शनिवार, १८ जुलै, २०२०

"कोकणात लग्न असते तेव्हा...." (भाग २)

"कोकणात लग्न असते तेव्हा...." (भाग २)

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin-
PC : Minal & Akshay Wedding

लग्न म्हटले कि, वेगवेगळ्या चालीरिती, रूढी-परंपरा आणि पद्धती आल्या.  कोकणातील लग्नात हि अश्या वेगवेगळ्या चालीरीती पाहायला मिळतात.  मुलगा- मुलगी पाहण्याचा आणि लग्न ठरविण्याच्या कार्यक्रमाला मुंबईत ‘कांदेपोहे’ म्हणतात तर कोकणात ‘सुपारी फोडणे’ किंवा ‘मुलगी पंचात टाकणे’ म्हणतात.  मला आमच्या गावाचे एक कौतुकास्पद वाटते कि, लग्न ठरवताना इकडे हुंडा पद्धत मी कधीच पाहिली नाही. अगदी लग्नाचा खर्च देखील अर्धा अर्धा केला जातो. इकडे एक लग्न ठरवताना एक वाक्य  वारंवार कानावर येईल. ते म्हणजे,  ‘आम्हाला फक्त मुलगी, नारळ आणि सुपारी द्या.  बाकी लग्न खर्चाचे आम्ही बघून घेऊ.’ खरंच, इथे मी अशी खूप  लग्ने पाहिली कि, ज्यात मुलगी फ़क़्त लग्नमंडपात पाटावर उभी राहिली. सर्व खर्च मुलाकडचे सांभाळून घेतात.  जर मुलाच्या किंवा मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती अर्धा  खर्च हि करू शकत नसतील तर गावातील इतर नातेवाईक खर्च सांभाळतात.  कुणीतरी म्हटलेच आहे कि, कोकणी माणसं म्हणजे मधाळ मधाळ आणि मधाळ.

मागील ब्लॉग मध्ये लग्नाची तयारी करताना गाव कसे सहभागी होते ते पाहिले होते. आता बघू लग्न नेमके कश्या पद्धतीने  होते ते...

सुरुवात करू साखरपुड्यापासून...

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin-
PC : Prathamesh & Neha Wedding
लग्न ठरले कि, मुलगा आणि मुलीला त्यांच्या गावातील जवळचे नातेवाईक घरी ‘केळवणासाठी’ (स्पेशल जेवण) आमंत्रण देतात. केळवणाला जाण्याचा खरा उत्साह सोबतची  करवली किंवा टोकणाला असतो. याच दरम्यान लग्नपत्रिका वाटल्या जातात आणि  जत्था (बस्ता) बांधला जातो.  म्हणजेच लग्नाची कपड्यांची खरेदी करणे.  कोकणात या खरेदीसाठी पण गावातले एकत्र जातात. जत्था बांधतानाच्या हि अनेक गमती जमती असायच्या. लग्न ठरलेले मुलगा आणि मुलगी  किती रुपयांचे कपडे आणि चप्पल घेत आहेत. या किमतीमध्ये  देखील समानता दिसली पाहिजे. तसे जर नाही झाले तर थोडी चढा- ओढ झालीच लगेच सुरु.  कोकणात लग्नाची नवरी साठी साखरपुड्याला हिरवी आणि हळद- लग्नाला पिवळी साडी ठरलेली असते. पण तरीही त्या साडीच्या रंगावरून त्या दुकानदाराला गोंधळात पाडत असतात.  जत्थाची खरेदी झाली कि, सर्वाना जेवण किंवा नाश्ता असतो.  कधी कधी तर बहुतेकजण त्यासाठीच जत्थाला आलेले असतात. 

