‘मला मासिक पाळी आलीय’ बोलताना....
आज हि आमच्याकडे मासिक
पाळी आली असे सांगायचे असेल तर, ‘मला कावळा
शिवलाय , आज माझी सुट्टी आहे, आज पगार
झाला, आज बाहेरची आहे, विटाळ आहे.’ असेच बोलतात. काळाबरोबर नवीन वाक्य पण कानावर पडू लागली, ‘आज
ते दिवस आलेत, आज बर्थडे आहे, आज कॉल आला,
आज फेस्टिवल आहे’.
आधुनिक महासत्तेच्या आणि
मंगळावर पोहचण्याच्या गोष्टी करणाऱ्या भारतात अजून हि साधं ‘आज मला मासिक पाळी
आलीय किंवा पिरिएडस आलेत.’ हे चार-चौघात न
लाजता बोलू शकेल असे बोलण्याचे स्वातंत्र्य अजूनही दिसून येत नाही. जेव्हा एखादी
स्त्री ‘मला पिरियड्स आलेत.’ असे चार चौघात बोलते. तर ती आजूबाजूची माणसं तिच्याकडे अश्या नजरेने बघतात जसे कि, तिने शिवी दिलीय किंवा चुकीच काही तरी बोलली. सोबतच
हि मुलगी खूप फोरवर्ड आहे किंवा असंस्कारी
आहे असे हे मत आपोआपच तयार होते. शाळेमध्ये आणि ऑफिसमध्ये सॅनिटरी नेपकीन जर कोणाकडे मागितला तर आज
हि तो लपून-छपूनच दिला जातो. सोशल मिडियामुळे मागील एक-दोन वर्षा पासून निदान एका दिवसासाठी तरी मुली 28th मे ला “Menstrual Hygiene Day” आणि 5th फेब्रुवारीला “Happy Periods Day” चे काही
स्टेट्स ठेवू लागलेत. पण ते हि प्रमाण खूपच कमी आणि व्हर्च्युअल आहे. स्वतः स्टेटस ठेवूनही त्या मुली चार चौघात ‘आज
मला पिरियड्स आलेत’ हे न लाजता आणि न घाबरता बोलू शकत नाही हि उदासीनता आहे.
हल्लीच माझ्या एका M.Sc in Chemistry शिकलेल्या मैत्रिणी सोबत शॉपिंगला गेले असताना. तिला सॅनिटरी नेपकीन घ्यायचे
होते म्हणून तिने खूप फिरवले. शेवटी ७ किलोमीटर दूर एका ठिकाणी गेलो. तिकडे एका मेडिकल मध्ये तिने सॅनिटरी नेपकीन घेतले. मी विचारले, ‘अग ते आपल्या इकडे पण कोणत्याही मेडिकल
स्टोअर मध्ये पण मिळाले असते. इतक्या दूर यायची काय गरज होती?’ लगेचच तीच उत्तर
आले कि, ‘या मेडिकल स्टोअरला मुलगी असते. पण आपल्या इकडे पुरुष असतात. त्यांच्या
समोर सॅनिटरी नेपकीन मागणार कसे?’ याच मुलीचा दोन दिवसानंतर whatsapp ला “Happy Periods Day” म्हणून #NoMoreLimits #ItsTimeForAction असे स्टेटस होते. मी तिला यावर काहीच न बोलता फ़क़्त मिश्कील अशी स्माईल
दिली.
मी तिला काही समजावत बसले
नाही. कारण तिने स्वतः विज्ञानात
पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. तिला नक्कीच मासिक पाळी विषयी काही गैरसमज नव्हता. पण
तरीही तिची स्थिती आज अशी होती. यात फ़क़्त
चूक तिची आहे मी म्हणूच शकत नाही. कारण आज ती जशी आहे तशीच एकेकाळी मी देखील होते.
मला मासिक पाळी म्हणजे
काय? हे वयाच्या सतराव्या वर्षी स्वतः ला पाळी आली तेव्हा कळले. तो पर्यंत माझ्या
आजूबाजूच्या सर्व स्त्रिया आई, बहिण आणि मैत्रिणी गपचूप आणि कोड्यात कोणत्या
गोष्टी बद्दल बोलायचे हेच कळत नव्हते. टीव्ही वर येणारी सॅनिटरी नेपकीन जाहिरात लागली कि, लगेच टीव्हीचे
चॅनेल बदलले जायचे. त्यानंतर मी हि तेच
करू लागले. घरी असल्यावर पाळीसाठी वापरले
जाणारे कपडे कोणाला दिसू नये अश्या ठिकाणी सुकायला घालायला शिकले. शाळेत एका
वर्गात सर्व मुलींना एकत्र करून खिडकी- दरवाजे
बंद करून मगच सॅनिटरी नेपकीनचे वाटप केले जायचे. ते हि मुली लगेच दप्तरात लपवून ठेवून मगच वर्गाबाहेर पडणार. घर आणि शाळे पासूनच ‘सॅनिटरी नेपकीन आणि कपडे कसे लपवून ठेवायचे’ याच उत्तम प्रशिक्षण न चुकता
दिल जात. मला हि आपल्या समाजाकडून आणि कुटुंबातून हीच शिकवण मिळाली.
