इथे
ओशाळला मृत्यू
मजूर : प्रातिनिधिक छायाचित्र |
पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी,
श्रमिक, कामगार आणि माझ्या सारख्या मजुराच्या तळहातावर तरली आहे. या पृथ्वीचा
तारणहार मजूर आधीही व्यवस्थेकडून लाथाडला जात होता आणि आता तर तो हद्दपार केला जात
आहे.
मी मुंबईत एका कारखान्यात हमालाच काम करायला आलो
होतो. दुसऱ्याची ओझी उतरवत संसाराच ओझ पेलायचा प्रयत्न अगदी जोमाने चालू केला होता.
काही का होईना पण तुटपुंज्या मजुरीत मी माझ घर आरमात चालवत होतो. त्याच तुटपुंज्या
कमाईत तिच्याशी बोलायला एक फोन पण घेतला होता. सगळ बऱ्यापैकी चालू होत आणि ....
आणि टाळेबंदी जाहीर झाली. दिवसरात्र पळणारी मुंबई लॉकडाऊन झाली.
मी मुंबईतल्या एका १० बाय १० च्या खोलीत अडकून
पडलो होतो. तेवढ्याश्या जागेत माझ्या सोबत आणखीन ८ जण हि होते. खिशातला पैसा संपत
आला होता. मालकान डोक्यावरचा हात कधीच काढून घेतला होता. घराबाहेर कोरोनाच संकट
आणि घरामध्ये भूखेच संकट. इकड आड तर तिकड विहीर अशी अवस्था झाली होती. मालकान काम
बंद केल होत. सरकारन शहर, गाड्या बंद केल्या होत्या. पण पोटाची भूख बंद
करण्याच सामर्थ्य कोणत्याही लोकडाऊन मध्ये नव्हत. मग ठरलं, मनाशी पक्क केल
आणि उचललं गाठोड अन पडलो घराबाहेर.
ट्रेनसाठी गर्दी केली म्हणून पोलिसांनी बेदम
मारलं, मग परतून ट्रकमध्ये बसून जायचं ठरवलं तर तिथेही पोलीस पोहचले. ट्रकातून
बाहेर काढून पोलिसांनी चांगलाच चोपल. मग म्हटलं चला आता चालतच निघू तर तिथेही
पोलिसांनी गाठलंच. तसच मारलं. कशी बशी पोलिसांची नजर चुकवून शहराबाहेर पडलो
एकदाचा.
दिवसाची उन्हातानात पायपीठ करायची, कोणी भाकरी
दिली तर खायची आणि महत्वाच म्हणजे भाकरीच्या बदल्यात देणाऱ्याला एक सेल्फी हि घेऊ
द्यायची. गरीब असल्याची पहिल्यांदा लाज वाटली होती. पण पोटासमोर सगळा
स्वाभिमान गळून पडला होता. चालताना पाय चांगलेच भाजून निघत होते. “साब दो
साल ये चप्पल तुटेगा नहि” या दुकानदाराच्या शब्दावर घेतलेल्या चपलेने कधीच विश्वासघात
केला होता. अनवाणी चालणच आमच्या नशिबी. अनवाणी चालत चालत तळपायाला आलेल्या फोडी
फुटून त्यातून रक्त बाहेर येत होत. मजुराच्या रक्ताने माखलेली वाट हि
स्मशानवाटच होती. पायी प्रवास करून दमलो होतो म्हणून एका ठिकाणी शांत थांबलो
होतो तर अचानक टाळ्याचा कडकडाट झाला, थाळ्याचा गजर चालू झाला आणि गो कोरोना गो करत
सुशिक्षित लोकांची मिरवणूक निघाली होती. क्षणभर वाटल कि हा थाळ्याचा गजर आमच्या
जखमांवर मीठ तर नाही ना चोळत?
पायापीठ करताना मधेच एखादा ट्रक दिसायचा मग
त्याला पाच-दोनशे रुपये देऊन पुढपर्यंत सोडायला सांगायचे. बकऱ्या कोंबतात तस
स्वतःला कोंबून घ्यायचं स्वतःच माणूसपण संपल्याची पक्की जाणीव झाली होती. असच जवळ
जवळ २०० किमी चा प्रवास झाला. कधी पायी तर कधी ट्रकने तर कधी सिमेंट
मिक्सरमधूनही.....
माझ्या सोबतचा सहमजूर चांगलाच तरुण होता. पण
त्याच्यातला त्राण हि संपत आला होता. त्याने हात टेकायला चालू केले होते. उन्हाचा
तडाखा, पोटातली भूख आणि व्यवस्थेने दिलेला दणका त्याला सहन नाही झाला. अंधाऱ्यारात्री
तो झाडाला लटकून गेला. व्यवस्थेने आणखीन एक खून केला होता. ज्या रात्री समाज घरात
दिवे लावून, फटाके फोडून कोरोनामहोत्सव साजारा करत होता तेव्हा एका मजुराच्या
घरातला दिवा मालवला होता. समाजात संपत चाललेल्या संवेदनांचा तो मालावता दिवा
प्रतिक होता. एक माणूस म्हणून किंमत शून्य झाली होती. खाटकाकड बांधलेल्या
बोकडासारखी अवस्था झाले होती आणि स्वतः माणूस असण्यावरचा विश्वास उडाला होता.
माझ्या सोबत एका तान्हुल्याची आई हि प्रवास करत
होती. त्या ५-६ महिन्याच्या बाळाला घेऊन पायीच प्रवास करत होती. स्वतः भूखी राहू
पोराला खायला घालत होती. त्या ५-६ महिन्याच्या बाळाची अवस्था पाहवत नव्हती.
भरउन्हात बाळाला उन्हापासून वाचवत ती अनवाणी भराभर पाय टाकत होती. पण माऊलीच नशीबच
फुटक होत. जगण्याच्या छळवादाने त्या बाळाची कधीच सुटका केली होती. निपचित पडलेल्या
त्या बाळाच्या मृतदेहाकडे ती माऊली स्तब्धपणे पाहत होती. एका आईने आपला बाळ गमावलं
होत आणि देश मातृदिनात मग्न होता. हेलिकॅप्टर मधून पडणारी फुल अश्रू बनून त्या
माऊलीच्या डोळ्यातून वाहत होती.
इतकेच मला जाताना सरणावर कळेल होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
भयानक वास्तव दर्शविणारा लेख आहे.
उत्तर द्याहटवावास्तव परिस्थितीचे चित्रण
उत्तर द्याहटवामांडणी व वास्तव
उत्तर द्याहटवासत्य परिस्थिती
उत्तर द्याहटवा