मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

आजादी का अमृत महोत्सव vs निःशब्द भारतीय || Amrit Mahotsav of Independence vs Quiet Indian

आजादी का अमृत महोत्सव vs निःशब्द भारतीय  

apali-writergiri-azadi-15th-august-india-swatantryadin


गेल्या काही वर्षात स्वातंत्र्यदिन हा फक्त झेंडा फडकविण्यासाठी, त्या झेंड्यासमोर फोटो किंवा सेल्फी काढण्यापुरता मर्यादित राहिला आहे. त्याचे फोटो सरकारी वेबसाईटला टाकले तर त्याचे पार्टीसिपेशन सर्टिफिकेट घेण्याचे पण नवीन फॅड सुरु आहे.  हा शोऑफ केला कि, " तुमचे भारतीयत्व खरे असे ठरविले जाते." अन्यथा तुम्ही बाटलेले किंवा देशद्रोही ठरता. 


आज इंग्रंजांच्या गुलामगिरीतून  स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली. पण  तेव्हापासून भारत राजकारणींच्या गुलामगिरीत अडकत गेला. भारतात "लोकशाही" राज्यव्यवस्था स्थापन तर झाली पण "लोकशाही" अमलांत मात्र अजूनही आलेली नाही.    देशाला स्वातंत्र्य  मिळाल्यानंतर अनेक सकारात्मक स्वप्न भारतीयांच्या मनात रुजली होती. " लोकशाही देश किंवा स्वतंत्र भारत म्हणजे आपण आपला नेता निवडणार. जो लोकांचे प्रतिनिधित्व करणार. जनकल्याणाचे काम निःपक्षपणे करणार. देशातील चांगले शिक्षण, रोजगार, आरोग्य, अन्नपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी पहिले प्राधान्य देणार. भारत धर्मनिरपेक्ष असणारा पहिला देश ठरणार. भारतात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असणार. आपल्याला आपल्या देशात सुरक्षित वातावरण मिळणार. पण वास्तविकता मात्र पूर्णपणे उलट आहे. भारतातील लोकशाही फक्त  "धर्म आणि पैसा" या दोनच गोष्टींवर अवलंबून आहे.

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने  प्रत्येक भारतीयासाठी काही प्रश्न या लेखाच्या माध्यमातून मांडत आहे. खालील प्रश्नांचा आणि मुद्द्यांचा नक्की विचार पुढच्या मतदाना आधी केलाच पाहिजे. 


१.  क्लार्क असो किंवा  IPS ऑफिसर लाखों तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यातील जेमतेम ५ ते १० टक्के उत्तीर्णांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. पण लोकांचा नेता - राजकारणी बनण्यासाठी "मोठा गुन्हा करणे" हि पात्रता असते का ?  ज्या व्यक्तींवर कालपर्यंत करोडोंचा भ्रष्टाचार, स्त्रीचे लैंगिक शोषण आणि खूनासारखे गंभीर आरोप असतात.  या लोकशाही देशातील जनता त्याच व्यक्तीला कशी निवडून देते ? एकीकडे सामान्य माणसाने जर साधी चोरी केली तर त्याला समाजात कुठेच नोकरी मिळत नाही. पण सध्या मंत्रिमंडळ ते आपल्या गावातील सरपंचपर्यंत  सर्व नेते खुलेआम गुंडगिरी करतात किंवा त्यांचे कार्यकर्ते खुलेआम दादागिरी करतात. याना कोणत्याही कायद्याचे भय का नसते ? उलट या लोकनेत्याला किंवा कार्यकर्त्यांना सामान्य जनता का घाबरून असते ? मग तरीही आपण याना का निवडून देतो ? या विरुद्ध सर्व जनता एकञ का येऊ शकत नाही ?  


२.  गल्ली गल्लीत  किंवा गावो गाव "मंदिरे / मस्जिद /चर्च  " दिसतील. या धर्मस्थळांसाठी करोडो खर्च होतात. करोडोंची देणगी देखील आपली भारतीय जनता देते. " मंदिर याही बनेगा" घोषणा करत करोडो लोक रस्त्यावर उतरतात. दंगली करतात.  मात्र हि जनता आपल्या गावात "रस्ते नाही, पाणी नाही,  शाळा नाही, दवाखाना नाही किंवा रोजगार नाही यासाठी का एकत्र येत नाही?"  आपण ज्या नेत्याला मत देतो तो मात्र रस्ते, शाळा, दवाखाना वैगरे अनेक आश्वासने देतो. त्यासोबत धर्माच्या नावाने  कीड डोक्यात सोडून जातो. त्यानंतर दवाखाने-शाळा तर कधी बनत नाही पण धर्माची कीड वाढत राहावी म्हणून गावात "धर्मस्थळ" १०० % बांधले जाते. यासाठी आपण त्या नेत्याला निवडून देतो. पण यामुळे तुमची मुलं शिक्षित होणार का ? रोजगार प्रश्न सुटला का ? तुमच्या गावात हॉस्पिटल सेवा बनली का किंवा सुधारली का ?पाण्याचा समस्या मिटल्या का ? हे प्रश्न कधी तुम्ही निवडून दिलेल्या नेत्याला / पक्षाला विचारले का ? कधी प्रश्न विचारण्याची साधी संधी तरी मिळाली का ?

 

३.  भारत हा  धर्मनिरपेक्ष देश आहे म्हणून त्याची ओळख होती. पण आज आपले लोकनेते उघडपणे धर्माच्या आणि जातीच्या नावाने भडकाऊ भाषण करतात. जातीभेदाचे विष पेरतात.  त्यामुळे दंगली ते मोबलिंचिंग सारखे अनेक गंभीर घटना वाढल्या आहेत. हजारो लोक आज याचे बळी ठरले आणि स्त्रियांवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार झाले. ज्यात कायम सामान्य जनतेचाच बळी गेला आहे.  धर्म आणि  जात नावाच्या अफूने सामान्य जनतेला इतके व्यसनाधिन आणि निकामी बनवून ठेवले आहे कि तो याविरुद्ध प्रश्न विचारत नाही. उलट हि धर्म आणि जातीच्या नावाने जेव्हा नेता बोलेल "मारा कि कसलाही न विचार करता एक भारतीय आपल्याच दुसऱ्या  भारतीय बंधूला मारत सुटला आहे." मग आपण धर्मनिरपेक्ष भारत म्हणून का स्वातंत्र्यदिन साजरा करावा ?


आज ना आपल्याकडे समान न्यायव्यवस्था आहे. ना रोजगाराच्या संधी आहेत. ना चांगल्या प्रतीचे सरकारी शिक्षण गावोगावी आहे. ना पाणी समस्या मिटली. अनेक लैंगिक अत्याचार आणि दंगली करणारे आरोपी मोकाट सुटले. दंगलीत लाखोंची कत्तल होतेय .  तीन दिवस अमृत महोत्सवाला करोडो खर्च होतात. पण दुसरीकडे दोन वेळचे जेवण नाही म्हणून सामान्य माणूस तडफडून किंवा आत्महत्या करून मरतो आहे.  गरीब हा अधिक गरीब होत गेला. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. पुन्हा याच गुंड प्रवृतीचे - धर्माचे विष पेरणारे आणि पैशासाठी क्षणाक्षणाला पक्ष बदलणाऱ्याला मत देणार असाल तर हा धर्मनिरपेक्ष - लोकशाही भारत नाही.   

मग नेमक्या कोणत्या लोकशाही भारताचा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे ?






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...