रविवार, २९ मे, २०२२

खारीच्या वाटा



खारीच्या वाटा 

3 तास एका जागी खिळवून ठेवून ग्रामीण भागातल्या वास्तवाचं दर्शन देणारी आणि विचार करायला लावणारी हि कादंबरी एक चित्रपट डोळ्यासमोर उभा करते आणि शेवटाला मन हेलकवून टाकते. हे पुस्तक वाचताना आपल्याला आपल्या लहानपणीच्या अनेक गमती जमती, ते सुवर्ण दिवस पुन्हा जगायला लावतं. बऱ्याच दिवसानंतर असं ग्रामीण जीवनावर आणि समस्येवर भाष्य करणारं पुस्तक वाचून खूप मस्त वाटतंय आणि तितकंच मन खिन्न सुद्धा करून टाकतं.

अगदी हिरवंगार, गुण्या गोविंदाने आनंदित असणारं गाव, ज्याच्या गरजाही फार मोजक्याच. लेखक, दीन्या आणि लुकी (लेखकाची पाळलेली खारू ताई) यांच्यावर केंद्रित असलेली ही कथा. अख्ख्या ग्रामीण जीवनाची उजळणी करून देते. लेखकाची शाळा, मास्तर, नदिवरचे खेळ, लहानपणी केलेल्या टवाळक्या, चोऱ्या, त्यावेळेस असणारी एकाच मंदिरात चार वर्गांची शाळा आणि मास्तरांची या सगळ्यांना शिकवण्याची पद्धत हे सगळं पुन्हा नव्याने अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.

"लुकी" आयुष्यात आल्यावर लेखक आणि दिन्याने तिच्या मदतीने केलेल्या करामती भारी वाटतात. दिन्याचा स्वभाव, त्याने लढविलेल्या शकली या सगळ्या कुठे तरी आपल्याला आपल्या बालपणात नक्कीच घेऊन जातात आणि हसवतात ही.

गावाकडचे लग्न समारंभ, शेतीची कामं, रानातला रानमेवा गोळा करायच्या वेळा, त्याच्या पद्धती, या सगळ्याचं वर्णन मनात घर करतात. 

अशा समृध्द, सुखी गावात नदीवर धरण बांधण्याचा शासकीय फतवा निघतो आणि गजबजलेलं, हे समृध्द गाव कंगाल, रिकामं आणि भयाण होतं. या सगळ्या रिकामपणात नेमकी लोकांची, लेखकाची, दिन्याची आणि लुकीची मनःस्थिती काय होते? ते या परिस्थितीला कसे सामोरे जातात? या तिघांची ताटातूट होते का? या सगळ्याच्या वर्णनाने सुरुवातीला भरपूर हसवणारी ही कादंबरी शेवटाला मन सुन्नं करत रडवते ही... काळीज चर्र होतं आणि अलगद डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मग असंख्य प्रश्नांनी मन भरून येतं. शासनाच्या अशा फतव्यांनी अशा अनेक लुकी अनाथ झाल्या असतील, अशी अनेक गावं निसर्गाला मुकली असतील आणि मग प्रश्न पडतो की खरंच ही धरणं माणुसकीला अनुसरून आहेत का? माणूस, प्राणी आणि निसर्ग यांच्यातील असणा-या प्रेमळ नात्याला तोडणाऱ्या या सरकारी योजनांचा खरंच काही उपयोग आहे का? मला वाटतं खरी माणसाची निसर्गाशी ताटातूट इथूनच सुरू झाली, जी आज फार दूरवर पोहचली आहे आणि आता हे अंतर कमी होणं शक्य नाही.

या कादंबरीतील एकूणच वर्णन, विषयाची हाताळणी आणि त्यातून वाचकांना विचार करायला लावणं या सगळ्यातून या कादंबरीला राज्यपुरस्कार मिळणे योग्यच आहे. लेखकाचे खरंच कौतुक या लिखाणासाठी. ल. म. कडू लिखित खारीचा वाटा सर्वानीच वाचायला हवा कारण लेखकाने मांडलेला प्रश्न किंवा विषय हा प्रत्येकाशी किंबहुना माणसाशी संबंधित आहे. आपण गावाच्या प्रेमात असालंच मग नक्की त्या प्रेमापोटी हे पुस्तक वाचा. तुम्हाला ही तुमचा गाव तुमच्यात जिवंत झाल्यासारखा नक्कीच जाणवेल. 

दिपेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...