मंगळवार, २६ मे, २०२०

आडस रत्नागिरीकर ....

आडस रत्नागिरीकर ....

कोकण-डायरी

      कोकण म्हणजे निसर्गाची उधळण झालेला स्वर्ग आहे.  दोन शब्दात सांगायचं तर कोकण म्हणजे  ‘जगात भारी’. आणि  ‘कोकणी’ असाल तर वेगळाच रुबाब असतो.  तुम्हाला पु.ल. देशपांडे याचं मी मुंबईकर... पुणेकर...नागपूरकर माहितीच असेल पण जेव्हा मी कोकणातील रत्नागिरीत राहायला आले तेव्हा कामानिमित्त ज्या ज्या तालुक्यामध्ये  गावांमध्ये ओळख होऊ लागली. तस तसे मला कळले कि, कोकणातील ‘कोकणी’ हि इतकी रुबाबदार  पदवी नसून तर त्याचे उपप्रकारदेखील  आहे.    ‘मी रत्नागिरीकर, मी दापोलीकर, मी चिपळूणकर, मी राजापूरकर, मी संगमेश्वरकर’ यांचे  व्हॉटसअप आणि फेसबुक सोशल मिडियावर  ग्रुप देखील पाहायला मिळतील.  या सोशल मिडीयाच्या ग्रुप मध्ये समाविष्ट होतानाहि पहिला प्रश्न हाच असतो कि, ‘तुम्ही अमुक अमुक तालुक्याचे/ जिल्ह्याचे   आहात का?’ तरच तुमची या ग्रुप मध्ये समाविष्ट होण्याची पात्रता असेल. हि पदवी मिळण्यासाठी  तुमचा किंवा तुमच्या पूर्वजांचा जन्म रत्नागिरीच्या मातीत झाला असेल तर तुम्हाला मिळेल अन्यथा तुम्ही या पदवीसाठी पात्र ठरणार नाहीत.

      रत्नागिरीकर होण्यासाठी इथे  कायम वास्तव्य करण्याची गरज नाही. इकडे जन्म घेऊन जर नंतर तुम्ही  मुंबई आणि पुणे इकडे राहत असाल तरी काही हरकत नसते. उलट तुम्हाला  ‘रत्नागिरीकर’ या पदवी सोबतच ‘मुंबईचे चाकरमानी’ हि पदवी देखील मिळते.तुम्ही  जेव्हा गावात याल तेव्हा  ‘मुंबईच चाकरमानी इले...’ हा आवाज कानावर पडणारच.   या मुंबईच्या चाकरमानीची पण एक वेगळीच गम्मत असते. हे चाकरमानी गौरी-गणपती आणि शिमग्याला मोठ्या प्रमाणात आपल्या गावांत न चुकता  हजेरी लावणार.  जरी ऑफिस – कंपनीतून  सुट्टी मिळत नसेल तरीही काम सोडतील पण आपला सण सोडणार नाहीत.  ट्रेन –एसटी ला कितीही तुफान गर्दी असली, रिजर्वेशन मिळो न मिळो.  तरीही स्वतः गाडी करून किंवा भर गच्च ट्रेन मध्ये पूर्ण प्रवास उभे राहून आपल्या गावी येणार.  अशी वेगळीच जिद्द या चाकरमानीकडे असते.   जेव्हा हे चाकरमानी शहरातील नवीन कपडे घालून गावांमध्ये फिरतात तेव्हा अक्ख गाव कुतुहलाने बघणार. चाकरमानी होण्यासाठी कोकणी बोली भाषेतील वाक्यात  एखादा शहरी शब्द बोलण गरजेच असत. उदाहरणार्थ, गावातील रत्नागिरीकर बोलताना ‘मांगल्यायेलेला’ आणि शहरी रत्नागिरीकर ‘मांगल्याटायमाला’ बोलेल.

