रावण_ आर्यभिमानी बालक ते राक्षस सम्राट
( शरद तांदळे लिखित रावण चे समीक्षण)
रावण एक नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येत?
दहा तोंड, पिळदार मिश्या, भयानक हसणं, क्रूरता, कपट, राक्षस....., आणि असंच काही, हे सर्व आपण रामानंद सागर च्या रामायण मालिकेतुन किंवा एकंदर समाजाने मान्य केलेल्या गोष्टीतून मत बनवत असतो. आपल्याला रावण जो कळतो तो सीतेच अपहरण केल्यानंतरच... त्या आधीचा रावण कसा होता, या बद्दल सहसा कोणालाही माहिती नसते.... आपल्याला जो माहीत आहे तो दहा तोंडी खलनायक ज्याने सीतेला पळवून नेलं आणि मग रामाने त्याचा 'वध' केला. पण रावण हा कैकपटीने वेगळा होता. प्रचलित समजुतींना बाजूला सारत पराक्रमी, बंडखोर आणि हळव्या मनाच्या रावणाच उत्कंटावर्धक चित्र शरद तांदळे यांनी त्यांच्या रावण--राजा राक्षसांचा या कादंबरीतुन आपल्या समोर मांडलं आहे.
आ ह साळुंखेच बळिवंश वाचतानाच कळलं होतं की आर्यांनी संस्कृत व्याकरणाचा सोयीस्करपणे वापर करून अर्थाचा अनर्थ केला होता. रक्षण करणारा राक्षस अशा मूळ अर्थाला बदलून वाईट/क्रूर असा अर्थ पसरवला गेला. त्यामुळे राक्षसांचा राजा रावणा बद्दल एक वेगळीच उत्सुकता होती. शरद तांदळे या लेखकाने समाजाला अनपेक्षित असा रावण मांडला आहे.
कादंबरीची सुरवात होते रावणाच्या बालपणापासून, त्याच मूळ नाव दशग्रीव. दशग्रीव हा संकरित पुत्र असतो. वडील विश्रवा हे आर्य आणि आई कैकासी ही असुर असते. हे दशग्रीव ला माहीत नसतं. त्याला लहानपणा पासून आर्य असल्याचा प्रचंड अभिमान असतो. एक दिवशी अचानक त्याला एक सत्य कळत. त्याची आई ही असुर राजा सुमाली ची मुलगी म्हणजे असुर राजकुमारी आहे आणि कुबेराने कपटाने तिला पळवून स्वतःच्या बापाची म्हणजेच विश्रावची दासी बनवलं होत. दशग्रीव हा विश्रवाने कैकसी वर केलेल्या बलात्कारातून जन्मलेला असतो. हे कटू सत्य दशग्रीव ला कळल्यावर तो अक्षरशः हादरून जातो. विश्रावाने त्याला आर्य म्हणून नाकारल्यावर दशग्रीवाच्या पायाखालची जमीन सरकते आणि सुरू होतो आर्यभिमानी दशग्रीव ते राक्षस साम्राज्याचा संस्थापक रावणाचा संघर्षमय रक्तरंजित प्रवास.
या प्रवासात रावणाची अनेक रूपे पाहायला मिळतील. रावणाच बालपण, त्याला आर्य म्हणून असलेला गर्व, अचानक कळलेलं एक बोचर सत्य, मग त्याचा लंकेपर्यंतच रक्तरंजित संघर्ष, सूर-असुर संस्कृतीच मनातला द्वंद्व, पराक्रमी राजा, हळवा पुत्र, प्रेमळ भाऊ, बंडखोर मुलगा, वेदज्ञानी, शिवभक्त ....रावणाची अशी अनेक रूपे जी आपल्याला माहीत नाहीत ती या कादंबरीतुन पाहायला मिळतील.
एक आर्यभिमानी बालक ते दैत्य, दानव, असुर, नाग ...अशांना एकत्र घेऊन बनलेल्या राक्षस साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट रावण हा प्रवास अनुभविण्यासाठी ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी. वाचताना प्रचलीत समजुतींना धक्का लागणार हे नक्की... सर्वांनी वाचा आणि ठरवा रावण हा खलनायक होता की नायक.....
प्रविण अंजली
नक्कीच
उत्तर द्याहटवाखूप छान... आणि वास्तव
उत्तर द्याहटवा