रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्री कोणाशी होते ? कि मैत्री कोणाशीही होते ? || Happy Friendship Day

 मैत्री कोणाशी होते ? कि मैत्री कोणाशीही होते ?

friendship-day-friends-apali-writergiri-blogspot


मैत्री कशी करायची, मैत्री कोणाशी करायची, मैत्री कोणत्या वयोगटाशी करावी, कोणत्या जाती - धर्मातील व्यक्तीशी करावी, मैत्री किती वेळासाठी करावी... कशालाच काही बंधन नसते. "मैत्री"  कळत- नकळत केव्हाही आणि कोणाशीही होऊ शकते. 


आपण एकटेच जन्माला येतो... तेव्हा आपली पहिली असते कि, आपल्याला बोलायचं असत आणि खूप बोलायचं असत. तेव्हा नुकतेच हुंकार द्यायला शिकलेले बाळ मध्यरात्रीचे आपल्या आई बाबांसोबत गप्पा मारत होते. आईपेक्षा हि बाबांच्या प्रत्येक वाक्याला "हू... हू... हा... " सुरु होते. तेव्हा ती आई बोलते कि, "तुमची गट्टी भारी जुळली." मैत्रीत बोलणे आणि शेअरिंग किती महत्वाचे असते. हे  इथूनच आपण शिकतो. 


त्यानंतर मैत्री होते आपल्या भावंडांशी. कधी एकत्र खेळायचे, चिडायची, भांडायचे पण पुन्हा एकत्र येऊन मस्ती करायची. मॆत्रीत रुसवे- फुगवे होणारच पण ते क्षणभराने विसरून पुन्हा एकत्र येणे. हे आपण इथूनच शिकलो. 


शाळेत जाऊ लागल्यावर पहिली मैत्री होते ती, माझ्या बाजूला बसलेल्या विद्यार्थीसोबत, पहिल्यांदा एकमेकांच्या बाजूला बसणे , मधल्या सुट्टीत लवकर डब्बा शेअर करून खेळायला वेळ काढणे, एकमेकांना अभ्यासात मदत करणे, समविचारी छोटे छोटे ग्रुप बनवून शर्यती लावणे. शर्यत संपली कि, पुन्हा खांद्यावर हात ठेवून एकत्र येणे. हे टीम वर्क आपण इथूनच शिकतो. 


कॉलेजला गेल्यावर मैत्री साठी पण एक दिवस साजरा केला जातो. ज्यात पेन किंवा मार्करने नाव लिहिणे,  फ्रेंडशिप बँड बांधणे, कॅन्टीन मध्ये समोसा - वडापाव ची पार्टी देणे, एका मित्राला काही बोलले तर त्याच्यापाठी ढाल बनून उभे राहणे. आनंद शेअर करण्यापासून ते संकटातही एकमेकांना साथ देणे. आपण कॉलेजच्या मैत्रीतुन शिकतो. 


ऑफिस किंवा कंपनीत आठ ते दहा तासाची ड्युटी, वर्कलोड, टार्गेट, आपल्या गरजा आणि पैशाच्या मागे धावताना अनेकदा वाटते कि आपण जगणे विसरलो आणि कुटुंबापासून लांब जात आहे. ना शाळा - कॉलेज सारखी मस्ती राहिली. ना स्वतः साठी मोकळा वेळ... तेव्हा एकत्र काम करणाऱ्या सहकारी सोबत कँटीग चहासोबत समदुःखी गोष्टी शेअर करताना पण खूप मोठा आधार वाटतो.  गर्दीतले एकटेपण दूर करणे हे आपण या मैत्रीतून शिकतो. 


रोज रोज बसने प्रवास करताना त्याच बस स्टॉपवर महिनाभरापासून  दिसणारी ती अनोळखी व्यक्ती आज मला ओळखीची वाटू लागली... आज आम्ही एकमेकींना बघून रोज एक स्माईल देतो. अजूनही मला तिचे नाव नाही माहिती... पण आम्ही आता रोज बस स्टॉपवर एकत्र भेटू लागलो बोलू लागलो. जर एखाद्या दिवशी ती किंवा मी नाही आली तर, कंडक्टर हि आपुलकीने विचारतात कि, "आज तुमची मैत्रीण नाही आली." कोणतीह ओळख नसताना नकळत मैत्रीचे नाते बनविणे आपण इथूनच शिकतो. 


मॉर्निंग वॉकला जाताना एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू एकेदिवशी अचानक पायाशी येऊन शेपटी हलवत खेळायला सुरुवात करतो. त्यानंतर दररोज नित्यनियमाने त्याच्याशी भेट होऊ लागली. मॉर्निंग वॉकला येणारे एक आजोबा बोलले कि,  " मस्त मैत्री आहे तुमची." मैत्री फक्त माणसाशी संबंधित नसून निसर्ग आणि प्राण्यांसोबत पण नकळत मैत्री होऊ शकते. हे आपण इथूनच शिकतो. 


सोशलमिडीयाच्या जगात हजारो फॉलोवर्स आणि फ्रेंड्स असतात... पण आजूबाजूला हि नकळत बनणारी मैत्री करणे कुठे तरी विसरलो आहोत. "मैत्री" चे एकमेव नाते निरपेक्ष असते.  पण अलीकडे मैत्रीतून जर फायदा होत नसेल तर ती लगेच तोडली जाते. किंवा कारणाशिवाय मैत्री केली जात नाही. 

अखेरीस पु. ल. देशपांडे यांच्या काही ओळी ज्या आज हि तितक्याच अर्थपूर्ण आहेत. 


"रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री."


शेवटी काय हो भेटी झाल्या... नाही झाल्या तरी मैत्रीचे नाते घट्ट राहणे महत्वाचं आहे.   ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जपलं.


Anjali Pravin

amkar.anju@gmail.com

1 टिप्पणी:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...