रावण महिन्यातील दुसरा सण.... यात समुद्राला वरुणदेव मानून त्याची पूजा करतात. इकडे नारळी पोर्णिमेला 'नारली पुनव' असे म्हणतात.  आगरी-कोळी बांधव यांचा पारंपारिक व्यवसाय हा मासेमारी. या समुद्रामुळे त्यांचे कुटुंबाचे पोट भरते.  समुद्राला देव आणि कर्ता- धर्ता सर्वस्व मानले जाते. यामुळेच  मोठ्या उत्साहात हा सण इकडे साजरा केला जातो.  इकडे काही गावांमध्ये समुद्रात अर्पण केलेला नारळ पुन्हा त्या खवळत्या समुद्रातील लाटांसोबत खेळून... तो नारळ शोधून घेऊन येतात आणि प्रसाद म्हणून एकत्र खातात.

नारळी-पोर्णिमा-रक्षाबंधन- कोकण-नागपंचमी-apali-writergiri

रत्नागिरीत हि नारळी पोर्णिमा साजरी केली जाते पण इतक्या जल्लोषमध्ये नाही पाहायला मिळत. पण इथल्या किनाऱ्यावर इथले पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, इतर सरकारी कार्यालये, विविध सामाजिक आणि धार्मिक संस्था यांच्या वतीने देखील सागराला नारळ अर्पण करून.... ‘सर्वांचे रक्षण कर... अशी प्रार्थना केली जाते.’ पारंपारिक गोड पदार्थ तयार केले जातात.  नारळी भात, खोबऱ्याची  वडी आणि  ओल्या नारळाच्या करंज्या (पुर्ण्या / पुरण्या ) याला रत्नागिरीत माझ्या गावी  ‘शेंगा’म्हणतात.  बाकी रायगड जिल्ह्यात जसे  आगरी- कोळी वाडे असतात तसे इथे खारवी वाडा आणि भंडार वाडा बघायला मिळातात.  नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने झिम्मा-फुगडी खेळली जाते.



"अशी दोडका भेंडी पावरी वाजते रे,

अशी राजेश तुझी बहिण नाचते रे,

कशी धोपावर हात ठेवून तुवेरी नाचते रे.....||"

 

घराघरात साजरी होणारी रक्षाबंधन तर सर्वांनाच परिचयाची आहे... पण त्याच दिवशी असणारी नारळी पोर्णिमा.... रायगडमध्ये जाऊन नक्की अनुभवली पाहिजे.


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


२ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...