समुपदेशन काळाची गरज || Why counseling matters ?
आपण अलीकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे समुपदेशन ऐकले असेल. महिला समुपदेशन, बालक समुपदेशन, कुटुंब समुपदेशन, करिअर समुपदेशन, कायद्याचे समुपदेशन, व्यावसायिक समुपदेशन, मानसिक समुपदेशन, व्यसनमुक्ती समुपदेशन इत्यादी. माणसांचे जितके प्रॉब्लेम्स तितके वेगवेगळी समुपदेशन केंद्र आणि वेगवेगळे कौशल्य असणारे समुपदेशक.
कोणी दारू सोडत नाही म्हणून व्यसनमुक्ती समुपदेशनाकडे जात असतील. कोणाला करिअर मध्ये काय करावे सुचत नाही म्हणून करिअर समुपदेशनासाठी जातात. अलीकडे तर अनेक शाळा आणि कॉलेजसमध्ये देखील करिअर समुपदेशन करताना दिसतील. कोणत्या स्त्रीला जर कौटुंबिक हिंसा सहन करावी लागत असेल तर ती महिला कुटुंब समुपदेशन किंवा महिला समुपदेशन केंद्रात जाते. असे माणसांचे जितके प्रॉब्लेम्स तितके वेगवेगळी समुपदेशन केंद्र आणि वेगवेगळे कौशल्य असणारे समुपदेशक.
तुम्ही देखील बऱ्याचदा वरील "समुपदेशन / कौन्सिलिंग " हा शब्द नक्कीच ऐकले असेल.
"बऱ्याचदा समुपदेशन म्हणजे काय तर नुसते आपले ऐकून घेतात बस.... इतकंच... कधी कधी त्याचे आपणच पैसे पण द्यायचे. नुसतं नवीन फॅड आहे बास्स्सस... पूर्वी लोकांना काय प्रॉब्लेम नव्हते का ? मग तेव्हा समुपदेशन का नव्हते ? " अनेकजण असे बोलताना पण तुम्ही ऐकले असेल.
तर समुपदेशनाची गरज का भासू लागली ते समजून घेऊया.
पूर्वी आपल्याकडे संयुक्त कुटुंब पद्धती होती. ज्यात आजी- आजोबा , काका , चुलते, मामा, बहिणी, भावंडे असे तीन चार पिढ्या एकत्र राहायचे. त्यामुळे त्या मोठ्या कुटुंबातील व्यक्तीला आपल्याच घरामध्येच कोणीना कोणी वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर बोलणारे किंवा मार्गर्दर्शन करणारे किंवा संवाद करणारे मिळायचे. जर कुटुंबातील एका सदस्याने समजून घेतले नाही तर कोणी तरी दुसरे सदस्य त्या व्यक्तीला समजून घ्यायचे. पण आधुनिक काळात शिक्षण आणि नोकरी निमित्ताने संयुक्त मोठे कुटुंब कमी होऊन ते विभक्त छोटे कुटुंब होताना दिसतात. आधुनिकीकरण आणि काळाची गरज म्हणून हे परिवर्तन होताना आपण पाहिले असेल.
या परिवर्तनांचा त्या कुटुंब सदस्यांवरती हि तितकाच परिणाम झाला आहे. सध्याच्या या धावपळीच्या जगात एकत्र कुटुंब फक्त सणावाराला एकत्र भेटतात. अन्यथा, प्रत्येकजण स्वतः चे शिक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी मागे दिवसरात्र धावत असतात. या धावपळीमुळे लक्षातच येत नाही कि, आपण संवाद करणे विसरलो आहे. एकमेकांचे ऐकून घेणे, एकमेकांशी बोलणे, एकेमेकांना समजून घेणे आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणेही कमी - कमी होत गेले आहे. यामुळे अगदी छोट्याश्या शुल्ल्लक गोष्टीवरूनही मतभेद किंवा क्लेश होताना दिसतात. कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रपरिवारही आपल्याला समजून घेत नाही हि भावना निर्माण होते.
यामुळे घरातील / ऑफिस मधील / समाजातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, मनावर, नाते संबंधावर, नात्यात दुरावा निर्माण होणे, पूर्वग्रह विचारांमुळे चुकीचे सल्ले किंवा निर्णय देणे,शिक्षणावर, करिअरवर व्हायला सुरु होते. अशावेळी मानसिक पातळीवर समुपदेशन उपयुक्त ठरते.
समुपदेशन म्हणजे देखील एक प्रकारचा संवादच असतो.
समुपदेशक हा सर्वप्रथम श्रोता मग संवादकाची भूमिका बजावतो. समुपदेशकाने यासाठी विशिष्ठ प्रकारचे शिक्षण आणि कौशल्ये शिकलेली असतात. समुपदेशक कधीच स्वतःची मते नैतिक मूल्ये दुसऱ्यावर लादत नाही. समुपदेशक कधीच पूर्वग्रह दूषित विचार डोक्यात ठेवत नाही. समुपदेशकासाठी प्रत्येक व्यक्ती हि भिन्न असते. येथे पूर्णपणे गोपनीयता पाळली जाते.
समुपदेशन हि आधुनिक काळाची गरज आहे. कधी मनावरचा ताण मोकळा करण्यासाठी तर कधी मनातील गोंधळ दूर करण्यासाठी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी, कायदे विषयक मदत मिळविण्यासाठी , व्यसन मुक्तीसाठी अश्या बऱ्याच कारणांसाठी समुपदेशनाची गरज पडू शकते.
तर अश्यावेळी नक्की जवळील समुपदेशकाकडे जा.
कारण,
समुपदेशन म्हणजे फक्त गप्पा मारणे नाही, फक्त सल्ला - मार्गदर्शन देणे नाही, स्वतः ची नैतिक मूल्ये दुसऱ्यावर लादणे नाही, स्वतःची विचार धारा दुसऱ्यावर लादणे नाही. तर स्वतः साठी उचललेले एक पहिले पाऊल आहे.
amkar.anju@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा