स्त्रीवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्रीवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ मे, २०२४

Menstrual Hygiene Day

PC:GOOGLE

माझ्या नातेवाईकांनी मिल कामगारांची मुंबई ते मॉलवाली मुंबई इतके झपाट्याने परिवर्तन पाहिले.  आमच्या गावातील निम्मी लोकसंख्या रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित झाली. पण मासिक पाळीतील बंधने मात्र मुंबईच्या छोट्याश्या खोलीत हि काटेकोर पाळले जायचे.  

माझं बालपण देखील  मासिक पाळीतील कपडे लपवून कसे सुकवायचे आणि छोट्याश्या हॉलमध्ये ५ दिवस अस्पृश्य कसे राहायचे यात गेले.  जेवण - पाणी लांबून द्यायचे. या पाच दिवसाचे अंथरून पण वेगळे असायचे. पाच दिवसा नंतर तर ते पुन्हा धुवून ठेवायचे. त्यात कोणी "जाणवे घातलेले किंवा माळकरी म्हणवणारे" घरी आले तर, मासिक पाळी आल्यावर मला बोलण्याची हि पाबंदी होती.  अन्यथा ते "पाण्याचा तांब्या उलटा करून श्राप देतात." हि भीती घालायचे. घरात गोमूत्र शिंपडले जायचे. 


त्यानंतर घरी गणपती, दिवाळी, दसरा, लग्न समारंभ आले कि मासिक पाळीच्या गोळ्या खाण्याचा  एक "नवीन संस्कार" घरी करण्यात आला. घरातील स्त्रिया म्हणजे आई बहिणी मैत्रिणी कायम सणवार आला कि, "किती गोळ्या आणायच्या ? कधी पासून खायच्या ? कुठली गोळी चांगली ? मग त्याने दिवस मागे येतात कि पुढे जातात ?  त्यामुळे कोणाकोणाला किती उलट्या होतात ? कोणाचं किती डोकं दुखत? कोणाची किती  मळमळ होते?  किती चिडचिड होते ?   किती पिंपल्स येतात ? पपई -खजूर -हळद दूध घरगुती कोणते उपाय किती करायचे ? किती गरम पडायचे ?" याची तासनतास पुरुष घरी नसताना चर्चा करायच्या. याचमुळे नेमकं मासिक पाळीत स्त्रीची मानसिक आणि शारीरिक नेमके काय बदल होतात. स्त्रीला किती त्रास होतो या गोष्टी कधी पुरुषांपर्यंत पोहचतच नाही. 


 नेमके सणवाराला त्या घरातील स्त्रीला पाळी आली तर आजही  "अडचण झाली,  प्राब्लेम झाला , विघ्न आले" असे शब्द आज हि सर्रास वापरले जातात. "घरातील आता सर्व सणवारातील काम कोण करणार ?" यामुळे घरातील इतर स्त्री आणि पुरुष यांची चिडचिड आणि टेन्शन वाढत.  आज हि हे चित्र आमच्या गावातील आणि शहरातील  प्रत्येक नातेवाईकाच्या घरी हमखास बघायला मिळते. 


मासिक पाळीतील ५ दिवस वेगळे ठेवणे यासाठी काही सुशिक्षित  मैत्रिणी वकिली करत पुढाकार घेऊन बोलतात कि, "स्त्रीला आराम मिळावा म्हणून ते दिवस वेगळे ठेवतात." तिला आराम मिळावा म्हणून अस्पृश्य ठेवण्याची का गरज भासते? समावेशन करून हि तिला आराम देता येऊ शकतो.  इतकं साधी गोष्ट हि लक्षात येत नाही. 

 

सध्या मी मेट्रो सिटी मध्ये राहते. माझ्या ऑफिसचे कर्मचारी आज हि "अडचण / प्रॉब्लेम आला..किंवा येणार .. आता घरातली सणवारची पूजेची काम कशी होणार ? " याच चर्चा सुरु असतात. 


 It's Time for Action... मासिक पाळी बद्दलचे संस्कृती- परंपरेच्या नावाने नकारात्मक असेलेली विचार सरणी पण बदलूया. प्रत्येकाने पुढाकाराची बदलाची गरज आहे.. 

कारण, 

ती आजही मासिक पाळीला प्रॉब्लेम / अडचण /  बर्थडे / पगार असे कोडवर्ड वापरते. 

कारण, 

तिने मासिक पाळी शब्द वापरला तर ती चारित्र्यहीन म्हणून तिला पाहिले जाते. 

