बुधवार, ९ जून, २०२१

कोकणी आणि कोकण रेल्वेच्या आठवणी (भाग -१ )

Kokan-Railway-apali-witerigiri
PC: Prathamesh Nalawade


ब्लॉगच्या नावातच एक मला खूप जवळचे असे आपलेपण वाटत. खर तर कोकण रेल्वेच्या आठवणींवर मी खूप आधीच लिहायला घेणार होते. काही कारणास्तव राहून गेले पण मी विसरून नाही गेले.  कोकणी व्यक्तीच्या  कोकण रेल्वेच्या आठवणी नसतील असे शक्यच होणार नाही. तर माझा कोकणचा सर्वाधिक प्रवास म्हणजे ठाणे ते रत्नागिरी (जेव्हा मी ठाण्याला राहायचे) आणि रत्नागिरी ते कुडाळ (कॉलेजसाठी दर आठवड्याचा प्रवास).

मी कोकणात जाण्याचा प्रवास एस.टी, खाजगी वाहन आणि कोकण रेल्वे या तिन्ही मधून एकसारखाच  प्रवास केला आहे. मला लहानपणी एस.टी किंवा खाजगी वाहनाने गावी जाणे सर्वाधिक जास्त आवडायचे. याची दोन कारणे होते. पाहिले कारण असे कि,  खिडकीच्या बाजूला बसायला मिळायचे आणि दुसरे कारण म्हणजे रेल्वेसारखे काळेकुट्ट डोंगरातील भोगदे नसायचे. लहानपणी मला डोंगरातील भोगदेबद्दल (सुरुंग)  मला घाबरवून ठेवले होते. कि, यात वाघ किंवा इतर प्राणी असतात. ते खिडकीतील मस्तीखोर मुलांना घाबरवतात.  काळेकुट्ट डोंगरातील भोगदे आणि आवाज यामुळे  लहानपणी मला कधीच रेल्वेचा प्रवास मनापासून आवडलाच नाही. पण हळूहळू हि भीती संपली. मग प्रवास करणार तर फ़क़्त कोकण रेल्वेनेच असे माझे आणि आमच्या कुटुंबाचे ब्रीदवाक्य बनले.

कोकण रेल्वेने प्रवास करतानाच्या काही ठळक आठवणी आणि वैशिट्ये ज्या आजही विसरू शकत नाही. जर तुम्ही देखील खालील पैकी कोणत्या आठवणी अनुभवल्या असतील तर नक्की मला कळवा.

ट्रेनमध्ये सिट / जागा मिळविण्याची धडपड :

पूर्वी कोकण रेल्वेतून प्रवास करताना आमच्या गावी आणि घरी रिजर्वेशन करून  जाण्याची पद्धत अजिबात नव्हती. ज्यांना सकाळी ५.३० वाजताच्या  दिवा- मडगाव पेसेंजरने गावी जायचे असेल ते रात्रीच दिवा – दातिवली – पनवेल स्टेशनवर ट्रेनमध्ये  किंवा स्टेशन फलाटावर रात्र जागवायचे. इतकी मेहनत फ़क़्त ट्रेनमध्ये बसायला जागा मिळावी म्हणून धडपड करायचे.  चारजनाच्या जागेत सहाजण बसून, दरवाजाच्या इथे - मधल्या पेसेजमध्ये किंवा शौचालयाच्या इथे बसूनदेखील प्रवास केला जातो. बरं, हे फ़क़्त माझ्या गावापुर्ते नाही तर अनेक कोकणवासी असे प्रवास करतात.

क्रॉसिंग आणि उशीर :

कोकण रेल्वे हि पूर्वी एक रेल्वे ट्रेक असलेला मार्ग होता. अलीकडेच दोन रेल्वे ट्रेकचे काम सुरु झाले आहे. एकच ट्रेक असल्याने एकावेळी एकच ट्रेन जाऊ शकत होती म्हणून दुसऱ्या ट्रेनला कोणत्यातरी स्टेशनला थांबवून ठेवले जाते. यालाच “ क्रॉसिंग / सिग्नल लागणे” असे म्हणतात. कोकण रेल्वेच्या कोणत्याही ट्रेनने जा क्रॉसिंग हे हमखास लागणारच. बहुतेक लोक दादर- रत्नागिरी, दिवा-मडगाव आणि मांडवी एक्स्प्रेस जास्त प्रवास करायचे याचे दोनच  कारण सर्वात कमी तिकीट आणि खूप सारे जनरल डबे  होते. या ट्रेनला साधारणतः मुंबई ते रत्नागिरी प्रवास हा आठ तासांचा व्हायला पाहिजे पण क्रॉसिंग मुळे  हाप्रवास  बारा ते पंधरा तास इतका हि होतोच. पण कितीही क्रॉसिंग लागले कितीही उशीर झाला तरीही लोक या ट्रेनने प्रवास करणे कधीच सोडत नाही. आम्ही तर हा उशीर पण खूप एन्जोय करायचो.

