“आमचं नमन”
PC: Prathamesh Nalwade
सुस्वागतम्... सुस्वागतम्...
सुस्वागतम्...
श्री रंग देवता… श्री ग्राम
देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री गणरायाच्या कृपेने शाहीर ‘आडस’
बुवा निर्मित ‘श्री रत्नेश्वर नाट्य नमन
मंडळ’ तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी (टीप : असे कोणतेही नाट्य नमन मंडळ नाही.
शोधायला जाऊ नका.) , यांचे गण गवळणीने नटलेले कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन... बहुरंगी
नमन... बहुरंगी नमन... (धारकरी)
(पहिला लाल पडदा
बाजूला होऊन... एक मृदुंगवाला आणि टाळ घेऊन पाच खेळ्यासोबत नांदीला
सुरुवात)
PC: Prathamesh Nalawade |
शिव पार्वती गजानना रंग
भरू दे आमच्या गणा
शिव पार्वती गजानना रंग
भरू दे आमच्या गणा
पयलं नमन आम्ही कोणाशी
बोलू
गणपती देवाचं चरण धरू
शिव पार्वती गजानना रंग
भरू दे आमच्या गणा
दुसरं नमन आम्ही कोणाशी
बोलू......
आणि अश्याप्रकारे झाली
आमच्या बहुरंगी नमनाची सुरुवात. आमचं नमन सुरु करण्या आधी जे कोकणातले नाहीत
त्यांच्या साठी ‘नमन’ काय असत ते थोडक्यात
सांगते. नमन म्हणजे मराठी भाषेत नमस्कार किंवा प्रणाम असा अर्थ असतो. पण दक्षिण
कोकणात नमन म्हणजे ‘खेळे’ (खेळण्यातील खेळ नव्हे.) याला उत्तर कोकणात ‘दशावतार’
म्हणून ओळखले जाते. हा एक इथल्या
पारंपारिक लोक कलेचा प्रकार आहे. जो इथल्या बोली भाषेत सादर केला जातो.
PC : Samir Mohite |
१७२८ साली
शामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या
दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून जी लोककला प्रकार महाराष्ट्रात आणली. त्यात याची
गणना केली जाते. यामधून वेगवेगळे पारंपारिक नृत्य, मौखिक गाणी, रंगभूषा, नाट्य आणि संगीत असे बहुरंगी कला प्रकार एकाच वेळी बघायला मिळतात. कोकणात
मंदिरातील सण-उत्सव, कोणाच्या घरी
सत्यनारायण पूजा आणि लग्न असले तर तेव्हा रात्री ‘नमन’ हे हमखास बघायला
मिळते. ‘नमन’ करण्र्यांचे गावानुसार विशेष
अशी कलापथके आणि मंडळे असतात. त्यांचे हि नाटकासारखे रंगीत तालीम होते. ‘नमन’ हे इथल्या लोकांचे करमणुकीचे एक माध्यम
आहे. ज्यात देव-देवतांच्या गोष्टी, गण- गवळण, वग नाट्य असतात. (वग नाट्य म्हणजे लोकांचे प्रबोधन होईल असे छोटेसे नाटक.
ज्यात राजा-राणी, रामायण, महाभारतातील कथा असतात.) नमनामध्ये पायघोळ झगे, उपरणी
पगड्या, घोंगडी, मुखवटे, स्त्री पात्रांना साड्या, राजासारखे कपडे, शंकर –गणपतीची
रूपे, संकासूर, भुताचे सोंग असे वेगवेगळ्या पात्रासाठी वेगवेगळे वेशभूषा आणि रंगभूषा
(मेकअप) केले जातात. या कलेला आपलं दैवत
मानून जगणारे किंवा आपले पोट भरणारे पण अनेक कोकणी इकडे भेटतील. दरवर्षी देवाचा कौल घेऊनच नमनाची सुरवात केली
जाते. पावसाळ्यात हि नमन कलापथके बंद असतात. बहुतेक कलापथकात सर्व पुरुष पात्र दिसतील. म्हणजेच स्त्रीची
भूमिका हि पुरुषांनीच वेषांतर करून दिसतील. काळ बदलला तसा कलापथकात स्त्री कलाकार
हि दिसून येतात. मृदुंग ढोलकी सोबत ऑर्केस्ट्राची जोड पण दिसून येते. कोकणातील नमन मुंबईच्या नाट्यगृहात पण दिसून
येते. या कलेचे लिखित साहित्य फारसे नाहीत
आणि शासनाच्या दुर्लक्षाने हा लोककला
प्रकार कमी कमी होत चालला आहे. यामुळे नमन
कलाकारांची स्थिती ‘रात्री राजा आणि सकाळी कामाचा बोजा’ अशी असते.
आता आपण पुन्हा येऊया आमच्या
बहुरंगी नमनाकडे.....