कारण, 

ती आजही तिच्या मासिक पाळीतील कपडे लपवूनच सुकवते. 

कारण, 

ती आज हि सणवारा आणि समारंभात घरात काम करता यावे म्हणून किती हि वेदना झाल्या तरीही  मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेत असते. 

कारण, 

तिला आज हि गावा-गावांत मासिक पाळीच्या दिवसात तिला अस्पृश्यासारखी वागणूकी दिली जाते. 

कारण, 

आज हि तिची मासिक पाळी अपवित्रच आहे. 

कारण, 

तुमच्या घरातील  "ती" तुमची आई, बहीण, पत्नी, काकी,  मामी  किंवा मैत्रीण कोणीही असू शकते. जर लेख वाचणारी स्त्री आहे तर तुम्ही स्वतः देखील असू शकाल ?


 मासिक पाळीदेखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. इतकं सोपं आहे समजून घ्यायला. पण उगीच रूढी - परंपरा पाप -पुण्य संस्कृती वैगरे जोखड त्यावर टाकत गेले आहेत. 


नुसते Menstrual Hygiene Day 2024 चा स्टेट्स ठेवण्या पेक्षा तिला तिच्या मासिक पाळीला समजून घेणायचा प्रयत्न करूया. 


अज्ञान, समज - गैरसमज असतील तर मोकळ्या मनाने चर्चा करूया. 

मी चर्चेसाठी तयार आहे माझ्याशी नक्की बोलू शकता. तुम्ही तयार आहात का ?




 

मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

फातीमाबी शेख – इतिहासाने दखल न घेतलेली पहिली महिला मुस्लिम शिक्षिका (2 min read)

फातीमा बी – इतिहासाने दखल न घेतलेली पहिली महिला मुस्लिम शिक्षिका

सावित्रीबाई फुले हे नाव शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला सुपरिचित आहे. भारतीय स्त्रीवादाचा आणि शैक्षणिक एल्गारचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अजून एक अशी स्त्री आहे तिला म्हणाव तस इतिहासात स्थान मिळाल नाही पण सावित्री-जोती यांच्या सामाजिक कार्यात त्या स्त्रीचा सिंहाचा वाटा होता. ती स्त्री म्हणजे फातीमाबी शेख, पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका, यांचे कार्यही सावित्रीबाईंप्रमाणेच महान आणि महत्वाचे आहे. 200 वर्षा पूर्वी मुस्लिममहिलेने घराबाहेर पडून शिक्षणकार्य करेन हे एक दिवा-स्वप्न होत. अशा कठीण परिस्थितीत फातीमाबी यांनी केलेले कार्य हे नक्कीच दखल घेण्यासारखे आहे. इतिहासाच्या पुस्तकात स्थान न मिळालेल्या या महान स्त्री बद्दल माहिती देणार हा लेख.

Source: theprint.in


सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला (3 जाने) पंतप्रधान मोदींनी सावित्रीबाईंना अभिवादन केले. इतकेच नव्हे तर सावित्रीबाईंचा सनातनी विचारधारेविषयीची मते माहिती असूनही RSS ने त्यांना मानवंदना दिली. पण सुरवतीला इतिहासाच्या पुस्तकांत सावित्रीबाईंचा साधा उल्लेख ही नसायचा. फातीमाबी यांच्या ही बाबतीत हेच झाले आहे. त्यांच्या कार्याची दखल इतिहासकारांनी म्हणावी तशी घेतली नाही.

समाजाने वाळीत टाकले असताना फातीमा बीचे कुटुंब सावित्री-जोति यांच्या मदतीला आले.

सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांना त्यांच्या सुधारणा वादी विचारांमुळे वाळीत टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यात त्यांना त्यांचे घर ही सोडावे लागले. त्यावेळी जोतिबा फुलेंचा मित्र उस्मान शेखने त्यांना मदत केली. सावित्री-जोति हे दोघे उस्मानच्या घरात राहत होते. पुढे याच घरात मुलींची शाळा भरविण्यात आली. फातिमाबी या उस्मानशेख  यांच्या बहीण होत्या.