त्यानंतर साखरपुडा होण्याआधी गावातील ठरलेला मानाचा ‘कासार’ (बांगडीवाला) ठरलेल्या दिवशी लग्नघरात येणार.  वाडीतील सर्व महिला आणि लहान मुली त्या लग्न घरातील अंगणात जमणार आणि त्या  कासारीन कडून बांगड्या भरून घेणार. मी तर लहान असताना मस्त रंगबिरंगी बांगड्या घायचे.  कोकणात या कासारला त्याचा मानपान देण्याची एक पद्धत आहे.  कोकणात मेहंदीचा विशेष असा कार्यक्रम नसतो पण  लहानपणी साखरपुडा, लग्न किंवा कोणतेही कार्यक्रम असले कि, आम्ही निलगिरी झाडाची पाने (निगडी / मेहंदीची पाने) तोडून आणायचो. मग कोणीतरी ताई ती पाने ठेचून- वाटून मेहंदी बनवायची. एक पेल्यात मेहंदी घेऊन. माचिस किंवा छोट्या काठीने हातावर मेहंदी काढायचो. हल्ली मेहंदीचे  कोन असतात. पण पूर्वी त्या छोट्याश्या काठीने हातावर गोल काढण्यात पण एक वेगळीच मज्जा असायची.  कोणाच्या हातावरील चंद्र किंवा सूर्य गोल आहे याची शर्यत असायची.  

साखरपुडा आणि लग्न  कोणाकडे होणार याबाबत कोकणात तालुक्यानुसार पद्धत बदलत जातात. जसे कि, आमच्या तालुक्यात साखरपुड्याला नवरीच्या घरी आणि लग्न नवऱ्याच्या गावी होते. पण बाकीच्या तालुक्यात याच्या उलट पद्धत  असते. जर आमच्या इकडे लग्न नवरीच्या इथे झाले तर, त्याला ‘नवरा उचली गेला.’ असे म्हणतात.  शक्यतो कोकणात साखरपुडा हा संध्याकाळी किंवा रात्री असतो.   आई तर म्हणायची कि, पूर्वी लग्न पण रात्रीच होत होती.  लग्न किंवा साखरपुडाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी जाताना  नवीन गाव बघायला मिळायचे.  मी तरी नवीन गाव बघायच्या उत्सुकतेने जायची. 

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin-
PC : Kalpesh Mane

आमच्या गावी  साखरपुडा होताना भट किंवा भडजी नसतो.  वाडीतील मानकरी आणि गावकरी यांच्या सहमतीने साखरपुडा केला जातो. साखरपुड्याला लागणारे साहित्य विड्याची पाने, सुपारी, तांदूळ, नारळ, अंगणातील फुले इत्यादी साहित्य पण शक्यतो गावतीलच असते.  गावकरी – मानकरी यांचा विड्यांचा मान देण्याचा कार्यक्रम झाला कि, नवरा –नवरी त्या विड्याची पूजा करून अंगठी घालून साखरपुडा उरकला जायचा. साखरपुड्याला नवरा- नवरीचे कपड्यात हि साधेपणा बघायला मिळेल. मुलगा शर्ट-पेन्ट मध्ये तर मुलगी  हिरव्या साडीत आणि  केसात आबोली किंवा मोगऱ्याचा गजरा माळेलेला आणि हातात हिरव्या बांगड्या.  

साखरपुड्या नंतर हळदीची तयारी सुरु व्हायची.   खरं तर, हळद म्हटली तर मला असे वाटते कि,  त्या हळदीचा  पिवळा रंग चढण्यापेक्षा

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin-
आपुलकी आणि प्रेमाचा रंग नक्कीच चढलेला दिसतो. हळदीच्या रात्री  खूप नाच-गाणी धम्माल-मस्ती सुरु असते. आणि तेव्हाच मायेच्या स्पर्शाने हळद लावताना अलगद डोळ्यात पाणी आलेले हि दिसते.  हा ओलावा पण मला गावीच जास्त  दिसला.  हळदीच्या दिवशी अजून एक नवीन  प्रथा म्हणजे ‘नवरा किंवा नवरीला’ खांद्यावर घेऊन पण नाचविलेच  पाहिजे.

“हळदी मळदीची वाटी... हळदी मळदीची वाटी...

‘सोनगिरी’ ताश्याच्या काठीमध्ये हळदीची वाटी..