मुंबईला राहत असताना लहानपणी मे महिन्याची सुट्टी असल्यावरच गावी जाणे
व्हायचे. तेव्हा आंबे - फणस खा.. सोबतच दिवसभर वाडीतील मुल-मुली एकत्र येऊन अंगणात निरनिराळे खेळ देखील सुरु असायचे. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत यंदा
गावात कोणाचे लग्न आहे? कोणाकडे सत्यनारायण पूजा आहे? कोणत्या दुसऱ्या गावात
देवाचा उत्सव- पूजा आहे का ? याची माहिती मिळाली. तर लगेच तिकडे कोणते नवीन किंवा
नावाजलेले कलापथक येणार आहे. याची पण
चौकशी करायचो. मग ते नमन आमच्या वाडी किंवा
गाव पासून किती हि लांब असले तरीही
रात्रीचे चालत जाऊन सर्व गाव तिकडे हजर
राहायचो. तिकडे बसण्यासाठी जाताना एखादी घोंगडी सोबत घेऊन
जायची. रात्रीच्या जेवणानंतर म्हणजे रात्रीचे
१० वाजल्या नंतर ग्राम देवतेचा नारळ फोडून आणि गाऱ्हाणे घालून नमनाला सुरूवात व्हायची. नमनाची सुरवात एक मृदुंगावर थाप पडून आणि सोबतीला
पाच- सहा व्यक्ती टाळ घेऊन स्टेजवर येऊन ‘पयलं
नमन हो करितो वंदन ...पयलं नमन हो पयलं नमन हो ..तुम्ही ऐका हो गुणिजन आम्ही करितो कथन’ अश्या नांदीने (नांदी म्हणजे पाहिले सुस्वागतम /
प्रणाम करण्याचे गाणे) ग्राम देवता, निसर्ग देवता आणि इतर देव देवतांना समर्पित नमनाची
सुरवात होते. त्यानंतर लगेचच गणेश वंदना सुरु
व्हायची. ज्यात शंकर पार्वती हे पात्र आणि
मध्ये गणपती असणार. त्याच्या शेजारी नंदी बैल आणि उंदीराची वेशभूषा केलेलं पात्र मान हलवत असणार.
एक गवळण आणि बुवा नाचत –गात गणपतीची आरती
करणार. त्यानंतर एखादे वासुदेवाचे आणि नारदमुनी
चे गीत असायचे. देव देवतांची गाणी झाली कि, मागील पडदा बदलणार. नवीन
जंगलाचे चित्र असलेला पडदा मागे येणार. त्यानंतर प्रवेश करायच्या चार गवळणी ज्या
दही- दुध घेऊन बाजारात विकायला घेऊन जाणार असणार पण कृष्णाचे सवंगडी पेंद्या आणि
सुदाम त्यांना अडवणार. त्या गवळणीना मदत
करायला मावशी येणार. मग त्या मावशीच्या
आणि सवंगडी यांच्या अनेक गमती जमती होत. ते झाले कि, कंस मामाचा हेलोजन ची लाईट चक-चक करत आणि आसुरी हास्याने प्रवेश व्हायचा. बाल कृष्ण
आणि कंस मामा नाट्यमय अशी लढाई व्हायची. मला
हि लढाई बघायला सर्वात जास्त मज्जा यायची. कारण घरी भाऊ आणि मी पण असे लढाई करायचो. त्यानंतर शेवटी कृष्णाचा विजय आणि त्याच्या विजयाच्या
गाण्याने गवळण संपायची. गवळणी नंतर लगेचच
पडदा पुन्हा बदलला जायचा. वगाची कथा जशी असेल तसा पडदा असायचा. बहुतेक कलापथकाचे वगासाठी मागील पडदा राजमहालचे चित्र असलेलेच असायचे. हे
बदलणारे पडदे बघण्यात पण एक वेगळचे कुतूहल आणि मज्जा असायची. वगाची हि बहुतेक पात्रे ठरलेलीच असायचे. एक
राजा-राणी, शकुनी मामा सारखा कोणी तरी एक पात्र असणार, राजकुमार किंवा राजकन्या
त्यांची एक प्रेम कहाणी असणार. वगाचा शेवट
गोड आणि थोडा प्रबोधनात्मक असणार. अखेरीस लंकापती रावण गर्वहरण नृत्य आणि घोडा नृत्य झाले कि
पहाटे ३.३० च्या सुमारास हे नमन संपायचे. असे
असायचे बहुरंगी नमन.
