काही पुस्तकांबद्दल आपण चुकीचे ऐकतो आणि ते पुस्तक वाचण्याचा कधीही प्रयत्नही देखील केला जात नाही. माझ्यासाठी "Norwegian Wood" हे एक असेच पुस्तक आहे. कितीतरी वेळा पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक पहिले लावलेले दिसायचे. पण मनात पूर्वग्रह दूषित झालेले होते म्हणून चुकूनसुद्धा हात लावण्याची कधी तसदी घेतली नाही. हे पुस्तक न वाचण्याचे निमित्त फक्त इतकंच ऐकून होते कि, "ती एक लव्हस्टोरी होती." मला पुस्तकातले गुलाबी प्रेम किंवा विरहाचे प्रेम अतिशय कंटाळवाणे वाटते. त्यामुळे सहसा लव्ह स्टोरीज वाचतच नाही. पण या मागील दोन महिन्यात एका मित्राच्या रेफरन्समुळे दिव्य प्रकाश दुबे यांची "ऑक्टोबर जंक्शन" आणि मानव कौल यांची "अंतिमा" कादंबरी वाचनात आल्या. यात अनेक वेळा मुराकामीच्या पुस्तकांचे संदर्भ सापडायचे. न राहवून "Norwegian Wood" पासून मुराकामीचे पुस्तक वाचायला सुरुवात केली. "Norwegian Wood" कादंबरी पूर्ण झाल्यावर मला George Eliot चे वाक्य आठवले. ते म्हणजे, “Don't judge a book by its cover”
पुस्तकाबद्दल थोडक्यात :
हे पुस्तक मूळ जपानी भाषेत हारुकी मुराकामी या लेखकाने लिहिले आहे. या पुस्तकाचे दोन वेळ इंग्रजी भाषांतर झाले आहे. यावर आधारित चित्रपटही बनले आहेत. साधारणतः प्रेम कथेत फक्त एक -दोन पात्र असतात. पण या कादंबरीत प्रत्येक पात्र तितकाच महत्वाचा वाटतो. त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यात दिसून येते. मी इतर कादंबरी वाचताना बऱ्याचदा कादंबरीतील इतर पात्रांना सहज विसरून जाते. पण या कादंबरीत सर्व पात्रे मला तितकीच जवळची वाटतात. खरंतर हि एक डार्क रोमान्स कादंबरी आहे.
"Norwegian Wood"या कादंबरीचे नाव हे Norwegian Wood नामक गाण्यावरून ठेवण्यात आले आहे. ६०च्या दशकातील हे गाणे नातेसंबंध, दु: ख आणि वासना यावर आधारित आहे. या कादंबरीची प्रमुख थीम / मुख्य विषय देखील याच भावनांशी निगडित आहे. ही एक आत्मनिरीक्षण करणारी कादंबरी आहे, कारण यातील पात्रे सतत स्वत:ला शोधून काढत असतात, परंतु ती त्याच्या गाण्याच्या संकेतांसह विस्तीर्ण प्रेक्षकांशी देखील संबंधित आहे.
इतर कादंबरी मध्ये बऱ्याचदा एक -दोन पात्रांवर अधिक फोकस केले जाते आणि बाकीची पात्रे निरर्थक वाटतात. पण या कादंबरीत प्रत्येक पात्र तितकाच महत्वाचा वाटतो. त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यात दिसून येते.
“I read Naoko's letter again and again, and each time I read it I would be filled with the same unbearable sadness I used to feel whenever Naoko stared into my eyes. I had no way to deal with it, no place I could take it to or hide it away. Like the wind passing over my body, it had neither shape nor weight, nor could I wrap myself in it.”
पात्रांची ओळख :
"टोरू वतनबे" नामक पात्रापासून गोष्टीची सुरुवात होते. जो स्वतःची गोष्ट सांगत असतो. ज्यात त्याच्या सर्वात जवळचा मित्र "किज़ुकी"च्या आत्महत्येचा उल्लेख होतो. यामुळे टोरूला असह्य मानसिक त्रास झाला. त्या दुःखातून सावरण्यासाठी बऱ्याच गोष्टी त्याने केल्या. त्याने दुसऱ्या शहरात स्थलांतरण हि केले. मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्या एकट्याच्या वैयक्तिक आयुष्यात बदल झाला नव्हता तर त्यासोबत "नाओको " चे आयुष्यही पूर्ण बदलले होते.
"नाओको" हि किज़ुकीची प्रेमिका असते. अचानक ते दोघे त्या शहरात ते भेटतात. किज़ुकीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दोघांनाही सावरणे अवघड जात होते. त्यामुळे मैत्रीच्या नात्याने एकमेकांना सपोर्ट करू लागतात. एखाद्या मानसिक धक्क्यातून सावरणे प्रत्येकालाच जमतं असे नाही. काहीजण दुःखातून लगेच सावरतात तर काहींजण वर्षानुनवर्षे त्याच दुःखाला कुरवाळून आयुष्य जगतात. नाओको हि अशीच मानसिक त्रासात अडकलेले एक व्यक्ती असते. पण तिला इतका मानसिक त्रास होण्यामागे देखील एक तितकाच आघात करणारा इतिहास असतो.
