शनिवार, १५ जुलै, २०२३

मुलांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण.... याला जबाबदार कोण ? || Rising Suicide Rates Among Children: Who is Accountable?

 मुलांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण.... याला जबाबदार कोण ? 

apali-writergiri-blog-suicide-prevention-mental-health-awareness-


अलिकडच्या वर्षांत मुलांमधील आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक वाढणे हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. समाज या हृदयद्रावक समस्येला सामोरे जात असताना, या प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यावश्यक बनते: जबाबदारी कोणाची? हा लेख मुलांच्या आत्महत्येच्या वाढीस कारणीभूत असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करतो, विविध भागधारकांच्या भूमिकेचे परीक्षण करतो आणि आपल्या तरुण पिढीच्या कल्याणासाठी सामूहिक कृती करण्याचे आवाहन करतो.  इंटरनेशनल असोशिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन (IASP) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या २०१९ च्या संशोधनानुसार जगभरात ७लक्ष व्यक्ती एका वर्षात आत्महत्या करतात. National Crime  Recor Bureo (NCRB)  यांच्या रिपोर्ट नुसार २०२१ मध्ये भारतात  १६४०३३ जणांनी आत्महत्या केली.  २०२० च्या तुलनेने ७.२ टक्के आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यात १८ वर्षा आतील मुलांचे आत्महत्येच्या आकड्याचे प्रमाण १० हजाराहून अधिक आहे. एकूण ८ % आत्महत्या करणाऱ्या मुलं हि विद्यार्थी असतात. तसेच एकूण आत्महत्येच्या आकडेवारीच्या तुलनेने ३२% आत्महत्या हि कौटुंबिक क्लेश किंवा समजून न घेणे  या कारणास्तव असतात. 

आपण आपल्या आजूबाजूला. सोशलमिडीया  किंवा बातम्यांमध्ये अनेकदा बातमी वाचतो कि,  प्रेमात नकार मिळाला म्हणून आत्महत्या केली. दहावी, बारावी किंवा कोणत्याही परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या केली. नवीन मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केली. पिकनिकला गेलो नाही म्हणून आत्महत्या केली. मामाच्या गावी जाऊया म्हंटले म्हणून आत्महत्या केली. कमी मार्क पडले किंवा जास्त मार्क पडले म्हणून आत्महत्या केली किंवा काहीच कारण नसताना हि आत्महत्या केली ........ 

अगदी शुल्लक वाटणारी घटना किंवा गोष्ट आत्महत्येचे कारण आहे. हे वाचल्यावर मन सुन्न होऊन जाते. 

पण खरंच तेवढे एकच कारण असते का ?

मुळात आत्महत्या करण्यासाठी कधीही एकच कारण किंवा एक घटना जबाबदार नसते. आत्महत्या पूर्वीची ती शेवटची घटना एक निमित्त असू शकते पण ते मुख्य कारण असू शकत नाही हे आपल्याला समजून घेतले पाहिजे.  आत्महत्ये मागे वैद्यकीय कारणे, तसेच  नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ झाल्याची भावना देखील असते. 


आत्महत्या करण्याचा विचार नेमका का येतो ? याचे काही उदाहरणे बघू : 

१.  सीमा, वय १६ वर्षे नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने चांगला अभ्यास केला होता म्हणून  तिला ९० % मार्क्स मिळाले. मोठ्या नामी कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले पण महिन्या भरातच "कोणतेही कारण नसताना" तिने आत्महत्या केली. काही महिने झाल्यानंतर लक्षात आले कि,  महिना भर तिला कॉलेजमध्ये शिक्षकाकडून लैंगिक शोषण केले जात होते. या बाबत तिला बाहेर बोलायची हि भीती वाटत होती. घरी आईकडे कॉलेज बदलण्याबद्दल तिने विचार मांडले होते पण कॉलेजच्या नावाची प्रसिद्धी मोठी आहे सांगून आईने तिलाच कॉलेज बदलायचे नाही निर्णय देऊन टाकला होता.  तसेच बाबांसमोर तर बोलायची भीती म्हणून काहीच सांगितले नाही.  तिच्याकडे याबाबत काहीच उपाय सुचला नाही. पोलीस स्टेशन वैगरे जाणे म्हणजे बदनामी अशी भीती वाटत होती. अखेरीस तिने आत्महत्या या मार्गाची निवड केली. 

