शुक्रवार, १ मे, २०२०

आस्तिकशिरोमणी चार्वाक- डॉ आ. ह. साळुंखे

आस्तिकशिरोमणी चार्वाक- डॉ आ. ह. साळुंखे

पुस्तक वाचण्यापूर्वी मी चार्वाक दर्शनापासून पूर्णतः अज्ञात होती.  जेव्हा चार्वाक वाचनाबद्दल मित्राने सुचविले तेव्हा चार्वाक म्हणजे मला चाणक्य- चरक असेच काहीतरी कोणीतरी असेल असे वाटले होते. चार्वाक वाचून झाल्यावर डॉ. आ ह साळुंखे यांचे युट्युब वरील भाषण पाहिले. तेव्हा त्यांच्या अनुभवातून हि चार्वाक म्हंटले कि प्रथमतः लोकांना “च” अक्षरावरून सुचणारे शब्द “चरक –चातक – चतुर-चाणक्य वैगरे वाटते. त्यांचे हे ऐकून मलाही थोडे स्वतःचे हसू आले कारण माझेही विचार प्रथमतः असेच काहीसे होते.  आज “आस्तिकशिरोमणी  चार्वाक” पुस्तकाबद्दल लिहू वाटले, कारण हे पुस्तक यातील विचार सर्वांपर्यंत पोहचावे किवा अधिकतम लोकांपर्यंत पोहचावे असे वाटले.

भारतीय संस्कृतीतील  तत्वज्ञानामध्ये  आस्तिक आणि नास्तिक असे दोन विभाग आहेत. त्यातील नास्तिक दर्शन म्हणजे नास्तिक तत्वज्ञानात सर्वप्रथम नाव “चार्वाक दर्शन” येते. त्यानंतर “ बौद्ध व जैन तत्वज्ञान” येतात.  जेव्हा भारतात तत्वज्ञानाचा अभ्यासक्रम सुरु होतो तेव्हा देखील चार्वाक दर्शनाचा उल्लेख त्यात दिसून येतो. जेव्हा हे पुस्तक वाचायला सुरवात करू तेव्हा त्या पुस्तकातील  पहिल्या प्रकरणातील पाहिले वाक्य, “चार्वाक! भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक उमदे आणि विवेकनिष्ठ, परंतु उपेक्षित आणि तिरस्कृत दर्शन...याचेच लोकायत दर्शन हे अजून एक नाव.”  चार्वाक दर्शनालाच लोकायत दर्शन देखील म्हणतात म्हणजेच  सर्वसामान्य लोकांमध्ये पसरलेले. येथे दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसोफी असा अर्थ होतो.

“नास्तिक” म्हणजे ईश्वराचे अस्तित्व मानात नाही तो नास्तिक किंवा जगाची निर्मिती ईश्वराने केलेली नाही  असे मानणारा निरीश्वरवादी अशी आजची धारणा आहे.  पण भारतीय तत्वज्ञानात आस्तिक दर्शनातील काहींनी ईश्वराचे अस्तित्व नाकारून देखील त्यांना आस्तिक म्हटले आहे. पण चार्वाक- बौद्ध – जैन यांना मात्र नास्तिक म्हटले जाते. कारण या तीन दर्शनाने  ईश्वर आणि वेद” नाकारले.  ईश्वराचे अस्तित्वापेक्षा वेदाचे अस्तिव अमान्य करणे म्हणजे नास्तिक. वेदाची चिकित्सा केली म्हणून नास्तिक.

“आस्तिकशिरोमणी  चार्वाक” या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय संकृतीतील संघर्ष आपल्याला ध्यानात येईल. चार्वाक दर्शनाने वेद प्रामाण्य नाकारले. चार्वाक प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान  म्हणजे पंचेंद्रिय आणि अनुभव मानणारे वैज्ञानिक विचारांचे तत्वज्ञ होते. हजारो वर्षांची परंपरा जपण्यापेक्षा आपला अनुभवावर विश्वास ठेवा.  सत्याचा शोध अनुभवावर असतो असे मानणारे होते. चार्वाकाच्या मते देहातील चैतन्य म्हणजे आत्मा.  आत्मा आणि देह वेगळा नाही. देह संपला कि आत्मा संपला असे मानणारा होता. स्वर्ग- नरक – मोक्ष- पुनर्जन्म या विचारांना त्यांनी नकार दिला. स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष मानणारा. चार्वाकाने धर्म देखील नाकारला. त्याने धार्मिक सिद्धांतावर हल्ला केला. यज्ञ व चातुवार्णाला विरोध केला. स्त्री व काम विषयक वास्तव विचार मांडणी केली. चार्वाक दर्शन एक वास्तववादी  जीवन दृष्टी आहे.  आपण जगण्यासाठी जन्माला आलो आहोत म्हणून जीवनात येणाऱ्या समस्या सोडवायच्या असतात. मृत्यू अटळ आहे म्हणून तो जीवनाचा उद्देश ठरू शकत नाही. जीवन जगण्यासाठी अति मानवी शक्तीची गरज नाही, तर मानवनिर्मित आणि विवेकाधिष्ठित समाजव्यवस्था महत्वाची आहे.

म.फुले, सोक्रेटीस, गेलेलिओ इ. चा जसा छळ झाला. तसा चार्वाकाला कडाडून विरोध आणि छळवाद  सोसावा लागला. त्याची बदनामी केली गेली. “ कर्ज काढून तूप पिण्याईतके समर्थ व्हा” या वक्तव्याचा मूळ अर्थ न समजून घेता. बेजबाबदार असा शिक्का मोर्तब करण्यात आला. चार्वाकाचे विवेकी चिकित्सा करणारे विचार लोकांपर्यंत पोहचू नये म्हणून विरोधाकाकडून अनेक प्रयत्न केले गेले.  तरीही चार्वाकाचे विचार हे इतके वास्तववादी – हितकारक –प्रयोगशील होते कि ते काळाच्या ओघात समोर येऊ लागले.

चार्वाक दर्शनातून नवा समाज निर्माण करण्याचा मार्ग दिसतो. म्हणून चार्वाक दर्शनाला नास्तिकशिरोमणी म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. चार्वाक दर्शन जीवनावर अपार प्रेम करणारे आस्तिकशिरोमणी आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे यांचे “आस्तिकशिरोमणी  चार्वाक” म्हणजे एका वाक्यात अर्थ समजून घ्यायचा असेल तर   “चार्वाकाचे विवेक विचार म्हणजे चांगल्या गोष्टी वेचून घेण.”



लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 
amkar.anju@gmail.com 

६ टिप्पण्या:

  1. lockdown samplya vr nakki he pustak vachen. khup chan saransh lihila ahe.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद... मनापासून तुमचे आभार मानते. 🙏🏻🙏🏻...
    मला चार्वाक म्हणजे काय किंवा चार्वाकाची संकल्पना तसेच, नेमका चार्वाक कोण आहे हे मुळातच कळत नव्हतं... तुम्ही सांगितलेल्या सारांश्यामुळे मला थोडं तरी कळलं आहे..!

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...