प्रसंग १ :
अंदाजे पन्नाशी वयाचे एक गृहस्थ एका सिग्नल्स रस्त्याच्यामध्ये उभे राहून एका कारमधील ड्रायव्हरला गाडी हळू चालविण्याबद्दल बोलत होता. त्याच वेळी पहिल्यांदा मी त्यांचे काही शब्द ओझरते कानावर ऐकले. ते गृहस्थ सांगत होते की, "जसे तुम्ही या वेळी ऑफिसला जाता. तसे लहान मुलांची ही शाळेत जाण्याची वेळ आहे. त्यामुळे गाडी सावकाश चालवा." हे अगदी तळमळीने सांगत होता. थोड्यावेळाने ते जवळील बसस्टॉपकडे कामाला जाण्यासाठी बस पकडायला आले. ते गृहस्थ बस येण्याची वाट पाहत असताना बस स्टॉपमधील लोकांनाही कोणत्या तरी कार अपघाताबद्दल बोलत होते. ज्यात एक लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला आणि त्याची आई खूप रडत होती. ते गृहस्थ प्रत्येक गाडीतील ड्रायव्हरला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा थांबवून सांगत होते.
अजून थोड्यावेळाने ते गृहस्थ बस स्टॉप मधील रिकाम्या खुर्चीकडे बघून एकटेच हातवारे करून बोलू लागले. "ओ हवालदार, किती मोठा अपघात झाला हो. तो शाळेतला १० वर्षाचा मुलगा जागीच खल्लास झाला. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले. मी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो.
बसस्टॉपमधील सर्व व्यक्ती ते बघून हसत होते. "डोकं फिरलय म्हाताऱ्याच, वेडाच दिसतोय" अशी चर्चा आपापसात होऊ लागली.
प्रसंग २ :
बस मधून प्रवास करताना एक महिला एकटीच बोलत होती कि, "मेरे को वो बहुत मारते है, मुझे बांध के रखते है, आज भी उसने मारा मुझे, ये देखो सुजन, इसीलिए निकाल घर छोड दिया मैने..., तुम मेरे साथ रहो हम कही दूर चले जाते है, मेरा भाई है वहा"
यावेळी देखील बस मध्ये सर्व जण तिची चेष्टा करत होते. अगदी कॉलेज किंवा नोकरीला असणाऱ्या सुशिक्षित व्यक्ती पासून ते शिक्षित नसलेल्या व्यक्ती पर्यंत प्रत्येकजण तिला बघून हसत होते.
या दोन्ही प्रसंगात अगदी स्पष्टपणे कळून येत होते कि, या दोघांच्या आयुष्यात कोणतेतरी भयावह अपघात किंवा ट्रॉमा झाले आहेत. त्याचाच मानसिक आघात त्यांना बसला आहे. यामुळे कदाचित त्यांना कोणीतरी किंवा काहीतरी दिसण्याचे, ऐकण्याचे आणि बोलण्याचे भास होत असावेत.
इतका भयावह मानसिक त्रास बघून साहजिकच कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचे मन विचलित होईल. या दोन्ही प्रसंगाच्या वेळी सर्वप्रथम तर मी सुन्न झाले आणि त्यांच्या बोलण्यातील तो त्रास किंवा अपघाताबद्दल जसे कळत होते तसे डोळ्यात पाणी आले. कारण आपण यांच्यासाठी काही करू शकत नाही. याची हि खंत वाटत होती.
पण याच वेळी दोन्ही प्रसंगातील आजूबाजूच्या व्यक्ती एकमेकांकडे बघून चेष्ठा करताना किंवा हसताना माझ्याकडे देखील याच आशेने पाहत होते कि, मी या प्रसंगावर देखील हसावे. किती विलक्षण गोष्ट आहे ना, एरव्ही सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाजूला कोण बसले किंवा उभे असेल तर आपण लक्ष हि देत नाही. पण या स्वतःला शहाण्या समजणाऱ्या समाजात त्यांच्या दृष्टीने "वेडे" व्यक्ती आले कि लगेच डोळ्यांनी आणि हसून चर्चेला सुरुवात होते. मग या असंवेदनशील शहाण्या समाजातील लोकांचे शाहनपण म्हणजे नेमकं काय ?
शरीराचे अपंगत्व दिसून येते म्हणून आपल्याला एखाद्याच्या संवेदना सहज समजतात. लगेच त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करणे , बसमध्ये बसायला सीट देणे वैगरे वैगरे वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतो. पण मानसिक अपंगत्व असेल तर ते दिसून येत नाही. त्यांना कोणी बसायला जागा देणार नाही. त्यांना कोणी रस्ता ओलांडायला मदत करणार नाही. जरी कोणाचा मानसिक त्रास दिसून आला तर त्याची समाजाकडून नेहमी अशीच चेष्टा केली जाते.
आज हा लेख लिहिण्यामागील उद्देश हाच कि, एखाद्याचा होणारा मानसिक त्रास समजून घेता येत नसेल. तर निदान त्यावर हसू तरी नका.
Khup chan lekh
उत्तर द्याहटवा