हळद चढविते हळद चढविते....’रुपाली’ तुझे ‘काकी’”

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin-
गावी लग्न म्हटले कि, लग्न ठरविण्यापासून ते सत्यनारायण किंवा हळद उतरणी होई पर्यंत प्रत्येक वेळी वाडीतल्या लोकांना जेवण असतेच पण हळद म्हटली स्पेशल चिकन किंवा मटण वड्यांचे जेवण असते. इथे लग्न समारंभाला जेवण बनविण्याचे पण प्रत्येक  गावातील वेगळे असे ‘मेनेजमेंट’ (Management) असते. जेवण तयार करण्यासाठी  गावातील महिला ठराविक वेळेला हजर राहणार. त्यातील तीन जनी भाजी कापणार, तीन जणी फोडणी घालणार, दोन जणी वडे / पुऱ्या करणार, एक जन भात करेल, चार जणी भांडी घासतील. असे सर्व जण आपआपले काम न सांगता वाटून घेतात. जे तरुण मुल- मुली असतील ते पंगतीला जेवण वाढायला. दोन जण पत्रावळ्या  मांडणे आणि अंगण स्वच्छ करण्याचे काम करणार. त्यानंतर एक जण पत्रावळी भोवती रांगोळी काढणार. जो तब्येतीने जाड –जुड असेल तो भात वाढणार,  जी हडकुळी लहान मुलं असतील ते लोणचं, पापड, मीठ, मिरची वाढणार, जो जास्त गोड खाणारा असेल तो  लाडू किंवा तांदळाची खीर घेऊन दिसणार. जेवण वाढतानाचा आणि खाताना हि वेगवेगळे सूर लागलेले असतात.  कोणी तरी एक काका कोणाला काही कमी जास्त हवे असेल ते पाहत असणार.  लहान मुलांनी जेवताना जेवण वाया घालवू नये म्हणून ‘जो ताटातील जेवण संपवणार नाही त्याच्या ताट गळ्यात बांधू’ असे कोणीतरी पंगतीतून बोलून जाणार.  लहानपणी हे वाक्य कोणी बोलले कि मला धडकीच भरायची.  एकतर चिऊ काऊ इतकं माझे जेवण, पण गावातले मुद्दाम जास्त जेवण वाढायचे.  मग ते ताटातील  जेवण संपवणे म्हणजे एक कसरत असायची. याला पर्याय म्हणून मी नेहमी आईच्या बाजूला जेवायला बसायची. आई उरलेले जेवण संपवायला मदत करायची.   

हळदीनंतर यायचा लग्नाचा दिवस. लग्नाच्या दिवशीची सकाळ नवरा आणि नवरी दोन्ही कडील वातावरण  वेगवेगळे असते.  दोन्ही घरातील कोणीच रात्रीचे झोपत नाही. सकाळ पर्यंत काही ना काही तयारी सुरूच असते.  जर आमच्या गावातील नवरी मुलगी असेल तर सकाळी उठून सर्वजण गावातील मंदिरात किंवा रस्त्यावर वऱ्हाडीसाठी जी गाडी केली असेल तिथे जमायचो.  इकडे वऱ्हाडीसाठी ट्रक – टेम्पो किंवा एस.टी वापरली जाते. वऱ्हाडाच्या गाडीतून जातानाही  लग्नाची गाणी बोलत जायचे.  जर नवरा मुलगा आमच्या गावातील असेल तर सकाळी ‘रेघ धरणे’ कार्यक्रम आणि वऱ्हाडीसाठी नाश्ताची तयारी सुरु असायची. ‘रेघ धरणे’  (In short hair stylist) म्हणजे गावातील नेमलेला मानाचा नाव्ही सकाळी येऊन नवऱ्या मुलाचे केस आणि दाढी कापणार. यासाठी पण गावकरी अंगणात एकत्र जमायचे. बाकीचे गावकरी आणि लहान मुले देखील तेव्हाच आपले केस कापून घ्यायचे. एखादी आई किंवा बाबा आपल्या मुलाला जबरदस्ती तिथे बसवून. ‘याचे केस पूर्ण बारीक करून टाका.’ हि सूचना देत असायचे. नवरी मुलगी आणि वऱ्हाडीची गाडी आल्याची चाहूल लागली. लगेच तरुण मुलांना कामाचा उत्साह भरून यायचा. आलेले पाहुण्यांमध्ये करवली किती? कोण? कशी? कोणाला आवडली? लगेचच चौकशी सुरु व्हायची.  तर मुली कडील वऱ्हाडी नाश्त्याला पोह्यात मीठ कमी कि जास्त ? या चर्चा मध्ये रंगलेले असायचे.  