२. समीर, वय १३ वर्षे, " सुट्टीत मामाच्या गावी जाऊया." असे बोलल्यावर आत्महत्या केली.  काही महिन्यानंतर लक्षात आले कि, समीरला मामाच्या गावी काही मुलं रोज प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडवायची किंवा चेष्टा करायचे. हे त्याला अजिबात आवडत नव्हते. अनेकदा याबाबत घरी सांगूनही घरच्यांनी लक्ष दिले नाही. तरीही दर सुट्टीला त्याला त्याच गावी त्याच मुलांसमोर जाणे असह्य झाले व अखेरीस आत्महत्या या मार्गाची निवड केली.

३. प्रीती, वय १८ वर्षे, बारावीची परीक्षा सुरु होण्याआधीच आत्महत्या केली. 

प्रीतीला दहावीला ८५% मार्क्स होते. तिच्या आई - वडिलांना ती डॉकटर बनावी असे  स्वप्न होते. ते स्वप्न  पूर्ण करण्यासाठी ती जोमाने अभ्यास करत होती. पण परीक्षा सुरु होण्याआधीच आत्महत्या केली. 


अश्या प्रत्येक आत्महत्येच्या घटनेचा सखोल अभ्यास केला तर लक्षात येईल कि, त्याने किंवा तिने फक्त एका शुल्लक गोष्टीमुळे आत्महत्या नसते केलेली. त्याचे मागील काही दिवस / महिने किंवा वर्षे ती व्यक्ती  एखाद्या मानसिक त्रासातून जात असते. नकळतपणे ते आपल्याला या बाबत सूचना देखील देतात. पण शुल्लक कारण समजून त्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही.  यामुळे त्या मुलांमध्ये "आपलं कोणीच ऐकून घेणारे नाही  किंवा अपयश आले तर घरचे रागावतील. कोणीच आपल्याला समजून घेणारे नाही. " हे नकारत्मक विचार त्या मुलांसाठी एकटेपणा, नैराश्य, आणि असहाय्य्य असल्यासारखे वाटते. कोणताही मानसिक आणि भावनिक आधार न मिळाल्याने हळू हळू  सुसायडल आयडेशन सुरु होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचे  जीवन संपवून टाकण्याचे विचार येणे किंवा तशी कल्पना करणे याला मानसोपचारतज्ञ "सुसायडल आयडेशन" असे म्हणतात.  

 

यावर सर्वांना जमेल असा सोपा उपाय म्हणजे " आपल्या पाल्याचे किंवा मुलांचे बोलणे ऐकून घेणे आणि समजून घेणे." आपल्याला शुल्लक वाटणारी गोष्ट कदाचित समोरच्या व्यक्ती साठी काहीतरी भयावह असू शकते याची गंभीरता समजून घेता आली पाहिजे. 


पालकांच्या इच्छा आणि अपेक्षा या मुलांसाठी  अपेक्षेचे ओझं बनत नाही ना याचा विचार केला पाहिजे. 

शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीत असे काही गोष्टी निदर्शनास येत असतील तर त्वरित त्या विद्यार्थीशी किंवा पालकांशी गरजेनुसार चर्चा करणे महत्वाचे आहे. 

निष्कर्ष:

मुलांच्या आत्महत्येच्या वाढीला विविध भागधारकांकडून सामूहिक प्रतिसादाची गरज आहे. एकूणच समाजाने मानसिक आरोग्य आणि सुधारणेला प्राधान्य दिले पाहिजे, अशा वातावरणास प्रोत्साहन दिले पाहिजे जे मुक्त संवादाला प्रोत्साहन देते आणि मुलांसाठी पुरेशी समर्थन प्रणाली प्रदान करते. या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी शैक्षणिक संस्था, पालक, सरकार आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याला महत्त्व देणारा समाज विकसित करून, आम्ही एक सुरक्षित आणि अधिक पोषण देणारे वातावरण तयार करू शकतो जिथे तरुण जीवन संरक्षित केले जाईल आणि मुलांच्या आत्महत्येचा विनाशकारी प्रभाव कमी होईल.


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...