"मिदोरी" नावाची हि एक टोरूची मैत्रीण दाखवली आहे. जी कायम मज्जा मस्ती करणारी दाखवली असली तिच्या या हसण्यामागे वैयक्तीक आयुष्यातील सुरु असलेल्या नैराश्यपूर्ण घटनांचा समोरच्याला पत्ताही लागू देणार नाही. या कादंबरीतील हिचे टोरूची मैत्रीण आणि स्वतःचे वैयक्तिक स्थान हि तितकेच महत्वाचे आहे.
"नागवासा" नावाचा टोरूचा रूममेट ज्याला आता पर्यंत शंभरहून अधिक मुलींशी शरीर संबंध ठेवल्यालाचा अभिमान असतो. त्याची "हातसुमी" नामक शालीन प्रेमिका पण असते. नागवासा आणि हातसुमी हि दोन पात्रांची देखील एक वैयक्तिक ओळख आणि त्यांची रिलेशनशिप एक वेगळेच कोडं असतं. यांचे विचार आणि स्वभाव देखील पूर्णतः वेगवेगळे असतात. तरीही एक विलक्षण नातं त्यांचं असत. त्यासोबत ते टोरूच्या जीवनाशी जोडले जाणे देखील तितकेच सुंदर पद्धतीने मांडले आहे.
" रेईको" नामक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये ओळख होते. तिचा हि मानसिक आजाराचा एक इतिहास असतो. ज्याची ट्रीटमेंट ती या हॉस्पिटलमध्ये घेत होती. ज्यात तिनेही अश्या अनेक चढ -उताराचा सामना केलेला असतो. जी एक आधारस्तंभासारखी त्यांच्या जीवनात येते.
टोरू आणि मिदोरी, टोरू आणि नाओको, नाओको आणि कुजिकी, मीदोरी आणि तिचा बॉयफ्रेंड याचे प्रेमातील आणि वैयक्तिक जीवनातील उतार -चढाव, त्यात रेईको, नागवासा, हातसुमी सारखे काही पात्र देखील आयुष्याच्या वळणावर भेटत राहतात. या प्रत्येक पत्राचे स्वतःची वेगळी ओळख आणि जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. जे कधी एकमेकांना मानसिक आधार देतात. तर कधी रिफ्लेक्शन करायला तर कधी एकमेकांना मदत करतात. यात कोणतेही पात्र चूक किंवा बरोबर या मापात नाही बसवू शकत.
शरीर आजारी पडले कि, ताप, सर्दी, अंग दुखी सारखी लक्षणे दिसू लागतात. त्याच प्रमाणे मन आजारी पडलं कि, एकटेपणा, ताण -तणाव, बैचेनी, दुःख, नैराश्य सारख्या भावना येऊ लागतात. या मानसिक त्रासाचे परिणाम शरीरावर देखील बदल दिसत असतात. त्याचप्रमाणे मानसिक त्रासासोबत जगणाऱ्या व्यक्तीचे लैंगिक जीवन किंवा लैंगीकतेबद्दल (sexuality) हि अनेक बदल होत असतात. ज्याचा परिणाम आजही कोणी खुलेपणाने बोलू शकत नाही. मानसिक त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीचे आपल्या समाजात सहज समावेशन केले जात नाही. अश्या अनेक मानसिक विषयाला अनुसरून कादंबरीतील पात्रांचे वर्णन केले आहे. मानसिक त्रास झाला तर त्याला आधार देणे आणि त्यावर उपचार होणे किती महत्वाचे आहे याचे हि अप्रतिम वर्णन केले आहे. जर तो मानसिक आधार द्यायला कोणी सापडले नाही तर... किंवा योग्य मानसिक उपचार झाले नाही तर.... व्यक्तीच्या मानसिक त्रासाचा गंभीर परिणाम म्हणेजच "आत्महत्या". यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही त्या सोबतचे नातेवाईक किंवा मित्रपरिवारात याचा मानसिक धक्का बसलेला असतो. आणि पुन्हा मानसिक त्रासाचे नवीन चक्र सुरु होते.
या कादंबरीतील पात्रे आणि प्रसंग मला समुद्रातील जहाजांप्रमाणे वाटतात. ज्यात अनेक जहाजे प्रवास करत असतात. त्यांना आपल्या ठरलेल्या वेगवेगळ्या मुक्कामी पोहचायचे असते. प्रत्येक खलाश्याला समुद्रातील वादळ-वाऱ्याशी झुंज द्यावी लागते. कधी अचानक भरती तर कधी ओहोटी... यात काही जहाजे मुक्कामी पोहचतात. तर काही भरकटली जातात... तर काही समुद्रात बुडून जातात. माणसाचं आयुष्य हि असेच काहीसे आहे.
“What makes us the most normal," said Reiko, "is knowing that we're not normal.”
-----------
amkar.anju@gmail.com