      मराठी भाषेच्या अनेक बोली भाषा आहेत. त्यात कोकणची ‘कोकणी भाषा’ असे म्हटले जाते. पण इकडे आल्यावर कळेल कि, अगदी तालुक्याप्रमाणे बोली भाषा बदलते. चिपळूण ते राजापूर भाषेत अनेक बदल दिसून येतील. राजापूरच्या भाषेला मालवणी सूर लागतो तर चिपळूण – संगमेश्वरी बोली भाषेचा वेगळाच सूर असतो.  रत्नागिरीतील चिपळूणकर, संगमेश्वरकर किंवा कोणताही कर असो तुमच्या बोलण्यात  काही शब्द मात्र आलेच पाहिजे. उदाहरणार्थ : ‘आडस’ हा एक शब्द अनेक प्रकारच्या भावना व्यक्त करायला वापरतात. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे आश्यर्य आणि  नवल  वाटत असेल तर ‘ कसलं आडस हाय ते’. जर एखादा  आंबा  खूप गोड आणि चविष्ट होता तर ‘आडस गोड’. जर मुसळधार पाऊस असेल तर ‘आडस पाऊस’. जर कोणाची जबरदस्त भांडण झाली असेल तर ‘आडस भांडण’. जर एखाद्याने महत्वपूर्ण- चांगली माहिती दिली तर, ‘आडस शिकवलान / समजवलान’   जर कोणतीही सुंदर गोष्ट दिसली तर ‘ आडस नाटक,   आडस मुलगा / मुलगी, आडस नाच’ एकूणच कळले असेल तर ‘आडस’ म्हणजे बहुअर्थरूपी  महत्वपूर्ण शब्द आहे. त्यासोबतच काही बेसिक अपशब्द (शिव्या) देखील तोंडी असले पाहिजे. त्या शिवीचा अर्थ म्हणजे राग द्वेष असतो असे नव्हे तर प्रेम , आश्चर्य , आवड, भीती  व्यक्त करण्यासाठी देखील या शिवीचा बहुअर्थी  उपयोग होतो. 

      रत्नागिरीकर बनायचं असेल  तर ‘ए पोरा किंवा ए पोरी’ चुकून सुद्धा म्हणणार नाही.  इकडे मुलगा असेल तर ‘बावा’  आणि मुलगी असेल तर ‘बाय’ असे म्हणतात.  तुमचे नाव माहिती असो किंवा नसो. हे नाव आपोआपच मिळून जात.  जेव्हा आजी आजोबा प्रेमाने  गालावरून हात फिरवतात तेव्हा ‘ माझी बाय ती / माझा बावा  तो’ या शब्दात एक वेगळाच गोडवा अनुभवायला मिळतो.


आपण शाळेत ‘सण’ म्हणजे उत्सव हा अर्थ शिकले असू. पण  रत्नागिरीत ‘सण’ म्हणजे जेव्हा एखाद्या स्पेशल दिवशी किंवा पाहुणे-चाकरमानी घरी  आल्यावर कोंबडी वडे किंवा मटण वडे यांचे जेवण करतात. त्याला ‘आज आमच्याकडे सण हाये’ म्हणतात. ‘कोंबडी वडे’ वाचल्यावर डोळ्यासमोर कोंबडी आणि बटाटा वड्यातील वडे समोर आणू नये. इकडे कोंबडी म्हणजे चिकन आणि वडे म्हणजे पुरी सारखा तांदूळ आणि इतर पिठांपासून बनवलेला एक पदार्थ आहे.  हे मांसाहारी जेवण कोकणाची खासियत आहे. रत्नागिरीकर व्हायचे असेल तर एक दिवस आड म्हणजेच आठवड्यातील तीन ते चार दिवस घरात  मांसाहार बनलाच पाहिजे. साधारणत कोकणी माणसाचा मांसाहाराचा वार  असला कि,  दुपारच्या जेवणाच्या वेळी  बाबांसाठी बोंबलाच कलावान, भाऊसाठी सुकट  (सुकट म्हणजे उन्हात सुकवलेले मासे) ,  ताईसाठी तव्यावरील फ्राय केलेले पापलेट मासे तर संध्याकाळी अंडी’   असे अनेक मांसाहाराचे  प्रकारचे पदार्थ एकाच दिवशी बनते. पण कोंबडी आणि  वडे एकत्र स्पेशल दिवशीच बनते. या विशेष मांसाहारी जेवणाचे  एक वेगळेच महत्व असल्याने  कदाचित  ‘सण’ बोलत असावे.  
रत्नागिरीकर व्हायचं असेल तर प्रत्येक ऋतूप्रमाणे येणारे फळे आणि भाज्या खाल्लेच पाहिजे. यालाच इथल्या भाषेत ‘नवं करण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ: या उन्हाळ्यात वर्षी पहिला खाल्लेला आंबा म्हणजे ‘आंब्याच नव केल’. फणस असेल तर ‘फणसाच नव’,  करवंद असेल तर ‘करदीच नवं’. कैरी टाकून केलेलं सुक्या मावर्याच कालवण (मच्छी), पावसाळ्यात टाकल्याची  (टाकळा) भाजी, दोडक्याची भाजी, अळूच फतफत. हिवाळ्यात काजूची भाजी. असे सर्व आवडीने खाता आलं पाहिजे. जर नाही खायला मिळाले तर ‘यंदा काय नवं करता आलं नाय’ याच दु:ख व्यक्त करता पाहिजे.  त्याबरोबरच दुकानातील काजू पेक्षा चुलीतील भाजलेले काजू किती चविष्ट असतात. हे देखील सांगता यायला हवं. 

