शुक्रवार, २८ जुलै, २०२३

तुला दहावी / बारावीला किती टक्के होते ? हे इतकं महत्वाचं आहे का ? || Beyond the Grades: Understanding the Relevance of SSC and HSC Exams

 तुला दहावी / बारावीला किती टक्के होते ? हे इतकं महत्वाचं आहे का ?

tension-mental-health-children-counseling-suicide


काल एका ४५ वर्षीय संदीप नावाच्या पालकासोबत माझे समुपदेशन विषयावर चर्चा सुरु होती. तेव्हा बोलता बोलता त्यांनी त्यांच्या दहावीत असणाऱ्या मुलीबद्दल सांगायला सुरुवात केली. मुलीची परीक्षा जवळ आली म्हणून मी महिनाभर सुट्टी घेतली. मी स्वतः तिचा रोज अभ्यास घेतो. बाहेरचे खाणे- जाणे सर्व बंद केले. फक्त अभ्यास एके अभ्यास... यंदा ९० % मार्क्स मिळायलाच पाहिजे. अन्यथा मनासारखं करिअर कुठे मिळत. त्यानंतर त्यांनी लहानपणीचा एक अनुभव सांगितला कि, "मला सहावी नंतर कधीच बाहेर खेळायला जाऊ दिले नाही. संध्याकाळी थोड्यावेळासाठी तरी मित्रांशी बोललो तरी आई ओरडायची. मी फक्त आणि फक्त अभ्यास करायचो. कारण पाच वर्षांनी मी दहावीला जाणार होतो. घरातील केबल काढून टाकली आणि टीव्ही बंद केले.  घरात काहीच मनोरंजनाचे साधन नव्हते म्हणून मला सकाळी वर्तमानपत्र वाचायची सवय लागली.  मला दहावी आणि  बारावीला ७० टक्के च्या पुढेच मार्क्स पडले." थोड्यावेळाने त्यांनी सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतला हा. 

तेव्हा मी त्याला एक प्रश्न विचारला कि, " तूम्ही तुझ्या आयुष्यातील पहिली सिगारेट केव्हा पिली ?"

उत्तर मिळाले कि, " आठवीत असताना."

त्यानंतर मी त्यांना अजून तीन प्रश्न विचारले  कि, " आज तुम्ही जिथे नोकरी करत आहे तिथे कोणी तुझे दहावी / बारावीचे टक्के विचारले का ? 

त्या ७०% टक्क्यांनी तुमच्या करिअरमध्ये ठरवलेल्या गोष्टी अगदी प्लॅन नुसार परफेक्ट झाल्या का ?    

तुम्ही आज तुमच्या शिक्षण आणि नोकरी बाबत आनंदी आणि समाधानी आहात का ? 


तिन्ही प्रश्नाचे उत्तर एकच मिळाले, " नाही."


मुलं दहावी / बारावीला पोहचली कि त्या मुलांचे टेन्शन कमी करण्यासाठी काहीच पर्याय शिल्लक नसतात. आई, वडील, नातेवाईक आणि समाज हे एकत्रितपणे रेड अलर्टसारखे ऍक्टिव्हेट होतात. आणि नकळतपणे त्यामुलांवर सर्वजण मिळून प्रेशर देतात... दबाव देतात.... त्यानंतर पालक हीच गोष्ट अभिमानाने सर्वीकडे सांगतात देखील कि, " आम्ही ना आता टीव्ही बंद केला. आम्ही खेळायला बाहेर पाठवायचे बंद केले. आम्ही बाहेर फिरायला जाणे बंद केले. अमुक केले आणि तमुक केले.... " हि झाली पालकांची बाजू... एकीकडे त्या मुलांचे करमणुकीचे किंवा मनोरंजनाचे एकही पर्याय शिल्लक ठेवले नाही. पण टेन्शनचे वजन मात्र वाढवत गेलो. 

कधी विचार केला का कि ते "मुलं ते प्रेशर कसे सहन करेल ?"


त्याचे प्रेशर कमी करण्यासाठी मी एक पालक म्हणून काय करत आहे ?


सतत चालू असलेल्या मशीनवरचा प्रेशर आपल्याला लगेच कळतो. एकतर ती तापते , चटके लागतात किंवा बंद पडते.  तेव्हा मॅकेनिक येऊन " मशीनला आराम देण्याचा सल्ला देऊन जातो." पण मुलांच्या  मेंदूवर परीक्षेच्या नावाने होणारे प्रेशर मोजण्याचे यंत्र आपल्याकडे नाही. या अति प्रेशरमुळे अनेक मुलं नैराश्य, चिंता, टेन्शन आणि उदासीनतेचा विळख्यात सापडतात. अनेक मुलं दबावामुळे व्यसनांच्या आहारी जातात. अति रागिष्ट आणि चिडचिडी होतात. जर मुलांना पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येत असेल  तर त्या 'Guilt' मुले  आत्महत्येचा प्रयत्न करतात.  मुलांचे बालपणच या स्टेजवर हरवण्याची खूप मोठी संभावना असते. 

मुलांना परीक्षेत मिळालेले मार्क्स आणि करिअर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुळात करिअर म्हणजे एक परीक्षा दिली कि झालं चांगलं करिअर असे अजिबात नाही. करिअर हि एक प्रक्रिया म्हणजे लांब चालणाऱ्या प्रवासासारखी आहे. ज्यात अनेक वळणे येतात. अनेक बदल होत असतात. पण या ' करिअरसाठी' शिकत राहणे मात्र गरजेचे असते. पण त्या शिकण्याचे मार्क्स किंवा टक्केवारीत रूपांतरण करणे मात्र चुकीचे आहे. 


हि गोष्ट समजण्यासाठी काही खऱ्या जगातील नामवंतांची उदाहरणे पाहू. 


थॉमस एडिसन यांना " हा मुलगा नॉर्मल शाळेत शिकू शकणार नाही. तो 'ढ' आहे सारखा नापास होतो म्हणून शाळेतून काढण्यात आले. पण त्याच्या आईने मात्र  त्याला शिकत राहण्यासाठी पाठिंबा दिला. आणि शिकण्यासाठी शाळेची गरज नाही हे देखील सांगितले. तोच एडिसन ब्लबचा शोध लावणारा शास्त्रज्ञ म्हणून आज प्रसिद्ध आहे."


कोलोनेल सॅन्डर्स नामक व्यक्ती वयाच्या ६५ वर्षे पर्यंत कुटुंबासाठी नोकरी केली आणि संघर्ष केले. अनेकदा अपयश आले पण त्यातून शिकण्याची जिद्द मात्र कधी हरली नाही. यांनीच वयाच्या ६५ वर्षानंतर KFC ची सुरुवात केली. जी आज पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. 


असे अनेक क्रिकेटर, सिंगर, व्यावसायिकांची उदाहरणे आहेत. ज्यांना कोणीही दहावी / बारावीच्या टक्के विचारले नाही. त्यांनी त्यांच्या शिकत राहण्याच्या जिद्दीमुळे आज प्रसिद्धी मिळाली आहे.  

 

पालक म्हंणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि,  

"आईबाप मुलांना गादी देऊ शकतात पण झोप नाही देऊ शकत. किंवा जेवण देऊ शकतात पण भूक नाही देऊ शकत." 


३ इडियट्स मध्ये देखील रॅन्चोने सतत हे सांगण्याचे प्रयत्न केले. 

"कामयाब होने के लिए नही काबिल बनने के लिए सीखो।"


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...