थोड्यावेळात कोणी तरी नवऱ्याकडील उष्टी हळद वाटीतून घेऊन येणार. पुन्हा नवरीला प्रथा म्हणून नवऱ्या कडील उष्टी हळद लावायचे.  त्यानंतर लगेचच लग्नाच्या तयारीला सुरुवात व्हायची.  दोन्ही कडे कोणते ना कोणते विधी सुरु असायचे. काही वऱ्हाडी गावभर फेर फटका मारायचे. ‘नवीन गाव कसे आहे? इथे लागवड कसली केली आहे?’ वैगरे चर्चा व्हायच्या. दोन्ही बाजूकडील लहान मुले कुठे तरी एका अंगणात आपलाच खेळ सुरु करायचे.  घाना भरणे, देवक ठेवणे, उद्यीपन करणे, कन्यादान, यजमान मान देणे रिती सुरु होतात. ‘घाना

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin-
भरणे’ म्हणजे पाच मुसळ घेऊन त्याचे पूजन केले जाते.  यासाठी पाच महिला घाना भरताना हि गाणे म्हटले जाते. तेव्हा पुन्हा ‘तू म्हण ग.. तू म्हण ग.. माईक नीट धर ग... मोठ्याने बोल...’ सुरु व्हायचे.

घाण्याचे गाणे :

घाना जो भरीला घाना जो भरीला |

विडा जो ठेविला...

आदी देव नमिले, आदि देव नमिले |

‘देवक ठेवणे’ म्हणजे गावातील देवाच्या नावाचे नारळ आणि पूजन केले जाते आणि गावातील कुलदैवत म्हणून जे झाड असेल त्याची पूजा केली जाते. बाकी उरलेले सर्व विधी हे भडजीकडून केले जाते.  या सर्व विधी सुरु असताना करवली थोड्या नट्टा-पट्टा करण्यात व्यस्त असतात. लग्नात नवरी नंतर करवलीलाच पाहायला जातात. असेच थोडेफार दिसते. सर्व विधी झाले कि, सुरुवात  होते मंगलाष्टकांना... मंगलाष्टकांना सुरवात होते वेळी.  हातात जास्त तांदूळ घेण्याची आणि पुढे पुढे उभे राहण्याची  घाई असायची. त्यानंतर कोणाच्या डोक्यात जास्त तांदूळ मारायचे हे नजरेने खुणवून ठरवले जायचे. पहिली मंगलाष्टका हि, स्वस्ति श्री गणनायकं गज मुखं, मोरेश्वरं सिद्धीदं |  पासून सुरु व्हायची. त्यानंतर बाकीचे एका मागोमाग एक असे खूप सारे मंगलाष्टके बोलायचे. जणू काही तिथे पण मंगलाष्टकांची स्पर्धा सुरु आहे.  सर्वांचे कान आतुरलेले असायचे ती  शेवटची मंगलाष्टका ऐकण्यासाठी....

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।

गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।

दृष्टादृष्ट वधुवरा न करितांदोघे करावी उभी ।

वाजंत्रे बहु गलबला न करणेलक्ष्मीपते मंगलम ।

शुभ मंगल सावधान ||

 