रत्नागिरीकर होण्यासाठी बहुउपयोगी असणारे ‘नारळ आणि खोबर’ याचा  जास्तीत जास्त वापर करता यायला हवा. नारळ फोडून कोणत्याही कामाची सुरवात करताना नारळ फोडूनच केली पाहिजे.  देवळातील नवस करायला नारळ हवा.  साधा सर्दी खोकला झाला तरी डॉक्टरच्या उपचारा  सोबतच देवा समोर नारळ ठेवलेला दिसेल.  जर काही चोरीला गेले तरी चोर शोधण्यासाठी हा नारळ मदत करतो. कोणतेही शुभ कार्य म्हटले तरी त्याची सुरवात  नारळापासूनच झाली  पाहिजे.  करणी करायची म्हटली तरी पहिला नारळ पाहिजे.  तुम्ही शाकाहारी किंवा  मांसाहारी कोणीही असू देत. प्रत्येक  पदार्थात खोबऱ्याचा मसाला (वाटण / ग्रेव्ही) असलीच पाहिजे. त्यासोबतच साधे कांदा पोहे  – उपमा पासून चिकन –मटण पर्यंत प्रत्येक  पदार्थावरून डेकोरेशनसाठी  कोथींबीर नसली तरी काही हरकत नाही पण   ‘खोबर’ मात्र  दिसलेच  पाहिजे.

      रत्नागिरीकर बनण्यासाठी अजून एक खासियत म्हणजे इथला सांस्कृतिक वारसा जपता यायला हवा. रत्नागिरीकर बनायचंय  तर इथले नमन, खेळ, शंकासूर, गोमुचे नाच, बाल्या नाच , डबलबारी, भजन, गणपतीतल्या आरत्या आणि फुगडी यात रस-आवड असलीच पाहिजे.  चाकरमानी गावी आल्यावर पत्त्यांचा डाव रंगला पाहिजे. सर्वात महत्वाच म्हणजे घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाण्याच्या ग्लासासोबत पान- सुपारीचे ताट (पानाची तबकडी) असलेच पाहिजे. 
     रत्नागिरीकर होण्यासाठी शेवटचा आणि महत्वाचा टप्पा ‘हापूस’ ओळखता यायला हवा. चुकुनही रायवळ – बिटकीचे  आंबे आणि हापूस आंबे  यांची एका पारड्यात तुलना करायची नाही. आणि ‘रत्नागिरीचा हापूस’ म्हणून एक जाज्वल्य अभिमान असायला हवा.   


      थोडक्यात म्हणजे इथल्या नारळासारखी बाहेरून टणक दिसली तरी आतून त्या गोड आणि मऊ खोबऱ्यासारखी असतात.  म्हणूनच ग. दि. माडगूळकर यांनी कवितेच्या पुढील ओळी लिहिल्या असाव्यात,  कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी....’



लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com



५ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...