शनिवार, १६ जुलै, २०२२

पक्ष्यांविषयी कुतूहल जागृत करणारं माहितीपूर्ण पुस्तक म्हणजे "पक्षी आपले सख्खे शेजारी"


   बऱ्याचदा आपण राहत असलेल्या ठिकाणी आपले शेजारी कोण आहेत?कसे आहेत? नाव काय? स्वभावाला कसे आहेत?बोलायला कसे आहेत?असे अनेक प्रश्न तपासून आजूबाजूला राहणाऱ्या प्रत्येकाची चौकशी, पाहणी, विचारपूस करतो. पण आपल्या सभोवताली यास्वार्थी माणसां व्यतिरिक्त(स्वार्थी यासाठी कारण ही मंडळी किंवा आपण स्वतः काही तरी स्वार्थ ठेवून एकमेकांशी ओळख आणि मदत करत असतो,पण पक्षी,झाडांचं तसं नसतं.) झाडे,पक्षी यांचाही समावेश असतो. आपल्या सभोवती दिसणारे, फिरणारे पक्षी हे आपल्याला कळत,नकळत अनेक मदत करत असतात किंबहुना या निसर्ग चक्राला गती देण्याचं महत्वाचं काम बजावत असतात आणि गंमत म्हणजे हे त्यांनाही माहीत नसतं आणि आपल्याला माहीत असूनही आपण त्यांच्याप्रती कृतज्ञही नसतो आणि ना ही त्यांची ओळख,माहिती जाणून घेत असतो

       *पक्षी आपले सख्खे शेजारी* हे किरण पुरंदरे यांचे हे पुस्तक म्हणजे पक्षी आणि माणूस यांचा जवळचा संबंध, पक्षांचे आपल्या आयुष्यातील महत्व, त्यांचं पर्यावरणातील महत्व,त्यांचं वागणं, जगणं आणि त्यांच्या या जगण्यातून आपण माणूस म्हणून त्यांच्या प्रती कसं जगावं हे सांगणारं उत्तम मार्गदर्शक म्हणजे हे पुस्तक.

  बऱ्याचदा आपल्या दारात येणारी चिमणी ही फक्त आपल्याला रंग आणि चिवचिव या पलीकडे माहीतच नसते. ती काय काय खाते, कुठे घरटं बांधते, कसं बांधते, अंडी काय रंगाची असतात, किती अंडी घालते, विण कधी असते या सगळ्याचा विचार आपल्या डोक्यातही येत नाही पण या सगळ्याची माहिती अगदी स्पष्ट चित्रांसहित देणारं हे मार्गदर्शक पुस्तक नक्कीच महत्वाचं आहे. अगदी लहान मुलांपासून कोणत्याही वयाच्या व्यक्तींनी वाचावं,हाताने स्पर्श करून अनुभवावं असं हे पुस्तक,वेळोवेळी मार्गदर्शन करणारं आहे. एकदा वाचून ठेवून द्यावं असं नसून कोणताही पक्षी बघितला की त्याची इत्यंभूत माहिती देणारं आहे.

  साळुंकी,कावळा,बुलबुल,सुभग,शिंजिर,शिक्रा,कोकीळ,हुदहुद्या, पोपट,राघू,पिंगळा अशा वेगवेगळ्या पक्ष्यांचं स्वतः निरीक्षण करून त्यांच्या वेगवेगळ्या छटा लेखकाने अगदी सहज शब्दात आपल्याला समजतील अशा मांडल्याने अगदी सहज आपल्या पर्यंत पोहचतात. कोकिळा हा अगदी लबाड पक्षी आयता बऱ्याच पक्ष्यांच्या घरट्यात अंडी ठेवून,दुसऱ्यांकडून काम करून घेऊ पाहत असतो आणि फक्त कावळ्याच्या घरट्यात अंडी ठेवतो असं नसून बऱ्याच दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी ठेवण्याचा प्रयत्न तो करतो हे या पुस्तकातून कळलं. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे अगदी सगळेच पक्षी घरटी स्वतःची स्वतः बांधून ती 4-5 वर्ष वापरण्याचा प्रयत्न करतात आणि विशेष म्हणजे ती स्वच्छ राहावी यासाठी आतोनात प्रयत्न करतात. अगदी त्यांच्या पिल्लांनी केलेली विष्टा ही ते स्वतः चोचीने घरट्यातून बाहेर नष्ट करतात, ही बाब विशेष समजण्यासारखी आणि माणसाने यातून शिकून स्वच्छतेचा धडा घ्यावा अशीच आहे. आपण मात्र निसर्ग घाण कसा होईल याच मार्गाने प्रवास करत आहोत

हे पुस्तक पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी यांनी तर वाचावेच पण जे या निसर्गात राहतात,निसर्गाचा भाग आहेत त्यांनी नक्कीच वाचावे,संग्रही करावे. कदाचित आपल्यात पक्ष्यांविषयी प्रेम,दया, जिज्ञासा जागृत होऊन या निसर्ग चक्राला मदत करण्याची जाणीव जागी होईल. पुन्हा एकदा माझे आवडते निसर्गप्रेमी लेखक,मार्गदर्शक ज्यांचे नेहमीच या विषयावर मी फोनवरून मार्गदर्शन घेत असतो किरण पुरंदरे यांचे आभार मानतो..उत्तम माहितीपूर्ण लिखाण...नक्कीच संग्रही करावं असं पुस्तक.


लेखकाची ओळख :

दीपेश मोहिते, कल्याण

लिहायला, वाचायला आवडतं. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण  करायची आवडं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...