धर्माच्या ठेकेदारांविरोधाला खंबीरपणे तोंड देणाऱ्या फातीमाबी

सावित्रीबाईंसोबत फातिमाबी यांनी सुद्धा सनातानी समाजकंटकांचे हल्ले सहन केले. फातीमा बी यांच्या वर दगडफेक झाली , त्यांच्यावर शेणही फेकले गेले. पण तरीही या दोघींनी कोणालाही न घाबरता स्त्री शिक्षणाचा किल्ला लढवत ठेवला. तसेच मुस्लिम कट्टरवादयांच्या नजरेत ही फातीमा बी यांचे कार्य खुपत होते. फातीमाबी यांचे कार्य हे त्यावेळच्या कट्टरवादयांना रुचणारे नव्हते. पण फातीमाबी यांनी या विरोधाला कधीही भीक घातली नाही.

आणि फातीमाबी शाळेत शिकवायला लागल्या

सावित्रीबाई दलित महिला तसेच काही उच्चवर्णीय मुलींना देखील शिकवत होते. तो काळ  असा होता की जोतिबा फुले मुलींना पूर्णवेळ शिकवू शकत नव्हते. कारण जो समाज पुरुषसत्ताक व्यवस्थेत दबला गेलाय त्या समाजाला एका पुरुष शिक्षकाने मुलींना शिकविणे कधीच सहन होणारे नव्हते. म्हणणून जोतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून तयार केले. पण सावित्रीबाईंना ६ महिन्यांसाठी शाळेच्या कामासाठी नगरला जावे लागणार होते. मुलींना शिकवणार कोण हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी फातीमा बी यांनी शिक्षिका म्हणून जबाबदारी  व्यवस्थित पार पाडली. फातीमाबी या ५ शाळेतील मुलींना शिकवत होत्या. असे म्हणतात की जसे जोतिबाफुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून तयार केले त्याचप्रमाणे फातिमाबी याना सावित्रीबाईंनी लिहायला आणि वाचायला शिकवले.

Source: feminisminindia.com


फातिमाबी यांच्या कार्याबाबत मर्यादित संशोधन

आपल्याला फातीमाबी यांच्या बद्दलजी माहिती मिळते ती सावित्रीबाईंनी जोतिबा फुले लिहिलेल्या पत्रातून मिळते. फातीमा बी यांचे कार्य सावित्रीबाईप्रमाणे लिखित स्वरूपात कधी जतन केले नाही. तसेच फातीमा बी  यांनी त्यांच्या कार्याबद्दयाल काहीच लिहून ठेवले नाही, त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल फार कमी महिती मिळते. त्यांचे कार्य हे सावित्री-जोती यांच्या कार्याच्या तोडिस-तोंड आहे. कारण मूलतत्ववादाचा भयंकर पगडा असलेल्या तात्कालिक मुस्लिम समाजात एका स्त्रीने शिक्षण घेणे आणि सामाजिक कार्यात झोकून देणे याची आपण कल्पना ही करू शकत नाही.

सर अहमद खान यांनी १८७५ साली एका कॉलेज ची स्थापना केली, हेच पुढे जाऊन अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. सावित्री आणि फातीमाबी यांनी १८४८ साली मुलींसाठी शाळाचालू केली. पण इतिहासणे फातीमा बी यांच्या कार्याची दखल घेतली नाही. पुरुषयासत्ताक व्यवस्थेचा किडा हा मुस्लिमसमाजाला ही लागला आहे. त्यामुळेच की काय मुस्लिम विद्वानांनी फातीमाबी यांच्या कार्याला म्हणावे तसे महत्व दिले नाही. तो सन्मान त्यांना मिळायालाच हवा. सावित्री-जोती या मालिकेतून फातीमाबी बद्दल बरीच माहिती मिळत होती पण प्रेक्षकांची चांगल्या विषयाबद्दलची उदासीनतेमुळे ती मालिकाही थांबविण्यात आली. असो, ९ जानेवारी फातिमाबी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा हा  छोटासा प्रयत्न.

 

संदर्भ :

द प्रिंट , ९ जाने २०१९ Why Indian history has forgotten Fatima Sheikh but remembers Savitribai Phule  https://theprint.in/opinion/why-indian-history-has-forgotten-fatima-sheikh-but-remembers-savitribai-phule/175208/

शि द पिपल , २४ जाने २०२०, Fatima Sheikh: The Muslim Feminist Forgotten By Indian History https://www.shethepeople.tv/sepia-stories/fatima-sheikh-muslim-feminist-forgotten-history/


लेखक : प्रवीण, यांची शिक्षण क्षेत्रात फेलोशिप झालेल्या आहेत.  मागील १०+ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात गावपातळी ते राज्यपातळीवर शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या अनेक प्रकल्पावर कार्य करीत आहेत. 

संपर्क : ७७३८८८२६९२


कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...