मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

“नितळ”

 नितळ

apali-writergiri-nital-anjali-pravin-नितळ-आपली

“पानी सा निर्मल हो मेरा मन... मेरा मन

धरती सा अविचल हो मेरा मन

धुंधलाई आँखे जब, भरमाया चित्त है

समझे ना मन को जब सत्य या असत्य है...

चंचलता मोह से दूर रहे

अपने हि द्रोह से दूर रहे

करुणामय निर्भय हो मेरा मन||”

 


नितळ हा शब्द ऐकला कि...टीव्हीवरील जाहिरातींचे शब्द कानावर ऐकू येतात ते म्हणजे .... “नितळ गोऱ्या त्वचेसाठी वापरा आमचे गुणकारी ‘अबक’ प्रोडक्ट... नितळ गोऱ्या त्वचेची १००% खात्री.”

नितळ गोरे दिसणे किती महत्वाचे आहे हे या भांडवलशाही जगाने अगदी शिक्कामोर्तब करून सांगितलेले आहे आणि समाजाने ते सारासार विचार न करता स्वीकारली आहे.  यामुळे  समाजाला लक्षातच नाही कि, ‘नितळ मन आणि  भावना देखील असतात.’ आता हे फ़क़्त पुस्तकी वाक्य बनले आहेत. “सुंदर दिसणं महत्वाचे नसून सुंदर असणं महत्वाचे आहे.” या विषयावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे “नितळ”

“नीरजा” हि या चित्रपटातील प्रमुख पात्र आहे. जिला “ल्युकोडोर्मा” किंवा “कोड” म्हणजेच शरीरावर पांढरे डाग आलेले असतात.  ती एक उत्तम नेत्रतज्ञ डॉक्टर असते. त्याच बंगळूरच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर अनन्य  रानडे  देखील तिच्यावर मनापासून प्रेम करत असतो. दोघे हि एकमेकांवर प्रेम करत असले तरीही तिला तिच्या दिसण्यावरून समाज कोणत्या नजरेने बघतो याची जाणीव असते म्हणून ती त्या प्रेमाच्या स्वीकार करण्यास घाबरत असते. म्हणून तो नीरजा आणि त्याचे कुटुंबीय यांचे एकमेकांबद्दलचे मत विचारात घेण्यासाठी तिला आपल्या घरी घेऊन जायचा विचार करतो. तेव्हा आजीच्या डोळ्याच्या ऑपरेशनचे आणि घरातील एक कार्यक्रमाचे निमित्त सांगून तिला आपल्या पुण्याच्या घरी घेऊन येतो.

 रानडे कुटुंब उच्चविद्याविभूषित असे मोठे कुटुंब दाखविले आहे. ज्यांना समाजात एक  मान किंवा चांगले स्थान मिळालेले आहे. त्याचे कुटुंबहि मोठे असते. ज्यात आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकी, त्यांची मुले, आत्या वैगरे कुटुंबीय असतात.  अनन्यचा लग्नाचा विषय घरी सुरूच असतो आणि त्याच वेळी नीरजाला मैत्रीण म्हणून घरी घेऊन आलेला असतो. यामुळे घरभर त्या दोघांचीच चर्चा सुरु असते. जेव्हा पहिल्यांदा ते दोघे घरी येतात तेव्हा घरातील सर्व व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामा निमित्त घराबाहेर व्यस्त असतात. तेव्हा पहिली भेट आजीशी होते. जिच्या डोळ्यावर पट्टी असते तिला काहीच दिसत नसते. पण आवाज आणि स्पर्शाने ती अनन्यला ओळखते आणि नीरजाशी हि ओळख करून घेते.  त्यानंतर नीरजाची कुटुंबियातील इतर सदस्यांसोबत ओळख होऊ लागते. त्यासोबतच घरच्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया व मते हि दिसू लागतात.

या चित्रपटात सुंदर दिसण्यावरून किती सहजतेने भेदभाव केला जातो हे खूप अचूक आणि उत्तमरीतीने मांडले आहे. त्यात जर कोड असेल तर समाज त्या व्यक्तींना वाळीत टाकल्यासारखेच वागत असतो. या चित्रपटातदेखील एका प्रसंगात नीरजा स्वयंपाकघरात  मदत करायला जाते.  तेव्हा फळे कापत असताना तिला स्वयंपाकघराच्या बाहेर जायला सांगतात आणि तिने कापलेली फळे कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली जातात. तिला मेकअप करण्याचे सल्ले दिले जातात.  थोडक्यात इथे हि तिला नेहमीप्रमाणे दिसण्यावरून अपमान सहन करावा लागतो. पण तिला लहानपणा पासून समाजाने असे तिच्याशी विक्षिप्त वागण्याची सवय झालेली असते. तिच्या सोबत अश्या वागण्याची सुरुवात घरातूनच झालेली असते.

एकीकडे नीरजाच्या पात्रातून असे अनेक प्रसंग दाखविले आहेत कि ज्यातून आपल्याला सुशिक्षित समाजाचा सुंदरतेकडे बघण्याचा मागासलेला दृष्टीकोन कळतो. तर दुसरीकडे अशिक्षित समजणारे आदिवासी पाड्यातील लोकांमध्ये मात्र सुंदरतेची संकल्पना व विचार पूर्णतः अनोखी आणि पुढारलेली दाखविली आहे.    

वर्ष २००६ ला नितळ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केले आहे. प्रमुख कलाकार देविका दफ्तरदार, शेखर कुलकर्णी, विजय तेंडूलकर, विक्रम गोखले, ज्योती सुभाष, अमृता सुभाष, किशोर कदम, सारंग साठ्ये, दीपा श्रीराम,उत्तरा बावकर आणि  रवींद्र मंकणी या प्रत्येकाने उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटातील सवांद आणि गाणी हळुवार मनाला स्पर्श करणारी आहेत. उगीच कोणताही तिखट मसाला न लावता साध्या सरळ आणि सोप्या भाषेत या चित्रपटाची मांडणी केली आहे.

आपण हि जेव्हा एखाद्याला रंग किंवा दिसण्यावरून कळत – नकळत जेव्हा बोलून जातो तेव्हा त्या व्यक्तीने असे प्रसंग किती वेळा सहन केलेले असू शकते. याची जाणीव तर आपल्याला कळेल. त्यासोबतच हा चित्रपट आपल्या विचारांत नक्की सकरात्मक बदल घडवून आणेल.   


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

३ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...