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin-
शुभ मंगल सावधान ऐकल्यावर लगेचच हातातील सर्व अक्षता पूर्ण जोर आणि उत्साहाने उधळून द्यायच्या. सोबतच ढोल ताशा वाजायला सुरवात व्हायची.   त्यानंतर रंगीत कागदातील साखरपुडी किंवा पेढा घेण्यासाठी धाव घ्यायची.  मला लहानपणी त्या रंगीत कागदात गुंडाळलेले चार साखरेचे दाणे पण खूप गोड आणि चविष्ट वाटायचे.  त्यानंतर नवरा नवरी एकमेकांना हार घालणे आणि फुलांचा गुलदस्ता देणे.  तसेच उरलेले लग्नाचे उरलेले विधी सुरु व्हायचे. नवरीचा भाऊ नवऱ्या मुलाचे कान किती जोराने ओढतोय. हे बघायला आम्ही थांबलेले असायचो.  आमच्या इथे लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाची चप्पल करवली लपवत नाही. कारण ते लग्न मुलाच्या गावी होते म्हणून.... जेव्हा हळद काढणी (उतरवणे) साठी मुलीच्या गावी यायचे तेव्हा चप्पल लपवली जायची.  बाकी लग्नाची रुकवत ज्या टेबलवर मांडलेले असेल ते  बघायला जायचो. कोकणात रुकवातिला जास्त करून मिठाई आणि फराळाचे पदार्थ दिसतील.  आणि हे पदार्थ लहान मुलांमध्ये वाटून संपवला जायचा.  वऱ्हाडी आणि गावकरी जेवणासाठीचे अंगण कोणते आहे तिकडे जाऊन आपला जेवणाच्या पंगतीला केव्हा नंबर लागेल ते वाट पाहायचे.  सर्व वऱ्हाडीचे जेवून झाले कि, मुली कडील पुन्हा वऱ्हाडीच्या  गाडीत बसून परतीच्या प्रवासाला लागायचे. करवली आणि पाठराखीन म्हणून दोन जनी नवरी मुली सोबत तिकडे थांबायचे. लग्न विधी नंतर गावी ‘रिसेप्शन’ म्हणजे अंगणात दोन प्लास्टीकच्या खुर्च्या मांडणार त्यावर नवरा नवरी बसणार. जर कोणी आहेर देणार असतील ते तेव्हा आहेर देणार.   बाकीचे  लोक संध्याकाळच्या वरातीच्या तयारीला लागलेले असायचे.  कंदीलमध्ये (दिवा) रॉकेल घालणे, लाठीकाठी साठी काठ्या शोधणे, लेझीम असतील तर ते शोधणे वैगरे तयारी सुरु होते.  कोकणातील वरात म्हणजे पूर्ण वाडीला वाजत गाजत एक फेरफटका.... आज हि  गावातील  वरातीला डीजे पेक्षा  ढोल-ताशेच वाजताना दिसतील.  ज्यांना लाठी-काठी येते ते आपली कला सादर करतात. माझ्या बाबांना लाठी-काठी खेळता येते हे मला एका लग्नातील वरातीमुळेच कळले होते.  काही  गावात लेझीम असतील तिथे लेझीम देखील खेळले जातात.   रात्रीचे जेवण झाले कि, लग्न घरातील अंगणात नमनाची तयारी सुरु.  (नमना विषयीची माहिती आणि गमती जमती साठी पुढील लिंक वर माहिती मिळेल.)

Kokan-diary-Lagn-apali-writergiri-कोकण-डायरी-लग्न-anjali-pravin-

 लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण, हळद उतरणी (पाचपरतवणे किंवा निम काढणे), लग्नानंतर घरातील प्रथा  (खेळले जाणारे खेळ) पूर्ण केल्या जातात.  यातील मला तांदुळात नाव लिहिण्याची प्रथा खूप आवडायची कारण ‘नवऱ्याला  ना त्या ताटातील तांदुळात नाव लिहायला जमायचे... ना नवरीला ते ओळखायला जमायचे.’ त्यांची हळद उतरवणी करताना वाडीतील महिलांना त्या दोघांना आंघोळ घालण्यासाठी एक वेगळाच जोर येतो.   सर्व प्रथा झाल्या कि, पाहुणे आपल्या घरी निघून जायचे आणि   अंगणातील सजावट हि काढून द्यायचे. आठवड्याभरतील गजबजाटा नंतर  घर आणि अंगण सुने होऊन जायचे.  साधारणत: माझ्या या आठवणी आहेत कोकणातील लग्नाच्या.....लग्न – प्रथा – रूढी थोडे किचकट वाटतातच. पण त्यासोबतच्या गमती-जमती आणि दिसणारा नात्यातील मायेचा ओलावा तितकाच प्रिय वाटतो. हे सर्व अनुभवण्यासाठी कोकणातील लग्न एकदा तरी  पाहिलेच पाहिजे.    

 

 लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com



६ टिप्पण्या:

  1. पूर्ण लग्नात उपस्थित असल्या सारख वाटत होतं😊👌

    उत्तर द्याहटवा
  2. कोकणातील लग्नाच्या पध्दती आणि गमती जमती छान सांगितल्या

    उत्तर द्याहटवा
  3. तू खुपच छान लिहितेस म्हणचे तसं आधी माहीत होत पण कधी वाचलं नव्हतं

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...