PC : Prathamesh Nalawade |
मी आणि माझी चुलत भावंड त्यातील
प्रत्येक पात्राचे, गाण्याचे , नृत्य आणि अभिनयाचे बारीक निरीक्षण करायचो. दुसऱ्या
दिवशी त्याच निरीक्षणातून कोणाच्या तरी गोठयात किंवा अंगणात आम्हां बाल कलाकारांचे
नमन सुरु व्हायचं. त्यासाठी हि तितकीच
मेहनत घ्यावी लागायची. जुने कपडे
शोधण्यापासून सुरवात व्हायची. झ्यात टॉवेल, ओढण्या, जुन्या साड्या , पावडरचे डबे, काजळ,
लिपस्टिक, फुले व पाने यांचे गजरे- हार, कंगवे (फणी), चुलीसाठी आणलेली लाकड म्हणजे आमची
तलवार, संगीत देण्यासाठी जुने डबे आणि लाकडाच्या फळ्या या महत्वाच्या
साहित्याची जमवा जमव करावी लागायची. त्यानंतर
जुन्या साड्यांनी कलापथकासारखे मागे पडद्याची सजावट करायचो. प्रत्येक जणाचे पात्र ठरवून तशी वेशभूषा करायचो. थोडेफार कालचे डायलॉग असायचे. बाकी उरलेले डायलॉग जेव्हाचे तेव्हा ठरवायचो. डोक्यावर मुकुट म्हणून जुने पातेले (जुना टोप
किंवा गंज) वापरायचो. कंबरेला रश्शी किंवा नाडी बांधून त्यात लाकडी तलवार अडकवायची. आणि
आम्हीपण खोटे खोटे नारळ देऊन ग्राम देवेतेला गार्हाण घालून आमच्या नमनाची सुरुवात करायचो.
पहिला दोन जण आणि एक मृदुंग म्हणून डबा
वाजवत नांदी म्हणयला सुरवात करायचा. ‘पयलं नमन’ चे गाणे झाले कि, लगेच जुन्या
कपड्याची सोंड लावलेला गणपती मध्ये बसवून ‘गणपती आला नि नाचून गेला’ गाणे
सुरु. त्यानंतर ‘ कान्हा तू मला जाऊ दे
मथुरे बाजरी’ म्हणत आम्ही मुली डोक्यावर
रिकामे हंडा-कळशी सोबत नाचत गवळण घेऊन यायचो. आमच्या नमनमध्ये पण ढगळे कपडे
घातलेले पेंद्या- सुदाम आणि फाकड्या असायचे. त्यांची अफलातून अशी कॉमेडी असायची. छोटेसे लाकुड बासरी समजून वाजवत कृष्ण देखील यायचा. जो सर्वात उंच आणि तब्येतीने जाडा असेल त्याला
कंस मामा बनवायचो. कृष्णाची कंस मामा सोबतची लढाई आणि वध पण खूप रंगतदार असायचा. त्याला हि आम्ही
‘तुमनाक तुमनाक धीदिंग तुमनाक’ म्हणत तोंडाने वेगवेगळे आवाज काढत आणि डबा वाजवत संगीत द्यायचो.
गण- गवळण झाली कि, काल नमनात जे वग नाट्य सादर व्हायचे तोच वग आम्ही तीच पात्र ठरवून वग सादर
करायचो.
आमच्याकडे सर्व पात्र साकार करायला तितक्या संख्येने मुलं
नसली कि, काही जणांना एका पेक्षा अधिक पात्र साकारावी लागे. कालच्या नमनाचे फेमस डायलॉग आणि गाणी या आमच्या नमन मध्ये दिसून येई. आमच्या नमनाला प्रेक्षक म्हणून फ़क़्त पाच वर्षा आतील लहान मुल
असायची. मोठी माणसे लपून छपून आमचं नमन बघायचा प्रयत्न करायचे पण आम्ही नीट लक्ष
देऊन असायचो. मोठे काका- काकी लपून छपून बघण्याचा खूप प्रयत्न व्हायचा पण
आम्हाला ते दिसले कि, लगेचच लाजून नमन थांबवून द्यायचो. पूर्ण दुपारभर आमचा हा कार्यक्रम सुरु असायचा.
या नमनाचा शेवट हि रावण गर्वहरण आणि घोडा नृत्याने करायचो.
आज हि गावी गेले कि, कोणत्या
तरी अंगणात किंवा गोठ्यात लहान मुलांचे नमन सुरु असते. जर मी ते पाहायला गेले तर ती मुलं हि लाजून तशीच
उभी राहतात. जसे पूर्वी आम्ही लाजून उभे राहायचो. आज मला त्यात बालपणाची एक छबी
दिसते. आणि आपोआपच चेहऱ्यावर हसू उमलत.
हि होती आमच्याकडील नमनाची
आठवण.... भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये अजून एका कोकण डायरीतील आठवणी सोबत.
खूप सुंदर
उत्तर द्याहटवाamhi pn asech karycho. sarv athvani punha jagya zalya. aadas ahe.
उत्तर द्याहटवा