रविवार, १३ जून, २०२१

कोकणी आणि कोकण रेल्वेच्या आठवणी (भाग – २ )

 

"kokan-railway-apali-writergiri"

मला कोकणरेल्वे जिव्हाळ्याची आहे कारण,

वडिलांनी नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर आम्ही गावाला कायमचे स्थलांतरीत झालो. पण गावी आल्यावर मला वाटले कि, माझे समाजकार्यात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न तसेच अर्धवट राहणार.  रत्नागिरीमध्ये येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉलेजची माहिती मिळाली. लगेचच प्रवेश परीक्षादेऊन एडमिशनहि झाले. एम.एस.डब्ल्यूचे दोन वर्ष पूर्ण रत्नागिरी ते कुडाळ / कणकवली असा कोकण रेल्वेचा  प्रवास सुरु झाला. या प्रवासामुळे कोकण रेल्वे  मुंबईच्या लोकल पेक्षा ही अधिक जवळची वाटू लागली. सकाळी ५.३० वाजताची कोकणकन्या आणि संध्याकाळी जी पहिला मिळेल ती ट्रेन पकडायची. घरी यायला रात्रीचे दहा वाजायचे. अनेकदा ट्रेनमध्ये बसायला जागा नसायची तेव्हा आमचा बहुतेक प्रवास हा उभ्याने किंवा दरवाजाच्या इथे बसूनच झाला आहे. पण कधी या प्रवासाचा कंटाळा किंवा त्रास वाटला नाही. खरंतर या कोकण रेल्वेमुळेच  मला माझे खूप जवळचे  मित्र-मैत्रिणी मिळाले.  या प्रवासात ट्रेन मध्ये आणि रेल्वे स्टेशनवर खूप धम्माल केली . आम्ही एकत्र खूप चहा -बिस्कीट खाल्ले,  पत्त्यांनी खेळलो आणि कॉलेजचा अभ्यास – रिसर्च – ग्रुप डिस्कशन केले. कोकणी भाषेची गोडी देखील या “आडस” मित्र- मैत्रिणीमुळे लागली. प्रत्येक प्रवासाच्या वेळी मला रत्नागिरीतील नवनवीन गोष्टी शिकवायचे. गणेश उत्सव आणि शिमग्याच्या वेळी ट्रेनला प्रचंड गर्दी असायची तरीही त्या गर्दीचा आम्हाला त्रास वाटला नाही.  कोकण रेल्वेचा प्रवास आणि  अभ्यासासोबत  कॉलेजचे प्रत्येक सेमिस्टर संपल्यावर आम्ही एक ट्रीप हि ठरलेलीच असायची. कधी गोवा - वेंगुर्ला – मालवण – रायगड- गुहाघर  असे करत बहुतेक कोकण फिरताना या कोकण रेल्वेतूनच प्रवास केला. 

कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोकण प्रवास सोयीस्कर झाला आहे. त्याच बरोबर कोकण रेल्वेमुळे कोकण टुरिझमला, रोजगार निर्मिती आणि शिक्षण -नोकरी निमित्त प्रवास करण्यासाठी एक खूप मोठा हातभार लागला आहे. मला भटकंती - प्रवास करण्याची आवड हि या कोकण रेल्वेमुळे लागली. कॉलेज पूर्ण झाल्यावर माझा नोकरी निमित्त रत्नागिरी – चिपळूण – खेड  प्रवास सुरु झाला.  समाजकार्य क्षेत्रात काम करायला सुरुवात करताना माझे सुरुवातीचे बहुतेक काम हे वेगवेगळ्या तालुक्यातील खेड्यापाड्यातच होते. बहुतेक प्रवास सकाळी पाचला सुरु  ते रात्री बाराला संपायचा.  एकटीने प्रवास करत असली तरीही मला स्टेशन किंवा ट्रेनमध्ये “मुलगी म्हणून असुरक्षित किंवा भीती वाटली नाही.” थोडीफार चोरांची भीती वाटायची पण ट्रेनमध्ये ही पोलिस गस्त सुरू केल्याने ती चिंता कमी झाली.    

शिक्षण आणि नोकरी निमित्त कोकण फिरताना कोकणातील रायगड ते वेंगुर्ला पर्यंत कोकणाची बदलत जाणारी भाषा, परंपरा आणि संस्कृती शिकायला मिळाली. नवीन माणसं आणि नाती जोडत गेली.  याच प्रवासातून अनुभवाची शिदोरी साठवून हळूहळू रत्नागिरी ते भुसावळ, रत्नागिरी ते राजस्थान , रत्नागिरी ते नागपूर , रत्नागिरी ते दिल्ली असा प्रवास सुरु झाला.  आज मी अभिमानाने सांगू शकते कि, मी माझे स्वप्न पूर्ण केले. 

एकूणच जर कोकण रेल्वेची सुविधा नसती तर कदाचित मला माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले नसते. आज यशस्वीपणे ज्या पदावर काम करत आहे इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास हि एक  स्वप्नच राहिले असते. इतका सुखद प्रवास घडविल्याबद्दल या कोकण रेल्वेला मनापासून धन्यवाद!!!

 

लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


२ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...