ट्रेनमधील करमणूक :

कोकणात गावी जाताना बहुतेकजण दोन -तीन  कुटुंब एकत्रितपणे जाताना अधिकतर दिसून येतील. आम्ही देखील आमच्या गावातील इतर काका – मामा यांचे कुटुंब आणि आमचे कुटुंब एकत्रितपणे गावी जायचे.  त्यामुळे एकत्रित वेगवेगळे खाऊचे प्रकार खायला मिळायचे. पत्त्यांनी खेळणे, गाण्याच्या भेंड्या खेळणे, भजन बोलणे,  गावकी – भावकीच्या गप्पापासून ते  गल्ली – दिल्ली पर्यंतच्या राजकीय गजाली मारणे सुरु असायचे. शेजारील पेसेजरशी गप्पा मारणे.  लहानपणी मोबाईलचा वापर खूप कमी होता म्हणून गप्पा आणि कोकणची हिरवळ खिडकीतून बघत प्रवास खूप आल्हाददायक व्हायचा. हाच  प्रवास  आजकाल लोक गप कानात हेडफोन लावून मोबाईलमध्ये डोक घालून एकलकोंड्यासारखा वाया  घालवतात असे दिसते.  

कोकण रेल्वेतले कौतुकास्पद फेरीवाले :

कोकण रेल्वेतल्या फेरीवाल्यांचे वैशिट्य असे कि, गणपती किंवा मे महिन्याच्या सीजनमध्ये तुफान गर्दीमुळे प्लेटफॉर्मवरचे पेसेजर गाडीच्या आत येऊ शकत नाही आणि जे ट्रेनमध्ये  असतात ते  बाथरूमपर्यंत पोहचू शकत नाही पण फेरीवाले मात्र सर्व सिजनमध्ये डोक्यावर त्यांच्या वजन इतकेच मोठे टोपले (विकण्याचे साहित्य ) घेऊन चालत्या ट्रेन ने सर्व डब्यातून सहजपणे फिरत असतात. मला नेहमीच त्यांचे कौतुक, नवल वाटते. कोकण रेल्वेमुळे स्टेशन शेजारील अश्या अनेक फेरीवाले विक्रेत्यासाठी रोजगार निर्मिती तयार झाली. अश्या काही फेरीविक्रेत्यांची एक वेगळी ओळख देखील दिसून आली. ज्यांनी  आपल्या आकर्षक बोलण्यातून किंवा खाद्यपदार्थच्या चवीने लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. उदा. आलेपाकवाले आजोबा आणि कुरकुरे सामोसेवाले : मला स्टेशन आठवत नाही पण साधारणत पेण  ते दिवाणखवटी स्टेशनपर्यंत असायचे. जे आपल्याजळील पदार्थ  विकताना यमक जोडून गाणे किंवा कवितादेखील बोलायचे. पनवेल ते रोहा पर्यतच्या भाजीवाले ज्यांच्या बोलण्यात एक वेगळाच लयबद्धपणा असायचा मला तो खूप आवडायचा. आज आता या गोष्टी लिहिताना देखील कानात ते ट्रेनमधील आवाज ऐकू येतात.

 

भाग एक फ़क़्त माझ्या लहानपणापासून कोकण रेल्वेच्या प्रवासाची सुरुवात आहे. कोकण रेल्वेच्या आठवणीच इतक्या आहेत कि, एकाच भागात लिहिणे अशक्य आहेत लवकरच दुसरा भाग प्रसारित करण्यात येईल. 

क्रमशः

 लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


 

1 टिप्पणी:

  1. छान... जुन्या आठवणी जागृत झाल्या. मला पण रेल्वेचा प्रवास जास्त आवडतो. बस, कार, बाइक ने कोकण फीरण्याची पण एक वेगळीच मजा असते. परत जेटीवरुन लाँच चा प्रवास, खाडीतील नावेचा प्रवास, छोट्या अंतरावरील ऑटो व जीपचा प्रवास ही वेगळीच मजा देतात. कोकण आहेच सुंदर...

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...