हल्ली शाळेत लैंगिक शिक्षण
विषयात मासिक पाळी बद्दल ज्ञान दिले जाते. या विषयाची शिक्षक हि स्त्री असते व हे
ज्ञान फ़क़्त मुलींना वर्गाचे दरवाजे बंद करूनच मिळत. या विषयाबाबत मुलीसोबत चर्चा केली तेव्हा कळले कि, त्यांना
फ़क़्त जुन्या कपड्या ऐवजी सॅनिटरी नेपकीन वापरावे याचीच माहिती दिली जाते. यातीलच
एक शिक्षिका मला म्हणाली होती कि, या लहान मुलींना आता पासूनच हे सर्व
शिकवल्यामुळे मुली लवकर ‘वाया’ जातात. त्यांची ‘प्रेम-प्रकरण’ आणि ‘शारीरिक संबध’
ठेवण्याची प्रकरण वाढतात. याच विचारांनी
जर बदल घडवायचे म्हटले तर समाजात बदल होणे
अवघड आणि अशक्य असेल.
मासिक
पाळी विषयी कोणाशीही बोलायचं नाही पण मासिक पाळीच्या वेळी सर्वांसमोर अस्पृश्यासारख
जगायचं असत. मला माझ्या मासिक पाळी वेळी इतकीच
माहिती माहित होती. मासिक पाळीच्या वेळी
होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास याच कौतुक करायचं नसतं. सर्वच बायकांना होतो असा त्रास असं म्हणून गप्प बसायचं असत. मासिक पाळीशी
निगडीत असलेल्या अंधश्रद्धांना देव आणि धर्माच्या श्रद्धेचे नाव देऊन प्रश्न विचारायचे
नाही. प्रश्न विचारले तरीही पाप वाढत. असे
सांगून गप्प केले जायचे.
जसे जसे मासिक पाळी विषयी
प्रश्न आणि विचारांचा गुंता वाढत गेला.
तसे मी स्वतः अभ्यास करून माझ्या प्रश्नांची उत्तर शोधायला लागले. मासिक पाळी विषयीचे अज्ञान दूर होण्यासाठी घरातूनच स्पष्टपणे चर्चा करायला प्रश्न
विचारायला सुरवात केली. मासिक पाळी आणि अंधश्रद्धे विषयीची माझी अनेक स्पष्टीकरणे नातेवाईकाना
निरुत्तर करून जायची. पण तरीही बहुतेक प्रश्नाची उत्तरे ‘शास्त्रात असं लिहिलेय’
सांगून सारवासारव केली जायची. पण माझे घरातील जनजागृतीचे प्रयत्न सुरूच राहिले. माझ्या नातेवाईक आणि
मित्रांशी चर्चा करताना कळले कि, ‘माझ्या बायकोला किंवा बहिणीला दर महिन्याला
नेमकं काय होत?’ याबद्दल पूर्णपणे अज्ञानी होते. त्यांना मासिक पाळी विषयी थोडक्यात माहिती दिली
तेव्हा पासून तिच्या त्या पाच दिवसात हे तिला समजून घ्यायला लागले.
एकीकडे मासिक पाळी संबंधी असलेले गैरसमज, अंधश्रद्धा आणि अज्ञान तर
दुसरीकडे न बोलण्याची मानसिकता. या दोन्ही बाजूने स्त्री पुरुष समानते सह बदल
घडण्याची गरज आहे. मासिक
पाळी किंवा ऋतू स्त्राव हि श्वसनाइतकीच नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणून स्वीकार
होईल. तेव्हाच ‘ती’ न लाजता न घाबरता बोलू शकेल कि, ‘मला आज पाळी आलीये’. #ItsTimeForAction
लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
मस्त
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीची विडंबना अगदी योग्य शब्दात मांडली आहे.
उत्तर द्याहटवा